27 April, 2024

हिंगोली लोकसभा मतदार संघात 63 टक्के मतदान

• किनवट विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान • हिंगोलीतील मतदारांचा शेवटचा क्रमांक • पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी हिंगोली,(जिमाका) दि.27: हिंगोली लोकसभा मतदार संघात शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 63.54 टक्के मतदारांनी मतदान केले, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 62.54, हदगाव 65.53, हिंगोली 59.92, कळमनुरी 63.60, किनवट 65.86 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात 64.37 टक्के मतदान झाले आहे. ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली, श्री. कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री. आर. जयंथी आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये विधानसभानिहाय एकूण मतदार आणि झालेले मतदान याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 82-उमरखेड विधानसभा मतदारसंघात 1 लाख 96 हजार 728 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 1 लाख 5 हजार 984 पुरुष, 90 हजार 743 महिला तर एका तृतीयपंथी मतदारामध्ये समावेश आहे. 83-किनवट विधानसभा मतदार संघात 1 लाख 77 हजार 258 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये 93 हजार 655 पुरुष, 83 हजार 601 महिला, तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 84-हदगाव विधानसभा मतदार संघात 1 लाख 90 हजार 338 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 2 हजार 997 पुरुष, 87 हजार 338 महिला आणि 3 तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा विधानसभा मतदार संघनिहाय तपशीलपुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 94 हजार 89 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 7 हजार 691 पुरुष, 86 हजार 397 महिला तर एका तृतीयपंथी मतदाराने आपल्या मताचे दान उमेदवाराच्या पारड्यात टाकले. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 2 हजार 845 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 11 हजार 196 पुरुष, 91 हजार 648 महिला व एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असून त्यामध्ये 1 लाख 93 हजार 700 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 6 हजार 781 पुरुष, 86 हजार 918 महिला आणि एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या 18 लाख 17 हजार 734 मतदारांपैकी 11 लाख 54 हजार 955 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 6 लाख 28 हजार 302 पुरुष, 5 लाख 26 हजार 644 महिला आणि 9 तृतीयपंथी मतदारांने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची एकूण टक्केवारी पाहता 83-किनवट विधानसभा मतदार संघ (65.86 टक्के) अव्वलस्थानी राहिला असून हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान (59.92 टक्के) सर्वात कमी राहिले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात 25 तृतीयपंथी मतदारांपैकी 9 जणांनी या राष्ट्रीय कर्तव्यात आपला सहभाग नोंदवला. किनवट विधानसभा मतदारसंघाच्या सहायक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी श्रीमती कावली मेघना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी, श्रीमती क्रांती डोंबे, डॉ. सचिन खल्लाळ, डॉ. सखाराम मुळे, अविनाश कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश महाडीक, समाधान घुटूकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुखांनी प्रयत्न केले. निवडणुकीचा दुसरा टप्पा देशात दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यात विदर्भातील यवतमाळ-वाशीम, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा या पाच आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. *****

