08 January, 2026

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहीबजी 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून तयारीचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 08 : नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रविंद्र पत्की, नायब तहसीलदार एन. पी. वाघुंडे, नर्सी नामदेव येथील गुरुद्वाराचे गुरपियार सिंग, सतवनसिंग चव्हाण, श्रीरंग राठोड, एन. जी. वैष्णव, प्रशांत गव्हाणे, प्रशांत भगत तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. शिक्षण विभागाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करावे तसेच या कार्यक्रमाची व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी जनतेमध्ये प्रचार व प्रसिद्धी करावी, अशा सूचना देण्यात आल्या. उद्योग विभागाने विविध उद्योजकांमार्फत अन्नछत्रालय सुरू करणे, भाविकांना ने-आण करण्यासाठी वाहनांची मोफत व्यवस्था करून देणे, अन्नछात्रालय सुरु करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नांदेड येथे जाणाऱ्या भाविकांसाठी रथमार्ग निश्चित करणे तसेच हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची संख्या कळविण्याबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. यावेळी रथयात्रा जिल्ह्यातून जाणार असून, या रथयात्रेमध्ये सर्व नऊ समुदायातील भाविकांचा सहभाग राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सर्व नऊ समुदायातील मान्यवरांकडून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून शिक्षण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रसार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यामध्ये स्टीकर, प्रभात फेरी, शाळांमध्ये सतींदर सिंह यांचा व्हिडीओ दाखविणे तसेच श्री गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या शहीदी समागमाविषयी विविध स्पर्धांचे आयोजन करून व्हिडीओ व छायाचित्रांच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातून नांदेडकडे पदयात्रा अथवा इतर कार्यक्रमांचे नियोजन असल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला कळविण्यात यावी. यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या तात्काळ देण्यात येतील. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. तसेच हिंगोली जिल्ह्यातून नांदेडकडे जाणाऱ्या भाविकांच्या रथमार्गाचे योग्य नियोजन करावे, गुरुद्वारा समितीशी समन्वय साधून त्यांच्या सूचनांनुसार कामांची विभागणी करावी. जिल्ह्यातील सिख - सिकलिगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाज या सर्व नऊ समाजातील भाविकांना नांदेड येथे पोहोचणे, जेवण, राहण्याची व्यवस्था, जाण्या-येण्याचे नियोजन तसेच प्रचार व प्रसिद्धी या सर्व बाबींमध्ये योग्य समन्वय ठेवून सामूहिक जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. *******

No comments: