31 January, 2017

वसमत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी तात्काळ कर भरावा
                                          -- मुख्याधिकारी
हिंगोली, दि. 31 :- शास स्तरावरून विविध कराच्या वसुलीचे 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कर वसुलीच्या टक्केवारीवर शहरविकास व सौंदर्यीकरणासाठी शासकीय अनुदान मिळणार असल्याने आपल्या शहराचा विकास करण्यासाठी नागरिकांनी वेळेच्या आत घरपट्टी, नवळट्टी व दुकानभाडे इत्यादी कराची मागणी करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी दैनंदिन (दररोज) आप-आपल्या वसुली झोनमध्ये कर मागण्यासाठी येत आहेत.
नागरिकांनी त्यांचेकडे असलेल्या थकीत व चालू कराचे दिलेल्या बिलाप्रमाणे मालमत्ताकर पाणीपट्टी फी व दुकानभाडे त्वरित भरून पावती घ्यावी. जे नागरिक वेळेत व मुदतीत स्वत: होऊन कराचा भरणा करणार नाहीत. त्या थकबाकीधारकाकडून कराची सक्तीने व वेळप्रसंगी त्यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेची किंवा साहित्याची जप्ती करून वसुली करण्यात येईल. तसेच त्यांची नांवे कराच्या थकबाकी रक्कमेसह वर्तमानपत्रात व शहरातील मुख्य चौकात बॅनरवर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
दिलेल्या मुदतीत कर न भरणा करणाऱ्या नागरिकांची वरीलप्रमाणे प्रसिध्दी केल्यास त्याकरिता हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. याची सर्व कर धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन वसमत नगर पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  

*****
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2017 अंतर्गत
 बँक खाते उघडण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 31 :- ‍जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2017 चा निवडणूक कार्यक्रम दि. 02 जानेवारी, 2017 रोजी जाहिर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रणे ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी हिंगोली यांचे अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संभावित उमेदवार आपल्या बँक शाखेकडे निवडणूक खर्चासाठी, विशेष बचत खाते / चालु खाते उघडण्यासाठी येतील, अशा सर्व संबंधित व्यक्तिंचे बँक खाते त्वरित उघडून देणे आवश्यक आहे.
तरी आपण या कामी व्यक्तिश: लक्ष घालुन निवडणूक उमेदवार / संभावित उमेदवार याची खाती त्वरित उघडून देण्याची व्यवस्था करावी. या कामी दिरंगाई करणारे कर्मचारी / अधिकारी हे अनुशासनात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, याची नोंद घ्यावी.

***** 
सेल्फी विथ ट्री स्पर्धेसाठी
प्पर जिल्हाधिकारी राम गगराणी व गजानन जकाते यांना पारितोषिक प्रदान
हिंगोली, दि. 31 :- राज्यात वन विभागामार्फत दि. 01 जुलै, 2016 रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सेल्फी विथ ट्री या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातुन 2 हजार 692 प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही वृक्ष लागवड करतांना सेल्फी काढुन स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. दिनांक 22 जुलै, 2016 रोजी मा. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी लकी ड्रा काढुन संपुर्ण राज्य भरातुन 23 स्पर्धकांची पारितोषिकांसाठी निवड केली होती.
हिंगोली जिल्हयातुन दोन स्पर्धकांची निवड झाली असुन त्यामध्ये अपर जिल्हाधिकारी रामनारायण गगराणी व गजानन जकाते यांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत पुरस्कार 26 जानेवारी 2017 रोजी पोलीस कवायत मैदान येथे प्रदान करण्यात आला.

*****

 

30 January, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली
        हिंगोली, दि. 30:- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन   ( स्तब्धता ) पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
            यावेळी नायब तहसिलदार श्री. बोथीकर, नायब तहसिलदार श्री. पटवे आदिसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


***** 
जिप/पंस निवडणुक आचारसंहिता अंमलबजावणीवर देखरेखीसाठी  ‘कॉप मोबाईल ॲप’
        हिंगोली, दि.30: राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम  घोषित केला असून, या सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कॉप (सीओपी- सिटिझन ऑन पोर्टल) हे अ‍ॅप तयार केले आहे.
            या अ‍ॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची उमेदवाराच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर राहणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत नागरिकांना काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह त्याची माहिती तात्काळ निवडणूक आयोगाकडे तक्रार स्वरूपात नोंदविता येणार आहे. त्यामुळे आचारसंहितेत समाजमाध्यमांचा उपयोग करुन प्रचार करणाऱ्यांवर मतदार या कॉप अ‍ॅपद्वारे नजर ठेवू शकणार आहे. या अ‍ॅपद्वारे मतदारांना उमेदवारांनी केलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल करता येणार आहेत. या अ‍ॅपद्वारे तक्रार केलेल्या तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवण्यात येणार असून तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल तक्रारदारास अ‍ॅपमार्फत प्राप्त होणार आहे.
            निवडणुक आदर्श आचारसंहिता कालावधीत जाहिराती, भित्तिपत्रके, पोस्टर, खासगी पेड न्यूज, विविध समाजमाध्यमे, पैसे, भेटवस्तू, घोषणा, प्रचार फेऱ्या, सभा आदी बाबतच्या तक्रारी आता मतदारांना निवडणूक आयोगाकडे करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

***** 
जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
हिंगोली, दि. 30 :  जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 31 जानेवारी, 2017 रोजीचे 06.00 वाजेपासुन ते दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजीच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी कळविले आहे.
दि. 31 जानेवारी, 2017 रोजी सकल मराठा समाजातर्फे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजी व्हलेंटाईस डे असल्याने या दिवशी हिंदुत्वावादी संघटना व कट्टर मुस्लीम संघटना निषेध व निदर्शने करतात. सध्या मराठा, मुस्लीम व धनगर समाजाची आरक्षणाची मागणी व त्याकरिता करण्यात येणारे आंदोलनात्मक कार्यक्रम, मराठा संघटनांतील आपआपसातील वाद, संकेतस्थळाच्या माध्यमातून होत असलेली देवीदेवतांची थोरपुरूषांची विटंबना, जातीय घटनांचा वाढता कल, समाज विघातक प्रवृत्तींकडून प्रसारीत करण्यात येणारे आक्षेपार्ह एसएमएस/चित्रफिती/छायाचित्रे, वाढती महागाई, दलीत-सवर्ण वादावरून उमटलेल्या प्रतिक्रीया, कट्टर हिंदुत्वावादी / मुस्लीम संघटनांच्या वाढत्या हालचाली दिसून येत आहेत. या दरम्यान उदभवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्हयात दि. 31 जानेवारी, 2017 रोजीचे 6.00 वाजेपासुन ते दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजीचे 24.00 वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा 1951 कलम 37 (1) (3) चे आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

                                                            ***** 
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 20 व 22 अन्वये
कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती
हिंगोली, दि. 30 :- फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये जिल्ह्यात दि. 31 जानेवारी, 2017 रोजी नियोजित आंदोलनाच्या दरम्यान उदभवणारी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
पोलीस स्टेशनचे नाव व नियुक्त करण्यात आलेले कार्यकारी दंडाधिकारी पुढीलप्रमाणे 1) पोलीस स्टेशन वसमत शहर व ग्रामीण - मनोहर गव्हाड, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसमत, 2) पोलीस स्टेशन हट्टा - श्रीमती सुरेखा नांदे, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वसमत, 3) पोलीस स्टेशन, कुरूंदा - स‍चिन जैस्वाल, नायब तहसिलदार तथा महसूल - 1 वसमत, 4) पोलीस स्टेशन हिंगोली शहर व ग्रामीण - विवेक काळे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, हिंगोली, 5) पोलीस स्टेशन नर्सी नामदेव - विजय अवधाने, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली, 6) पोलीस स्टेशन, बासंबा - माधव बोथीकर, नायब तहसिलदार तथा महसूल - 1 हिंगोली, 7) पोलीस स्टेशन कळमनुरी - श्रीमती गोरे, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, कळमनुरी, 8) पोलीस स्टेशन, बाळापूर - संदीप भांगरे, नायब तहसिलदार तथा महसूल - 1 कळमनुरी, 9) पोलीस स्टेशन औंढा नागनाथ - शाम मदनुरकर, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, औंढा नागनाथ, 10) पोलीस स्टेशन सेनगाव - वैशाली पाटील, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, सेनगांव, 11) पोलीस स्टेशन, गोरेगांव - श्री. पाठक, नायब तहसिलदार महसूल - 1 सेनगांव.
वरीलप्रमाणे नियुक्त केलेल्या दंडाधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीपावेतो दि. 31 जानेवारी, 2017 रोजी कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन नेमणुक करीत आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी यांनी नेमुण दिलेल्या पोलीस स्टेशन शिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणुन नियंत्रणे ठेवावे. व तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी नेमुण दिलेल्या पोलीस स्टेशन शिवाय त्यांच्या तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन नियंत्रण ठेवावे.

*****  

27 January, 2017

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत
बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार
हिंगोली, दि. 27 :- जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि. 29 जानेवारी, 2017 रोजी 0 ते 5 वयोगटातील बालकांना लस पाजण्यात येणार आहे. तरी पालकांनी आपल्या बालकांना घेऊन जाऊन पोलिओची लस द्यावी, असे  आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  

*****
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य चित्ररथ कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि. 27 :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कार्यक्रमांचे आरोग्य कार्यक्रम जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, पल्स पोलिओ मोहिम 2017 व प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा योजना या कार्यक्रमाचे जनजागृती करण्याच्या अनुषंगाने 26 जानेवारी, 2017 रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आरोग्य चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य चित्ररथाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. व बा.) तृप्ती ढेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली कोतवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एम. धनवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, वैद्यकिय अधिकारी  डॉ. राहुल राळेगांवकर व माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतिष रुणवाल यांनी आरोग्य चित्ररथ तयार करण्या करिता मार्गदर्शन व सहकार्य केले.
आरोग्य विषयक कार्यक्रमाचे जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सदर आरोग्य रथाचे आयोजन करण्यात आले होते यामधे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम,पल्स पोलिओ मोहिम 2017 व प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा योजना तंबाखुचे दुष्पारिणाम व कानाची  निगा या विषयावर जनजागृती करण्यात आली. तदनंतर सदर चित्ररथ संत नामदेव कवायत मैदान येथे पालकमंत्री दिलीपजी कांबळे, जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांचे समक्ष सदर आरोग्य चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात येवुन सदर चित्ररथ इदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चैाक, जवाहर रोड मार्ग, पोस्ट ऑफिस रोड समोरुन शिवाजी नगर मार्गे जिल्हा परिषद हायस्कुल येथे सांगता करण्यात आली. याकरिता श्री कमलेश ईशी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी व संतोष दहिफळे यांनी परिश्रम घेतले.

***** 
05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात
मतदारांना मतदान करायला विशेष नैमित्तिक सुट्टी
हिंगोली, दि. 27 :- उपआयुक्त (सा.प्र.) तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी, 05 - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ, औरंगाबाद यांचे पत्र दि. 24 जानेवारी, 2017 अन्वये शासन निर्णय क्रमांक: 23 जून, 2011 ची प्रत प्राप्त झाली असून सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 – औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर निवडणूकीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, दि. 03 फेब्रुवारी, 2017 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात यावी असे कळविले आहे. सदर रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजे व्यतिरिक्त असेल असेही निर्देश प्राप्त झालेले आहेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
***** 


जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) लागु
हिंगोली, दि. 27 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक पुर्व परीक्षा 2016, रविवार, दि. 29 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 या वेळात हिंगोली जिल्हा मुख्यालयी 9 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी 9 उपकेंद्रावर 1 हजार 944 उमेदवार परीक्षेस बसले आहेत.
सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दुष्टीकोनातुन परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने म्हणुन वापरण्यायोग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा आयोगाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यास परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यास आयोगामार्फत सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या द्दष्टीकोणातून परीक्षा केंद्रावरील कायदा व सुव्यवस्थेची परीस्थीती हाताळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) परीक्षा केंद्रावर लागु करण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रावर फक्त पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा मुळ पुरावा व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सुचनेनुसार  आयागाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्राच्या प्रवेश दारावर पोलीसांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
सदर परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे मोबाईल फोन / दुरसंचार साधनासह आयोगाने बंदी घातलेल्या इतर कोणतेही  साहित्य आढळून आल्यास तसेच कॉपीचा / गैरप्रकाराचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द फौजदारी  स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली यांनी केले आहे.

***** 

26 January, 2017

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
हिंगोली, दि.26:- 67 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल भंडारी  यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.   
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हा निवडणूक आधिकारी   श्री. रणवीरकर यांच्यासह प्रशासकीय संकुलातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


***  








 राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात
 सहभागी होण्याचा अधिकार मिळाला
--- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली, दि.26:- लोकशाही तंत्राने राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाल्याने देशातील नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री तथा हिंगोली जिल्हा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.   
येथील संत नामदेव कवायत मैदान येथे आयोजित 67 व्या प्रजासत्ताक दिनांच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकूळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तूम्मोड, पोलिस अधिक्षक आशोक मोरोळे, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, 26 जानेवारी, 1950 रोजी भारतीयांसाठी लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना राष्ट्राला अर्पण करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केल्याने देशाने लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जगामध्ये भारत देश एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आले.  
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, अग्निशमन दल, नॅशनल कॅडेट कोर,  श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद विरोधी वाहन, सामाजिक वनीकरणाचा हरित चित्ररथ, आरोग्य विभागाचे आरोग्य पथक यांच्यासह  विविध शाळेतील मुलां-मुलींनी देखील या संचलनात सहभाग घेतला होता. पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना
पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे यांच्या हस्ते सत्कार

जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्यामार्फत सशस्त्र सेना ध्वज दिन 2015 निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबाबत महाराष्ट्र शासनातर्फे सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून प्राप्त स्मृतीचिन्ह जिल्हाधिकारी     श्री. अनिल भंडारी यांना पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते स्मृति चिन्ह देवून सन्मानित केले. त्याच बरोबर अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांनाही सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात केले.  
हिंगोली भारत स्काऊट आणि गाईडस जि. हिंगोली राष्ट्रपती पुरस्कार प्रमाणपत्र श्री. सचिन अशोक पवार व महेश मुरलीधर शेवाळे यांना देवून सन्मानित करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र शासनाचा दोन कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत SELFIE WITH TREE’’ या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर राज्यस्तरावर निवड झाली म्हणून महाराष्ट्र शासन वनविभागातर्फे मोबाईल व प्रशस्तीपत्र देवून पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे यांनी सन्मानित केले.

***






25 January, 2017

मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्काची जाणीव व्हावी
याकरिता नवयुवकांनी मतदारांना प्रोत्साहीत करावे 
--- जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी
·         राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी यांनी मतदानाची प्रतिज्ञा दिली    
हिंगोली, दि. 25 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्काची जाणीव व्हावी, याकरिता प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्यावतीने आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार विजय अवधाने, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एन. बर्वे आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.  
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वपुर्ण राहणार आहे. तसेच तरुण मतदारांनी केवळ आपल्या मतदानाच्या अधिकारापुरता विचार न करता, आपल्या नजीकच्या परिसरातील मतदानास पात्र नागरिकांना तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्तींना मतदानास प्रोत्साहीत करावे. मोबाईल ॲप तसेच सोशल माध्यम, माहिती तंत्रज्ञानाचा लोकशाही बळकट करण्यासाठी वापर करावा. तसेच निवडणुकीसंदर्भातील माहिती सर्व विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावी. निवडणुकीसंदर्भात मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढविण्यावर भर देण्यात यावा. जेणे करुन एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी. मतदानात आपला सहभाग अमुल्य व महत्वाचा आहे, असेही श्री. भंडारी म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड म्हणाले की,  मतदान प्रक्रिया पारदर्शी झालेली असून त्यामुळे बोगस मतदान होणार नाही. मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा. चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत. त्यासाठी नवयुवकांचा मोठा सहभाग असणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले .
            जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे म्हणाले की, मतदार जागृती करणे व मतदानाचे प्रमाण वाढविणे ही जबाबदारी आपल्यावर आहे. आपले मतदान हे बहुमूल्य व महत्वाचे आहे. तसेच योग्य व पारदर्शी शासन निवडून देण्यासाठी मतदारांचा सहभाग आवश्यक आहे. त्याकरिता नवयुवकांनी लोकशाही यशस्वी व बळकट करण्याकरिता  नागरिकांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी जनजागृती करावी, असेही मोराळे म्हणाले.   
जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींना राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते नवीन मतदारांना बिल्ले, मतदार ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींकरिता घेण्यात आलेल्या निबंध, रांगोळी, चित्रकला या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.  
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदर्श महाविद्यालयाचे श्री. कदम यांनी केले.  तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.   

*****



24 January, 2017

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती सायकल रॅली संपन्न

हिंगोली, दि. 24 :- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीस जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी मतदार जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसिलदार विजय अवधाने, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, नायब तहसिलदार श्री. खोकले, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, आदि अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
सदर सायकल रॅलीस तहसिल कार्यालय, हिंगोली येथून प्रारंभ करून पोस्ट ऑॅफिस, जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक, अग्रसेन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली पर्यंत आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये मतदारामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी तरुण आणि भविष्यात मतदारांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने घोषणा फलक व ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना आवाहन करण्यात आले.
या सायकल रॅलीमध्ये शहरातील माणिक स्मारक आर्य विद्यालय, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, सरजुदेवी भिकुलाल भारुका कन्या विद्यालय, शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, हिंगोली इ. शाळांच्या विद्यार्थ्यांनी व एन.सी.सी. स्कॉउट गाईडच्या जवळपास 250 मुला/मुलींनी यात सहभाग नोंदविला. सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस प्रशासन, वाहतुक पोलीस, वैद्यकिय पथक, शहरातील विविध शाळेतील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षिका यांनी सहकार्य केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.
***** 

 

23 January, 2017

जिल्ह्यातील 1944 विद्यार्थी देणार एस.टी.आय. पूर्व परीक्षा
परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू
हिंगोली, दि. 23 :- जिल्ह्यात विक्रीकर निरीक्षक (पुर्व) परीक्षा ही दिनांक 29 जानेवारी, 2017 रोजी (रविवार) सकाळी 10.30 ते 12.00 या वेळात घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पुढील नऊ परीक्षाकेंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या कालावधीत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
केंद्राचे नाव व एकूण विद्यार्थीसंख्या पुढीलप्रमाणे : 1) आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग (अ) - 288, 2) आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग (ब) - 288, 3) सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, हिंगोली - 240, 4) सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल, हिंगोली - 240, 5) शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालय पोस्ट ऑफिस रोड, हिंगोली - 192, 6) जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, शिवाजी नगर, हिंगोली - 192,  7) शिवाजी कॉलेज, कोथळज रोड, हिंगोली - 192, 8) जिल्हा परिषद कन्या शाळा, हिंगोली - 168, 9) पोदार इंटरनॅशनल इंग्लीश स्कुल, हिंगोली - 144,
सदर परीक्षा उपकेंद्राचे इमारती व यामध्ये परिक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्ती शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या दोनशे मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन टेलीफोन बुथ चालु ठेवण्यास निर्बंध. सदरील आदेश हा नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागु राहणार नाही. सदरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेले आहे. अशा व्यक्तीना लागु राहणार नाही. परिक्षार्थी यांना परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजमेकर, गणकयंत्र, इलेक्ट्रॉनिक साधने इत्यादी घेवून जाण्यावर निर्बंध.

***** 
जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

हिंगोली, दि. 23 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, आदिसह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. 

***** 
 

22 January, 2017

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी
अंतिम मतदार यादी प्रसिध्द
            हिंगोली, दि. 22 :- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या निवडणूकी बाबतची गट व गण निहाय अंतीम मतदार यादी  दि. 21 जानेवारी 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व सर्व तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

*****

20 January, 2017

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 20 :  मा. भारत निवडणूक आयोगाने निर्देशीत केल्याप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, सहा. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे स्तरावर दि. 25 जानेवारी, 2017 रोजी "राष्ट्रीय मतदार दिवस" (National Voters Day) साजरा करावयाचा असून, मतदारांचा विशेषत: 18 वर्ष पूर्ण केलेल्या नव तरूण मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा "राष्‍ट्रीय मतदार दिवस" साजरा करण्या मागचा प्रमुख उद्देश आहे.
            यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या वर्षी "सक्षम करूया युवा व भावी मतदार" (Empowering Young & Future Voters) हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यास अनुसरून युवा मतदारांमध्ये विशेषत: वय वर्षे 15 ते 17 या वयोगटातील (ई 9 वी ते 12 वी) भावी मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक बी.एल.ओ. ने त्यांचे कार्यक्षेत्रामध्ये नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना मा. भारत निवडणूक अयोगाचे घोषवाक्य लिहीलेले बॅचेस देण्याचा कार्यक्रम आयोजीत करावा. त्यासाठी त्यांना बॅचेस व निमंत्रण पत्रिका संबंधतीत तहसिलदार यांचे मार्फत या कार्यालयाकडून देण्यात येतील. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदारांचा सत्कार होणार आहे अशा ठिकाणी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी व उपविभाग/ तालुक्यातील इतर अधिकारी यांनी भाग घ्यावा. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक उपविभाग व तालुका स्तरावर विशेष पथक नेमण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

*****
बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे माहे फेब्रुवारी महिन्यासाठी
1433 क्विंटलचे नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 20 :  जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे फेब्रुवारी - 2017 या महिन्याकरीता  तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली  ( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 एकूण 1433, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ***** 
बँकांनी मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे
                                                          - निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड 
·         जिल्ह्यातील  1293 लाभार्थ्यांना 20 कोटी 41 लाख 29 हजार कर्जाचे वितरण
                                                                                 
            हिंगोली, दि.20: केंद्र शासनाने सुरु केलेल्या मुद्रा बँक योजनेतंर्गत नवीन उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांना मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज वितरणांचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या सूचना  निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी दिल्या.
             येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुद्रा बँक योजना समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कार्यालयाचे प्रतिनिधी डी.आर. आव्हाड, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक पी. आर. शिंदे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.पी. भगत, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी ग.चि. राठोड, अशासकीय सदस्य उमाशंकर माळोदे, रमेश पंडित, रविद्र फड आणि श्रीकांत दिक्षित, यांची उपस्थिती होती.    
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय  मुद्रा बँक योजना समन्वय  समितीने जिल्ह्यातील सर्व बँकांना शिशु गटातील - 30 प्रकरणे, किशोर गटातील - 20 प्रकरणे आणि तरुण गटातील - 10 प्रकरणे याप्रमाणे गटनिहाय मुद्रा बँक योजनातंर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. कर्ज वितरणाचे काही बँकानी उत्कृष्ट काम केले आहे. परंतू समितीने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी जिल्ह्याने आतापर्यंत केवळ 20 टक्केच उद्दिष्ट पुर्तता केली आहे. तरी सर्व बँकांनी त्यांना ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. तसेच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देखील मुद्रा बँक योजनेतंर्गत समावेश करण्यात आला असून, त्यांनी देखील कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतू सदर योजनेतंर्गत त्यांनी अद्यापपर्यंत एक ही कर्ज वितरणाचे प्रकरण केले नाही. काही बँकां या जून्या खातेधारकांनाच सदर योजनेतंर्गत कर्ज वितरण करुन उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत.
                यापुढे असे प्रकार होणार नाही याची सर्व बँकांनी दक्षता घेऊन कौशल्य विकास अंतर्गत विविध विषयाचे प्रशिक्षण प्राप्त करणांऱ्या प्रशिक्षणार्थींनीनी नवीन उद्योग सुरु करण्याकरीता कर्जासाठी सादर केलेल्या प्रस्तावास तात्काळ मंजूरी देवून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज वितरण करावे. तसेच सदर योजनेतंर्गत कृषी प्रक्रियेवर आधारित छोटे उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्यांना देखील सर्व बँकांनी कोणतीही अट न ठेवता कर्ज वितरण करुन सदर योजनेचा लाभ द्यावा. बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देवून जिल्ह्यात नवीन उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना ही निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी यावेळी दिल्या.
                तसेच मुद्रा बँक योजनेविषयी काही तक्रार असल्यास तक्रार निवारणासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांचा दूरध्वनी क्रमांक 02456-221692 आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांचा दूरध्वनी क्रमांक 02456-221461 यावर संपर्क साधुन तक्रार नोंदविण्याचे अवाहन ही श्री. माचेवाड यांनी यावेळी केले.
         जिल्ह्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुद्रा बँक योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील  शिशु , किशोर आणि तरुण या गटातील एकूण 12 हजार 41 लाभार्थ्यांना 20 कोटी 41 लाख रुपय कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक  पी. आर. शिंदे यांनी यावेळी दिली.
            अलाहाबाद बँक -24 लाभार्थ्यांना 34 लाख  , बँक ऑफ बडोदा -37 लाभार्थ्यांना 35 लाख , बँक ऑफ इंडिया -96 लाभार्थ्यांना 51 लाख , बँक ऑफ महाराष्ट्र - 90 लाभार्थ्यांना 112 लाख,  कॅनडा बँक 24 लाभार्थ्यांना 48 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया -10 लाभार्थ्यांना 5 लाख, देना बँक -02 लाभार्थ्यांना 1 लाख, आयडीबीआय बँक - 18 लाभार्थ्यांना 60 लाख, ओरियटंल बँक ऑफ कॉमर्स-03 लाभार्थ्यांना 2 लाख, पंजाब नॅशनल बँक-01 लाभार्थ्यांना 05 लाख, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद-481 लाभार्थ्यांना 966 लाख,  स्टेट बँक ऑफ इंडिया-162 लाभार्थ्यांना 246 लाख,   सिंडिकेट बँक -57 लाभार्थ्यांना 72 लाख, युको बँक - 09 लाभार्थ्यांना 10 लाख,  युनियन बँक ऑफ इंडिया -70 लाभार्थ्यांना 56 लाख, ॲक्सिस बँक -09 लाभार्थ्यांना 2 लाख,  महाराष्ट्र ग्रामीण बँक- 199 लाभार्थ्यांना 337 लाख, असे एकूण 1293 लाभार्थ्यांना 20 कोटी 41 लाख 29 हजार रुपये मुद्रा बँक योजनेतंर्गत या बँकांना कर्ज वितरण केले आहे.    

****   

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी

                                                                                       --- जिल्हाधिकारी अनिल भंडारी


         हिंगोली, दि.20:- जिल्हय़ात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक अशोक मोराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एच.पी. तुम्मोड, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धनवे, महिला बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. भंडारी म्हणाले की, जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याकरिता स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरीता जनजागृती करावी. स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा, मुलींना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती याविषयी माहिती देण्यात याव्या. तसेच या अभियानातंर्गत विविध उपक्रम राबवून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींचे संगोपन व त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजगृती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी दिल्या.
            सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान समितीचे सदस्य सचिव तृप्ती ढेरे यांनी अभियानविषयक माहितीचे सादरीकरण केले.

****

19 January, 2017

मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली, दि. 19 :  समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 12 यांनी या गटास पोलीस कर्मचारी यांचे ड्रिल, गॅस अफम्युनेशन, 7.62 एमएम एकेएम, एमएमजी, 5.56 इंसास, एलएमजी, स्ट्रेस मॅनेजमेंट सत्र क्र. 7 व 8 चे वार्षिक गोळीबार सरावसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना वार्षिक निरिक्षण गोळीबार सराव देण्यात येणार आहे. त्याकरिता दि. 14 जानेवारी, 2017 ते 04 मार्च, 2017 या कालावधीत पोलीस कर्मचारी यांचा गोळीबार सरावाकरिता मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी केली होती.  महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येत असून सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                                                ***** 
जिल्हयातील 39 परीक्षा केंद्रावर 7 हजार 472 उमेदवार देणार
सार्वजनिक आरोग्य विभागाची लेखी परीक्षा
            हिंगोली , दि. 19 :- जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता  लेखी परिक्षा दिनांक 22 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11-00 ते दुपारी  1-00  वाजेपर्यंत खालील केंद्रावर लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. या कालावधीत हिंगोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी खालील केंद्र परीसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. 
 हिंगोली तालुक्यातील केंद्राचे नाव :- 1) सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, हिंगोली 2) शिवाजी महाविद्यालय , कोथळज रोड, हिंगोली , 3) आदर्श शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान कालेज, हिंगोली, 4) जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, शिवाजी नगर, हिंगोली, 5)  श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालय पोस्ट ऑफिस रोड, हिंगोली, 6) आदर्श माध्यमिक विद्यालय, आदर्श कॉलेज जवळ, हिंगोली, 7) खाकीबाबा मेरोरिअल इंग्लिश हायस्कूल, रामलिला मैदान, हिंगोली, 8) ज्ञानवर्धिनी अध्यापक महाविद्यालय, रामाकृष्ण नगर, वाशिम रोड, हिंगोली, 9) श्री. संत गाडगे महाराज, अध्यापक महाविद्यालय, रामाकृष्ण सिटी अकोला बायपास, हिंगोली, 10) अनुसया विद्यामंदिर, खटकाळी परिसर, हिंगोली, 11) पोदार इंटरनॅशनल स्कुल खुराणा सावंत इंजिनियरींग कॉलेज जवळ, अकोला रोड, हिंगोली, 12) राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय, हिलटॉप कॉलनी, हिंगोली, 13) शासकीय तंत्रनिकेतन, एमआयडिसी परिसर, औंढा रोड, हिंगोली, 14) आर.के. किड्स कॅप इंग्लिश स्कुल, रामाकृष्णनगर, बळसोंड, हिंगोली, 15) पवित्रेश्वर प्राथमिक व माध्यमिक शाळा खटकाळी बायपास परिसर, कारवाडी हिंगोली, 16) कै. विठ्ठलराव घुगे प्राथमिक शाळा, गंगानगर, हिंगोली, 17) माणिक स्मारक आर्य माध्यमिक विद्यालय, हिंगोली, 18) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शिवाजी नगर, हिंगोली, 19) शंकरराव चव्हाण ऊर्दु हायस्कूल, औंढा रोड, हिंगोली,  20) सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल, शास्त्री नगर,  हिंगोली. कळमनुरी तालुक्यातील केंद्राचे नाव : 21)   कै. डॉ. शंकरराव सातव कला व वाणिज्य, महाविद्यालय, कळमनुरी,  22) कै. डॉ. शंकरराव सातव, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कळमनुरी, 23) जिल्हा परिषद प्रशाला, कळमनुरी, 24) महात्मा जोतिबा फुले विद्यालय, कळमनुरी,  25) गुलाम नबी आझाद, उर्दु हायस्कूल, कळमनुरी,  26) स्व. शिवरामजी मोघे सैनिक शाळा कळमनुरी.   वसमत तालुक्यातील केंद्राचे नाव : 27) बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत,  28) श्री. छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा स्वानंद कॉलनी, वसमत,  29)  बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत, 30) योगानंद सरस्वती प्राथमिक विद्यालय, वसमत, 31) श्री. सिध्देश्वर विद्यालय, वसमत, 32) केम्ब्रीज (स्वतंत्र) ज्यु. कॉलेज, वसमत, 33) जिल्हा परिषद हायस्कूल, वसमत, 34) विवेक वर्दीनी हायस्कूल, वसमत, 35) अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत, 36) जवाहर बालक उच्च प्राथमिक शाळा, वसमत, 37) महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, वसमत, 38) योगानंद स्वामी आर्ट कॉलेज, वसमत, 39) महात्मा फुले प्राथमिक शाळा, वसमत या सर्व परीक्षा केंद्रावरील एकूण परीक्षार्थी संख्या 7 हजार 472  आहे. 
                फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार , हिंगोली जिल्ह्यातील वरील परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करीत आहे. तसेच वरील परीक्षा केंद्रावर सकाळी 9-00 ते सांयकाळी 2-00 कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निंर्बध घालण्यात येत आहेत.
                सदर परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसर यामध्ये परीक्षेच्या शांततापूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या दोनशे मीटर परिसरात फोन , झेरॉक्स मशीन, टेलीफोन बुथ चालु ठेवण्यास निर्बंध . सदरील आदेश हा नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागु राहणार नाही . सदरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी आणि पोलिस अधिक्षक, हिंगोली यांनी बंदोबस्तकामी नेमणुक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परिक्षार्थी यांना परिक्षा केंद्रात डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल , पेजमेकर , गणकयंत्र ( Calculater ) इत्यादी घेवुन जाण्यावर निर्बध आहेत, असे जिल्हादंडाधिकरी यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

                                                                                  *****