31 May, 2022

 

अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष व फूलपिक लागवड योजनेचा

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. आपल्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. अशात महाराष्ट्र राज्याने राज्यातील दारिद्र्याच्या उच्चाटनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडिक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष व फूलपिक लागवड कार्यक्रम ठरवलेला आहे. पुढील 25 वर्ष दरवर्षी सरासरी एक लक्ष हेक्टर फळझाड, वृक्ष, फूलपिक लागवड होईल. जेणेकरुन स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा या योजनेंतर्गत एकूण 25 लक्ष हेक्टर लागवड झालेली असेल. तसेच या आणि अन्य माध्यमातून देशाच्या शताब्दी वर्षी राज्याला अधिकाधिक शेतकऱ्यांना लक्षाधीश करण्यात यश येईल.

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम-1977 मधील अनुसुची दोन मधील परिच्छेद 4 नमूद करण्यात आल्याप्रमाणे तसेच दि.30 मार्च, 2022 च्या शासन निर्णयामधील प्रवर्गातील प्राधान्यक्रमानुसार वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग  शेतावर, शेताच्या बांधावर व पडिक जमिनीवर फळझाड व फूलपिक लागवड कार्यक्रम ग्राम पंचायती तसेच कृषी व फलोत्पादन विभागामार्फत आणि वृक्ष लागवड कार्यक्रम वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत हाती घेण्यास शासनाने मान्यता दिलेली असून मग्रारोहयोसाठी जॉबकार्ड धारक शासन निर्णयातील नमूद प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.

तसेच या योजनेतंर्गत फळझाड, वृक्ष, फूलपिक लागवडीसाठी कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.0 हेक्टर प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याबाबतची सोय ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेली आहे. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. त्यांनी शासनाने दिलेल्या http://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScFOuLLqOzrDvIHLjZE_WSRFIR98G3ypbrZrSISveTUZAFug/viewform?usp=link या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. नियोजन विभाग (रोहयो) यांच्याकडील दि.30 मार्च, 2022 च्या शासन निर्णयामधील योजनेंतर्गत एकूण 79 समाविष्ठ फळपिके, वृक्ष व फूलपिकांची शेतामध्ये लागवड करता येईल. तसेच लाभार्थी किती क्षेत्रावर, कोणत्या फळझाडांची, फुलपिकांची लागवड तसेच कोणत्या प्रकारात करावयाची आहे. त्याप्रमाणे शासन मान्यतेने मंजूर केलेल्या मापदंडानुसार अंदाजपत्रकानिहाय प्रती हेक्टरी झाडांच्या, फळबागांच्या संख्येनुसार तसेच तीन वर्षाच्या कालावधीतील झाडांच्या जिवंत टक्केवारीनुसार मग्रारोहयो अंतर्गत कुशल, अकुशल घटकानुसार 5 ते 8 लाख या दरम्यान अनुदान प्राप्त होईल.

मे अखेर सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास जून 2022 मध्ये फळबाग लागवडीची सुरुवात करता येईल. यासाठी प्रशासन शक्यतो सर्व मदत करण्यास तयार आहे. तसेच गावातील ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्यामार्फत ग्रामपंचायती अंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात येईल.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

*****

 

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी

जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना

हिंगोली (जिमाका), दि. 31 : खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि वेळेत गुणात्मक दर्जाच्या कृषि निवष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हिंगोली येथील कृषि विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषि निविष्ठा विक्री केंद्राची आणि कृषि निविष्ठांची तपासणी करण्यात येत असते. यानंतरही एखाद्या शेतकऱ्याला कृषि निविष्ठा विक्री केंद्रावरुन कृषि निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण आल्यास अथवा खरेदी पश्चात खरीप हंगाम संपेपर्यंत कृषि निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता इत्यादी बाबतीत काही संशय आल्यास अथवा त्यामध्ये आपली फसवणूक झाली आहे, असे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळीच निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर 01 व प्रत्येक तालुक्यात 01 या प्रमाणे पाच तालुक्यात 05 असे एकूण 06 तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तक्रार निवारण कक्षासमोर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करण्यात आला आहे.

जिल्हास्तरावर कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याचा भ्रमणध्वनी क्र. 9421490222 असा आहे. तर तालुकास्तरावर कृषि विभाग, पंचायत समिती, औंढा नागनाथ (भ्रमणध्वनी क्रमांक 8087889299), कृषि विभाग, पंचायत समिती, वसमत (भ्रमणध्वनी क्र. 9028905357), कृषि विभाग, पंचायत समिती, हिंगोली (भ्रमणध्वनी क्र. 9822699947), कृषि विभाग, पंचायत समिती , कळमनुरी (भ्रमणध्वनी क्र. 9673946799), कृषि विभाग, पंचायत समिती, सेनगाव (भ्रमणध्वनी क्र.9158121718) येथे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

संबंधित तालुक्यातील शेतकरी कृषि निविष्ठांबाबत आपली तक्रार वरील दिलेल्या संपर्क क्रमांकावर दूरध्वनी करुन नोंदवू शकतात. तक्रारीचे स्वरुप पाहून शेतकऱ्यांनी संबंधित गुणनियंत्रण निरीक्षकाकडे , तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रार अर्जासोबत कृषि निविष्ठांच्या खरेदीची पावती, सातबारा, होल्डींग इत्यादी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्यास लगेच कळविण्यात येईल. त्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गाव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. या व्यतिरिक्त शेतकरी आपली तक्रार संबंधित तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवू शकतात, असे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******

 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी  कार्यालयात अभिवादन

 


हिंगोली (जिमाका), दि. 31 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  नायब तहसीलदार डी. एस.जोशी, मिलींद वाकळे, सूर्यकांत तत्तापूरे, गोपाल कंठे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

******

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद





 

            हिंगोली (जिमाका), दि. 31 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिमला (हिमाचल प्रदेश) येथून गरीब कल्याण संमलेन कार्यक्रमात केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

जिल्ह्यातील नागरिकासाठी व योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी या संवाद कार्यक्रमाचे येथील जिल्हा परिषदेच्या डीआरडीए सभागृहातून दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, डॉ.विशाल राठोड, अनंत कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संवाद कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातील विविध विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती नागरिकांना व लाभार्थ्यांना देण्यात आली. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेची, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी वन नेशन व रेशन कार्ड, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना, उज्वला योजनेची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्राची माहिती दिली. प्रधान मंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण योजनेची माहिती अभियान व्यवस्थाप जयराम मोडके यांनी दिली.  पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्वच 663 गावांमध्ये हर घर जल से नल उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सावंत यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजना व मुद्रा योजनेची माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजनेची तसेच डायल 112 ची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी सुरु आहे. उर्वरित कामे पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्यात येतील. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, असे सांगून उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, लाभार्थी यांचे आभार मानले.

यावेळी कार्यक्रमात विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

******

30 May, 2022

 

माजी सैनिक नायब हवलदार, नायब सुबेदार, सुबेदार यांनी

अशासकीय लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज करावेत

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली, वाशिम, नांदेड व परभणी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक नायब हवलदार, नायब सुबेदार, सुबेदार यांच्याकडून जिल्हा सैनिक कक्ष हिंगोली येथे अशासकीय लिपिक टंकलेखक पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरीलप्रमाणे माजी सैनिकांनी भारतीय सैन्यात कमीत कमी 17 वर्षे लिपिक टंकलेखक पदावर सेवा केलेली असावी. त्यांना लिपिक टंकलेखकाच्या कामाबद्दल माहिती असावी. तसेच त्यांना संगणकावर काम करण्याबाबत माहिती असावी.

            वरील नमूद सर्व जिल्ह्यातील माजी सैनिक हवलदार, नायब सुबेदार, सुबेदार यांनी अशासकीय लिपिक टंकलेखक पदासाठी वैयक्तीक अर्ज (मोबाईल नंबरसह), माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, रोजगार कार्ड आणि सेवा पुस्तक (डिस्चार्ज बूक) या कागदपत्रासह दि. 9 जून, 2022 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे जमा करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली (मो.क्र. 9404975099) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे .

******

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार निवडक लाभार्थ्यांशी संवाद

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंगळवार, 31 मे 2022 रोजी सकाळी 10.15 ते 10.50 या वेळेत राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरुपात तर सकाळी 11 ते दुपारी 12.10 या कालावधीत सिमला (हिमाचल प्रदेश) येथून केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहाऐवजी जिल्हा परिषदेच्या डीआरडीए सभागृहातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

पंतप्रधान श्री.मोदी यांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. संवादाचा पहिला भाग राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरु होईल आणि सकाळी 10:50 वाजता समारोप होणार आहे.

            संवादाच्या दुसऱ्या भागात राज्य आणि जिल्हा स्तरावरील कार्यक्रम शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडला जाणार असून पंतप्रधान श्री.मोदी हे निवड केलेल्या योजनांच्या जिल्ह्यांसोबत निवडक लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.

            या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील चॅनेलवर केले जाणार असून युट्यूब आणि NIC चॅनलद्वारे वेबकास्ट देखील केले जाणार आहे.

            जास्तीत जास्त नागरिकांनी  या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

******

 

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

हिंगोली जिल्ह्यातील तीन अनाथ बालकांना बँक पासबूक, हेल्थ कार्डचे वाटप

 



            हिंगोली (जिमाका), दि. 30 : कोविड-19 मुळे जिल्ह्यातील अनाथ झालेल्या 03 बालकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज बँक पासबूक, हेल्थ कार्ड यासह            15 लाखाच्या पॅकेजचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेचा प्रारंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते बटन दाबून ऑनलाईन करण्यात आला. प्रधानमंत्री श्री. मोदी  यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 18 वर्षाखालील 03 बालकांसोबत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत वेब कास्टव्दारे संवाद साधला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एनआयसी हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनीही संबोधित केले. त्यानंतर प्रधानमंत्री यांनी 18 वर्षावरील बालकांसोबत संवाद साधला व 18 वर्षा खालील बालकांना वेब कास्ट व्दारे सहभागी करण्यात आले.

यावेळी  प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी बालकांशी संवाद साधतांना तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे उत्तम मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणाऱ्या अडचणी पार कराल, स्व:तावर विश्वास ठेवा, फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जावे व योगासनांना आपल्या जीवनात महत्वाचे स्थान द्या, असा संदेश दिला.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, शासन आणि महिला व बाल विकास विभाग आपल्या सोबत आहे. सुजान नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा, चांगला अभ्यास करा आणि उत्तम भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

            कार्यक्रमामध्ये कोरोना महामारीने आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम निधीमधून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या वयानुसार आर्थिक मदत केली जाणार आहे. या शिवाय आयुष्यमान भारत योजने अंतर्गत 5 लाख रुपयांचा प्रतीवर्षी आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रिमियम देखील पीएम केअर फंडामधून दिला जाणार आहे. तसेच प्रधानमंत्री यांचे आलेले स्नेह पत्र संबंधित  बालकांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बालकांसोबत संवाद साधला.

            या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, बाल न्याय मंडळ सदस्या ॲड. सत्यशिला तांगडे व वर्षा कुरील, बाल कल्याण समिती सदस्या ॲड. जया करडेकर, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, माहिती अधिकारी कार्यालयाचे माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत तसेच प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            या कार्यक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन (1098) चे सदस्य व बालक आणि त्यांचे पालक वेब कास्ट व्दारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी NIC विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षा मार्फत नियोजन करण्यात आले.       

******

 

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाच्या

सुधारित निवड चाचणीसाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ॲथलेटिक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे राज्य निपुणता केंद्र ( खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) कार्यान्वित करण्यात आले आहे. 

            खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाच्या सुधारित निवड चाचणी दि. 21 जून ते 22 जून, 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. त्यासाठी खेळाडूंचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत ॲथेलेटिक्स-18, सायकलींग-14, शुटींग-24 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. वरील संबंधित खेळाबाबतची खेळाडूंची चाचणी तंत्र समितीमार्फत घेऊन गुणानुक्रमे खेळ बाबीमध्ये निश्चित केली जाणार आहे.

            सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाचे राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग , प्राविण्य प्राप्त खेळाडूच निवड चाचणीसाठी पात्र असतील. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत प्रवेशासाठी दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी परिशिष्ट-अ नुसार मानके निश्चित केलेली आहेत. खेळाडूंना दि. 15 जून, 2022 पर्यंत परिशिष्ट-ब नुसार माहिती अर्ज kiscepune@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.

            शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आवश्यकतेनुसार फक्त खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात येणार असून प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करण्यात यावा. चाचणीस येताना खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत व मूळ प्रत सोबत आणावी. चाचणीस येतांना खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत आणावी.

            शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथील राज्य निपुणता केंद्रात ( खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) प्रशिक्षण घेण्यासाठी सुधारित दि. 21 जून ते 22 जून, 2022 या कालावधीत होणाऱ्या निवड चाचणीसाठी वरील अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

******

 माननीय पंतप्रधानांचा 31 मे 2022 रोजी  लाभार्थ्यांशी संवाद

तोंडापूर कृषि विज्ञान केंद्रात कार्यक्रम प्रक्षेपणाची व्यवस्था

हिंगोली (जिमाका), दि. 30 : भारतीय स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग म्हणून माननीय पंतप्रधान भारत सरकारच्या नऊ मंत्रालये/विभागांच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी दोन्ही), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी दोन्ही), जल जीवन मिशन आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत, पीएम जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजना अशा सुमारे सोळा योजना, कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या करोडोंमध्ये आणि अनेक प्रकरणांमध्ये कोटींमध्ये आहे. या सर्व योजना लोकसंख्येतील सर्वात गरीब घटकांचा समावेश  करतात; त्यामुळे या कार्यक्रमाला गरीब कल्याण संमेलन असे नाव देण्यात आले आहे. संवादाचा मुख्य उद्देश केवळ या योजनांमुळे नागरिकांचे राहणीमान कसे सुलभ झाले आहे हे समजून घेणे नाही तर अभिसरण आणि संपृक्ततेची शक्यता शोधणे देखील आहे. 2047 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होत असल्याने नागरिकांच्या आकांक्षेचे मूल्यमापन करण्याचीही यामुळे संधी मिळेल. हे संमेलन सर्व जिल्ह्यांमध्ये पसरलेले आजवरच्या सर्वात मोठमोठ्या देशव्यापी संवादांपैकी एक आहे, ज्यामध्ये माननीय पंतप्रधान लाभार्थ्यांशी घरे, पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता, अन्न, आरोग्य आणि विस्तृत योजना, कार्यक्रम यांच्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल संवाद साधतील. त्यांच्या जीवनावर पोषण, उपजीविका आणि आर्थिक समावेशन इ. योजना, कार्यक्रम आहेत.

हिंगोली जिल्ह्याला या कार्यक्रमाचा भाग असल्याचा अभिमान आहे आणि त्यांनी कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर जिल्हा हिंगोली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. सकाळी  10.00 पासून  पुढे हा कार्यक्रम  सुरु  होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. शिवाजीराव माने यांची  आणि मान्यवरांचीही उपस्थिती असेल. हा  जिल्हास्तरीय कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडला जाईल. जेव्हा माननीय पंतप्रधान शिमला येथून थेट देशाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

शिमला येथे 31 मे, 2022 रोजी राष्ट्रीय स्तरावरील संमेलन आयोजित केले जात आहे. ज्यामध्ये माननीय पंतप्रधान थेट लाभार्थ्यांशी संवाद साधतील. माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील जारी करतील. माननीय पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात पसरलेल्या काही लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर राष्ट्रीय संमेलनाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. MyGov द्वारे राष्ट्रीय कार्यक्रम वेबकास्ट करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. ज्यासाठी लोकांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. हे इतर सोशल मीडिया चॅनेल उदा., यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादींद्वारे देखील पाहिले जाऊ शकते.

या संवादामुळे या योजनांचा लोककेंद्रित दृष्टीकोनच अधोरेखित होईल अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे नागरिकांचे जीवन सुसह्य होईल. परंतु लोकांच्या आकांक्षांवर सरकारचे प्रबोधन होईल आणि देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेईल, असे डॉ.पी. पी. शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर जिल्हा हिंगोली  यांनी  कळविले आहे.

***** 

28 May, 2022

 

महाजीविका अभियानांतर्गत 331 महिला बचतगटांना 

4 कोटी 4 लाख 30 हजार रुपयाचे कर्ज वाटप

 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाजीविका अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने जिल्ह्यातील 331 महिला बचतगटांना  4 कोटी 4 लाख 30 हजार रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले.

महाजीविका अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या स्वयं सहायता समूहास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक 27 मे रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी केले तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे  मुख्य व्यवस्थापक बोरकर, उप मुख्य  कार्यकारी डॉ.विशाल राठोड, जिल्हा अभियान व्यवस्थापक जे.व्ही.मोडके, लेखाधिकारी मनोज पिनगाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सावंत, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कदम, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे त्रीपुडे, संदिप अन्नदाते,  जिल्हा व्यवस्थापक राजू दांडगे, जिल्हा व्यवस्थापक विक्रम  सारस्वत, जिल्हा व्यवस्थापक किरण गुर्मे, जिल्हा व्यवस्थापक ओमप्रकाश गलांडे, तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित आदी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुंलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प संचालक डॉ.विशाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा कर्ज वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता.

महाजीविका अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 331 स्वयं सहायता समूहास 4 कोटी 4 लाख 30 हजार रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू दंडगे यांनी केले तर प्रास्ताविक जे.व्ही. मोडके यांनी केले. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातून मोठ्या संख्येने बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा व्यवस्थापक किरण गुर्मे यांनी मानले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ पंडित गजानन लोखंडे, रमेश पवार, तानाजी काळे, विष्णू खाडे, आनंत मूळे, उज्वला गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

******

 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी  कार्यालयात अभिवादन

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  पुरवठा विभागाचे तहसीलदार श्रीराम पाचपुते, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रंजना कोठाळे, नि.श्री. वाकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

******

27 May, 2022

 

द पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेचा आढावा घेण्यासाठी

मा.प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 30 मे रोजी ऑनलाईन बैठक

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : द पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेचा आढावा घेण्यासाठी मा. प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 मे, 2022 रोजी ऑनलाईन आढावा घेणार आहेत. या बैठकीत ते योजनेचा सविस्तर आढावा घेणार आहेत. योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

द पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना :

भारताच्या माननीय पंतप्रधानांनी दि. 29 मे,2021 रोजी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना सुरु केली होती. ज्यांनी पालक किंवा कायदेशीर पालक किंवा दत्तक पालक किंवा दत्तक पालक दोन्ही गमावले आहेत किंवा कोविड-19 साथीच्या आजारात वाचलेले पालक अशा मुलांना आधार देण्यासाठी ही योजना आहे. 11 मार्च, 2020 पासून आणि 28 फेब्रुवारी, 2022 रोजी समाप्त होणाऱ्या योजनेचे उद्दिष्ट मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण शाश्वत पद्धतीने सुनिश्चित करणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे आरोग्य सक्षम करणे त्यांना शिक्षणाद्वारे सक्षम करणे, त्यांना शिक्षणाद्वारे सक्षम करणे आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सुसज करणे हे आहे. 23 वर्षे वयापर्यंत पोहोचल्यावर आर्थिक सहाय्याने अस्तित्व पोलिस डीसीपीयू आणि नागरी समाज संस्थांच्या मदतीने डीएमएसद्वारे मुलांची ओळख पटल्यावर शिफारशीसह डीएमच्या विचारासाठी मुलांचे बाल संरक्षण कर्मचारी, पोलीस किंवा इतर कोणत्याही एजन्सीच्या मदतीने डीएमने शिफारस केलेल्या किंवा शिफारस न केलेल्या प्रत्येक मुलाबद्दल स्वतंत्र मुल्यांकन केले आहे.  सीडब्ल्यूसीद्वारे योजनेअंतर्गत मुलाच्या पात्रतेबद्दल DM ने घेतलेला निर्णय अंतिम आहे. एकूण 9042 अर्ज संबंधित डीएमएसद्वारे 31 राज्ये आणि युटीएसकडून 557 जिल्हे कव्हर करण्यात आले होते. यापैकी 4345 मुलांना योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. सिक्कीम, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार, लडाख आणि लक्षद्वीप या 5 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकही पात्र मुले नाहीत.

पीएम केअर फॉर चिल्ड्रन पोर्टल :

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन हे मुलांसाठी नोंदणी, प्रमाणीकरण योजनेच्या विविध घटकातर्गत मुलांना उपलब्ध निधी हस्तांतरण लाभ आणि तक्रार निवारणासाठी एकात्मिक पोर्टल आहे. हे पोर्टल महिला आणि बाल विकास मंत्रालयाने विकसित केले आहे. ज्यामध्ये मुलांसाठी पीएम केअर येथे प्रवेश केला जाऊ शकतो. योजनेची प्रमुख वैशिष्ठये खालीलप्रमाणे आहेत

आर्थिक सहाय्य :

प्रत्येक ओळखल्या गेलेल्या मुलाच्या खात्यात यथानुपात रक्कम जमा केली गेली आहे की 18 वर्षे वयाच्या वेळेस प्रत्येक मुलासाठी 10 लाख रुपये होतील. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी 10 लाख रुपये जमा केले गेले आहेत. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना मुलांना 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मासिक स्टायफंड मिळेल. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक टायफंड मुलांच्या पोस्ट ऑफिस बचत बँक खात्यात जमा केला जाईल. 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना ते 23 वर्षे पूर्ण होईपर्यंत स्टायफंड मिळेल. राज्य आपत्ती प्रतिसादाकडून प्रती मृत पालक 50 हजार रुपयाची सानुग्रह एमएचएच्या निर्देशानुसार मुलांना निधी प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे. 

******

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत

प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेच्या 11 व्या हप्त्याचे पंतप्रधानाच्या हस्ते वितरण

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने सन 2022 मध्ये संपूर्ण भारतामध्ये दिनांक 15 ऑगस्ट, 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेच्या 11 व्या हप्त्याचे वितरण भारताचे मा.पंतप्रधान यांच्या हस्ते दिनांक 31 मे, 2022 रोजी होणार आहे.

प्रधान मंत्री किसान सन्मान योजना दि. 1 डिसेंबर, 2018 मध्ये सुरु कण्यात आली आहे. या योजनेचे हिंगोली जिल्ह्यात 2.16 लाख इतके खातेदार आहेत. यापैकी सुमारे 75 हजार 536 खातेदारांना 10 हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. तर 1 लाख 24 हजार 664 लाभार्थ्यांना 9 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये अपात्र आढळून आलेल्या लाभार्थ्याकडून अदा केलेली रक्कम वसूल करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली आहे.

******

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत

पंतप्रधान साधणार पोषण अभियानाच्या लाभार्थ्यांशी व्हि.सी.द्वारे संवाद

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने सन 2022 मध्ये संपूर्ण भारतामध्ये दिनांक 15 ऑगस्ट, 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत भारताचे पंतप्रधान हे दिनांक 31 मे, 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वतः संवाद साधणार आहेत.

त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पोषण अभियानाच्या 05 लाभार्थी बालके व माता यांच्याशी पंतप्रधान महोदय हे दिनांक 31 मे, 2022 रोजी सकाळी 9.00 जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्हीसीद्वारे संवाद साधणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2022 मध्ये दिनांक 21 मार्च, 2022 ते दिनांक 04 एप्रिल, 2022 या कालावधीत पोषण पखवाड़ा/ पंधरवाडा यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या अंतर्गत अंगणवाडी केंद्र व गाव पातळीवर ओटी भरण, सुपोषित दिवस, मुलीच्या जन्माचे स्वागत, किशोरवयीन मुलींचे मेळावे, नवविवाहित जोडप्यांचे समुपदेशन, पालक मेळावे, आजी-आजोबा मेळावे, महिला सशक्तीकरण मेळावे, अर्धवार्षिक वाढदिवस साजरे करणे इत्यादी विविध उपक्रम घेण्यात आले. या कालावधीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये 70 हजार 846 उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमध्ये 18 लाख 90 हजार 784 लोकांनी सक्रीय सहभाग घेतलेला आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली आहे.

******

 



देहविक्री करणाऱ्या महिलांनी आधार कार्ड,रेशन कार्ड व मतदान कार्ड काढून घ्यावेत

-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हयातील सर्व देहविक्री करणाऱ्या महिलांना स्वत:चे आधार कार्ड, रेशन कार्ड व मतदान कार्ड काढून घ्यावेत. यासाठी संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी प्रोत्साहित करावेत. तसेच एचआयव्ही संसर्गाने बाधित झालेल्यांनी आपली औषधी नियमितपणे घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर  यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, सहाय्यक आयुक्त यांचे प्रतिनिधी , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांचे प्रतिनिधी , समाज कल्याण अधिकारी यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी  यांचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व इतर विभागाचे सदस्य तसेच अधिकारी आणि सेवाभावी संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, जिल्ह्यातील सद्यस्थितीत असलेल्या देहविक्री करणाऱ्या महिलांनी स्वत:चे आधार कार्ड, रेशन कार्ड व मतदान कार्ड काढून घेण्यासाठी संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावे. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीसाठी विविध सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक खिडकी  योजना सक्षम रित्या राबवावी. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.  जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित असलेल्या व एआरटी औषधी घेत असलेल्या सर्व रुग्णांनी आपली औषधी नियमितपणे घेण्यात यावे व कोणीही औषधीपासून खंडीत होऊ नये याची खबरदारी घ्यावी. तसेच जिल्हयातील लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प (TI NGO) अंतर्गत 900 चे उद्दिष्ट असलेला कोअर कम्पोजिट (FSW/TG) प्रकल्प देण्यासाठीचा प्रस्ताव प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांना पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी  एप्रिल 21 ते मार्च 22 या आर्थिक वर्षामधील जिल्ह्याने सामान्य गटातील 96 टक्के व गरोदर महिलांची 117 टक्के एचआयव्ही चाचणीचे उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याचा HIV Positivity ट्रेंड कमी  झाल्याबद्दल अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी  उध्दव कदम यांनी एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाचा आढावा सादर केला. यामध्ये एप्रिल 21 ते मार्च 22 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 73 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 73 रुणांची  ए.आर.टी. औषधोपचारासाठी  एआरटी केंद्रामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. तसेच एचआयव्ही संसर्गित पालकांच्या 18 महिने वरील मुलाची चाचणीचे उद्दिष्ट शंभर टक्के  पूर्ण करुन सर्व मुले ही एचआयव्ही  मुक्त करण्याचे यशस्वी काम करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अति जोखीम लोकसंख्या असलेल्या 100 गावांमध्ये एचआयव्ही/एड्स माहिती शिक्षण-संवाद आणि चाचणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

 

******

 

वीज पडून होणारी जिवित हानी टाळण्यासाठी ‘ दामिनी ’ ॲपचा वापर करावा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : मान्सून कालावधीत वीज पडून होणारी जिवित हानी टाळण्यासाठी भारत सरकार हवामान विभागाने ‘ दामिनी ’ ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.

हिंगोली जिल्ह्यात सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपल्या अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तलाठी, कृषि पर्यवेक्षक, सरपंच , ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषिसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांना हे ॲप डाऊनलोड करुन वापर करण्याबाबत प्रवृत्त करावे.

‘ दामिनी ’ हे ॲप जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते, अशा वेळी सुरक्षित स्थळी जावे आणि झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबत सर्वांना निर्देशित करण्यात यावे. तसेच गावातील नागरिकांनी हा ॲप डाऊनलोड करण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात. यासाठी प्रेसनोटद्वारे प्रसिध्दी देणे, ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधिताच्या बैठका घेणे, गावात दवंडी देणे इत्यादी उपाययोजना करण्यात याव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

ग्रामस्तरावरील आपले अधिनस्त शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत या ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या विजेच्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना पोचवण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देशित करावेत, अशा सूचना सर्व संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.   

******

26 May, 2022

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत

प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत वितरणासाठी धान्य उपलब्ध

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक व्यत्ययामुळे गरिबांना सामोरे जावे लागत असलेल्या ठिकाणी प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाने एप्रिल, 2020 ते सप्टेंबर, 2022 या कालावधीत 06 टप्प्यांमध्ये मोफत अन्नधान्य गहू व तांदूळ, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रती सदस्य प्रती महा 05 किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे.  

माहे एप्रिल, 2020 ते एप्रिल, 2022 या कालावधीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक व्यत्ययामुळे गरिबांना सामोरे जावे लागत असलेल्या ठिकाणी प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना अंदाजे 35 हजार 778 मेट्रिक टन गहू आणि 35 हजार 835 मेट्रिक टन तांदूळ असे एकूण 71 हजार 614 मेट्रिक टन अन्नधान्य वाटप करण्यात आलेले आहे.

तसेच कोविडच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर, 2020 या कालावधीसाठी 879.767 क्विंटल मोफत चनादाळ वितरीत करण्यात आलेली आहे.

प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत माहे एप्रिल, 2022 ते सप्टेंबर, 2022 या कालावधीसाठी मासिक 3320 मेट्रिक टन गहू, 993 मेट्रिक टन तांदूळ मोफत वितरणासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेला आहे.

अंत्योदय अन्न योजनेत प्रती सदस्य 02 किलो गहू, 03 किलो तांदूळ असे एकूण 05 किलो धान्य मोफत वितरीत करण्यात येणार आहे.

प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत प्रती सदस्य गहू 01 किलो व तांदूळ 04 किलो असे एकूण 05 किलो मोफत वितरीत करण्यात येणार आहे. याची सर्व पात्र लाभार्थ्यांनी नोंद घेऊन त्या प्रमाणात संबंधित रास्तभाव दुकानांमधून या सुधारित धान्याच्या परिमाणानुसार धान्य उपलब्ध करुन घेण्यात यावे. तालुका पुरवठा कार्यालय व रास्त भाव दुकानदार यांनी याबाबत अधिकाधिक प्रसिध्दी द्यावी,असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

******

 

