25 February, 2020



महिला व बालविकास विभागामार्फत जनजागृती कार्यक्रम संपन्न
                                                                                                   
        हिंगोली,दि.25: जिल्हा महिला व बालविकास विभागातंर्गत, जिल्हा बालसंरक्षण कक्ष हिंगोली, यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी असलेल्या शासकीय योजना व जिल्ह्यामध्ये बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणा यांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी जनजागृती कार्यक्रम संप्पन झाला.
प्रत्येक गाव पातळीवर बालकासाठी गाव बालसंरक्षण समिती असून या समितीमार्फत काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे पुनर्वसन केले जाते. तसेच अशा बालकांसाठी बालसंगोपन संस्था व बालसंगोपन योजना कार्यान्वित आहेत. अनाथ असलेल्या बालकांना शिक्षण व नोकरीमध्ये 1% (टक्का) आरक्षण आहे अशी माहिती या जनजागृती कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी यावेळी दिली.
समुपदेशक सचिन पठाडे यांनी यावेळी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा असून असे केल्यास २ वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रुपये १ लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ नुसार १२ वर्षाच्या आतील बालकांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा, तसेच १६ वर्षावरील  बालकांवर बलात्कार केल्यास कमीत कमी १० वर्ष ते २० वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती दिली. जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी पालकांनी बालकल्याण समिती सावरकर नगर, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी केले.  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहिती विश्लेषक शेख रफिक व क्षेत्र कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत यांनी सहकार्य केले.
****







24 February, 2020




                                 ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019’
जिल्ह्यातील मौजे समगा व मौजे खरबी येथून आधार प्रमाणिकरण योजनेचा शुभारंभ
·   जिल्ह्यातील 1 लाख 05 हजार 690  शेतकरी लाभार्थ्यांचे कर्जखात्याशी आधार जोडणीचे काम पूर्ण
             हिंगोली, 24: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 या योजनेची हिंगोली तालूक्यातील मौजे समगा व मौजे खरबी या गावातील शेतकरी सभासदांना प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण नोंद पावती देवून योजनेचा शुभारंभ केला.
यावेळी उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसिलदार श्री. खंडागळे, सहाय्यक निबंधक जितेंद्र भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 या योजनेची हिंगोली जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजने अंतर्गत आजपर्यंत 1 लाख 05 हजार 690 शेतकऱ्यांचे कर्जखात्याशी आधार जोडणी झालेली आहे. त्यापैकी 96 हजार 995 इतक्या शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत, 3 हजार 500 शेतकऱ्यांनी आपले आधार ओळखपत्र आणून न दिल्याने त्यांची आधार जोडणी करण्याचे काम प्रलंबीत राहिले आहे. आधार जोडणीचे काम शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी विनाविलंब त्यांचे आधार ओळखपत्र संबंधीत बँक शाखेत देवून आपले आधार जोडणीचे कामकाज पुर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन योजनेसाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.
 या योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत पायलट प्रमाणिकरणासाठी हिंगोली तालुक्यातील मौजे समगा व खरबी या दोन गावांची निवड करण्यात आली होती. मौजे समगा गावातील 147 लाभार्थी तर मौजे खरबी येथील 86 लाभार्थी असे एकुण 233 लाभार्थ्यांची यादी आज संबंधीत गावात प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणांचे काम सुरुळीतपणे सुरु झाले आहे. मौजे समगा व मौजे खांबाळा येथील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक यंत्राद्वारे हे आधार प्रमाणिकरणाचे काम करण्यात येत आहे. या 233 लाभार्थ्यांची बँक निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
 यामध्ये हिंगोली तालुक्यातील मौजे समगा गावातील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अलाहाबाद बँक-01, बँक ऑफ इंडिया-28, स्टेट बँक ऑफ इंडिया-22, युनियन बँक ऑफ इंडिया-96 असे एकूण 147 लाभार्थी शेतकरी तर हिंगोली तालुक्यातील मौजे खरबी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये एकूण 86 लाभार्थी शेतकरी आहेत. मौजे समगा व मौजे खरबी या दोन्ही गावात एकून लाभार्थी शेतकरी संख्या 233 अशी आहे.
 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 करीता गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील गावांना प्रत्यक्ष भेट देवुन आधार प्रमाणिकरणाच्या कामकाजाची पाहणी केल्याने आजपर्यंत 1 लाख 05 हजार 690 शेतकऱ्यांचे कर्जखात्याशी आधार जोडणी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी मुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे नक्कीच दिलासा देण्याचा प्रत्यन शासनाने केला आहे . तसेच उर्वरीत 3 हजार 500 शेतकऱ्यांनी आपले आधार ओळखपत्र विनाविलंब संबंधीत बँक शाखेत देवून आपले आधार जोडणीचे कामकाज पुर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी केले.

