29 February, 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यातील 65 वर्षे वय असलेली व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणाऱ्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु केलेली आहे. या योजनेंतर्गत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदीसाठी 3 हजार रुपयापर्यंतची रक्कम महाडिबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी दि. 4 मार्च ते 15 मार्च, 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली येथे अर्ज सादर करावेत. अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी हा दि. 31 डिसेंबर, 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेला असावा. आधार कार्ड, मतदान कार्ड जोडणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँकखात्याचे बँक पासबूक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयाच्या आत असावे.), स्वयं-घोषणापत्र -सीपीएसयुद्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल, असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील तीन वर्षात लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र देखील नमूद करण्यात यावे. उपरोक्त पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. वरील कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनी दि. 4 मार्च ते 15 मार्च, 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ******

‘उत्कर्ष बहुजनांचा’ मेळावा कार्यक्रमाचे आयोजन • पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार मेळाव्याचे उद्घाटन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘उत्कर्ष बहुजनांचा’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 4 मार्च, 2024 रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली येथे होणार आहे. यावेळी विभागाच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना कळावी यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील नागरिकांना या योजनांचा लाभ घेता येईल. तसेच या मेळाव्यात विविध योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे. ******

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करून बालविवाह निर्मूलनाची जनजागृती करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 29 : येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन बालविवाह निर्मूलनाची जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारील कार्यालयाच्या सभागृहात दि. 28 फेब्रुवारी, 2024 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, आरोग्य विभाग प्रतिनिधी डॉ. जाधव, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी चंद्रकांत कारभारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी बालाजी भाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी व्ही. बी. चव्हाण, कळमनुरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी बी. के. गायकवाड, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी गजानन गुंडेवार, चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, एकात्मिक बालविकास प्रकल्पच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती एल. बी. ठाकूर, माध्यमिक शिक्षण विभाग प्रतिनिधी आकाश बांगर, कायदा तथा परीविक्षा अधिकारी अनुराधा पंडित, एसबीसी 3 & यूनिसेफचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे उपस्थित होते. बालविवाहातून मुक्त होऊन उच्च शिक्षण पूर्ण करीत असलेल्या मुलींचा व मुलींच्या पालकांचा सत्कार शासन आपल्या दारी कार्यक्रमात करण्यात यावा. बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून बालविवाहाची प्रचार-प्रसिद्धी करावी. प्रत्येक गावात 20 ते 30 वयोगटातील बालमित्रांची निवड करुन जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालमित्रांच्या संपर्कात राहून बालविवाहाचा आढावा घ्यावा. बालविवाहास आळा घालण्यासाठी उमेद अभियानातील, माविम मधील महिलांमध्ये जनजागृतीचे उपक्रम घेण्यात यावे, बालविवाह निर्मूलनाबाबत 250 शाळेत घेण्यात येणारे सत्र महाविद्यालयातही घेण्यात यावे. तसेच यूनिसेफ व एसबीसी 3 यांच्याकडून 2024 ते 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या. शेवटी बैठकीचे आभार प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे यांनी केले. ******

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या त्रैमासिक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा घेतला. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठुले, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर केला. तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर, 2023 या मागील तिमाहीत केलेल्या एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाचा, अशासकीय संस्था विहान व लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाचा आढावा सादर केला. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 3829 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली असून, त्यापैकी 1920 रुग्णांना औषधोपचार सुरु असल्याचे सांगत जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्सबाबत सुविधा पुरविणाऱ्या केंद्राची माहिती दिली. *******

चर्मकार बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी • ‘लिडकॉम आपल्या दारी’ची कार्यशाळा संपन्न

हिंगोली (जिमाका), दि 29 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संत रोहिदास चर्माद्योग आणि चर्मकार विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार आणि शैक्षणिक कर्ज पुरवठा केला जातो, याचा चर्मकार बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि व्यवस्थापकीय संचालक धम्मदीप गजभिये यांच्या मार्गदर्शनात ‘लिडकॉम आपल्या दारी’ मोहिमेंतर्गंत ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात पार पडली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी बोलत होते. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, प्रल्हाद वाघमारे, महादेव खंदारे, सिद्धार्थ गोवंदे, गोविंद असोले, अरुण राऊत आदि उपस्थित होते. महामंडळाने आणि समाजबांधवांना सुवर्ण जयंती वर्ष आणि संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या युवकांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन उच्च शिक्षण व व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री. केले. मोहिमेत विविध शासकीय योजना राबविल्या जातात. तसेच महाराष्ट्रग उद्योजकता विकास केंदाचे सुधीर आठवले आणि सुभाष बोरकर यांनीही महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. बार्टीचे प्रकल्प समन्वयक सिद्धार्थ गोवंदे यांनीही बार्टीच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. चर्मकार महामंडळातर्फे कर्ज योजनेची माहिती व दिनदर्शिकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. महामंडळाचे सुवर्ण महोत्स्वी वर्ष असून, लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अरुण राऊत यांनी केले. सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी तर विशाल कुबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव खंदारे, सचिव गजानन खंदारे, प्रल्हाद वाघमारे, आनंद इंगळे, दिगांबर मानकर, महादेव गाडेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. *****

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित मंडळामध्ये शासनाच्या विविध उपाययोजना तातडीने अंमलात आणा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

हिंगोली,(जिमाका)दि. 29 : राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यातील जून ते सप्टेंबर, 2023 या कालावधीत महसुली मंडळामध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मी. पेक्षा कमी झाले आहे. अशा 1021 महसुली मंडळांपैकी आणि दि. 10 नोव्हेंबर, 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्ह्यातील महसुली मंडळांमध्ये शासनाच्या विविध उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता, भांडेगाव, कळमनुरी तालुक्यातील साळवा, औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर आणि शिरड शहापूर, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव आणि बाभुळगाव ही सात महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करून सवलती लागू केल्या आहेत. याशिवाय ज्या महसुली मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन केली आहेत आणि अद्यापही पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाहीत, अशीही मंडळे यामध्ये समाविष्ट आहेत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या चालू विज बिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू केल्या आहेत. या महसुली मंडळांना देण्यात येणाऱ्या विविध सवलतीपोटी आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच या उपाययोजना तातडीने अंमलात आणावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिले आहेत. ******

खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओवरील आक्षेपार्ह प्रसारणावर राहणार नियंत्रण • जिल्हास्तरीय केबल टेलिव्हिजन नेटवर्क सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

हिंगोली,(जिमाका)दि. 29 : खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन होणाऱ्या सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 नुसार जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज दि. 29 फेब्रुवारी, 2024 रोजी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सर्व खाजगी वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 चे पालन करणे बंधनकारक असून, सदर कायद्यानुसार सर्व नोंदणीकृत खाजगी वाहिन्यांनी फ्रि टू एअर वाहिन्या आणि दूरदर्शन वाहिन्याचे प्रक्षेपण करणे बंधनकारक आहे. जाहिरात संहितेचे कार्यक्रमाच्या प्रसारणात उल्लंघन करणे, विविध धर्म, जाती, भाषा, वर्ग, समूह आणि समाजाच्या भावना दुखविणारे किंवा समाजात द्वेषभावना पसरविणारे प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे अधिकार या समितीला असणार आहेत. अशा प्रसारणाची तक्रार आल्यास संबंधित केबल चालकाकडून कार्यक्रमाची दृश्ये मागविण्याचे अधिकार समितीला आहेत. ज्या नोंदणीकृत खाजगी वाहिन्या किंवा एफ. एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आक्षेपार्ह प्रक्षेपण करत असतील, अशा वाहिन्यांची किंवा रेडिओची तक्रार प्राप्त झाल्यास या कायद्यानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच अनिवार्य वाहिन्यांच्या प्रक्षेपणात व्यत्यय येणे, सिग्नल न मिळणे अशा त्रुटी आढळल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास प्राधिकृत आधिकाऱ्यांनी संबंधित केबल ऑपरेटरला समज द्यावी. जिल्ह्यातील कार्यरत खासगी एफ. एम. रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सद्वारे हवाई प्रसारण संहितेचे पालन होते का नाही, यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या. तक्रारींची शहानिशा करुन केबल चालक किंवा खासगी एफ. एम. रेडिओ विरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई करावी. जर एखाद्या कार्यक्रमाचा सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत असेल किंवा कोणत्याही समाजात असंतोष निर्माण होत असेल तर तात्काळ जिल्हाधिकारी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या त्वरित नजरेस आणून द्यावे. तसेच जिल्ह्याकरिता तक्रार निवारण केंद्राची स्थापना करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने स्थानिक वृत्त वाहिन्यांना केबल ऑपरेटर म्हणून नोंदणी देण्याऐवजी फक्त केबल ऑपरेटर किंवा केबल परिचालक म्हणूनच परवानगी द्यावी. टपाल विभागानेही याबाबतची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी किंवा एफ. एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह संदेशाचे प्रसारण होत असल्यास संबधित वाहिन्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांमध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 कायद्याबाबत विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी यावेळी दिल्या. प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव प्रभाकर बारहाते यांनी या खाजगी दूरचित्रवाणी सनियंत्रण समितीची रचना व तीची कार्ये तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरात याविषयी दर्शकांकडून येत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच केबल वाहिन्या आणि केबल चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभर कायदा लागू केला आहे. तसेच स्थानिक खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्राचे सनियंत्रण करण्याचे काम ही समिती करणार असल्याची माहिती यावेळी दिली. या बैठकीस समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी विष्णुकांत गुट्टे, सरजूदेवी भिकुलाल आर्य कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य चंद्रशेखर देशपांडे, महिलासाठी काम करणाऱ्या उज्वल प्रसारक मंडळ या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, समर्थ पत्रकारिता व जनसंवाद महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोल्हे यांची यावेळी उपस्थिती होती. *****

28 February, 2024

जलेश्वर तलाव विकासासाठी नागरिकांनी अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे* • तहसीलदारांचे जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमणधारकांना आदेश

हिंगोली (जिमाका),दि.२८ : येथील जलेश्वर तलावाचा विकास करण्यासाठी परिसरातील अतिक्रमणधारकांनी नोटीस मिळाल्यापासून पुढील ४८ तासात आपापले अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी दिले आहेत. दि. 31 जानेवारी, 2018 च्या पत्रान्वये अतिक्रमण हटविण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. जलेश्वर तलाव परिसरात १९५ कुटुंबांचे कच्चे व पक्के घराचे अतिक्रमण दिसून आले. त्यानुसार अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आली होती. याविरोधात उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे रिट याचिका क्र. 3126/2020 नुसार आव्हान देण्यात आले होते. तलाव हा सार्वजनिक वापरासाठी आवश्यक असल्याने उच्च न्यायालयाने अतिक्रमणधारक शा.नि. दिनांक 04/04/2002 व दि. 17/01/2018 मधील नमुद तरतुदीनुसार पुर्नवसन करण्यात पात्र आढळून येत असल्यास शासकीय धोरणाप्रमाणे आपले पुर्नवसन इतरत्र ठिकाणी करण्यात यावे. तथापि, शासनाने जलेश्वर तलाव परिसरातील आपले अतिक्रमण तात्काळ काढून टाकावेत, असे निर्देश दिले आहेत. याबाबत दिनांक ४ एप्रिल २००२ च्या शासन निर्णयानुसार अतिक्रमण नियमित करताना अशी अतिक्रमण जमीन मंजूर प्रारुप विकास योजनेमध्ये कोणत्याही सार्वजनिक, निमसार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित असल्यास अशी अतिक्रमणे नियमित करता येणार नाही असे अवलोकनावरून दिसून आले. नगर विकास विभागाच्या‌ शासन निर्णयानुसार निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण आहे तोच भूखंड नियमानुकुल करण्यास पात्र राहील, अशी अट आहे. अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण हे नगरपरिषद हिंगोलीचे विकास आराखड्यामधील बोट क्लब व गार्डन यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर आहे. त्यामुळे या ठिकाणी रहिवाशी प्रयोजनासाठी जागा आरक्षित नाही. परिणामी, हे अतिक्रमण तलावाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे ते नियमित करता येत नाही. तसेच उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद यांचे आदेश विचारात घेता अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन तलावाच्या परिसराच्या जागेवर करणे शक्य नाही. उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे दिनांक 16 डिसेंबर, 2022 रोजी बहुतांश अतिक्रमणे निष्कासित करण्यात आले होते. मात्र या‌ कारवाईदरम्यान रात्र झाल्यामुळे काही अतिक्रमणे निष्कासित करता आली नव्हती. त्यानंतर या ठिकाणी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर दगडफेक झाल्याने व परिणामतः कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला होता. महाराष्ट्र विधीमंडळात सदर लक्षवेधी सूचना उपस्थित झाल्यामुळे संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे ते थांबविण्यात आले होते. आता महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, यांचे दिनांक 24 जानेवारी, 2024 पुढील निर्देश प्राप्त झाले असल्याने दिनांक 09 फेब्रुवारी,2024 रोजी सुनावणी घेण्यात आली. या‌ सुनावणी दरम्यान मालकी हक्काबाबतचे कोणतेही पुरावे अतिक्रमणधारकांनी सादर केले नाहीत. त्यामुळे हे अनाधिकृत अतिक्रमण निष्कासित करणे क्रमप्राप्त आहे. २७ फेब्रुवारी २०२४ नुसार कार्यालयाने नोटीस काढून ते अतिक्रमण काढून घेण्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी दिली आहे.

जलरथाद्वारे जिल्ह्यातील सर्व गावात होणार जनजागृती • जलरथाला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हिरवी दिंडी दाखवून शुभारंभ

हिंगोली, दि. 28 (जिमाका) : जलशक्ती मंत्रालय भारत सरकार, पाणी व स्वच्छता विभाग यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी व स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. या जल रथाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गाव स्वच्छ, शाश्वत व आरोग्यदायी होण्यासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. पाणी व स्वच्छता विभाग नेहमी लोकांमध्ये जल जीवन मिशन विषयक जन जागृती निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळया प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन, हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस), जल जीवन मिशन, शुध्द पाण्याची उपलब्धता, वैयक्तीक स्वच्छता, परिसर स्वच्छता, गावाची स्वच्छता, घर व अन्न पदार्थाची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, मानवी विष्टेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय) सार्वजनिक शौचालय तसेच जल जीवन मिशनच्या अनुषंगाने प्रत्येक घराला 55 लिटर प्रमाणे पाणी, योजनेची देखभाल दुरुस्ती, गाव हर जल घर करणे, तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या बाबत जलरथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 व जल जीवन मिशनच्या विविधि घटकांची व जलयुक्त शिवारबाबत प्रचार प्रसिध्दी होणार असल्याचे आत्माराम बोंद्रे, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग यांनी सांगितले. या प्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या प्रीती माकोडे, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आत्माराम बोंद्रे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष तज्ञ आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ******

लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त पथक प्रमुखांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर • निवडणूक पथक प्रमुखांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

हिंगोली, दि. २८ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यात विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या प्रमुखांनी सजग राहून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक पथक प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, डॉ. सचिन खल्लाळ, श्रीमती क्रांति डोंबे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, तहसीलदार, नगर परिषद, नगर पंचायतींचे मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणेचे अधिकारी, यांच्यासह सर्व पथक प्रमुख, सहायक पथक प्रमुखांची‌ यावेळी उपस्थिती होती. निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक पथकाची जबाबदारी अतिशय महत्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व पथक प्रमुखांनी आपापली जबाबदारी समजून घेवून ती काळजीपूर्वक पार पाडावी. निवडणूक विषयक कामाला प्राधान्य देवून आपल्या पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा योग्य समन्वय ठेवून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घ्यावी. आतापासूनच आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करावी, असे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागताच सर्व विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील दर्शनी भागात असलेले विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पणप्रसंगी लावलेले नामफलक झाकून टाकावेत. ते संपूर्णत: झाकले गेले असल्याची खात्री करून घेण्याबाबतच्या‌ सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी पथकप्रमुखांना यावेळी दिल्या. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनीही लोकसभेच्या आदर्श आचारसंहिता पालनाबाबत सूचना केल्या. नियुक्त सर्व पथक प्रमुखांनी नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदारी पार पाडताना अतिशय दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी केल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी सर्व पथक प्रमुख अधिकारी यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत माहिती दिली. तसेच प्रत्येक पथक प्रमुख अधिकारी यांनी आपल्याला आवश्यक मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. *****

27 February, 2024

बीएच मालिकेतील नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 27 : केंद्र शासनाने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच शासकीय कार्यालयामध्ये/विभागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बीएच मालिकेमध्ये नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज करण्याबाबत तसेच त्यामध्ये अशा वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या कराविषयी तरतूद केली आहे. ही अधिसूचना दि. 15 सप्टेंबर, 2021 पासून अंमलात आली आहे. बीएच मालिकेतील नोंदणी चिन्हांसाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारास नमुना 60 मध्ये वर्कींग सर्टिफिकेट व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अर्जदारास कार्यालयीन ओळखपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. नमुना 60 नुसार अर्ज करणाऱ्या अर्जदारास ज्या खाजगी कंपनीत, संस्थेत करतो त्या कंपनीचे किमान 4 किंवा त्यापेक्षा जास्त कार्यालये राज्यात किंवा संघराज्य क्षेत्रात असणे आवश्यक आहे. अर्जदारास नियम 48 मध्ये नवीन परंतुकानुसार बीएच मालिकेतील नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करणे अर्जदारास ऐच्छिक असणार आहे. नवीन नियम 51बी मध्ये फुली बिल्ट (Fully Built) परिवहनेत्तर वाहनाचा मोटार कराच्या आकारणीबाबत यापूर्वीच्या दि. 17 सप्टेंबर, 2021 च्या परिपत्रकान्वये सर्व कार्यालय प्रमुखांना कळविण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार सर्व प्रादेशिक कार्यालयांना बीएच मालिकेतील नोंदणी संदर्भातील कार्यपध्दती कळविण्यात आली आहे. परंतु अनेक कार्यालयाकडून कार्यवाही करताना अडचणी व कार्यपध्दतीमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यामुळे खालील सूचनांचे पालन करावेत. खाजगी संस्थेतील तथा शासकीय सेवेतील वाहनधारकांची त्यांच्या संस्थेची , शासकीय कार्यालयाची भारतातील विविध राज्यामध्ये कार्यालये आहेत. अशा वाहनधारकांकडून मागील काळात त्याचा विविध राज्यातील वास्तव्याचा दाखला तसेच मागील कार्यकाळातील वेतन देयके प्राप्त करुन अर्ज करण्यापूर्वी वाहनधारक सद्यस्थितीत ज्या विभागात, कंपनीत अस्तित्वात आहे. त्याच विभागात, कंपनीमध्ये तो यापूर्वी इतर राज्यात कार्यरत होता का ? ही बाब तपासावी व त्यानंतरच त्याचे वाहन बीएच सिरीजमध्ये नोंदणीसाठी ग्राह्य धरावे. तथापि, केवळ त्याच्या कंपनीचे चार राज्यात शाखा आहेत अथवा त्याची इतर राज्यात बदली होऊ शकते, असे नमूद करुन अर्ज केल्यास केवळ त्या कारणास्तव बीएच सिरीजमध्ये वाहन नोंदणी करु नये. बीएच सिरीजचा लाभ प्रती व्यक्ती फक्त एका वाहनासाठीच देण्यात यावा. बीएच सिरीज नोंदणीचा लाभ पात्र व्यक्तीसच मिळण्यासाठी बीएच सिरीजमध्ये अर्ज केलेल्या वाहन मालकांने स्वत:च्या बँक खात्यातून वाहन खरेदीसाठी रक्कम अदा केली असल्याबाबत पुरावा तपासावा. अर्जदारांनी उपरोक्तप्रमाणे माहिती सादर न केल्यास किंवा सादर केलेल्या पुराव्यात विसंगती आढळल्यास त्यांचा अर्ज नाकारावा. 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची चारचाकी वाहने तसेच दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची दुचाकी वाहने बीएच सिरीज नोंदणीसाठी आल्यास अशा वाहनधारकाचे आयटी रिटर्नस किंवा बँक खात्याची विवरणपत्रे तपासावे. वाहनधारकाची खरोखरच आर्थिक क्षमता आहे किंवा नाही हे बघून नोंदणीसंदर्भात निर्णय घ्यावा. भारतीय सुरक्षा दलातील वाहनधारकांच्या वाहनांचे बीएच सिरीजमध्ये नोंदणी करताना त्यांचे फक्त सुरक्षा दलाचे ओळखपत्र घ्यावे. त्यांच्याकडे इतर कागदपत्राची मागणी/तपासणी करु नये. बीएच सिरीजमध्ये नोंदणी केलेल्या व नोंदणी कालावधीत दोन वर्षापेक्षा जास्त झालेल्या वाहनधारकांनी पुढील कालावधीसाठीचा कर भरणा केलेला आहे किंवा नाही ते तपासावे. पुढील कालावधीचा कर भरलेला नसल्यास अशा वाहनधारकांना मागणीपत्र पाठवावे. वाहन धारकांनी कराचा भरणा न केल्यास अशा वाहनावर मुंबई मोटार वाहन कर कायदा 1958 मधील कलम 12 (बी) व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 51 (ब) अन्वये कर वसुलीबाबत आवश्यक ती कायदेशीर करावी, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी कळविले आहे. ******

ईव्हीएम स्ट्राँग रुम व मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत केली संयुक्त पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सावत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या ईव्हीएम स्ट्राँग रुम व मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत संयुक्त स्थळ पाहणी केली . यावेळी त्यांनी स्ट्राँग रुम, मतमोजणी केंद्राची तपासणी करुन उपलब्ध सोई सुविधाची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी स्पप्नील मोरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, भारत संचार निगमचे उपविभागीय अभियंता, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य आदी उपस्थित होते. *******

महासंस्कृती महोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धेला उदंड प्रतिसाद विजेत्यांना पारितोषिक वितरण

हिंगोली (जिमाका), दि. 27 : महासंस्कृती महोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. महासंस्कृती महोत्सवानिमित्त येथील रामलिला मैदानावर सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दोन गटात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, उपविभागीय अधिकारी क्रांतीताई डोंबे, उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेमध्ये दोन्ही गटातील सहभागी स्पर्धकांनी उत्तम रांगोळी रेखाटली. स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. सायंकाळी महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात उपविभागीय अधिकारी क्रांतीताई डोंबे, सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख, मंडळ अधिकारी पोटे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये 18 वर्षे वयोगटाखालील प्रथम क्रमांक साक्षी रणजित चोरुडे, द्वितीय सायली धनराज भुसांडे, तृतीय हर्षदा गजानन मस्के यांना बक्षीस वितरण करण्यात आले. 18 वर्षे वयोगटावरील प्रथम क्रमांक किरण दत्तराव कुऱ्हे, द्वितीय वंदना नारायण भेंणे, तृतीय सोनिका नितीन शर्मा यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना प्रथम 18 वर्षे खालील वयोगटामध्ये प्रथम नऊ हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार तर 18 वर्षेवरील वयोगटामध्ये प्रथम 11 हजार, द्वितीय नऊ हजार, तृतीय सात हजार रुपयांची रोख पारितोषिके जिल्हा प्रशासनाकडून धनादेशाद्वारे देण्यात येत आहेत. या बक्षीस वितरणाचे सुत्रसंचालन शंतनू पोले यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजिका उपविभागीय अधिकारी क्रांतीताई डोंबे यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालिकेचे बाळु बांगर, आशिष रणशिंगे यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे परिक्षण चित्रकला शिक्षक शिवाजी निळकंठे, रमेश थोरात, संगिता पतंगे, कैलास कावरखे यांनी केले. ******

वनाच्छादन वृद्धीसाठी वृक्षारोपणासह ती जगवणे आवश्यक - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• दुधाळा वनपरीक्षेत्रात वृक्षारोपण हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात वनाच्छादन क्षेत्र वाढवायचे असेल तर वृक्षारोपण करण्यासोबतच लावलेली रोप जगविणेही तितकेच आवश्यक आहे. या परिसरात वृक्षवाढीसाठी शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाची सोयही केली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. दुधाळा येथील मराठवाडा 136 इको बटालियन वनपरीक्षेत्र परिसरात आज जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. लेफ्टनंट कर्नल विशाल रायजदा, विभागीय वनाधिकारी मनोहर गोखले, सिद्धटेक संस्थानचे महंत आत्मानंद गिरी, भारतीय माजी सैनिक कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष सयद मीर, बाबुराव जांबुतकर, पंडीत हाके उपस्थित होते. सध्या राज्यात वनाच्छादित क्षेत्र कमी असून, पुढील पिढ्यांचा विचार करता सर्वांना वृक्षारोपण करून ती रोपे वाचवावी लागतील. हे वृक्ष वाचविले तरच राज्यातील वनाच्छादन वाढेल. पुढील 100 वर्षात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करायची असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात वाढ झाल्यास वन्यप्राण्यांचा येथील शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल. तसेच वन्यप्राण्यांना जंगलातच खाद्य मिळेल आणि जैवविविधतेची आणि पर्यायाने सजिवांची अन्नसाखळी सुरक्षित राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले. 136 बटालियनने वृक्षारोपण करण्यासाठी केलली तयारी पाहता, पावसाळ्यात लाखो वृक्षांची लागवड होणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील वाढणाऱ्या वृक्षाराजीमुळे डोंगर बोडके दिसणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी आंबा, जांभूळ, नारळ, वड, कडूनिंब, काजू, बदाम, बांबू, अर्जुन, सिताफळ, आवळा, करंजी आदी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून, येथे शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी वृक्षारोपणासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, वन विभागाच्या विविध शासकीय रोपवाटीकांमधून उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाय 136 बटालीयन परिसरात उन्हाळ्यात रोपे तयार करण्यात येणार असून, लाखभर खड्डे तयार करण्यात येतील. या खड्ड्यांमध्ये काळी माती टाकण्यात आली असून, पाऊस पडल्यानंतर येथे लाखो झाडे लावण्यात येतील, असे लेफ्टनंट कर्नल श्री. रायजदा यांनी सांगितले. हिंगोली येथील ओम साई इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, मुख्याध्यापक गजानन बांगन, दीपाली आमले, वर्षा शिंदे, शुभांगी पतंगे, वनपाल संदीप वाघ, सुदाम गायकवाड, पंजाब चव्हाण, भालचंद्र पवार आदी उपस्थित होते. सुभेदार विनोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. *****

‘लख लख चंदेरी’ने महासंस्कृती महोत्सवाचा थाटात समारोप

• ‘केशर केवडा’तून लावण्यांचा ठेका हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून येथील रामलीला मैदानावर महासंस्कृती महोत्सवातून विविध सिनेअभिनेत्री आणि स्थानिक कलाकार, हास्यकवी, यांच्या कला सादरीकरणाने हिंगोलीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली. यामध्ये समारोपीय कार्यक्रमांमध्ये ‘लख लख चंदेरी’मधून पुष्कर श्रोत्रीच्या खुमासदार सूत्रसंचालनाने समारोपीय कार्यक्रम चांगलाच गाजला. कार्यक्रमात गायिका आनंदी जोशी असे कसे बोलायचे आता, तुझा छंद लागला, सैराटमधील ‘आताच बया का बावरलं, आदी एकापेक्षा एक गितांनी उपस्थितांमध्ये जल्लोष भरला. नेहा खान, दिव्या सिंग, ‘चंद्रा’ या लावणीला रसिकांकडून वन्स मोअर मिळाला, मोनिका ओ माय डार्लींग, मयुर सुकाळेच्या बाई माझ्या गं दुधात नाही पाणी या गवळणीत उपस्थित तल्लीन झाले होते. आनंदी जोशीच्या हात नका लावू जी पाहील कुणीतरी, तसेच शांतनू पोलेच्या ‘कोरलायं शिवबा काळजावर’वर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे नृत्य केले. तर ही पोली साजूक तुपातली… सामूहिक गिताने समारोप झाला. तत्पूर्वी स्थानिक कलावंतांनी चारही दिवस आपल्या कलांचे सादरीकरण केले. यावेळी शाहीर नामदेव दिपके कलासंचाने मुलगी वाचवा मुलगी शिकवा, शाहीर प्रकाश दांडेकर कलासंचाने मतदार जनजागृती आणि महापुरुषांवरील राष्ट्रीय पोवड्यांचे सादरीकरण केले. तर प्राची पाईकराव या चिमुकलीने एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राज्याचं नाव गाजतयं गड किल्ल्याच्या दगडावर हे गीत अप्रतिमपणे सादर केले. सर्व कलावंत आणि स्थानिक कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर रविवारी कौस्तुभ दिवाण यांच्या अप्रतिम सूत्रसंचालनाने ‘केशर केवडा’ आणि त्याला सन्मिता जटाळे, नेहा पाटील, आरती शिंदे, स्मिता शेवाळे, आय्ली घिलीया आणि ऐश्वर्या बडदे यांच्या तितक्याच अप्रतिम लावणी सादरीकरणाचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. सुरुवातीला कसं काय पाटील बरं हाय का, बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना, एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज, कोणीतरी न्या हो मला मिरवायला, गं बाई मी पतंग उडवीत होते, हात नका लावू माझ्या साडीला या लावणीसोबतच नेहा पाटीलच्या ‘चंद्रा’, मला जावू द्या ना घरी आता वाजले की बारा,रात्र धुंदीत ही गाजवा आणि कुठं कुठं जायाचं हनीमूनला, राया थेंबा थेंबानं केलयं मला गार.., पाडाला पिकलायं आंबा या एकापेक्षा एक वरचढ अशा लावणी सादरकीरणावर ऐश्वर्या बडदेने ‘शौकिनांचा मेळा भरला, डावा डोळा लवू लागला’ने कहरच केला. त्याशिवाय स्मिता शेवाळे हिच्या ‘नटरंग उभा’ लावणीने कार्यक्रमाची सांगता झाली या सर्व लावणींचे श्रीमती कांचन जाधव यांनी दिग्ददर्शन केले. *****

26 February, 2024

वसमत येथे होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन • जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हिंगोली,दि 26 (जिमाका) : राज्य शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करून त्यांची योग्य अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमत येथे शनिवार (दि.2) रोजी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या लोकाभिमुख कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी‍ आज विभागप्रमुखांना दिले. वसमत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, श्रीमती सुरेखा नांदे, यांच्यासह जिल्ह्यातील विकास यंत्रणेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे विविध दस्तावेज, कागदपत्रे उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच छताखाली आणून विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकाच छताखाली सर्व शासकीय यंत्रणा आणून त्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठकांद्वारे पूर्वतयारी आढावा घेण्यात आता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची आज वसमत येथील कार्यक्रमस्थळाला भेट देवून पूर्वतयारीची पाहणी केली. तसेच या कार्यक्रमात विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लाभार्थ्यांना निमंत्रण देण्यात येणार असून, कार्यक्रमस्थळी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. यात महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, कृषी, समाज कल्याण, आरोग्य विभाग आदीसह महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचेही दालन असणार आहे. तसेच रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. *****

23 February, 2024

‘महासंस्कृती महोत्सवा’त पहिल्या दिवशी संस्कृती आणि देशभक्तीपर गीतांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील रामलीला मैदानावर ‘महासंस्कृती महोत्सवा’च्या उद्घाटन समारंभानंतर स्वरराज प्रस्तुत रसिकांनी महाराष्ट्राची लोकधारा, लोकसंस्कृती तसेच देशभक्तीपर गीतांवर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोष केला. या महासंस्कृती महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी सायंकाळी 6 वाजता स्थानिक कलावंतांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. यामध्ये लोकसंस्कृतीमध्ये येथील आईचा गोंधळ, अहिल्याबाई होळकरांचा पोवाडा यासह गणेशवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विलास गंगाधर गोडसे व त्यांची चमू गोंधळ घातला. तर देविदास वाकुडे व त्यांची चमूने वासुदेव आणि मधुकर निवृत्ती इंचेकर व त्यांची चमूने आपल्या पहाडी आवाजाने उपस्थितांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले. याशिवाय हास्य कलाकार शाहीर रमेश गिरी यांच्या हसवेगिरीने उपस्थितांची हसवून पुरेवाट लावली. प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तुत जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला, या कार्यक्रमात मंगेशकर घराण्यातील सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजाची उपस्थितांना भुरळ पडली. यामध्ये गणेशवंदन, ‘लयं भारी’मधील विठ्ठल विठ्ठल… माऊली माऊली, ‘जोगवा’ चित्रपटातील ललाटी भंडार उधळत, आई भवानीचा गोंधळ घालत उपस्थितांना भक्ती रसात चिंब चिंब भिजवले. याशिवाय वंदे मातरम् गीताने भारतभूमीला वंदन केले. ‘वेदांत मराठे वीर दौडले सात’, ‘नया दौर’मधील ‘ये देश है वीर जवानों का’ गात उपस्थितांना देशभक्तीत तल्लीन केले. ‘ढोलकरं, ढोलकरं, मी दर्याचा राजा’ या कोळीगीताने उपस्थितांना समुद्रकिनारी नेले. याशिवाय ‘काळ्या मातीत मातीत, तिफन चालते’ या गीतातून कृषिप्रधान देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरीराजाचा सन्मान केला. तसेच मराठवाडा भूषण सन्मानित गायक-संगीतकार प्रमोद सरकटे, सूर नवा, ध्यास नवा विजेती सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांनी राधा मंगेशकर यांना स्वरसाथ देत महाराष्ट्राच्या ‘बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला’ या ठसकेबाज लावणीतून उपस्थित प्रेक्षकांना ‘घुमर घुमर’ करत रंगीलो राजस्थानात नेले. कॉमेडी स्कीट म्हणून ज्युनीअर जॉनी लिव्हरने विमानाचे टेक ऑफ आणि लँडीग होतानाचे आवाज, दिवंगत सिने अभिनेते अमरीश पुरी, अभिनेता शाहरुख खानच्या गीतांवरील अभिनय, जॉनी लिव्हर आणि परेश रावल यांच्यातील संवादानेही उपस्थितांची वाहवा मिळवली. त्याशिवाय हिंगोलीच्या रामलीला मैदानावर होत असलेल्या कार्यक्रमाबाबतच्या राजकीय पुढाऱ्यांच्या प्रतिक्रियेची हुबेहुब नक्कल केली. शनिवारचे कार्यक्रम शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बबन दिपके व त्यांची चमू छत्रपती शिवाजी महाराज गीत, चंद्रभान सोनार व चमू वाघ्या-मुरळी, पांडूरंग धोंगडे व चमू गोंधळ, गणपतराव इचलकर व चमू वासुदेव, अशोक इंगोले व त्यांची चमू स्वच्छता अभियान, केशव खटींग व त्यांची चमूची काव्यसंमेलन ही मैफल काव्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. सायं. 6.30 वाजता सुशांत शेलार यांची संकल्पना व दिग्दर्शित केलेला महाराष्ट्राचा लोकोत्सव हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासाठी निवेदिका म्हणून पूर्वी भावे काम पाहणार आहेत. माधुरी पवार, अभिजीत केळकर नृत्य सादर करणार आहेत. तर गायक म्हणून मनीष राजगिरे व यांच्यासोबत 45 कलाकारांचा संच असणार आहे. हास्य कलाकाराची भूमिका मंगेश मोरवेकर सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला पुढील चारही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आसनस्थ व्हावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. *****

