28 January, 2022

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

          हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19)  ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे देशात व राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने सर्व राज्यांना सतर्कता बाळगण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी व दिवसा जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.  तसेच नुकतीच हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ व सेनगांव येथील नगर पंचायत निवडणूक पार पडली आहे. त्यावरुन या नगर पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदांकरिता निवडणूक होणार आहे.

दि. 01 नोव्हेंबर, 2021 रोजी पासून हिंगोली, कळमनुरी, वसमत या तिन्ही आगारातील समस्त कर्मचारी यांनी सामुहिक संप पुकारलेला आहे. जोपर्यंत राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करुन घेणार नाहीत तो पर्यंत संप मागे घेणार नाही असा ईशारा दिला आहे.

तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 29 जानेवारी, 2022 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 12 फेब्रुवारी, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी  आदेश काढले आहेत.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

00000

मार्जिन मनी साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

मार्जिन मनी साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

            हिंगोली, (जिमाका) दि.28 : भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात साजरे करीत असताना यामध्ये केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड  अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील  नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

            या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित  जातीसाठीच्या सवलती  घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा  भरणा केल्यानंतर  व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया  योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के  राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहेत

या योजनेचा लाभ  स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल, संबंधित लाभार्थ्यांने आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. या  विवरणपत्रासोबत उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक कर्ज खात्याचे प्रमाणपत्रासह इच्छुक पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यातील  प्रस्ताव तीन प्रतींमध्ये सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

000000

 

27 January, 2022

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 1 ते 18 वयोगटातील बालकांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त वितरण

 


कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 1 ते 18 वयोगटातील बालकांना

मुदत ठेव प्रमाणपत्राचे पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त वितरण

 

            हिंगोली, (जिमाका) दि.27 :. कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 1 ते 18 वयोगटातील बालकांना अर्थसहाय्य योजने अंतर्गत दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्या नंतर कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई व वडील) हे मृत्यु पावले आहेत. अशा बालकांकरीता त्या बालकांच्या नावे एकरकमी रु.5 लक्ष रुपये इतकी रक्कम मुदत ठेव म्हणुन जमा करण्याची तरतूद आहे. 26 जानेवारी रोजी  संत नामदेव महाराज पोलीस कवायत मैदान, हिंगोली येथे प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन  साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते  जिल्ह्यातील पालक गमावलेल्या अशा तीन बालकांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

            या तीन बालकांना शासनाने जाहिर केल्यानुसार एक रकमी रु.5लक्षाचे मुदत ठेव (FD) प्रमाणपत्र  करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या 17 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नावे एकरकमी रु.5 लक्ष इतकी रक्कम मुदत ठेव स्वरुपात संबंधित बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यामध्ये कोविड-19 काळामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या भवितव्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे.

या कार्यक्रमास महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, क्षेत्र बाह्य कार्यकर्ता  अनिरुध्द घनसावंत  आदी  उपस्थित होते.

             

 

26 January, 2022

 


प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ

 

हिंगोली, दि.26 (जिमाका) : संपूर्ण  राज्यात कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव  दिसून येत आहे. तंबाखुयुक्त पदार्थांचे सेवन केल्यानंतर  अनेक व्यक्तींना थुंकण्याची सवय असते. थुंकणे हे संसर्ग पसरवण्याचे एक माध्यम आहे. या आजारावर काही प्रमाणात आळा घालणे व कोव्हिड -19 या साथरोगाची जनजागृती होण्यासाठी प्रत्येक  शासकीय कार्यालयामध्ये तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.

त्यामुळे येथील जिल्हा माहिती कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त तंबाखु मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, सर्वसाधारण सहायक कैलास लांडगे, लिपिक चंद्रकांत गोधने व संदेशवाहक परमेश्वर सुडे आदी उपस्थित होते.

*****

 



प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात

अप्पर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगांवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

            हिंगोली, दि.26 (जिमाका) :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगांवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसिलदार नवनाथ वगवाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

****

 




कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण पूर्ण करणे आवश्यक

                                                             - पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

 

* कोविड-19 च्या धर्तीवर माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या उपक्रमात शाळा बंद पण शिक्षण सुरु

* आमचा गाव, आमचा विकास या योजनेचे आराखडे  पूर्ण करणारी हिंगोली जिल्हा परिषद देशात पहिली

* परसबागा तयार करण्यात हिंगोली जिल्हा राज्यात दुसरा

 

 हिंगोली, दि.26 (जिमाका) :  सध्या कोरोनावर लस हा एकमेव उपाय आहे. भारतात आतापर्यंत अनेक नागरिकांना कोरोना लसीकरणाचे डोस देण्यात आलेले आहेत. लस पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी अद्यापही कोविडची लस घेतली नाही, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी व ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनी देखील दुसरा डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करावे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार संतोष टारफे, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, राज्य राखीव दलाचे समादेशक संदिपसिंह गिल, पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी  पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 6 हजार 133 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 5 लाख 1 हजार 971 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तसेच आता 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींनाही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 33 हजार 966 मुला-मुलींनी लसीचा डोस घेत चांगला प्रतिसाद दिला आहे. कोविड-19  सोबत आपण समर्थपणे मुकाबला करत आहोत. यासाठी शहरी व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लाँटची उभारणी करण्याबरोबरच ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देत जिल्हा सामान्य रुग्णालय, कोविड केअर सेंटरमधील 18 केंद्रावर 121 आयसीयू, 847 ऑक्सिजन व 2856 सर्वसाधारण असे एकूण 3944 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महिला व लहान मुलांसाठी 100 खाटांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच लेवल तीनचे इंटेन्सिव पेडीयाट्रीक केअर युनिट व 20 खाटांचे एन.आय.सी.यू., 25 स्वतंत्र व्हेंटीलेटर, आणि 124 खाटांचे एस.एन.सी.यु. उपलब्ध करण्यात आले आहेत.

यासोबतच कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन निर्मिती, औषधांची उपलब्धता, लसीकरण, कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळा, ऑक्सिजन बेड्स आदींच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात आली आहे. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या वसमत येथील स्त्री रुग्णालय व इतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढ करण्यात येत असून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असे सांगितले.

अनेक देशात कोरोनाने थैमान घातले होते. हिंगोली जिल्ह्यात 17 हजाराहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला असून दुर्दैवाने 397 जणांचा मृत्यू झाला आहे. लोक प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने आपल्या जिवाची परवा न करता अहोरात्र काम केले. त्यामुळेच कोरोनाचे महासंकट नियंत्रणात आणण्यात हिंगोली जिल्ह्यातील जनता, सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यशस्वी झाले असे सांगताना हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने एक वेगळा पॅटर्न राज्यात निर्माण केला. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. राज्य शासनाला नुकतेच दोन वर्ष पूर्ण  झाले आहेत. या दोन वर्षात निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीबरोबरच पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यात मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट संपूर्ण जगासमोर उभे टाकले. परंतु महाराष्ट्राने या सर्व संकटाचा धैर्याने मुकाबला केला. असे कितीही संकट आले तरी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही, असे पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 2 लाख 97 हजार 867 शेतकऱ्यांना 75 टक्के निधी मदत म्हणून 222 कोटी 94 लाख निधी मिळाला आहे. यापैकी 208 कोटी 58 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच 56 लाख 14 हजार रुपयाच्या निधी  मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

कोविड-19 च्या धर्तीवर राज्यात बंद असलेल्या शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने स्थानिक पातळीवर परिस्थितीचा आढावा घेवून, शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. यापुर्वीही आपण माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या उपक्रमात शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवले आहे.

आमचा गाव, आमचा विकास या योजनेतून आता गावाच्या विकासाचा प्राधान्यक्रम ठरणार आहे. यासाठीचे आराखडे जिल्ह्यातील सर्व 563 ग्रामपंचायतीने अपलोड करण्याचे काम पूर्ण केले आहे. हे काम पूर्ण करणारी हिंगोली जिल्हा परिषद राज्यातच नव्हे तर देशात पहिली ठरली असल्याचेही यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यात 663 गावात जलजीवन मिशनची मोहिम राबविली जात आहे. यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे 12 गावातील योजनेची कामे असणार आहेत. उर्वरित 651 गावातील नळ योजनेची कामे जिल्हा परिषद व तांत्रिक सल्लागार समिती करणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत निवडलेल्या गावापैकी 576 गावात प्रत्यक्षात जलजीवन मिशनची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी 207 ठिकाणी पुनर जोडणीची कामे व 357 ठिकाणी नवीन नळ योजनेची कामे सुरु केली जाणार आहेत. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत रोजगार निर्मिती उपलब्ध करुन देण्यासाठी व या योजनेला अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील हिंगोली, औंढा आणि सेनगाव या तीन तालुक्यासाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे एकूण तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वसमत येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कनेरगाव शिवारात 65 एकरांवर प्रस्तावित असलेले मॉडर्न मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे देशात जयपूर, बंगळूरुनंतर वसमतला मॉडर्न मार्केट होणार असून जागतिक दर्जाची बाजारपेठ उभी राहणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात हिंगोली नगर पालिकेने मागील सहा वर्षापासूनचे सातत्य कायम राखत यंदा राज्यातील पहिल्या दहा नगरपालिकांमध्ये स्थान मिळविल्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात पालिकेचा गौरव करण्यात आला आहे. ही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले.  

