हिंगोली (जिमाका), दि. ६ : स्मार्ट प्रकल्पांतर्गत टीएसए (Palladium) यांच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांच्या प्रशिक्षण सहभागृहात करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेची प्रस्तावना जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्टचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड यांनी केली.
या कार्यशाळेत समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळांना व्यवस्थापन कौशल्य विकास या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, लातूरचे कृषी व्यवसाय सहयोगी मंगेश लाभांडे यांनी व्यवस्थापन कौशल्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच अन्न सुरक्षा विषयावर विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, लातूरचे अन्न सुरक्षा अधिकारी सचिन कच्छवे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध समुदाय आधारित संस्थांच्या महिला संचालक मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, जिल्हा समन्वयक गजानन खिरोडकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व समुदाय आधारित संस्थांचे संचालक उपस्थित होते.
महिला संचालक मंडळाच्या माध्यमातून समुदाय आधारित संस्थांचे प्रभावी व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता वाढविणे, व्यवसायवृद्धी तसेच मूल्यसाखळीच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.
कार्यशाळेच्या समारोपावेळी पुरवठा व मूल्यसाखळी तज्ज्ञ तथा कृषी व्यवसाय सल्लागार जी. एच. कच्छवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*******



No comments:
Post a Comment