Showing posts with label आरोग्य. Show all posts
Showing posts with label आरोग्य. Show all posts

23 August, 2026

एड्स नियंत्रणातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस व जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांचा गौरव

हिंगोली, दि. २३ (जिमाका) : एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन २०२५’मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांचा आज राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त (शहरी विभाग) तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांच्या हस्ते डॉ. तडस आणि श्री. चौधरी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाकडून एड्स प्रतिबंध व जनजागृतीसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांची राज्यस्तरावर यापूर्वीही दखल घेण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय एड्स नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या ‘इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन २०२५’मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंगोलीच्या कार्याची पुन्हा एकदा राज्यस्तरावर नोंद झाली असल्याचे श्री.चौधरी म्हणाले.