महाजीविका अभियान यशस्वी करण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

- मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार



 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन करुन महिलाच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेले स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत महिलांचे शाश्वत उपजिविकेचे स्त्रोत निर्माण करणे, महिलांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच शाश्वत समुदाय स्तरीय संस्था निर्माण करण्यासाठी राज्यात महाजीविका अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी बैठकीत दिले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सन 2022-23 हे वर्ष उपजिविका वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी जागतिक महिला दिनापासून ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट या कालावधीत महाजीविका अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, कार्यकारी अभियंता एल. पी. तांबे, जिल्हा अभियान व्यवस्थापक जयराम मोडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर.डी. कदम, कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. टी. भंगिरे, किरण गुरमे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हिंगोली जिल्ह्यात सुरु आहे. या अभियानांतर्गत 01 एप्रिल, 2018 पासून हिंगोली इन्टेन्सिव्हमध्ये आला आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब, अनुसूचित जाती, जमाती, विधवा, परितक्त्या , अपंग, अल्पसंख्यांक, शेतमजूर, भूमिहीन , जोखीम प्रवण कुटुंबासाठी कार्य केले जात आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 8 हजार 576 स्वयंसहाय्यता समूह कार्यरत असून त्यामध्ये 80 हजार 671 कुटुंब समाविष्ट आहेत.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 5 हजार 737 बचत गटांना फिरता निधी म्हणून 858.27 लक्ष रुपयाचा निधी वितरीत केला आहे. मार्च, 2022 पर्यंत 1548 बचत गटांना बँकामार्फत 2664.26 लक्ष रुपयांचा कॅश क्रेडिट वितरीत करण्यात आलेला आहे. बचत गटांना फिरता निधीसाठी भौतिक उद्दिष्ट 2591 व आर्थिक उद्दिष्ट 388.65 लक्ष रुपये असून त्यापैकी 1054 बचत गटांना 167.94 लक्ष रुपये वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरित निधी उपलब्ध नसल्यामुळे वाटप करण्यात आलेला नाही.

या अभियानामार्फत 42 हजार 420 महिलांनी उपजिविका सुरु केलेली आहे. त्याचबरोबर सन 2021-22 मध्ये 5136 परसबागा तयार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभियानातील बचत गटांनी बँकांकडून कर्ज घेऊन शिवणकाम, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कापड दुकान, कटलरी, पिठाची गिरणी, किराणा दुकान इत्यादी स्वरुपाचे छोटे व्यवसाय ग्रामीण महिलांनी सुरु केलेले आहेत.

मोठे व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकांकडून बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या प्रकल्प अहवालाप्रमाणे 5 ते 10 लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्याची गरज आहे. सन 2022-23 साठी 2300 बचत गटांना 50 कोटी रुपये बँकेकडून कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात स्वयंसहायता समूह-8595, ग्राम संघ-459, प्रभाग संघ-36, सीएलएफ नोंदणीकृत-14, उत्पादक गट-70 या संस्थाच्या माध्यमातून बचतगटांच्या महिलांची उपजीविका वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक जयराम मोडके यांनी बैठकीत दिली.

******

 

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळीच निवारण करण्यासाठी

जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना

हिंगोली (जिमाका), दि. 26 : खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि वेळेत गुणात्मक दर्जाच्या कृषि निवष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हिंगोली येथील कृषि विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषि निविष्ठा विक्री केंद्राची आणि कृषि निविष्ठांची तपासणी करण्यात येत असते. यानंतरही एखाद्या शेतकऱ्याला कृषि निविष्ठा विक्री केंद्रावरुन कृषि निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण आल्यास अथवा खरेदी पश्चात खरीप हंगाम संपेपर्यंत कृषि निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता इत्यादी बाबतीत काही संशय आल्यास अथवा त्यामध्ये आपली फसवणूक झाली आहे, असे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळीच निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर 01 व प्रत्येक तालुक्यात 01 या प्रमाणे पाच तालुक्यात 05 असे एकूण 06 तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तक्रार निवारण कक्षासमोर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करण्यात आला आहे.

जिल्हास्तरावर कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याचा भ्रमणध्वनी क्र. 9421490222 असा आहे. तर तालुकास्तरावर कृषि विभाग, पंचायत समिती, औंढा नागनाथ (भ्रमणध्वनी क्रमांक 8087889299), कृषि विभाग, पंचायत समिती, वसमत (भ्रमणध्वनी क्र. 9028905357), कृषि विभाग, पंचायत समिती, हिंगोली (भ्रमणध्वनी क्र. 9822699947), कृषि विभाग, पंचायत समिती , कळमनुरी (भ्रमणध्वनी क्र. 9673946799), कृषि विभाग, पंचायत समिती, सेनगाव (भ्रमणध्वनी क्र.9158121718) येथे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

संबंधित तालुक्यातील शेतकरी कृषि निविष्ठांबाबत आपली तक्रार वरील दिलेल्या संपर्क क्रमांकावर दूरध्वनी करुन नोंदवू शकतात. तक्रारीचे स्वरुप पाहून शेतकऱ्यांनी संबंधित गुणनियंत्रण निरीक्षकाकडे , तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रार अर्जासोबत कृषि निविष्ठांच्या खरेदीची पावती, सातबारा, होल्डींग इत्यादी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्यास लगेच कळविण्यात येईल. त्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गाव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. या व्यतिरिक्त शेतकरी आपली तक्रार संबंधित तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवू शकतात, असे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

******