27 April, 2018


विधान परिषद निवडणुक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी         
हिंगोली, दि.27: निवडणूक आयोगाने जिल्ह्यात विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच सर्व यंत्रणांनी मतदारांना प्रभावित करणाऱ्या बाबींबाबत सतर्क रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले.
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आदर्श आचार संहितेबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. घुले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
श्री. भंडारी म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात यावे.  आचारसंहितेचा भंग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. निवडणूक प्रक्रीयेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसमवेत कोणत्याही बैठकीत सहभागी होऊ नये. महत्वाच्या बैठकीबाबत पूर्वपरवानगी घेण्यात यावी. निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत धोरणात्मक निर्णय जाहीर करू नये.
मतदानाच्या दिवसापर्यंत आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी भरारी पथकाद्वारे अवैध अशा गोष्टींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देशही दिले.  भरारी पथकाद्वारे वाहनाची तपासणी करण्यात यावी. मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जाणार नाही याकडे ही विशेष लक्ष देण्यात यावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत माहिती देण्यात यावी. मतदान प्रक्रीया मतपत्रिकेद्वारे आणि पसंतीक्रमानुसार होणार आहे, अशी माहिती त्यांनी  दिली. तसेच जिल्ह्यात येणाऱ्या विविध मार्गावर भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. वाहनातून रोख रक्कम अथवा मद्याची वाहतूक होणार नाही याविषयी दक्षता घेण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
            महाराष्ट्र विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -2018 निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला, असून त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे दि. 20 एप्रिल, 2018 अन्वये सदर निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे कळविले आहे. त्यानुसार परभणी-हिंगोली विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक -2018 या निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
     अधिसुचना जाहीर करण्याचा दि. 26 एप्रिल 2018 (गुरुवार), 2) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची दि. 3 मे 2018 (गुरुवार), 3) नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे दि. 4 मे, 2018 (शुक्रवार) 4) उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र मागे घेणे. दि. 7 मे, 2018 (सोमवार),5) मतदानाचा दि. 21 मे, 2018 (सोमवार), 6) मतदानाची वेळ सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 पर्यंत. 7) मतमोजणी दि. 24 मे 2018 (गुरुवार), 8) मतदान प्रक्रिया पूर्ण होईल तो दि. 29 मे,2018 (मंगळवार)     
          उपरोक्त निवडणूक प्रक्रियेसाठी परभणी-हिंगोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी  पी. शिवाशंकर हे काम करीत आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्याचे आचार संहिता कक्ष प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण हे काम पाहात आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांवरील जबाबदाऱ्यांबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. बैठकीस तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, सदर कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02456-221456 आहे.
*****

No comments: