25 May, 2022

 

प्लास्टिक निर्मूलनासाठी विशेष मोहिम राबवावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये आठवड्यातून दोन दिवस विशेष मोहिम राबवून प्लास्टिक निर्मूलन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.    

            एकल वापर प्लास्टिक निर्मूलनासाठी व त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी एस. आर. कुलकर्णी, हिंगोलीचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी व्ही.आर.अंभोरे, क्षेत्र अधिकारी एन. पी. दारसेवाड यांची उपस्थिती होती.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, प्लास्टिक निर्मूलनासाठी विशेष मोहिम राबविण्यासाठी आराखडा तयार करावा. विविध माध्यमातून जनजागृती करावी. तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यामार्फत जनजागृती करावी. शहरी भागात आठवड्यातून दोन दिवस विशेष मोहिम राबवून प्लास्टिक निर्मूलन करावे. तसेच ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची बैठक घेऊन प्लास्टिक निर्मूलनाची अंमलबजावणी करावी , असे निर्देश दिले.

            एकल वापर प्लास्टिक निर्मूलनासाठी कृती दल स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलात इतर आठ सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व नगर पालिका/पंचायतचे मुख्याधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा पर्यटन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी व्यापक कृती आराखडा तयार करणे, प्लास्टिक कचऱ्यांचे मूल्यांकन करणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करणे, कचऱ्याचे विलगीकरण, संकलन, साठवण आदी कामे या कृती दलाच्या माध्यमातून केली जाणार आहेत, अशी माहिती  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी एस. आर. कुलकर्णी यांनी बैठकीत दिली.

******

No comments: