30 March, 2024

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला टपाली मतपत्रिकांचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया वेग घेत असून, आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक अधिकारी तथा पथकप्रमुखांकडून टपाली मतपत्रिकांचा आढावा घेतला. अपर जिल्हाधिकारी तथा पथक प्रमुख खुशालसिंह परदेशी, जिल्हा सांख्यिकी एस. एम. रचावाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, तहसीलदार नवनाथ वगवाड, पोलीस निरीक्षक व्ही. टी. गुट्टे हे प्रत्यक्ष तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक अधिकारी उपस्थित होते. टपाली आणि इलेक्ट्रॉनिकली टपाली मतपत्रिका प्रणालीबाबत आढावा घेतना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पापळकर यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये मतदारसंघातील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदारांच्या संख्या पुन्हा तपासून त्याची सुधारित यादी येत्या 4 एप्रिलपर्यत पाठविण्याचे निर्देश दिले. अत्यावश्यक सेवेतील वाहक व चालकांबाबत मतदान केंद्रांवर जाणाऱ्या बससाठी नमुना 12 अ तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या बसचे वाहक - चालकांसाठी नमुना 12 डी द्यावा. तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील, पोलीस अधिकारी –कर्मचारी, बाहेर जिल्ह्याचे निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी –कर्मचारी मतदारांबाबतही अशीच कार्यवाही करण्याच्या सहायक निवडणूक अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना दिल्या. बाहेर जिल्ह्यातील निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी –कर्मचारी यांना नमुना 12 वितरीत करणे, विधानसभा निहाय यादी तयार करून वेगवेगळे लखोटे तयार करणे व ते सर्व एका लखोट्यात सहा मतदारसंघाचे सहा लखोटे टाकणे, हे सर्व लखोटे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. हदगाव, किनवट, उमरखेड आणि वसमत या विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी टपाली मतपत्रिका उपकोषागार कार्यालयात ठेवण्याचे प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सहायक निवडणूक अधिकारी यांनी नमुना 12 अ ला अनुक्रमांक देणे, विधानसभा मतदार संघनिहाय अर्जाची विभागणी करून ते स्वतंत्र सीलबंद लिफाफ्यात ठेवून संबंधित विधानसभा मतदार संघाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधितांना यावेळी दिल्या. *****

निवृत्ती वेतन धारकांचे मासिक वेतन यापुढे ई-कुबेर प्रणालीमार्फत

• मार्चचे मासिक निवृत्ती वेतन 10 एप्रिलपर्यंत होईल हिंगोली, दि. 30 (जिमाका) : जिल्हा कोषागार कार्यालयातून सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे मासिक निवृत्ती वेतन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिजर्व बँकेतून थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. निवृत्ती वेतन धारकांनी वेतन जमा करण्यासाठी दिलेल्या बँक खात्यातील आयएफएससी कोडनुसारच जमा होईल. कोषागार कार्यालयाच्या विना परवानगीने परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात अथवा इतर बँकेत बदलले असल्यास अशा निवृत्ती वेतन धारकांचे वेतन जमा होण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे निवृत्ती वेतन धारकांनी बँकेत अथवा बँक खात्यात बदल न करता त्यांचे मूळ बँक खातेच सुरु ठेवावे. भविष्यात निवृत्ती वेतनाबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी निवृत्ती वेतन धारकांची राहील. जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे माहे मार्च, 2024 चे मासिक निवृत्ती वेतन हे 10 एप्रिलपर्यंत होईल. याची सर्व निवृत्ती वेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे यांनी केले आहे. ******

हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी एक अर्ज दाखल

• आज 14 उमेदवारांना 56 अर्जांचे वितरण हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी आज एक अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. आज नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या दुसऱ्या दिवशी 14 उमेदवारांना 56 अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 54 इच्छुक उमेदवारांना 175 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षाचे उमेदवार हेमंत श्रीराम पाटील यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह निवडणूक याकामी नियुक्त अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. रविवार, दि. 31 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती बंद राहणार आहे. शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ******

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षाला भेट

हिंगोली, दि. 30 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाला भेट देत पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, समितीचे सदस्य सुरेश कोल्हे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, माध्यम कक्षातील श्रीमती आशा बंडगर, कैलास लांडगे, परमेश्वर सुडे, श्रीमती जयश्री नाईक, नवनाथ ठोंबरे, विलास मोरे आदी उपस्थित होते. माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडे येणारे राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत माध्यमांमध्ये येणारे वृत्त वाचन करून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ते निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल, माध्यमांना निवडणुकीसंदर्भातील माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक‍ निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीला दिले. यावेळी प्रसारमाध्यमांना निवडणूकविषयक विविध आढावा बैठकांचे वृत्त, पत्रकार परिषदांचे आयोजन, वृत्तपत्रांतील वृत्ताचे संकलन करून त्यावर आवश्यक कार्यवाही करणे, निवडणूकविषयक बातम्यांबाबत अहवाल तयार करून तो भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे याबाबतची माहिती पथकप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी दिली. ******

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - मतदान करण्यासाठी शालेय विद्यार्थी देणार आई-बाबांना ‘संकल्प पत्र’, 'स्वीप'अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम

हिंगोली (जिमाका),दि.30 : मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण लक्षात घेता 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे या उद्देशाने स्वीप अंतर्गत #MissionDistinction75% हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत शालेय मुले आता आई-बाबांना संकल्प पत्राद्वारे मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. हे 'संकल्प पत्र' मुले पालकांकडून भरुन घेणार आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, जिल्ह्याचे मिशन डिस्टिंक्शन हे ध्येय पूर्णत्वास यावे, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत हा उपक्रम आम्ही राबविण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या आवाहनाला आई-बाबा सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वाधिक संख्येने मतदान करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गाव, शहर, वाडी, वस्ती या ठिकाणच्या मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी सर्व महाविद्यालये, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मी व माझे कुटुंबीय मतदान करणारच असे संकल्पपत्र दि. 01 एप्रिल, 2024 रोजी एकाच दिवशी भरुन घेण्यात येणार आहेत. हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या लोकसभा मतदारसंघामध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाचे ध्येय ठेवले आहे. आई-बाबासाठी मुलांचे संकल्प पत्र माझे प्रिय आई-बाबा, मला खात्री आहे की, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. माझे भविष्य घडविण्यासाठी आपण दिवसरात्र कष्ट करत आहात. माझे उज्वल भविष्य हे उद्याच्या उज्वल भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे मी आपल्याकडून एक संकल्प करुन घेऊ इच्छितो की, दि. 26 एप्रिल, 2024 रोजी होणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आपण आवश्य जाल आणि आपला मतदानाचा हक्क बजावाल. कराल ना येवढं माझ्यासाठी ….. असे मुलांच्या संकल्पपत्रात नमूद केले आहे. आई-बाबांचे संकल्प आम्ही हा संकल्प करतो की, दि. 26 एप्रिल, 2024 रोजी हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आम्ही आवश्य जाऊ आणि आमचा मतदानाचा हक्क बजावू. तसेच परिवारातील सर्व मतदारांना, शेजाऱ्यांना, मित्रांना मतदान करण्यासाठी प्रेरित करु, असे या संकल्प पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही संकल्पपत्रे संबंधित शाळेत विद्यार्थी जमा करणार आहेत. ******

29 March, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांच्याकडून नाक्याची तपासणी

• अन्वर अली यांचा संपर्क क्रमांक 7666878375 हिंगोली (जिमाका),दि.29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचार संहिता मतदारसंघात लागू झाली असून, मतदार संघात व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), भरारी पथकांनी निवडणूक विषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश आज निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी पथक प्रमुखांना दिले होते. त्यानंतर त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदार संघातील उमरी पाटी येथे प्रत्यक्ष नाक्यावर थांबून तपासणी केली. निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी सकाळी मतदार संघात पोहोचल्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्ष, जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्ष आणि तांत्रिक कक्षाला भेट देऊन ई-एसएमएस, सी-व्हिजील ॲपची माहिती घेतली. त्यानंतर लगेचच त्यांनी मतदार संघातील नाक्यांची तपासणी करत निवडणूक कालावधीत रोकड, सोने, मद्य आदींचे वाटप होणार नाही, यावर बारकाईने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश तपासणी नाक्यावरील पथक प्रमुखाला दिले. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली हे मतदार संघात भेट देत आहेत. निवडणूक कालावधीमध्ये तक्रार असल्यास निरीक्षक अन्वर अली यांच्याशी (7666878375) व त्यांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ (9923040733) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. ******

निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांची जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाला भेट

हिंगोली (जिमाका), दि. 29 : निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी जिल्हा नियोजन कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाला भेट देऊन पाहणी केली. पथक प्रमुख सुधाकर जाधव यांनी निवडणूक कालावधीमध्ये या कक्षाचे कामकाज 24X7 सुरु असून, तक्रार निवारण कक्षातील कार्यान्वित 1950 या निशुल्क क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सची तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती दिली. जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्षाकडे आतापर्यंत 1950 व 18002330820 या दोन्ही निशुल्क क्रमांकावर 14 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या सर्व तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यात आल्याचे पथकप्रमुख श्री. जाधव यांनी सांगितले. निवडणूक निरीक्षक अन्वर अली यांनी येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत निवडणूक कालावधीत या कक्षाने अधिक सक्रियपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा सूचना केंद्रामध्ये स्थापन करण्यात आलेल्या तांत्रिक कक्षाला भेट देऊन ई-एसएमएस, सी-व्हिजील ॲपची माहिती घेतली. यावेळी पथकप्रमुख अब्दुल बारी यांनी याबाबत त्यांना माहिती दिली. *****

निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांची माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षाला भेट

हिंगोली, दि.29 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाला भेट देत पाहणी केली. हिंगोली लोकसभा मतदार संघातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली या तीन विधानसभा मतदारसंघाचे ते निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून काम पाहणार आहेत. उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा निवडणूक खर्च समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगांबर माडे, श्री. अली यांचे संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, माध्यम कक्षातील श्रीमती आशा बंडगर, कैलास लांडगे, परमेश्वर सुडे आदी यावेळी उपस्थित होते. माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडे येणारे राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत माध्यमांमध्ये येणारे वृत्त वाचन करून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ते निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल, माध्यमांना निवडणुकीसंदर्भातील माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश निवडणूक‍ निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला दिले. यावेळी प्रसारमाध्यमांना निवडणूकविषयक विविध आढावा बैठकांचे वृत्त, पत्रकार परिषदांचे आयोजन, वृत्तपत्रांतील वृत्ताचे संकलन करून त्यावर आवश्यक कार्यवाही करणे, निवडणूकविषयक बातम्यांबाबत अहवाल तयार करून तो भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे याबाबतची माहिती पथकप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली. ******

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून पथक प्रमुखांचा आढावा

निवडणुका पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवावेत - निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली हिंगोली (जिमाका),दि.29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचार संहिता मतदारसंघात लागू झाली असून, लवकरच नामनिर्देशन पत्रेही उमेदवारांकडून दाखल केली जातील. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक विषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करावे, अशा सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी पथक प्रमुखाच्या आयोजित आढावा बैठकीत दिल्या. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी सर्व पथक प्रमुखांचा आढावा घेतला. निवडणूक कालावधीमध्ये तक्रार असल्यास निरीक्षक अन्वर अली यांच्याशी (7666878375) व त्यांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ (9923040733) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ, जिल्हास्तरीय खर्च समितीचे पथक प्रमुख दिगंबर माडे, माधव झुंजारे, अवैध मद्य वाटप प्रतिबंध समितीचे पथक प्रमुख तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, जिल्हा माध्यम व प्रमाणन सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे अधिकारी यांच्यासह विविध कामकाज करण्यासाठी नेमण्यात आलेले पथक प्रमुख, व्हीएसटी, व्हीव्हीटी, एसएसटी, लेखांकन करणारा पथक, भरारी आदी पथकाचे वसमत, कळमनुरी, हिंगोली विधानसभा मतदार संघातील प्रमुख यांची उपस्थिती होती. राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक ठेवाव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. अभिरुप नोंदवहीतील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. तसेच एसएसटी आणि एफएसटी या पथकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. निवडणूक कालावधीमध्ये तपासणी नाक्यांवर तपासणी करताना कोणतीही दिरंगाई करू नये, कर्तव्यावर असलेल्या पथक प्रमुख आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश अन्वर अली यांनी यावेळी सांगितले. लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवारांचे निवडणुकीशी संबंधित स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या बँक खात्यातून दैनंदिन काढण्यात येणाऱ्या रकमेवर बारकाईने लक्ष ठेवावेत. तसेच सर्व पथक प्रमुखांनी समन्वयाने काम करावेत. इतर विभागाशी संबंधित माहिती मिळाल्यास ती माहिती संबंधित विभागास कळवावी. जेणेकरुन त्याच्यावर कारवाई करणे सोयीचे होईल. तसेच मतदार संघात मद्य वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना श्री. अन्वर अली यांनी दिल्या. ******

28 March, 2024

जाहिरात प्रमाणीकरणासह सोशल मिडीयाच्या वापरावर लक्ष ठेवा -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची सभा • इलेक्ट्रॉनिक माध्यमासह सर्व जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण बंधनकारक हिंगोली (जिमाका), दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींच्या प्रमाणीकरणासह सोशल मिडीयाच्या वापरावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एमसीएमसी समितीच्या बैठकीत श्री. पापळकर बोलत होते. समिती सदस्य तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, समिती सदस्य सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, आकाशवाणीचे प्रतिनिधी रमेश कदम, समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोल्हे, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांची यावेळी उपस्थिती होती. निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण आणि माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सोशल माध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आणि अनुषंगिक अधिनियमानुसार कार्यवाही करावी. पेडन्यूज, जाहिरात खर्च याविषयी काटेकोरपणे कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या. समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी समितीची रचना, कार्य आणि जबाबदाऱ्या याविषयी सादरीकरण केले. या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक दूरचित्रवाणी वाहिनी, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या आणि त्याच्या एक दिवस आधी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण एमसीएमसी समितीकडून करुन घेणे बंधनकारक आहे. खासगी व्यक्ती, उमेदवार यांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण जिल्हास्तरीय एमसीएमसी समितीकडून करण्यात येते, तसेच राजकीय पक्ष, संघटना, समूह यांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण राज्यस्तरीय समितीमार्फत केले जाते. जाहिरात प्रसारित अथवा प्रसिद्ध करण्याच्या नियोजित दिवसाच्या तीन दिवस अगोदर जिल्हास्तरीय समितीकडे पूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, जाहिरातीची अर्जदाराने स्वाक्षरीत केलेली दोन प्रतीतील मुद्रित स्क्रिप्ट, जाहिरातीच्या दोन सीडी समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवाराने राजकीय सर्व जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. ******

हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी 41 इच्छुकांकडून 119 अर्जांची उचल

• एकही अर्ज दाखल नाही • शनिवारी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती सुरु • शुक्रवार व रविवारी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती बंद हिंगोली (जिमाका), दि. 28 : हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी आज पहिल्या दिवशी 41 इच्छुक उमेदवारांनी 119 नामनिर्देशनपत्रांची उचल केली. त्यापैकी एकानेही आज नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. 26 एप्रिल रोजी होणाऱ्या हिंगोली लोकसभा निवडणुकीची आज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी 41 इच्छुक उमेदवारांनी 119 नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी उमाकांत पारधी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते. एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिलपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. शनिवार, दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्राचे वितरण व स्वीकृती सुरु राहणार आहे. परंतु शुक्रवार, दि. 29 मार्च व रविवार, दि. 31 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती बंद राहणार आहे. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ******

हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्ष स्थापन

हिंगोली (जिमाका), दि. 28 : मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 16 मार्च 2024 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून, आदर्श आचारसंहिता दि. 16 मार्च 2024 पासून लागू झाली आहे. त्या अनुंषगाने लोकसभा मतदार संघ अंतर्गत आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे या दृष्टिकोनातून या कार्यालयामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि दरम्यानच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी नागरिकांना संपर्कासाठी व तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात स्वतंत्र जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी संपर्कासाठी व आचारसंहिता भंगाबाबत काही तक्रार असल्यास 1950 किंवा 18002330820 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभाग येथे जिल्हा संपर्क केंद्र व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून, हे केंद्र 24 तास कार्यरत आहे. या केंद्रावर व्यक्तिश: किंवा वरील टोल फ्री क्रमांकावरुन संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे. ******

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्रे ग्राह्य

हिंगोली (जिमाका), दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरिता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. हिंगोली लोकसभा मतदरसंघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरिता निवडणूक आयोगाने १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करताना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. ******

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जिल्हा निबंधक कार्यालय सुरु

हिंगोली (जिमाका), दि.28 : वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून प्रसिद्ध होत आहेत. सन 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना यासंबंधीचे कामकाज करण्यासाठी व दस्त नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये व सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय 29 ते 31 मार्च रोजी कार्यालये सुरु राहणार आहेत. याची पक्षकारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी हिंगोली यांनी केले आहे. *******

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु

हिंगोली (जिमाका), दि. 28 : सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील महसूल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्च अखेर असल्यामुळे नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव नवीन वाहन नोंदणी व त्या अनुषंगाने कर वसुली करुन शासकीय महसूल जमा व्हावा, यासाठी परिवहन आयुक्त, मुंबई यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्या अनुषंगाने हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दि. 29 ते 31 मार्च, 2024 या तिन्ही सार्वजनिक सुटीच्या दिवशी नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगाने कर वसुलीचे कामकाज तसेच इतर परिवहन विषयक थकीत कर वसुली व खटला विभाग (महसूल जमा होणारे कामकाज) सुरु ठेवण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील नागरिक, वाहन वितरकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे. ******

ई-कुबेर प्रणाली एक एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने लागू

हिंगोली (जिमाका), दि. 28 : लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त सर्व कोषागार कार्यालयांमध्ये आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये दि. 01 एप्रिल, 2024 पासून ई-कुबेर प्रणाली (VPDAS व I-PLA वगळता) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रदानाचे इतर सर्व पर्याय 01 एप्रिल, 2024 पासून बंद करण्यात येणार आहेत, याची जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे यांनी केले आहे. तसेच ई-कुबेर प्रणाली 01 एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ******

27 March, 2024

हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षकांची (Expenditure Observer) नियुक्ती केली आहे. श्री. अन्वर अली हे 2005 च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असून, 7666878375 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. तामिळनाडू केडरचे अधिकारी असलेले श्री. अन्वर अली हे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत. तर कमलदीप सिंह हे 2015 च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असून, 9855306967 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. श्री.कमलदीप सिंह हे उमरखेड, किनवट आणि हदगाव या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेले निवडणूक निरीक्षक अन्वर अली आणि कमलदीप सिंह यांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून प्रक्रियेला सुरवात - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 27 : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठीची प्रक्रिया गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, नामांकन अर्ज दाखल करणे ते मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. इच्छुकांना ऑफलाईनसह सुविधा तसेच संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरे अर्ज मिळणे, अनामत रक्कम स्वीकारणे, नामांकन अर्ज स्वीकारणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये नामांकन अर्ज सादर करताना भरणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिली. ******

लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्रासोबत ना-देय प्रमाणपत्र आवश्यक

हिंगोली (जिमाका), दि. 27 : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरताना उमेदवारांना निवडणूक आयोगामार्फत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास त्याच्या वापराचे संबंधीत विभागाचे भाडे, विद्युत आकार, पाणीपट्टी व दूरध्वनी आदी देयके भरुन सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे ना-देय प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडणे बंधनकारक : उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत. नामनिर्देशन दाखल करताना शंभर मीटरच्या आत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेशास निर्बंध : नामनिर्देशन दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार व इतर 4 अशा एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश करता येणार आहे. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्तींना शंभर मीटरच्या आत प्रवेश मिळणार नाही. मान्यताप्राप्त पक्षांना ए व बी फॉर्म दाखल करणे बंधनकारक : मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने पक्षाचे विहित नमुन्यातील ए व बी फॉर्म नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकास दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे. अपक्ष उमेदवारांना 10 प्रस्तावक आवश्यक : उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करताना याच लोकसभा मतदार संघातील प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांना एक मतदार प्रस्तावक तर अपक्ष आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना 10 मतदार प्रस्तावक असावे. उमेदवार जर इतर जिल्ह्यातील अथवा मतदार संघातील असेल तर त्याने नामनिर्देशन पत्रासोबत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशनासाठी गर्दी झाल्यास जे उमेदवार नामनिर्देशन पत्र व आवश्यक त्या कागदपत्रांसह उमेदवारीसाठी नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात हजर असतील त्यांचाच विचार केला जाईल. दुपारी 3 वाजल्यानंतर बाहेरुन कोणतीही कागदपत्रे आणता येणार नाहीत अथवा अन्य कोणाही व्यक्तीस ती देण्यासाठी प्रवेश देता येणार नाही. नामनिर्देशनपत्र व्यक्तीश: उमेदवारांनी अथवा सूचकाने सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने दोन पेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करू नये. ही जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. शपथपत्र व दृढकथन उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल करत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर मोठ्या आवाजात घेणे आवश्यक आहे. तसे केल्यानंतर साक्षांकित करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांच्या ओळखपत्रासाठी दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो नावाची नोंद असलेल्या पाकीटात देणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी उमेदवार, उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी, एक सूचक व एक प्राधिकृत प्रतिनिधी असे एकूण पाच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. नामनिर्देशनासाठी उमेदवाराचे वय 25 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची मर्यादा 95 लक्ष इतकी आहे. उमेदवाराने बँक अकाऊंट, मोबाईल क्रमांक, ई-मेल व पूर्ण पत्ता असलेले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील दिलेले पत्र भरुन सादर करणे आवश्यक आहे. 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत 25 हजार रुपये अनामत रक्कमत भरून त्याची पावती नामनिर्देशनासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवार जर अनुसूचित जाती, जमाती असेल तर त्याने नामनिर्देशन पत्रात उल्लेख करून साक्षांकित करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमाती उमेदवारासाठी अनामत रक्कम 12 हजार 500 रोखीने किंवा चलनाने भरणा करणे, शपथपत्रातील सर्व रकाने स्पष्ट शब्दात पूर्णपणे भरणे, सक्षम प्राधिकाऱ्यासमोर शपथ घेतल्याबाबतचे शपथपत्र सादर करणे, आदी काही सूचना सोबतच भारत निवडणूक आयोगाने नामनिर्देशनाबाबत निर्गमित केलेल्या सविस्तर सूचनांचे अवलोकन उमेदवारांनी करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. *****

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून नामनिर्देशन कक्षाची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची घोषणा केली आहे. 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे. यासाठी गुरुवार दि. 28 मार्च, 2024 रोजी हिंगोली लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 28 मार्चपासून ते 4 एप्रिल, 2024 पर्यंत नामनिर्देशन अर्जाची विक्री व स्वीकृती करण्यात येणार आहे. यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार नामनिर्देशन संदर्भात कामकाज करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या नेतृत्त्वाखाली नामनिर्देशन कक्ष तयार करण्यात आला आहे. या नामनिर्देशन कक्षात नामनिर्देशन संदर्भात समन्वय ठेवणे, सर्व कामकाजाचे नियोजन करणे, नामनिर्देशनपत्रासोबतच शपथपत्र तपासणी, चेकलिस्ट करणे, नामनिर्देशन पत्र वितरण, फॉर्म-26 ई व नामनिर्देशन पत्राची संबंधित सहपत्रे इच्छुक उमेदवारांना वाटप करणे व त्याची नोंद घेणे, सुरक्षा अनामत रक्कम स्वीकारणे, पोच देणे, प्राप्त रक्कम शासन जमा करणे, उमेदवार व सूचक यांचे मतदार यादीत नाव शोधणे, खर्चाचे रजिस्टर, फोटो व सह्यांचे नमुने घेणे, विहित नमुन्यात त्यांची नोंद व प्रमाणपत्र घेणे यासह विविध कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीमध्ये नामनिर्देशन कक्ष स्थापन करण्यात आला असून, विविध सोयीसुविधांनी हा कक्ष सज्ज करण्यात आला आहे. या नामनिर्देशन कक्षाची आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पाहणी करून आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित अधिकारी –कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टपाली मतपत्रिकेसाठी मागणी नोंदवावी- तहसीलदार नवनाथ वगवाड

हिंगोली (जिमाका), दि.27 : अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या मतदानाच्या व्यवस्थेसाठी टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी मागणी नोंदवावी, अशा सूचना तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024साठी अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अपर तहसीलदार हिमालय घोरपडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, टपाल कार्यालय अधीक्षक रमेश बगाटे, महावितरणचे नितीन पाटील, वनीकरण विभागाचे सी. डी. वाघमारे, आकाशवाणी एफएम केंद्राचे श्रीपाद पांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे गजानन खोरणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. नवनाथ वगवाड म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 12 डी फॉर्मची मागणी नोंदवावी. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एव्हीईएस ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे 12 डी फॉर्मद्वारे मागणी घेऊन त्यांना मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टपाली मतपत्रिकेची मागणी नोंदविताना निवडणूक विभागानी काढलेल्या आदेशाची प्रत आणि मतदार ओळख पत्राची (EPIC) एक प्रत सोबत जोडावेत. अत्यावश्यक सेवेतील मतदारांना उपविभागीय कार्यालयात दि. 21 ते 23 एप्रिल, 2024 हे तीन दिवस टपाली मतदान करण्यासाठी विशेष मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. टपाली मतदान झालेल्या मतपत्रिका सिलबंद करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार श्री. वगवाड यांनी यावेळी सांगितले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक आयोग मतदानासाठी चार प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकासाठी ईव्हीएससी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे निवडणूक पथकातील कर्मचाऱ्यांमार्फत 12 डी फॉर्म भरून घेऊन त्यांना घरीच मतदान करता येणार आहे. तसेच दुसरी सुविधा 40 टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या उमेदवारांनाही घरीच मतदान करण्यासाठी ईव्हीपीडी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तिसरी सुविधा कोविड बाधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी त्यांच्या घरी किंवा दवाखान्यात जाऊन मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. मात्र सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोविड रुग्णांची संख्या निरंक असल्यामुळे याबाबतचे मतदान निरंक असणार आहे. चौथी सुविधा ही अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एव्हीईएस ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची 12 डी फॉर्मद्वारे मागणी घेऊन त्यांना मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील मतदारांना उपविभागीय कार्यालयात दि. 21 ते 23 एप्रिल, 2024 हे तीन दिवस टपाली मतदान करण्यासाठी विशेष मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. टपाली मतदान झालेल्या मतपत्रिका सिलबंद करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानाला प्रत्यक्ष जावू शकत नसल्यामुळे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील कर्मचाऱ्यांकडून 12 ए फॉर्मद्वारे व हिंगोली लोकसभा मतदार संघाबाहेरील कर्मचाऱ्यांसाठी 12 डी फॉर्मद्वारे मागणी घेऊन त्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्री. वगवाड यांनी दिली. ******

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर

• निवडणुकीच्या राजकीय जाहिरात प्रसारीत/प्रसिद्धीसाठी पूर्व प्रमाणीकरण आवश्यक • जाहिरात प्रसारणाच्या तीन दिवसापूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक • मुद्रीत माध्यमाद्वारे मतदान आणि मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक • अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने 7 दिवस आधी अर्ज करावा हिंगोली, दि.27 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. 15-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर हे आहेत. निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे श्री.पापळकर यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती या कक्षात कार्यान्वीत करण्यात आली आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम कक्षातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहे. राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत भारत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केली आहे. या नियमावलीनुसार राजकीय पक्ष व उमेदवारांना दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हॉईस संदेश, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती ह्या देखील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या तीन दिवस अगोदर जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अर्थात एम.सी.एम.सी समिती ही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज 48 तासात निकाली काढेल. जाहिरात नियमानुसार नसल्याचे समितीला आढळून आल्यास एम.सी.एम.सी. समितीला जाहिरात प्रमाणिकरण नाकारण्याचा अधिकार आहे. समितीच्या निर्णयाविरुद्ध राज्य समितीकडे अपील करता येते. मात्र त्यानंतर केवळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे. जाहिरात प्रमाणीकरणासाठीचा अर्ज हा विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव व पत्ता, उमेदवार किंवा पक्षाचे नाव किंवा सदर जाहिरात एखादी संस्था - ट्रस्ट- संघटना यांच्याकडून दिली जात असल्यास त्यांचे नाव, मतदारसंघाचे नाव, राजकीय पक्षाचे मुख्यालयाचा पत्ता, ज्या चॅनल/केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करायची आहे, त्याबाबत स्पष्ट माहिती कोणत्या उमेदवाराच्या हितासाठी सदर जाहिरात करण्यात आली आहे, त्याबाबत माहिती, जाहिरात सादर करण्यात येत असल्याची दिनांक, जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली भाषा, त्याच्या संहिता लेखनाच्या (ट्रास्कींप) साक्षांकित दोन प्रती, जाहिरातीचे शिर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरात जर चॅनेलद्वारे प्रसारित केली जात असेल तर किती वेळा ती प्रसारित केली जाणार आहे, त्याचे प्रस्तावित केलेले दर, त्यासाठी लागलेला एकूण खर्च आदी सविस्तर माहिती अर्जदाराने निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमुन्यात स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेनुसार दिलेल्या निर्देशाचे जाहिरातीमध्ये पालन होणे आवश्यक आहे. या प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी, धार्मिक भावना दुखावणे, भारतीय घटनेचा अवमान करणे, गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण, महिलांचे चुकीचे चित्रण, तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाच्या जाहिराती, हुंडा, बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. इतर देशावर टीका नसावी. न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये. राष्ट्रपती व न्याय संस्था यांच्याबाबत साशंकता नसावी. राष्ट्रीय एकात्मतेला, सौहार्दतेला आणि एकतेला बाधा पोहचविणारा मजकूर त्यामध्ये नसावा. सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक, व्यक्ती, अधिकारी यांची अथवा सैन्य दलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे. कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी / वैयक्तिक जीवनातील घटनांना धरुन त्यावर भाष्य नसावे. व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे साहित्य याचे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. या वाहनाची निवडणूक विभागाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या संमतीशिवाय प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत. अनुमतीशिवाय जाहिराती प्रकाशित झाल्यास प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर मुद्रीत माध्यमाद्वारे प्रकाशित करावयाची जाहिरात प्रमाणीकरणसाठी समितीकडे दोन दिवस आधी जाहिरातीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ****

26 March, 2024

माध्यम कक्षातील विधानसभा मतदार संघनिहाय नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती अंतर्गत करावयाच्या कामकाजात सुसूत्रता आणि संदेशाची सहज देवाण-घेवाण व्हावी, शंकाचे निरसन व्हावे, यासाठी 82-उमरखेड, 83-किनवट, 84-हदगाव, 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघनिहाय नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आज गुगल मीटद्वारे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षण पथकातील दिपक कोकरे यांनी दूरचित्रवाणी वाहिनी, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या आणि त्याच्या एक दिवस आधी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण एमसीएमसी समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. खासगी व्यक्ती, उमेदवार यांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण जिल्हास्तरीय एमसीएमसी समितीकडून करण्यात येते, तसेच राजकीय पक्ष, संघटना, समूह यांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण राज्यस्तरीय समितीमार्फत केले जाते. जाहिरात प्रसारित अथवा प्रसिद्ध करण्याच्या नियोजित दिवसाच्या तीन दिवस अगोदर जिल्हास्तरीय समितीकडे पूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, जाहिरातीची अर्जदाराने स्वाक्षरीत केलेली दोन प्रतीतील मुद्रित स्क्रिप्ट, जाहिरातीच्या दोन सीडी समितीकडे सादर करणे बंधनकारक असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली . समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी समितीची रचना, कार्य आणि जबाबदाऱ्या याविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण आणि माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सोशल माध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आणि अनुषंगिक अधिनियमानुसार कार्यवाही करावी. पेडन्यूज, जाहिरात खर्च याविषयी काटेकोरपणे कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाला 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघ निहाय नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. *******

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी पथक प्रमुख नेमावेत- अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी

हिंगोली (जिमाका), दि. 26 : अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या मतदानाच्या व्यवस्थेसाठी टपाली मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित मतदारसंघासाठी पथक प्रमुख नेमावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आयोजित बैठकीत दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024साठी अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. बालाजी भाकरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, टपाल कार्यालय अधीक्षक रमेश बगाटे, एसटी महामंडळाचे श्री. थोरवले, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. परदेशी म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची टपाली मतपत्रिकेसाठी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 12 डी फॉर्मची मागणी नोंदवावी. मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे, यासाठी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाज करता मतदान करण्यासाठी वेळेची सवलत देण्यात यावी. त्यामुळे त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत, याची प्रत्येक कार्यालय प्रमुखाने काळजी घ्यावी, असे निर्देशही अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत. तसेच सेनादलातील जवानांना टपाली मतपत्रिका पाठविण्यासाठी पोस्टातर्फे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ******

24 March, 2024

पथकप्रमुखांनी उमेदवारांच्या खर्चाचा अचूक ताळमेळ राखावा - जिल्हा निवडणूक खर्च निरीक्षक

हिंगोली (जिमाका), दि. 24 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचार संहिता मतदारसंघात लागू झाली असून, लवकरच नामनिर्देशन पत्रेही उमेदवारांकडून दाखल केली जातील. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा मतदारसंघातील नियुक्त प्रत्येक पथकप्रमुखाने उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळ अचूक नोंदवावा, असे आवाहन खर्च पथकप्रमुख दिगंबर माडे यांनी केले आहे. खर्च नियंत्रणाची संरचना समजावून घेण्यासाठी आज दूरदृष्यप्रणालीव्दारे घेतलेल्या सहायक खर्च निरीक्षकाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हास्तरीय निवडणूक खर्च पथकाचे सदस्य तथा जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. माधव झुंजारे, एमसीसी समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा माहिती अधिकारी तथा जिल्हा माध्यम व सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख प्रभाकर बारहाते यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहायक खर्च निरीक्षक उपस्थित होते. जिल्हास्तरीय समितीकडून हिंगोली लोकसभा मतदार संघातील खर्चाचे एकत्रीकरण त्याचे निवडणूक खर्च निरीक्षकांना सादरीकरण करावे लागणार आहे. यासाठी लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर सनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती यांचा समावेश आहे. या सर्व पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक घेऊन जिल्हास्तरीय निवडणूक खर्च नियंत्रण समितीला कळवणे आवश्यक असल्याचे श्री. माडे यांनी यावेळी सांगितले. निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक खर्च निरीक्षक किमान तीन वेळा उमेदवाराच्या खर्चाचा ताळमेळ तपासतात. त्यामुळे प्रत्येक संबंधित पथक प्रमुखाने अभिरूप नोंदवहीमध्ये अचूक आणि पृष्ठ क्रमांक टाकून नोंदी घ्याव्यात. तसेच ती नोंदवही पथकप्रमुखाकडून प्रमाणित करून ठेवावी. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी, असेही श्री. माडे यांनी यावेळी सांगितले. ******

23 March, 2024

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शहीद दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या शाखा 31 मार्च रोजी रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश

हिंगोली (जिमाका), दि. 23 : शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने रविवार, दि. 31 मार्च, 2024 रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव येथील शाखा रात्री (10 वाजेपर्यंत) उशीरापर्यंत चालू ठेवावीत, असे आदेश महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमांक 409 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. ********

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 23 : हिंगोली लोकसभा मतदार संघातील 82-उमरखेड (यवतमाळ), 83-किनवट (नांदेड), 84-हदगाव (नांदेड) तसेच 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कामासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन विशेष दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यापैकी तीन सहायक निवडणूक अधिकारी हे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पदी कार्यरत असल्याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदसिध्द आहेत. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कामासाठी सहा विधानसभा मतदार संघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्त केलेले स्थायी निगराणी पथक (Static Surveillance Team) आणि फिरते पथक (Flying Squad) यांच्या प्रमुखांना विधानसभा कार्यक्षेत्र हद्दीपावेतो दि. 16 मार्च, 2024 पासून ते दि. 6 जून, 2024 पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या कार्यकारी दंडाधिकारी यांना उक्त संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील शक्ती प्रदान करण्यात आले असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. ******

22 March, 2024

छायाचित्रकार, चलतचित्रकार यांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 22 : छायाचित्रकार आणि चलतछायाचित्रकार हे निवडणूक विभागाचे डोळे व कान असून, निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, यासाठी ‍हिंगोली लोकसभा मतदारसंघात काम करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी निवडणूक विभागाकडून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूकविषयक कामकाज करताना छायाचित्रकार आणि चलतछायाचित्रकार यांची लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका असणार आहे. अतिशय तटस्थ राहून आपण आपले काम जबाबदारीने पूर्ण करावे. याचबरोबर काय करावे आणि काय करु नये, याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षण प्रमुख तथा नोडल अधिकारी डॉ. दीपक साबळे तसेच नायब तहसीलदार गणेश जिडगे उपस्थित होते. मास्टर ट्रेनर म्हणून बालाजी काळे, अरुण बैस, विजय बांगर आणि दीपक कोकरे यांनी काम केले. ******

लोकसभा, विधानसभा मतदार संघनिहाय एक खिडकी ‌योजना कक्ष कार्यान्वित

हिंगोली (जिमाका), दि. 22 : हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, यासाठी एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवानगी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येईल. हा कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या कक्षाचे नोडल अधिकारी प्रशांत बिलोलीकर हे असून, निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे नमूद केलेल्या आवश्यक कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे. या परवानगी कक्षात राम सिद्धमवार हे सहायक नोडल अधिकारी असून, सहायक अधिकारी व कर्मचारी वर्ग येथे कार्यरत आहे. त्यामध्ये सुनील गुठ्ठे, डी. जी. पोतरे, संतोश बोथीकर, आर. पी. पोटे, शेख युनूस, जगदीश माने, अनंत जवादवार, काशिनाथ पाईकराव, ए. बी. पाथरकर, यु. जी. फाले आणि बालाजी जगताप यांचा समावेश आहे. संबंधित एक खिडकी कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या विविध परवानगी : कार्यक्षेत्र - हिंगोली लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना 1. नोंदणीकृत राजकीय पक्ष, 2. नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी. परवानगी देणारे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी (लोकसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे - 1. आर. सी. बुक, 2. वाहनाचा इन्शुरन्स, 3. वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, 4. टॅक्स भरल्याची पावती, 5. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, 6. चालकाचा परवाना, 7. पी.यू.सी., 8. वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र – हिंगोली लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना: उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी :- परवानगी देणारे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे 1. आर.सी. बुक, 2. वाहनाचा इन्शुरन्स, 3. वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, 4. टॅक्स भरल्याची पावती, 5. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, 6. चालकाचा परवाना, 7. पी.यू.सी., 8. वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र – विधानसभा मतदारसंघ, वाहन परवाना – उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी - परवानगी देणारे अधिकारी सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग - परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे - 1. आर.सी. बुक, 2. वाहनाचा इन्शुरन्स, 3. वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, 4. टॅक्स भरल्याची पावती, 5. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, 6. चालकाचा परवाना, 7. पी.यू.सी., 8. वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे : परवानगी देणारे अधिकारी सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष), ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग 1. संबंधित जागा मालक यांची संमती, 2. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, 3. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना- हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग 1. संबंधित जागा मालक यांची संमती, 2. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, 3. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी - सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना- हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग 1. संबंधित जागा मालक यांची संमती, 2. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, 3. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र-लोकसभा मतदारसंघ: रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्य, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी - निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना- हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग 1. पोलीस विभाग, 2. वाहतूक नियंत्रण विभाग. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ – रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्य, ध्वनीक्षेपकाची परवानगी देणारे अधिकारी - सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना- हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग 1. पोलीस विभाग, 2. वाहतूक नियंत्रण विभाग. एकापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघातील मिरवणूक, रॅलीच्या परवानगीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र अर्ज करण्यात यावा, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. कार्यक्षेत्र-लोकसभा मतदारसंघ: स्टेज, बॅरोगेट, रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी - निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग 1. संबंधित जागा मालक यांची संमती, 2. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, 3. पोलीस विभाग. 4. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ स्टेज, बॅरोगेट, रोस्ट्रम परवानगी देणारे अधिकारी-सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी कक्षातील सक्षम पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग - 1. संबंधित जागा मालक यांची संमती, 2. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना- हरकत प्रमाणपत्र, 3. पोलीस विभाग. 4. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना- हरकत प्रमाणपत्र. कार्यक्षेत्र-हिंगोली लोकसभा मतदारसंघ- हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवाना, परवानगी देणारे अधिकारी - जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग 1. संबंधित जागा मालक यांची संमती, 2. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, 3. पोलीस विभाग. 4. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे. ********

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा

• अधिकारी –कर्मचारी यांच्याकडून कामात दिरंगाई नको – जितेंद्र पापळकर हिंगोली, (जिमाका) दि.22: हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पथक प्रमुखांनी निवडणूकविषयक कामाकाजाची आतापर्यंत केलेली तयारी, प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी लागणारी मदत, मार्गदर्शन याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज ऑनलाईन बैठकीमध्ये आढावा घेतला. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे प्रत्यक्ष तर इतर सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व पथक प्रमुख दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीबाबत करण्यात आलेली तयारी, ती करताना आतापर्यंत प्रत्यक्ष कामकाज करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी लागणारी मदत याचा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. तसेच मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील माध्यम कक्ष स्थापन करणे आणि येथून चालणाऱ्या कामकाजाबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूकविषयक कामकाज करताना आवश्यक तेवढे मनुष्यबळ सोबत असल्याची खात्री करून घ्यावी. मनुष्यबळाअभावी कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत, असे सांगून या सर्वांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक कर्तव्यावर प्रत्येकजण प्रशिक्षित असणे आवश्यक असून, कोणीही प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देणे, आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करणे, 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर नवमतदारांमध्ये झालेली वाढ, त्याची नोंद, ईव्हीएमच्या अनुषंगाने माहिती देणे, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यकता असल्यास पुन्हा प्रशिक्षण देणे, शिघ्र कृती दलाची नियुक्ती आदी विविध विषयांबाबत संबंधित पथक प्रमुखांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले. महसूल विभागाच्या सर्व चारचाकी वाहने अधिग्रहीत करण्याचे आदेश काढावेत. त्यामुळे इंधन भरणे आणि इतर अनुषंगीक बाबींना अडचणी येणार नाहीत. त्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेशही त्यांनी दिले. निवडणूक काळात लागणारे सर्व निवडणूकविषयक साहित्य वेळेत आणि मुबलक प्रमाणात मिळाले आणि सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. हे सर्व साहित्य हाताळताना किंवा वाहतूक करताना सांभाळून व्यवस्थितपणे हाताळावे. स्वीपअंतर्गंत मतदारांमध्ये जनजागृती करण्याविषयी कामगिरी योग्यरित्या पार पाडावी. टपाली मतदानासाठी 12 ड अर्जांचे वितरणाची माहिती अचूक नोंदीद्वारे अद्ययावत ठेवावी, असे श्री. पापळकर यांनी सांगितले. भरारी पथक आणि पोलीस यंत्रणा यांच्या योग्य समन्वयातून निवडणूक कालावधीमध्ये रोकड, मद्य, सोने यांच्या तपासणी नाक्यांवर करडी नजर ठेवून चोख भूमिका पार पाडावी. उमेदवारांचे निवडणूक कालावधीतील खर्च अचूकपणे नोंदवून त्याचा अहवाल वेळोवेळी निवडणूक खर्च निरीक्षकांकडे सादर करावा. उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून प्रचार साहित्य, मजकूर, ऑडिओ, व्हिडीओ आणि त्याची संहिता तपासून घेऊन त्याचे प्रमाणपत्र वेळेत वितरीत करण्याबाबतच्या सूचना दिल्या. या कालावधीत विविध ॲपद्वारे सर्वसामान्य नागरिक, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून येणाऱ्या ऑनलाईन तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी टपाली मतदानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ****

जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्वांनी बीसीजी लसीकरणाचा लाभ घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार

हिंगोली (जिमाका), दि. 22 : हिंगोली जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील सर्व युवक-युवती तसेच सर्व नागरिकांसाठी बी.सी.जी. लसीकरण अभियान मे महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात 18 वर्षावरील सर्वांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 18 वर्षावरील नागरिकांचे बी.सी.जी. लसीकरण अभियान राबविण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक येथील जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात नुकतीच त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी श्री. शेंगुलवार बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, एस. एम. ओ. डॉ. मुजीब, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. सुनिल काळे, डॉ. सावंत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, डॉ. किरण कुऱ्हाडे, डॉ. कुपास्वामी, डॉ. अमोल गट्टू, डॉ. बी. के. गिरी, डॉ. व्ही. वाय. करपे, डॉ. मेश्राम आदी उपस्थित होते. या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे एस. एम. ओ. डॉ. मुजीब यांनी बी.सी.जी. लसीकरण अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ******

21 March, 2024

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सलग्नतेसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 21 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संलग्नतेसाठी इच्छूक संस्थांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विद्यमान शासकीय व खाजगी संस्थेत नवीन व्यवसाय तुकडी वाढ, संस्थेच्या नावात, पत्त्यात बदल, नवीन जागेत संस्था स्थलांतर, विद्यमान संस्था, तुकडी नि:सलग्नीकरण व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एससीव्हीटी अभ्यासक्रमाचे एनसीव्हीटीमध्ये रुपांतर करणे इत्यादीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना राज्य शासनाचे वैध इरादापत्र, शासन मान्यता प्राप्त आहे, अशाच संस्थांनी संलग्नतेसाठी अर्ज करावा. राज्य शासनाचे वैध इरादापत्र, शासन मान्यता नसलेल्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अर्ज नाकारण्यात येतील, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा https://nimionlineadmission.in/iti/new_index/ उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धती, संस्था व व्यवसाय सुरू करण्यास आवश्यक मानके यांचा सविस्तर तपशील वरील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक संस्थाकडून दि. ३० एप्रिल, २०२४ पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, हिंगोली कळविले आहे. ******

धार्मिकतेच्या नावावर पशुबळी देण्यास प्रतिबंध

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यात होणाऱ्या यात्रामध्ये पशूक्रूरता निवारण कायदा 1960 नुसार उघड्यावर पशू हत्या ही अवैध असून, मुंबई पोलीस अधिनियम कलम 105, भादवि 133 नुसार सार्वजनिक स्थळी केल्या जाणाऱ्या पशूहत्या बेकायदेशीररित्या केल्या जातात. त्यामुळे लोकांच्या भावना दुखविल्या जातात. असे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे असून, हिंगोली जिल्ह्याच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकाच्या हद्दीतील सर्व यात्रेच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तसेच उघड्यावर पशुहत्या करणे गैरकृत्य आहे. पशू हत्या थांबविण्यासाठी यात्रेच्या ठिकाणातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमेटी सदस्य, देवस्थान विश्वस्त व समविचारी संस्था या सर्वांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बळी प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करावे. योग्य ते समूचित उपाययोजना करावेत. आपल्या अखत्यारित असलेल्या परीक्षेत्रात सुरु असलेले सर्व बेकायदेशीर व अवैध पशूहत्या धार्मिक यात्रेच्या नावाखाली होणारे पशूहत्या थांबविण्यासाठी योग्य ती कायदेशीर कार्यवाही अनुसरण्यात यावी. हिंगोली जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद हद्दीतील सर्व यात्रा, धार्मिक स्थळी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास तसेच धार्मिकतेच्या नावावर पशूबळी देण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. तसेच योग्य ते समूचित उपाययोजना करण्यात याव्यात. आपल्या अखत्यारीत असलेल्या परीक्षेत्रात सुरू असलेले बेकायदेशीर व अवैध धार्मिक यात्रेतील पशूबळी कायमस्वरुपी बंद करावेत, असेही आदेशात नमूद केले आहे. *******

जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी न घाबरता सतर्क रहावे - जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आज गुरुवारी, सकाळी ६ ते ६:२४ दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 4.5, 3.6 व 2.6 अशी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील गावांमध्ये होते. सकाळी 6:08 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील जांब तर सकाळी 6:19 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू रामेश्वर तांडा आणि सकाळी 6:24 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे असल्याची माहिती दिल्लीस्थित संकेतस्थळावरुन प्राप्त झाली आहे. याशिवाय हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, यवतमाळ या जिल्ह्यातही धक्के जाणवले असल्याचे जिल्हा नियंत्रण कक्षास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहावे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. तसेच भूकंप होण्याआधी, दरम्यान व नंतर नागरिकांनी सतर्क राहत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. भूकंपापूर्वी घ्यावयाची काळजी : तुमचे घर भूकंपाला तोंड देऊ शकेल, असे होण्यासाठी बांधकाम अभियंत्याचा सल्ला घ्या. ग्रामीण भागात काही घरांचे छत पत्र्यांचे असून त्या पत्र्यावर आधारासाठी मोठे दगड ठेवले आहेत. प्रामुख्याने अशा घरांवरचे दगड काढून त्यांना तारेच्या सहाय्याने आधार द्यावा. भूकंपप्रवणता माहिती करुन घ्यावी आणि त्यानुसार घरात आवश्यक ते बदल करावेत. तुमच्या घराची आरेखने, नकाशे भविष्यातल्या उपयोजनासाठी जपून ठेवा. भिंती व छतावरच्या प्लास्टरला खोल तडे असल्यास ते दुरुस्त करुन घ्यावेत. कपाटे, फडताळ भिंतीला सुरक्षितपणे बांधून ठेवा, जड वस्तू फडताळात खालच्या कप्प्यांमध्ये ठेवा. विजेच्या तसेच गॅसच्या वस्तूंना भक्कम आधार द्या. सुरक्षितता तसेच जीव वाचवण्याच्या दृष्टीने आपत्कालीन वस्तू संच तयार ठेवा. कुटुंबासाठी आपत्कालीन दळणवळण आणि आपत्तीप्रसंगी बाहेर जाण्याचा आरखडा तयार करा. ड्रॉप कव्हर होल्डचं म्हणजे खाली पडा, संरक्षित व्हा, पकडा हे तंत्र शिकून घ्या. शक्य तो बांधकामासाठी पुराच्या ठिकाणी नदी वा किनाऱ्यालगतचा भाग तसेच भराव टाकून विकसित केलेला भाग टाळा. भूकंपात असलेल्या धोक्याबद्दल स्वत:ला तसेच कुटुंबातल्या माहिती द्या. भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी : शांत राहा, घाबरुन जाऊ नका, चार भिंतीच्या आत वा मोकळ्या जागी असाल तर तिथेच थांबा. काडीपेटी, मेणबत्या किंवा कोणत्याही प्रकारची ज्योत वापरु नका. नादुरुस्त किंवा भंग पावलेली गॅस पाइपलाइन आणि आग एकत्र येणे योग्य नाही. मोटारीमध्ये असाल तर गाडी तिथेच थांबवून भूकंप थांबेपर्यंत गाडीतच थांबा. टेबलाखाली झोपा, एका हाताने तोंड झाका आणि भूकंपाची कंपनं थांबेपर्यंत टेबल धरुन ठेवा. खिडक्या तसेच आरशांपासून लांब थांबा. जमीन हादरत असताना इमारत सोडून जाऊ नका. कंपन थांबल्याबरोबर बाहेर पडा, लिफ्टचा वापर करु नका. खुल्या जागी असाल तर इमारती, झाडं, भिंती, विजेचे खांब, विजेच्या तारांपासून दूर राहा. एखाद्या वाहनात असाल तर मोकळ्या जागी या आणि पुलावर थांबू नका. भूकंपरोधक बांधकाम असलेल्या सुरक्षित इमारतीत असाल, तर जमीन हादरणे थांबेपर्यंत इमारतीतच थांबा. एखाद्या कोपऱ्याचा आधार घेऊन, एखाद्या भक्कम टेबलाखाली, पलंगाखाली लपून किंवा खिडक्या तसेच आरशापासून लांब अशा एखाद्या आतल्या भिंतीचा वापर करुन स्वत:ला वाचवा. इमारतीतून बाहेर जायच्या दाराच्या जवळ असाल तर लवकरात लवकर बाहेर पडा. एखाद्या जुन्या कमकुवत वास्तुत असाल तर बाहेर पडायचा सुरक्षित मार्ग लवकरात लवकर पकडा. भूकंपानंतर घ्यावयाची काळजी : मोडकळलेल्या इमारतीत प्रवेश करु नका. इमारतीखाली, राडारोड्यात अडकलात तर, काडीपेटीची काडी पेटवू नका, तोंड कापडाच्या तुकड्याने झाकून घ्या, मदतीसाठी एखाद्या पिंप किंवा भिंतीवर हात आपटा, शिट्टी वाजवा. शेवटचा उपाय म्हणूनच फक्त ओरडा, त्यानं अंगात जीव राहील आणि ऊर्जा कमी खर्च होईल. सरकते जिने किंवा लिफ्टचा वापर न करता जिने वापरा. काळजीपूर्वक चाला, तुमच्या भोवतीच्या डोक्यावरच्या धोकादायक, अस्थिर वस्तूंचा अंदाज घ्या. तुम्ही जखमी होणार नाही याची काळजी घ्या. मोठ्या भूकंपानंतर अनेक छोटे धक्के बसतात, याची जाणीव ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका, त्या पसरवू नका. तुम्हाला घर सोडायचच असेल तर तुम्ही नेमके कुठे जाताय, याविषयीचा संदेश सोडून जा. उद्ध्वस्त क्षेत्रात गाडी घेऊन जाऊ नका, कारण मदत पुनर्वसन कामासाठी रस्त्यावरची वाहतूक खोळंबू शकते. पूल किंवा उड्डाणपूल वापरु नका, कारण त्यांची मोडतोड झालेली असू शकते, असे आवाहन केले आहे. *******