पोलीस ठाण्यात आलेल्या लहान मुलांच्या मनातील पोलिसांविषयी भिती दूर व्हावी, त्यांना खुल्या वातावरणाचा, खेळाचा आनंद घेता यावा आणि यातून काही गुन्हेही रोखण्यास मदत व्हावी यासाठी हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन सुरु करण्यात आले आहे.

राज्य शासनाने आर.आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यातील 05 ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्कार प्राप्त पाचही गावांना प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे 50 लाखाची रक्कम मिळाली आहे. या तरतुदींमधून संबंधित गावांना नाविण्यपूर्ण विकास कामासाठी खर्च करता येणार आहे.

जिल्ह्यात विविध घरकूल योजनेतून एक हजार पेक्षा जास्त पूर्णत्वास आलेल्या घरकुलांचा गृह प्रवेश कार्यक्रम आयोजन करुन घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीणमध्ये 19 हजार 860 घरकुलाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 15 हजार 930 घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. याची टक्केवारी 80 टक्के इतकी आहे. तसेच येत्या मार्च अखेरपर्यंत उर्वरित 3930 घरकुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही पालकमंत्री  प्रा. गायकवाड म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 5020 बचतगटांना 750.75 लक्ष रुपयाचा फिरता निधी वितरीत करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे सन 2021-22 मध्ये एकूण 5 हजार 136 परसबागा तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा राष्ट्रीय कृषि योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना अनुसूचित जाती व जमाती या योजनेत सन 2020-21  व 2021-22 साठी 914 विहिरींच्या कामांना मंजुरी मिळाली असून आतापर्यंत 125 विहिरींचे काम पूर्ण झालेली आहेत. तर 450 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. वन विभागामार्फत सन 2021 च्या पावसाळ्यात जपान देशाच्या प्रसिध्द वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. आकिरा मियावाकी यांच्या मॉडेलनुसार जिल्ह्यात 10.53 हेक्टर क्षेत्रावर 20 घनवन रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3 लाख 42 हजार 900 वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. या घनवन लागवडीमुळे झाडांची दोन ते तीन वर्षात वाढ होते. त्यामुळे तापमान वाढीमुळे जमिनीची होणारी धूप कमी होण्यासाठी मदत होते. तसेच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची वाढ होण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या महासंकटाचा मुकाबला करत आपण जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून काम करत राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे सांगून पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   

            यावेळी पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने प्रकाशित केलेल्या हिंगोली जिल्हा व्हिजन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमार्फत शहीद सैनिकांच्या वीर माता रुक्मिणीबाई परसराम भालेराव, रा. पिंपळदरी, औंढा ना. यांना जमीन वाटपाचा सातबारा पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.

यावेळी पदाधिकारी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

****

25 January, 2022

 जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 150 रुग्ण ; तर 91 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  940 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25: जिल्ह्यात 150 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, वसमत परिसर 12 व्यक्ती, कळमनुरी परिसर 02 व्यक्ती, औंढा परिसर 03 व्यक्ती, सेनगाव परिसर 11 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 18 व्यक्ती, वसमत परिसर 45 व्यक्ती, कळमनुरी परिसर 45 व्यक्ती व सेनगाव परिसर 13 व्यक्ती असे एकूण 150 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 91 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 02 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 17 हजार 530 रुग्ण झाले असून, त्यापैकी  16 हजार 193 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 940  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 397 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात हिंगोली जिल्हा अग्रेसर

 

 राज्यात दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे शासन सत्तेत आल्यावर नवीन विकास कामे सुरु होण्यापूर्वीच कोरोनामुळे अनेक निर्बंध आले. मागील दोन वर्षापासून कोविड-19 विषाणूने धुमाकूळ घातलेला होता. या आजारामुळे अनेक माणसे मृत्यूमुखी पडले. अनेक कुटुंबियांना त्यांची जवळची माणसे गमवावी लागली. या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. या आपत्तीत आरोग्य व्यवस्थेचे महत्व लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी नियोजन तयार करण्यात आले. कोरोना निर्बंधामुळे व्यापार, उद्योग मंदावल्यामुळे शासनाची आर्थिक आवक देखील थांबलेली असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही व थांबणार नाही’ असा विश्वास प्रकट करत राज्याच्या आर्थिक चक्राला गती दिली. जिल्ह्याच्या व राज्याच्या उत्पन्नातून अधिकाधिक खर्च हा आरोग्य व्यवस्थेवर करुन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम केले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्याने अपुऱ्या संसाधनांसह दिलेला लढा अभूतपूर्व आणि इतरांसाठी आदर्शवत आहे. हिंगोली जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. तरीही खबरदारी म्हणून 15 फेब्रूवारी, 2020 पासून पूर्व नियोजन करुन ठेवण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात पहिला कोविड रुग्ण 2 एप्रिल, 2020 रोजी वसमत शहरामध्ये आढळला. जिल्हास्तरावर डिस्ट्रीक्ट टास्क फोर्स कमिटी तयार करुन ट्रेस, टेस्ट, ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करुन जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या सर्व नागरिकांची शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करुन त्यांची कोविड-19 ची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णास शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. बाहेरील जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होम क्वारंटाईन मध्ये न ठेवता त्यास क्वारंनटाईन सेंटर मध्येच ठेवण्यात आले. अशी उपाययोजना करणारा हिंगोली हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णास होम क्वारंटाईन किंवा होम आयसोलेशन मध्ये राहण्याची मुभा देण्यात आली नाही.

  डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास कोरोनाची पहिली लाट अंतिम टप्प्यात आली असे वाटत असतानाच फेब्रुवारी-2021 मध्ये रुग्णसंख्या वाढू लागली. त्यानंतर ती झपाट्याने वाढत गेली. कोरोनाची ही दुसरी लाट अधिक तीव्र होती. मात्र या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न केले. ऑक्सिजन, रेमडेसिवीरची कमतरता आणि वैद्यकीय मनुष्यबळाची कमी अशा संकटातही  हिंगोली जिल्ह्याने धीराने आणि संयमाने कोरोना विरोधात दिलेला लढा वाखाणण्यासारखा आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नाने शहरी व ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरी व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅटंची उभारणी करण्याबरोबरच बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. शासन व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन साठा व अन्य  आरोग्य उपकरणाची व्यवस्था करण्यात आली. परिणामी सध्या हिंगोली जिल्ह्यात बेडस्‌ची व ऑक्सिजनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे.

सन 2020 मध्ये पहिल्या लाटेच्या वेळी कोरोना उपचारासाठी अत्यल्प असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय, कोविड केअर सेंटरवरील 18 केंद्रावर 121 आयसीयू, 847 ऑक्सिजन व 2856 सर्वसाधारण असे एकूण 3944 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांसाठी वेगळा कोविड वार्ड तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिला व लहान मुलांसाठी 100 खाटांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच लेवल तीनचे इंटेन्सिव पेडीयाट्रीक केअर युनिट व 20 खाटांचे एन.आय.सी.यू., 25 स्वतंत्र व्हेंटीलेटर, आणि 124 खाटांचे एस.एन.सी.यु. उपलब्ध करण्यात आले आहे.

 यासोबतच कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन निर्मिती, औषधांची उपलब्धता, लसीकरण, कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळा, ऑक्सिजन बेड्स आदींच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात आली आहे. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या वसमत येथील स्त्री रुग्णालय व इतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढ करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णावर वेळीच उपचार होण्यासाठी जिल्ह्यातील सिध्देश्वर, कौठा, डोंगरकडा व शिरड शहापूर या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना रुग्णांसाठी प्रत्येकी 50 बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  तसेच ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रातही ऑक्सिजनची उपलब्धता करुन देण्यात आली आहे.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यामुळे जिल्ह्यात 7 क्रायो ऑक्सिजन टँक, 4 ऑक्सिजन प्लाँट कार्यान्वित करण्यात आले असून आणखी 2 ऑक्सिजन प्लाँट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सध्या दररोज 6.25 मे. टन ऑक्सिजन तयार होत आहे. आज रोजी जिल्ह्यात 900 ऑक्सिजन बेड व 1 हजार 884 नॉन ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तसेच हिंगोली  जिल्ह्यात कोविड-19 साठी स्वतंत्र 100 खाटांचे सर्व सोयीनी युक्त कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. यामध्ये सेंट्रल ऑक्सिजन लाईन, व्हेंटीलेटर, डायलिसीस युनिटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या वेळी दररोज 8 मे. टन ऑक्सिजनचा वापर करण्यात आला होता. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात 124.42 मे.टन ऑक्सिजन साठवणूक करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यासाठी नवीन ॲम्ब्यूलन्स उपलब्ध करुन देण्यास पुढाकार घेतला. आज प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्यूलन्स उपलब्ध झाल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एड्स सारख्या रुग्णांसाठी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या पुढाकारातून स्वतंत्र एआरटी केंद्र उभारण्यात आले आहे. भारतात असे एकूण 3 एआरटी केंद्र असून महाराष्ट्रात हिंगोली येथे उभारण्यात आलेले पहिले एआरटी केंद्र आहे. या केंद्रात एच.आय.व्ही. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सध्या कोरोनावर लस हा एकमेव उपाय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 6 हजार 133 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 5 लाख 1 हजार 971 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तसेच आता 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींनाही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 33 हजार 966 मुला-मुलींनी लसीचा डोस घेत चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सध्या कमी दिसत असले तरीही अद्याप आपला जिल्हा कोरोनामुक्त झालेला नाही. कमी-अधिक प्रमाणात अजूनही रुग्ण आढळून येत आहेत. तसेच देश-परदेशात कोरोना विषाणू आपले रुप पालटून अधिक सशक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत.  सध्या देशात ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. कोरोना विषाणूपासून आपल्याला बाधा होऊ नये म्हणून लस घेणे आवश्यक आहे. भारतात आतापर्यंत अनेक नागरिकांना कोरोना लसीकरणाचे डोस देण्यात आलेले आहेत. लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. ती पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी अद्यापही कोविडची लस घेतली नाही, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी व ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनी देखील दुसरा डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करावेत.

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासोबतच सर्वांच्या लसीकरणासाठी आग्रही असून प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील पायाभूत सुविधा अद्यावत करण्यात येत आहेत.

तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे. कोरोना विषाणूपासून स्वत:ला वाचविण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करुन सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. कोरोनाने जिवाची किंमत दाखवून दिली आहे. त्यामुळे आपणही लस घ्यावे. तसेच आपल्या परिवारातील सदस्य, मित्र मंडळीना लस घेण्यास सांगून सुरक्षित करावेत. 

 

                                                                                                --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                     माहिती सहायक,

     जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******




 लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करणे आवश्यक

                                                                              -  उप जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उप जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुजित जाधवर, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची  प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. कच्छवे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकांस निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून याची जाणीव झाल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. यासाठी 18 ते 20 वयोगटातील युवकांनी पुढाकार घेवून आपली मतदार नोंदणी करावी. तसेच याबाबत समाजामध्ये जनजागृती करावी, असे सांगितले.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त नवमतदारांना यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना उप जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप कच्छवे यांनी मतदानाची प्रतिज्ञा दिली. यावेळी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले.

कार्यक्रमास नायब तहसीलदार जी. एस. जिडगे, डी. एस. जोशी यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचारी तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. शेवटी तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी  सर्व उपस्थितांचे आभार मानले.

****

24 January, 2022

 

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड या दि. 25 व 26 जानेवारी, 2022 या दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  मंगळवार, दि. 25 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता नांदेड विमानतळ येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व 3.30 वा. पर्यंत राखीव. 3.40 ते 4.00 वा. हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे  येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 4.00 वाजता डिग्रस कऱ्हाळे येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोलीकडे प्रयाण. 4.10 वा. ते सांय. 5.00 वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती.  सांय. 5.00 ते 6.00 वा. राखीव. 6.00 वाजता राजयोग मेडिकल हिंगोली येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने हेल्मेटचे वाटप कार्यक्रमास उपस्थिती. 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन . 7.00 ते 8.00 वा. माजी मंत्री श्रीमती रजनीताई सातव, कळमनुरी यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती.

बुधवार, दि. 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता संत नामदेव कवायत मैदान, हिंगोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. 9.40 वाजता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रकाशित होणाऱ्या व्हीजन डॉक्यूमेंट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, 9.50 वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमार्फत शहीद सैनिक, वीरमातांना जमीन वाटपाचा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वाजता आय मार्ट नांदेड रोड, हिंगोली येथे मॉलचे उद्घाटन, 10.10 वाजता नारायण नगर हिंगोली येथील देवकर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. 10.30 वाजता कोथळज रोड, परिवार मॉल जवळ, हिंगोली येथील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या अद्यावत ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 10.50 वाजता सह्याद्री हॉस्पिटल येथून मोटारीने श्री गुरु गोविंदसिंघजी, नांदेड विमानतळाकडे प्रयाण.

****

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 148 रुग्ण ; तर 121 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  881 रुग्णांवर उपचार सुरु तर एका रुग्णांचा मृत्यू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 148 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 03 व्यक्ती, वसमत परिसर 15 व्यक्ती, कळमनुरी परिसर 13 व्यक्ती, सेनगाव परिसर 07 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 70 व्यक्ती, औंढा परिसर 37 व्यक्ती व सेनगाव परिसर 03 व्यक्ती असे एकूण 148 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 121 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 02 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 17 हजार 380 रुग्ण झाले असून, त्यापैकी  16 हजार 102 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 881  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 397 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****