               
*****

23 February, 2020



जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

        हिंगोली,दि.23: संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, नायब तहसिलदार डी. एस. जोशी, अव्वल कारकून एम. एस. वाकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी ही यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****



19 February, 2020




जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

        हिंगोली,दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे,  जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल कळसकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****



15 February, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन






जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

हिंगोली, दि. 15 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदींसह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. 
***** 


07 February, 2020

08 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


08 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

            हिंगोली, दि.07: मागील लोक अदालतीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून  भूसंपादनाचे प्रकरणे निकाली काढण्यामध्ये सर्वांचे हित असून लोक अदालतीमध्ये प्रकरणे निकाली काढल्यास आपली वेळ, पैसे व श्रमाची बचत होते. त्याकरीता शनिवार, दिनांक 08 फेब्रुवारी 2020 रोजी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद, जिल्हा सत्र न्यायालय हिंगोली व वसमत येथे होणा-या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये भूसंपादनाची प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****


03 February, 2020

रोजगार मेळाव्याचे आयोजन


रोजगार मेळाव्याचे आयोजन
        हिंगोली, दि.3 :सुशिक्षत बेरोजगार युवक-युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  हिंगोली व तोष्णीवाल आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 फेब्रुवारी, 2020 रोजी तोष्णीवाल महाविद्यालय येथे  तर दिनांक 7 फेब्रुवारी , 2020 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
            या मेळाव्यास पॅराडईज प्लेसमेंट कन्स्लटन्सी, औरंगाबाद पेस स्किल ट्रेनिंग सेंटर, लातूर , धूत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद , नवकिसान बायोप्लांट लिमिटेड कंपनी, जळगाव , अलाईड रिसोर्स मॅनेजमेंट सर्व्हीस प्रा. लि. औरंगाबाद , फ्युचर मनी सोर्स इंडिया प्रा. लि. वाशिम, सेक्युरा मल्टीस्पेशालिटी ॲन्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, वाशिम हे उद्योजक येणार असून अप्रेंटीस ट्रेनी, इपीपी ट्रेनी, फिल्ड ऑफीसर, बोट अप्रेंटीसशिप, नीम ट्रेनी, सेल्स एक्झिक्युटीव्ह , सेल्स सुपरवायझर, सेल्स असोसिएट या पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठ www.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर रोजगार या पर्यायावर क्लिक करुन नोकरी साधक हा पर्याय  निवडावा, युजर आयडी  व पार्सवर्डद्वारे  लॉग ईन करुन प्रोफाईल मधील पंडीत दीनदयाळ  उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायाद्वारे हिंगोली जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी 02456-224574 व डॉ. व्हि.डी. शिंदे मो-9850593939, प्रा. टी. यु. केंद्रे मो-8275005646 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
            शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपले शैक्षणिक  प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, सेवायोजन कार्ड घेऊन वरील पत्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता श्रीमती रेणुका तम्मलवार , तोष्णीवाल महाविद्यालयाचे प्राचार्य एस.जी. तळणीकर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे  प्राचार्य श्री. भगत  यांनी केले आहे.
000000