जिल्हा हिवताप कार्यालयात जागतिक हिवताप दिन साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील जिल्हा हिवताप कार्यालयात नुकताच जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. जागतिक हिवताप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, तसेच आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी जागतिक हिवताप दिन व राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासून होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. सर्वांनी एकाच वेळी एकदिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषित केला आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आणि जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या वर्षाचे घोषवाक्य ‘मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी’ असे आहे. भारतामध्ये सन 2016 ते 2030 पर्यंत हिवताप दूरीकरण करण्याचे लक्ष ठरविले आहे, त्याबाबतचे ध्येय व नियोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावे, हिवताप आजार होऊ नये यासाठी आपले घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा, घरातील पाणी साठ्यांना घट्ट झाकणे लावावीत, घरावरील, घराभोवती पडलेले भंगार सामानाची विल्हेवाट लावावी, घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे हिवताप आणि त्याचा प्रसार हिवताप हा आजार प्लाझमोडीअम या परोपजीवी जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादीमार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे 30 ते 50 कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. डासांची उत्पत्ती ही स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते. हिवतापाचा प्रसार अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या यकृतमध्ये जात त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला ताप येते. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम डासांच्या नियंत्रणासाठी घरगुती वापरातील पाण्याचे हौद, टाक्या, बॅरल, रांजण, आठवड्यातून किमान एकदा पुसून कोरडे करावेत. त्यांना घट्ट झाकणे बसवावीत, कापडाने बांधावीत. डबकी बुजावीत, पाणी वाहते करावे, साठलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत. घरातील भंगार सामान निरुपयोगी टायर्सची विल्हेवाट लावावी. कुलर, चायनीज प्लँट व फ्रिजचा ड्रीप पॅन स्वच्छ ठेवावा. शौचालयाच्या नादुरुस्त सेप्टीक टँक दुरुस्त कराव्यात. शौचालयाच्या व्हेन्ट पाईपला जाळी बसवावी अथवा कापड बांधावे. वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा. ताप आल्यास रक्त नमुना तपासून घ्यावा. आवश्यक औषधोपचार घ्यावा. हिवतापाने निदान व औषधोपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. हिवताप नियंत्रणासाठी हिवताप निदान व उपचार महत्वाचे आहेत. अॅनाफिलिस डासांमुळे हिवतापाचा प्रसार होतो. हे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात. उदा. पाण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या, डबके, छतावरील पाणी, भातशेतीतील पाणी कॅनॉल, नदी, नाले, ओबे, इत्यादी. अॅनाफिलिस द्वारा एडीस डासांमुळे या आजारांचा प्रसार होतो. हे डास घरगुती स्वच्छ पाण्यात म्हणजेच हौद, बॅरल, रांजण, पाण्याच्या टाक्या, पायनिज प्लॅट डेस कुलर, फ्रिजचा दिप सामान टावरमध्ये साठलेले पाणी यामध्ये तयार होतात. एडीस डास, क्युसेक्स डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. हे डास शौचालयाच्या सेप्टीक टँक, तुंबलेली गटारे, ड्रेनेज लाईन, अस्वच्छ पाण्यात तयार होतात. हिवतापाची लक्षणे व औषधोपचार थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, ताप नंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात. याबाबत प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करावी. हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासून करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतू आढळतात. ताप आलेल्या प्रत्येक रुग्णाने आपला रक्त नमुना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासून घ्यावे. हिवताप दूषित रक्त नमुना आढळून आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळ्याचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशीपोटी घेऊ नये. गर्भवती स्त्रियांनी प्रायमाक्वीन औषधी घेऊ नये व शून्य ते एक वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देऊ नये. हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. आतील बाजू व तळ घासूनपुसून कोरड्या करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणीने झाकून ठेवावेत. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी आदीची वेळीच विल्हेवाट लावा. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. *********

26 April, 2024

निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांची पहाटेच मतदान केंद्राला भेट

• निवडणूक खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली यांनी केली सखी मतदान केंद्राची पाहणी हिंगोली (जिमाका), दि. 26 : लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज पहाटे 5.45 वाजता सरजू देवी भिकुलाल आर्य कनिष्ठ महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रावर जावून निवडणूक यंत्रणेच्या तयारीची पाहणी केली. तसेच श्रीमती अर्चना व निवडणूक खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली यांनी ही सिटी क्लब येथील सखी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती एम.एस.अर्चना यांनी यावेळी सिटी क्लब येथील मतदान केंद्र क्र. २८६ येथील महिला कर्मचारी संचालित सखी मतदान केंद्रवरील पॉईंटवर सेल्फी घेत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. याशिवाय त्यांनी माणिक स्मारक येथील दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदान केंद्राचीही भेट देत पाहणी केली. *****

हिंगोली लोकसभा मतदार संघात अंदाजे 62.67 टक्के मतदान

• निवडणूक विभागाची 1026 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर • पोलिस विभागाचा मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त • आदर्श सखी, युवा आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रांचे संचलन हिंगोली, (जिमाका) दि.26: हिंगोली लोकसभा मतदार संघात 33 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज मतदारसंघात 2008 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 18 व्या लोकसभा निवडणुकीत आज अंदाजे 62.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. हिंगोली लोकसभा मतदार संघातील वसमत विधानसभा मतदार संघ 60, हदगाव 66, हिंगोली 60, कळमनुरी 63, किनवट 65 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात अंदाजे 62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 77 हजार 734 मतदार असून, त्यामध्ये 9 लाख 46 हजार 674 पुरुष तर 8 लाख 71 हजार 35 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 25 मतदारांचा यात समावेश आहे. निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना, निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती आर. जयंथी यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर हे दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 1026 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. संपूर्ण लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांनी सतत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहातील वॉर रुममध्ये उपस्थित होते. तत्पूर्वी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनीही वॉर रूमला भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पापळकर यांनी दिली आहे. या सर्व मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. मतदान प्रक्रिया (मॉक पोल) सुरू असतानाच 39 मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून तातडीने मतदान यंत्र बदलवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना प्रोत्साहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. त्यासाठी स्वीपच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य, आई-बाबांना पत्र, लोकशाहीचं लग्न असे विविध उपक्रम राबवून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. *****

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

• जिल्हाधिकारी यांनी घेतली सेल्फी • लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्यासाठी केले आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आज दि. 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथील सिटी क्लब येथे उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले आहे. तेंव्हा आपणही आपले मतदान करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी येथील मतदान केंद्रावर असलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. सखी मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यापैकी हिंगोली येथील हे मतदान केंद्र महिलाद्वारे संचालित सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी, पोलीस, परिचारिका यांसह सर्वच महिला कर्तव्यावर आहेत. या मतदान केंद्रावर फुग्याचे डिझाईन करुन, रांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ******

25 April, 2024

निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांच्याकडून पुसेगाव, पहेनी येथील मतदान केंद्राची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 25 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी आज हिंगोली विधानसभा मतदार संघातील पुसेगाव, पहेनी येथील मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निरीक्षकांसोबत सहायक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, शिवाजी रोडगे, शेख मुजीब, पोलीस पाटील राधेशाम जैस्वाल उपस्थित होते. हिंगोली लोकसभा मतदार आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे प्रथमोपचार, दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी यासह आवश्यक त्या सर्व सुविधांची माहिती श्री. अन्वर अली यांनी घेतली. ******

निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांच्याकडून यंत्रणेचा आढावा

• मतदार संघाच्या सीमांवर काटेकारेपणे तपासणी करण्याचे निर्देश • अचूक नोंदीवर निवडणूक विभागाचा विशेष भर हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूकविषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून खर्चाच्या अचूक नोंदी ठेवण्याच्या सूचना खर्चाचे निवडणूक निरीक्षक अन्वर अली यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत दिल्या. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे पथक प्रमुख माधव झुंजारे, दिगंबर माडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त दीपक खंदारे, जिल्हा माध्यम व सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख प्रभाकर बारहाते, संपर्क अधिकारी गणेश वाघ आदी उपस्थित होते. राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक ठेवाव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. अभिरुप नोंदवहीतील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. तसेच एसएसटी आणि एफएसटी या पथकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. निवडणूक कालावधीमध्ये तपासणी नाक्यांवर तपासणी करताना कोणतीही दिरंगाई करू नये, कर्तव्यावर असलेल्या पथक प्रमुख आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी यावेळी दिले. लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मतदार संघात मद्य वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना श्री. अन्वर अली यांनी दिल्या. लोकसभा मतदार संघात कोठेही संशयास्पद अवैध मद्य विक्री व साठा, रोख रक्कमेचे वितरण, विविध साहित्य वाटप यासारखे अनुचित प्रकार होणार नाहीत, यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्थिर संनियंत्रण (एसएसटी) पथकामध्ये वस्तू व सेवा कर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग व पोलीस विभागाने लक्ष ठेवावेत. सीमेवर येणाऱ्या वाहनाची कसून तपासणी करावी. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश श्री. अन्वर अली यांनी दिले. तसेच जिल्हास्तरीय माध्यम व सनियंत्रण समिती पथक प्रमुखाने एकही पेड न्यूज नसल्याचे सांगितले. ********