वसमत येथे फार्मासिस्ट उजळणी वर्गात प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 21 : वसमत शहरात नुकताच हिंगोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने केमिस्ट व फर्मासिस्ट यांच्यासाठी फार्मासिस्ट उजळणी वर्गात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे भूषण माळी, राजेश्वर रेड्डी, बा.सू.टेंगसे, औषध निरीक्षक मनोज पैठणे, जिल्हाध्यक्ष राजेश शिंदे, सचिव संतोष बाहेती, सचिन काबरा हे उपस्थित होते. भूषण माळी व औषध निरीक्षक मनोज पैठणे यांनी भविष्यात स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी औषधी दुकान नियमानुसार कशी चालवावी, यावर मार्गदर्शन केले. यावेळी वसमत तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसमत तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला वसमत तालुक्यातील फार्मासिस्ट, केमिस्ट बांधवांची उपस्थिती होती. ******

20 March, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम दिनांक 16 मार्च, 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. काही व्यक्ती, संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधित व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमता विद्रुपीकरण करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात निवडणुकीच्या कालावधीमध्ये होडींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शीत करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दूर (नष्ट) करुन इमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणुकीच्या कालावधीमध्ये शासकीय, निमशाकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुवीकरण करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यत (दि. 06 जून, 2024 पर्यंत) निर्बंध घातले असल्याचे आदेश दिले आहेत. ******

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दिनांक 16 मार्च, 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चीत केल्याप्रमाणे कागद वापरणे. आयोगाने निश्चीत केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या बाबीवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून, 2024 पर्यंत) निर्बंध घातले असल्याचे आदेश दिले आहेत. ******

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम 16 मार्च, 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहीता अंमलात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजिनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाद्वारे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यत (दि. 6 जून, 2024 पर्यंत) निर्बंध घातले असल्याचे आदेश दिले आहेत. *******

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 20 :भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम 16 मार्च, 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, इत्यादी बाबीसाठी बंधन घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये पुढील प्रमाणे आदेशाद्वारे निर्बंध घातले आहेत. यामध्ये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही. तसेच तो त्या वाहनाच्या टपापासुन 2 फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरीक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) लागू राहणार असल्याचे आदेशीत केले आहेत. *******

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म, भाषावार शिबिरांचे आयोजनास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम दिनांक 16 मार्च, 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक, शिबीरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबीरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून, 2024 पर्यंत) निर्बंध घातले असल्याचे आदेश दिले आहेत. ******

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 मोटार गाड्या, वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 16 मार्च, 2024 पासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश दिले आहेत, हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि. 6 जून, 2024 पर्यंत निर्बंध घातल्याचे आदेश दिले आहेत. ******

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 खाजगी व्यक्तींच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध.

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 16 मार्च, 2024 पासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधीनी, हितचिंतकानी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे इत्यादीसाठी कोणत्याही व्यक्तीची जागा, ईमारत, आवार, भिंत्ती आदीवर संबंधित मालकाची व संबंधित परवाना प्राधिकरणाची परवानगी शिवाय वापर करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 6 जून, 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत. *****

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 सार्वजनिक ईमारतीच्या ठिकाणी, रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित करुन दि. 16 मार्च,2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधीनी, हितचिंतकानी सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणूकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होडींग्ज, कमानी लावणे या व ईतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1951 चे कलम 33 (1) (डीबी) अन्वये जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 6 जून, 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत. *****

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी दि. 16 मार्च, 2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 6 जून, 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत. *****

हिंगोली लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 20 : लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर आज पूर्ण करण्यात आली. यातून कोणते ईव्हीएम मशीन कोणत्या मतदारसंघात जाणार, हे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी सखाराम मांडवगडे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी बारी सिद्दीकी तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री उमेश नागरे, गोपाल ढोणे, बाबुराव गाडे, विशाल काळे आदी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्सची नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे 20 व 30 टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा मतदारसंघ हिंगोली येथे 343, कळमनुरी येथे 346 व वसमत येथे 328 मतदान केंद्र आहेत. या एकूण 1017 मतदान केंद्रांकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. निवडणूक मतदान यंत्र वितरीत करताना 20 टक्के कंट्रोल युनिट व 30 टक्के व्हीव्हीपॅट मशीन अतिरिक्त देण्यात आल्या आहेत. यानंतर संबंधीत विधानसभा मतदार क्षेत्रात कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल, हे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान यंत्रांच्या सरमिसळीची प्रक्रिया पार पाडेल, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली. मनुष्यबळाचीही सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 15-हिंगोली लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्रामध्ये मनुष्यबळाचीही सरमिसळ प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, पथक प्रमुख बारी सिद्दीकी यावेळी उपस्थित होते. ******