30 August, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण ;  तर 06 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे सेनगाव परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी 01 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 01 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 27 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 629 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 06 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 

मोटार सायकल संवर्गासाठी ‘एसी’ ही नवीन मालिका चालू

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील यापूर्वीची मोटार सायकल संवर्गासाठीची मालिका एमएच-38-एबी ही मालिका संपुष्टात आल्यामुळे एमएच-38-एसी-0001 ते 9999 ही नवीन मालिका चालू करण्यात आली आहे.

ज्यांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून आपला आकर्षक क्रमांक राखीव करुन घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

*****

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2020 हिंगोली मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 4 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी 1) आदर्श महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली भाग-अ, 2)  आदर्श महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली भाग-ब, 3) शासकीय तंत्रनिकेतन, हिंगोली, 4) सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल, शास्त्रीनगर, हिंगोली, 5) विद्यानिकेतन इंग्लीश स्कूल, बियाणीनगर, हिंगोली, 6) जिल्हा परिषद कन्या शाळा, हिंगोली, 7) एबीएम इंग्लीश स्कूल, लिंबाळा, हिंगोली, 8) जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, हिंगोली, 9) संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली, 10) पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकोला रोड, हिंगोली, 11) कै.बाबूराव पाटील कला महाविद्यालय, गारमाळ, परिसर, हिंगोली, 12) अनुसया विद्यामंदीर खटकाळी बायपास, हिंगोली, 13) शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, 14) गुलामनबी आझाद उर्दू हायस्कूल, कळमनुरी, 15) महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय, कळमनुरी, 16) कै.शिवरामजी मोघे सैनिक स्कूल असोलवाडी रोड, कळमनुरी, 17) कै.शंकरराव सातव अ.महाविद्यालय, कळमनुरी, 18) सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, हिंगोली या 18 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार असून या परिक्षा केंद्रावर 4 हजार 488 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. वरील सर्व  परीक्षा केंद्रावर सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्तकामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

27 August, 2021

 

जिल्ह्यात कोरोनाचा नवीन एकही रुग्ण नाही ;  तर दोन रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात कोरोनाचा नवीन एकही रुग्ण नाही, तर दोन रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 01 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 01 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 23 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 629 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 02 आरटीपीसीआर पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने

पैनगंगा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : पैनगंगा नदीवरील इसापूर धरण दि. 26 ऑगस्ट, 2021 पर्यंत 80.41 टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी 438.92 मीटर आहे. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार दि. 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत 440.82 मीटर ठेवावी लागणार आहे. धर सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणातून वक्रदाराद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पेनगंगा नदीपात्रात  सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1, नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

***** 

 

मार्चपासून निवृत्तीवेतन बंद असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी

हयातीचे प्रमाणपत्र तातडीने पाठवावेत

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : ज्या निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्तीवेतन माहे मार्च, 2021 पासून बंद आहे. अशा निवृत्तीवेतन धारकांनी त्यांनी त्यांचे हयात प्रमाणपत्र  तातडीने कोषागार कार्यालयाच्या  to.hingoli@zillamahakosh.in या ई-मेल पत्यावर पाठवावेत. तसेच त्याची मूळ प्रत कोषागार कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

***** 

 

विविध व्यवसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून

युवा उद्योजक पिढी निर्माण करण्याचे काम करावे

                                      - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 : नेहरु युवा केंद्राच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्र आणि एनएसएसच्या सहकार्याने युवकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे विविध व्यवसायिक प्रशिक्षण देऊन सक्षम युवा उद्योजक पिढी निर्माण करण्याचे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, कौशल्य विकास कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. ए. काद्री, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश कानवडे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. दत्ता कुंचलेवाड, आदर्श महाविद्यालयातील एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन हटकर, क्रीडा विभागाचे जयवंत असोले, समाज कल्याण विभागाचे गंभीर शेबेटवाड, स्काऊट गाईडच्या माधुरी हाळवी, संस्थेचे प्रतिनिधी नामदेव सपाटे, चक्रपानी गायकवाड, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संदीप शिंदे यांची उपस्थिती होती.  

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून युवकांना प्रशिक्षण द्यावे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी व इतर विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून बँक मित्रांना ऑनलाईन बँकेच्या कामकाजाविषयी जनतेपर्यंत माहिती कशी पोहोचवावी याविषयीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

‘स्वच्छ गाव-हरित गाव’ या उपक्रमाद्वारे युवकांना प्रशिक्षण देवून जिल्ह्यातील गावात स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी प्रबोधन करावे. तसेच वन विभागाशी संपर्क साधून युवकांच्या माध्यमातून सर्व गावांत वृक्ष लागवड करावी व लोकेशन वाईज छायाचित्रे अपलोड करावेत. तसेच एनएसएसच्या माध्यमातून युवकांचे प्रबोधन करावे. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. नेहरु युवा केंद्राच्या प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी आत्मनिर्भर भारत योजनेतून युवकांचे मॅपिंग, कौशल्य हाताळणे, बँक मित्राना प्रशिक्षण देणे,  कोविडची जनजागृती करणे, कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, भारतातील युवकांना निरोगी व तंदुरुस्त जीवनशैली जगण्यासाठी प्रबोधन करणे, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे यासह विविध योजनेचा कृती आराखडा यावेळी सादर केला .

*****

26 August, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण ;  तर 06 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे औंढा परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी 05 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 05 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 23 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 629 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 02 आरटीपीसीआर पॉझिटीव्ह व 04 संशयित रुग्ण असे एकूण 06 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 

कृषि विज्ञान केंद्रामध्ये किसानों के लिए खाद्य एवं पोषण कार्यक्रम संपन्न

विविध मान्यवरांचे मार्गदर्शन


 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने  किसानों के लिए खाद्य एवं पोषण या विषयावर आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारंगा येथील प्रगतीशील शेतकरी आबासाहेब कदम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी रत्न पुरस्कार प्राप्त गोरखनाथ हाडोळे हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके हे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोरखनाथ हाडोळे यांनी सेंद्रीय शाळू ज्वारी व भाजीपाल्याची  शेती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब कदम यांनी सेंद्रीय शेती व सकस आहार याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रा. राजेश भालेराव यांनी मातीचे आरोग्य या विषयावर माहिती दिली. प्रा. अजयकुमार सुगावे यांनी रोगप्रतीकारक क्षमता कशी वाढवावी तसेच पिक संरक्षणासाठी सप्तसुत्री सांगितली. डॉ. कैलास गिते यांनी गाईच्या दुधाचे आहारातील महत्व याविषयी माहिती दिली. तोंडापूर येथील महिला शेतकरी वंदना थोरात यांनी स्वत:च्या शेतामधील सेंद्रीय शेतीचा अनुभव सांगितला.

प्रास्ताविकात डॉ. पी. पी. शेळके यांनी शेतकऱ्यांसाठी पौष्टिक आहार व प्रत्येक कुटुंब प्रमुखांनी परसबाग निर्मिती करावी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी किसानों केले लिए खाद्य एवं पोषण या विषयावरील केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी, डॉ. त्रिलोचनसिंह महापात्रा यांचे भाषण दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ठाकरे यांनी केले तर राजेश भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.  या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*****

 

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांनी

विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला, नैर्सगिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे अशा विविध क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य, तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता दहावी, बारावी बोर्डात 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापिठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी , आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

विशेष गौरव पुरस्कारासाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांनी दि. 16 ऑक्टोबर, 2021 पर्यंत ओळखपत्राची छायांकित प्रत, दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छयांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत , आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डाची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची व आधार कार्डाची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्रासह  जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे संपर्क साधावा. तसेच या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी केले आहे.

*******

 

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी

शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत सन 2021 मध्ये इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांसाठी  सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. पात्र माजी सैनिक , विधवांच्या पाल्यांनी  दि. 15 ऑक्टोबर, 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली  येथे कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत इयत्ता दहावी, बारावी व पदवी गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असलेल्या इयत्तेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, केंद्र/राज्य शासनाची/ इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेच्या प्राचार्याचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे अशा पाल्यांना प्रकरणासोबत गॅप सर्टीफिकेट (स्वयंघोषणापत्र) , माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असल्यास मुलगी अविवाहित असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डच्या दोन्ही बाजूची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबूकच्या पहिल्या पानाची व आधार कार्डाची छायांकित प्रत जोडण्यात यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी केले आहे. 

*****

 

एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

हिंगोली, दि. 26 (जिमाका) :  शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्हा सैनिक कार्यालयात संपर्क साधून दि. 16 ऑक्टोबर, 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबूकच्या पहिल्या पानाची व आधार कार्डाची छायांकित प्रत जोडण्यात यावे आणि जास्तीत जास्त माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी केले आहे. 

*****

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी

अर्ज करण्यास 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील, अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनींना सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांस  निधीच्या उलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी दि. 12 ऑगस्ट, 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ही मुदत दि. 15 सप्टेंबर, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

याचा लाभ घेण्यासाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनीनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश  घेतल्याची पावती, बोनाफाईड सर्टीफिकेट व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) हिंगोली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

 

प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिचंन सुविधा साधने यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

 

हिंगोली, दि. 26 (जिमाका) :  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी सन 2021-22 साठी इच्छूक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करु10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी दि. 30 ऑगस्ट, 2021 ते दि. 10 सप्टेंबर, 2021 या कालावधीत नोंदणी करावी. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाणार आहे .

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रम खालील नमूद जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो.

गहू - सोलापूर, बीड, नागपूर. कडधान्य (हरभरा) -राज्यातील सर्व जिल्हे. भरडधान्य (मका) - नाशिक, धुळे, जळगाव,अहमदनगर, सांगली,औरंगाबाद, जालना. पौष्टिक तृणधान्य - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला ,वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. गळीतधान्य - सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम,चंद्रपूर.

बियाणे वितरण : वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाच्या आतील वाणास 25 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रुपये प्रती किलो, संकरीत मका 95 रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाच्या आतील वाणास 30 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रुपये प्रती किलो, करडई बियाण्यासाठी 40 रुपये प्रती किलो, गहू बियाण्यासाठी 10 वर्षाच्या आतील वाणास 20 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 10 रुपये प्रती किलो प्रमाणे बियाणे वितरण करण्यात येणार आहे. एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

पीक प्रात्यक्षिके : पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार 2 हजार रुपये ते 4 हजार रुपये प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. 

            शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. एस. कच्छवे  यांनी केले आहे.

*****

 

बोगस वैद्यकीय व्यवसायिकांची चौकशी करुन

दोषी वैद्यकीय व्यवसायिकांवर फौजदारी कारवाई करावी 

-         जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश



हिंगोली, दि. 26 (जिमाका) :  जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायिकांची चौकशी करुन दोषी आढळून आलेल्या वैद्यकीय व्यवसायिकांवर फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

 येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बोगस वैद्यकीय व्यावसाय करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक के.एस.पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शेळके, नरेश पत्की यांची उपस्थिती होती.

 बोगस व्यवसायिकांवर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा बैठकीचे आयोजन करुन आढावा घेण्यात यावा. बोगस वैद्यकीय व्यवसायिकांच्या तपासणीसाठी चेकलिस्ट (तपासणी सूची) तयार करावी व ती सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांना देण्यात यावी, अशा सूचनाही  जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी  दिल्या.

 ****

24 August, 2021

 

जिल्ह्यात कोरोनाचा नवीन एकही रुग्ण नाही ;  तर 02 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात कोरोनाचा नवीन एकही रुग्ण नाही, तर 02 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 03 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 22 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 628 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 02 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली

बालविवाह निर्मूलन प्रतिबंध कृती दलाची बैठक संपन्न



 

           हिंगोली, दि. 24 (जिमाका) : जिल्हा महिला बाल विकास विभाग, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहावीयर चेंज कम्युनिकेशन (SBC3) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा कार्य दल (District Task Force ) स्थापन करण्याची आणि त्याच्या सहकार्याने बाल विवाह रोखण्यासाठी कृती आराखडा विकसित करण्यासाठी तसेच अग्रभागी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नियोजन करणे व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 ची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आज  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन प्रतिबंध जिल्हा कृती दल समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पावसे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, आरोग्य अधिकारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 37.1 टक्के आहे. बालविवाहाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रारुप कृती आराखडा तयार करावा. तसेच फ्रंटलाईन वर्करच्या माध्यमातून व युनिसेफच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा व गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या.

              महाराष्ट्र शासनाचा महिला बाल विकास विभाग, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेज कम्युनिकेशन (SBC3) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाहाचे निर्मूलनासाठी मागील दीड वर्षात संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास केला. यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यात विभागीय सल्लामसलत सत्र आयोजित करुन महाराष्ट्रातील बालविवाहाचे निर्मूलनासाठी सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन (SBC3) या संस्थेने धोरण विकसित केलेले आहे. यामध्ये सक्षम नावाच्या उपक्रमाची शिफारस करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

 

****