14 May, 2022

 

वाई गोरक्षनाथ येथे 111 जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

 

माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार, मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून वधू-वरास आशिर्वाद





 

हिंगोली,दि.14, (जिमाका) : वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 111 जोडप्यांच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

या विवाह सोहळ्यातील नव वधू-वरास शुभ आर्शिर्वाद देण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप व पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी  मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राजु नवघरे, आमदार विप्लव बाजोरीया यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खा. पवार म्हणाले की, अलीकडील काळामध्ये विवाह म्हणजे खूप खर्चिक विषय असून गोरगरीब, कष्टकरी अनेक कुटुंबांना सावकारी कर्ज काढण्याची वेळ येते. विवाहांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी हा सामूहिक विवाह करण्याची पध्दत गेल्या काही वर्षापासून  आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानने सुरु केल्याने विवाहावरील खर्च कमी होऊ लागला असून हा होणारा खर्च कमी केल्यानंतर होणाऱ्या बचतीची गुंतवणूक शेती किंवा व्यवसायात केल्यास आपोआपच नवदांप्त्यांच जीवन बदलणार व त्यांचा संसार सुखाचा होणार आहे, असे सांगून त्यांनी  नव दांपत्यांना शुभ आशिर्वाद दिला. 

यावेळी नवदांप्त्यास देण्यात येणा-या संसार उपयोगी विविध साहित्यांबाबत गौरउद्गार काढतांना  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, गोरगरिबांच्या, कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादान करण्याचे भाग्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगाकवर, आ. राजू नवघरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नवदाप्त्यांचे नातेवाईक, वाई गोरक्षनाथ येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

रुग्णवाहिकेचे लोकार्पण

यावेळी आमदार राजु नवघरे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत देण्यात आलेल्या पाच रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, वसमत विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुर्णा कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या

‘सिंहावलोकन’  पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या सिंहावलोकन या पुस्तकाचे विमोचन माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार , सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राजु नवघरे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****

No comments: