27 April, 2018


डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड माडर्नायझेशन प्रोग्रॅम

हिंगोली, दि.27: राज्यात केंद्र शासन पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड माडर्नायझेशन प्रोग्रॅम (DILRMP) कार्यान्वित असून त्याअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी ई-फेरफार आज्ञावली विकसित केली आहे. राज्यातील ई-फेरफार आज्ञावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी स्टेट डाटा सेंटर या ठिकाणी स्थापित केलेला हिंगोली जिल्ह्यातील अधिकार अभिलेखाचा अद्यावत डाटा हा मुळ हस्तलिखित अभिलेखाशी तंतोतंत (100 टक्के) जुळविण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 698 गावापैकी 697 (99 टक्के) गावांतील संगणकीकृत गा. न. नं. सातबारा (7/12) अद्यावत करण्यात आले आहेत.
ई-फेरफार प्रकल्पांतर्गत अचूक गा. न. नं. सातबारा (7/12) व 8 अ साठी घेण्यात आलेल्या चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेत प्राप्त आक्षेप / तक्रारी व तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यात आलेल्या संगणकीकृत गा. न. नं. सातबारा (7/12) चे डिजीटल स्वाक्षरी युक्त सातबारा (7/12) (DSP-RoR) चे लोकार्पण सोहळा जिल्हास्तरावर मा. पालकमंत्री महोदय यांचे हस्ते दि. 01 मे, 2018 रोजी करण्यात येणार आहे.
तसेच डिजीटल स्वाक्षरी युक्त गा. न. नं. सातबारा (7/12) (DSP-RoR) चे काम पुर्ण (एकूण सातबारा (7/12) संख्येच्या 90 टक्के) करणाऱ्या संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना मा. मंत्री (महसूल), मा. राज्यमंत्री (महसूल) व मा. प्रधान सचिव (महसूल) यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देऊन जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 01 मे, 2018 रोजी मा. पालकमंत्री महोदय यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.
*****


विधान परिषद निवडणुक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी         
हिंगोली, दि.27: निवडणूक आयोगाने जिल्ह्यात विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच सर्व यंत्रणांनी मतदारांना प्रभावित करणाऱ्या बाबींबाबत सतर्क रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आदर्श आचार संहितेबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. घुले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
श्री. भंडारी म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात यावे.  आचारसंहितेचा भंग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणूक प्रक्रीयेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसमवेत कोणत्याही बैठकीत सहभागी होऊ नये. महत्वाच्या बैठकीबाबत पूर्वपरवानगी घेण्यात यावी. निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत धोरणात्मक निर्णय जाहीर करू नये.
मतदानाच्या दिवसापर्यंत आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी भरारी पथकाद्वारे अवैध अशा गोष्टींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देशही दिले.  भरारी पथकाद्वारे वाहनाची तपासणी करण्यात यावी. मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जाणार नाही याकडे ही विशेष लक्ष देण्यात यावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत माहिती देण्यात यावी. मतदान प्रक्रीया मतपत्रिकेद्वारे आणि पसंतीक्रमानुसार होणार आहे, अशी माहिती त्यांनी  दिली. तसेच जिल्ह्यात येणाऱ्या विविध मार्गावर भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. वाहनातून रोख रक्कम अथवा मद्याची वाहतूक होणार नाही याविषयी दक्षता घेण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
            महाराष्ट्र विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -2018 निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला, असून त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे दि. 20 एप्रिल, 2018 अन्वये सदर निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे कळविले आहे. त्यानुसार परभणी-हिंगोली विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक -2018 या निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
     अधिसुचना जाहीर करण्याचा दि. 26 एप्रिल 2018 (गुरुवार), 2) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची दि. 3 मे 2018 (गुरुवार), 3) नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे दि. 4 मे, 2018 (शुक्रवार) 4) उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेणे. दि. 7 मे, 2018 (सोमवार),5) मतदानाचा दि. 21 मे, 2018 (सोमवार), 6) मतदानाची वेळ सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 पर्यंत. 7) मतमोजणी दि. 24 मे 2018 (गुरुवार), 8) मतदान प्रक्रिया पूर्ण होईल तो दि. 29 मे,2018 (मंगळवार)     
          उपरोक्त निवडणूक प्रक्रियेसाठी परभणी-हिंगोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी  पी. शिवाशंकर हे काम करीत आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्याचे आचार संहिता कक्ष प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण हे काम पाहात आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांवरील जबाबदाऱ्यांबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. बैठकीस तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, सदर कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02456-221456 आहे.
*****

सन 2017-18 चे जिल्हा क्रीडा पुरस्कार व जिल्हा युवा पुरस्कार जाहिर 1 मे महाराष्ट्र दिनी पुरस्कारांचे वितरण


सन 2017-18 चे जिल्हा क्रीडा पुरस्कार व जिल्हा युवा पुरस्कार जाहिर
1 मे महाराष्ट्र दिनी पुरस्कारांचे वितरण
हिंगोली, दि.27:  क्रीडा विभागाच्या  वतीने दरवर्षी  गुणवंत खेळाडू , गुणवंत क्रीडा  मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा  कार्यकर्ता/ संघटक पुरस्कार  जिल्हाधिकारी , हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली  पुरस्कार निवड समितीने खालील पुरस्कार जाहिर केले आहेत .
गुणवंत खेळाडू (महिला)- कु. चव्हाण  शितल सुरेश  या खेळाडूने  कुस्ती  खेळात  महाराष्ट्र  राज्य कुस्तीगीर  परिषद  तसेच  राज्यस्तरावरील प्राविण्य  प्राप्त  केले असून पुरस्काराचे स्वरुप  रु. 10 हजार , स्मृतिचिन्ह  आणि प्रमाणपत्र असे राहील .
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक – श्री . रामप्रकाश  माधवराव  व्यवहारे – पुरस्कारासाठी  पात्र ठरले असून  यांनी मैदानी खेळात राज्य , राष्ट्रीय  खेळाडू घडविले आहेत. त्यांन देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप रु. 10 हजार , स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे राहील.
गुणवंत  क्रीडा कार्यकर्ता/ संघटक -श्री. शिवाजी  श्रावण इंगोले हे पुरस्कारासाठी पात्र ठरले असून त्यांना देण्यात येणारे पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये 10 हजार , स्मृतिचिन्ह  आणि प्रमाणपत्र असे राहील.
जिल्हा युवा पुरस्कार:-जिल्हा य़ुवा संस्था पुरस्कारासाठी सद्भाव सेवाभावी संस्था, परभणी ही संस्था पात्र ठरली असून संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार भारतीया यांना पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. या संस्थेने हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात युवा विकास कामे, सामाजिक कामे, सांस्कृती संबंधीत कार्य, सामाजिक कार्य, दुर्बल घटक जातीचे कार्य करणे, शिक्षण क्षेत्रात कार्य, आरोग्य संबंधीचे कार्य, पर्यावरण संबंधीचे कार्य, क्रीडा संबंधीचे कार्य, युवकांच्या सर्वांगिण विकासाचे कार्य इ. कामे केलेले आहेत. पुरस्काराचे स्वरुप रु. 50 हजार, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे आहे.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा पुरस्कार निवड समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, चंदा रावळकर, जिल्हा युवा समन्वयक, नेहरु युवा केंद्र   प्रा. बंकट नंदलाल यादव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश नामदेवराव गंगावणे, जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते, श्री. संतोष फुफाटे, क्रीडा अधिकारी यांच्या समितीने सदर पुरस्कार जाहिर केले आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक ( क्रीडा पुरस्काराकरीता 10 हजार ,  जिल्हा युवा पुरस्कार संस्थेकरीता 50हजार) असे असून सदर पुरस्काराचे वितरण मा. पालकमंत्री महोदय, हिंगोली यांच्या हस्ते दि. 01 मे 2018 रोजी प्रदान करण्यात येणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी  नरेंद्र पवार यांनी कळविले आहे .
000000


किसान कल्याण कार्यशाळेचे 2 मे रोजी आयोजन


किसान कल्याण कार्यशाळेचे 2 मे रोजी आयोजन

हिंगोली,दि.27:- शेती  हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे शेतीची उत्पदकता वाढवणे, उत्पन्न वाढविणे तसेच शेतकरी स्वयंनिर्भर होण्याच्या दृष्टीने अनेक केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना राज्यामध्ये राबविल्या जातात. तथापि, या योजनांची एकत्रितरित्या माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचत नसल्यामुळे अनेक शेतकरी सदर योजना पासून वंचित राहतात. त्यामुळे शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी दि.02 मे 2018 रोजी हिंगोली जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये किसान कल्याण कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेत कृषि विभाग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय, जलसंधारण विभाग, रेशीम विभाग तसेच सहकार व पणन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तसेच कृषि व फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी पालन, कुकूट पालन, रेशीम शेती, बिजोत्पादन अशा अनेक विषयावर प्रगतशील शेतकरी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.
यावेळी जिल्हयातील प्रगतशिल शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे लघुपट (Documentary) दाखविण्यात येणार आहेत. तसेच कृषि व कृषि पुरक व्यवसायामध्ये उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
तरी सर्व शेतकऱ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  व्ही.डी. लोखंडे  व प्रकल्प संचालक आत्मा एम.डी.जाधव यांनी केले आहे.
00000

एचएचटी सीईटी परीक्षा 10 मे रोजी जिल्ह्यातील 15 उपकेंद्रांवर 3,569 परीक्षार्थी देणार परीक्षा परीक्षा केंद्रावर 1973 चे कलम 144 लागू


एचएचटी सीईटी परीक्षा 10 मे रोजी
·   जिल्ह्यातील 15 उपकेंद्रांवर 3,569 परीक्षार्थी  देणार परीक्षा
·   परीक्षा केंद्रावर 1973 चे कलम 144 लागू

        हिंगोली, दि.27: महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात एकाच वेळेस अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी)  व फार्म डी. तसेच कृषी विज्ञान व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (MHT-CET परीक्षा  2018) दिनांक 10 मे, 2018 रोजी सकाळी 09.00 ते सांय. 05.00 पर्यंत या वेळेत हिंगोली जिल्हा मुख्यालयी 15 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 15 उपकेंद्रांवर जिल्ह्यातील एकूण 3,569 परीक्षार्थी  परीक्षा देणार आहेत. सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षेत बसण्याच्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दूरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तू, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास  अथवा स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रावरील कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती  हाताळण्यासाठी परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, परीक्षा केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
                सदर परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे मोबाईल फोन/दूरसंचार साधनासह शासनामार्फत बंदी घातलेले इतर कोणतेही साहित्य आढळून आल्यास तसेच कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द  फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्व संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी .
                तसेच सदर परीक्षेची पूर्व तयारी बाबतचे पहिले प्रशिक्षण दिनांक 26 एप्रिल, 2018 रोजी घेण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणास उपकेंद्र प्रमुख 04, पर्यवेक्षक 23, समवेक्षक 37 हे गैरहजर असल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच उपरोक्त गैरहजर उपकेंद्र प्रमुख/ पर्यवेक्षक/ समवेक्षक दुसऱ्या प्रशिक्षणास हजर न झाल्यास त्यांच्याविरुध्द प्रशासकीय कार्यवाही करण्यात  येणार आहे, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे .

0000

26 April, 2018

जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 26 :  जिल्ह्यात दिनांक 30 एप्रिल रोजी बौध्द पौर्णिमा  असून दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन  व दिनांक 10 मे रोजी एम.एच.टी.सी.ई.टी. 2018 ची परीक्षा आहे.  तसेच शिक्षकांचे आंदोलन ,मराठा आरक्षण  व तसेच  आरोग्य  कर्मचाऱ्यांचे  धरणे  आंदोलन तसेच दिनांक  30 एप्रिल पर्यंत डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  यांची जयंती साजरी होत आहे . तसेच जम्मू काश्मिर राज्यातील कठुआ  व उत्तरप्रदेश  मधील उन्व येथे केलेल्या अमानुष  बलात्काराच्या निषेधार्थ  धरणे आंदोलने , मुकमोर्चे व रास्ता रोको  सारखे प्रकार घडत  आहेत. त्यामुळे  विविध संघटनांमध्ये  तीव्र  असंतोषाचे वातावरण आहे.
तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव , शेतकऱ्यांना  वीज जोडणी , लोडशेडींग अशा वेगवेगळ्या  प्रश्नांमुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको अशा विविध  प्रश्न हाताळण्यासाठी  व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता  संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 26 एप्रिल  रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 10 मे 2018 रोजीचे  24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील याउद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000