22 February, 2024

रामलीला मैदानावर पाचही दिवस शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र, चित्रांचे प्रदर्शन पाहता येणार

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून आजपासून सुरु झालेल्या महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार असून, ऐतिहासिक तलवार, बिचवे, शिवकालीन चित्र प्रदर्शन नागरिकांना मोफत पाहता येणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले आहे. यावेळी प्रदर्शनाला आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी भेट देत पाहणी केली. स्पार्क फाउंडेशन, अंमळनेरचे संस्थापक अध्यक्ष पंकज दुसाने यांचे भव्य व दुर्मिळ इतिहासकालीन शस्रास्त्रे प्रदर्शन व दर्शन सोहळा, चित्रमय शिवचरित्र व ऐतिहासिक शिवकालीन किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, नागरिकांना पाचही दिवस या महासंस्कृती महोत्सवात मोफत पाहता येणार असून, नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रमय इतिहास पाहण्यास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शस्त्रास्त्र प्रदर्शनात तलवार, मराठा कट्यार - हलदाई, अमुक्त शस्त्र, स्त्रियांच्या कट्यारी, आदिवासी कट्यार, विजयनगरी कट्यार, जरनाळ, खैबर, संगीन, अंकुश, इराणी भाले, पेशकब्ज, जंबिया, खंडा तलवार, दांडपट्टा, मराठा तलवारी, विटा, फरशी कु-हाड, दगडी, पोलादी तोफगोळे, कर्द, खंजराली, बिचवा, कुकरी, वाघनखं, मुघल कट्यार आदिंचे प्रदर्शन भरले आहे. तसेच मानकरी तलवार, ब्रिटीश तलवार, समशेर, मुगल तलवार, गुर्ज, जमदाड तलवार, राजपुत तलवार, पट्टीसा, निमचा तलवार, नायर तलवार, दमास्कस पोलादाची राजपुत तलवार, तेगा तलवार, फेन्सींग तलवार, प्रदर्शनात समावेश आहे. गेल्या १० वर्षापासून हे प्रदर्शन भरवत असून, आतापर्यंत महाराष्ट्रासह पंढरपूर, वाशिम, अमरावती, नागपूर नाशिक, चंद्रपूर, धुळे, अंमळनेर, पातूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा तसेच राज्याबाहेर छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि मध्यप्रदेशातील जबलपूर येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती स्पार्क फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. हर्षल दाभाडे यांनी दिली. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाच्या स्टॉल्सवर मुलगी वाचवा, पाणी वाचवा, उर्जा वाचवा, वन वाचवा, वायु, पर्यावरण वाचविण्यासाठी आदी संदेश काष्टशिल्पामध्ये विविध शिल्पांमधून देण्यात येत आहे. यामध्ये वाघ, सिंह, तडस, लांडगा, चितळ, काळवीट, गेंडा, बिबट, चौशिंगा, ड्रैगन, नीलगाय, ससा, कांगारू, हरणाचे पाडस, गवा, हत्ती, कोल्हा आदी वन्यप्राणी तर पक्ष्यांमध्ये गिधाड, कोकीळ, घुबड, पक्षांचा थवा, सायाळ, बदक आदींचा या काष्टशिल्पांमध्ये समावेश आहे. त्याशिवाय वन आरोग्याची माहिती, महाराष्ट्र लोक सेवा हमी अध्यादेश २०१५ची माहिती दर्शनी भागात लावण्यात आली आहे. तसेच येथे खाजकुरी, बर्सेरा, हाळदबेरा, शेवगा, कुरडू, चहा, वज्रदंती, काराटे, अशोका, बारतोंडी, चाफा, शिंदोळी, अंजन, लोखंडी, कुंभी, शतावरी, रिठा आदी विविध वन्यझाडांची बियाणेही येथे ठेवण्यात आले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमतचा स्टॉल लावण्यात आला आहे. येथे हळदीविषयी शेतकरी, प्रेक्षकांना माहिती मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटांकडून कपडे, जेवणाचे विविध पदार्थ, कुरड्या, पापड, पाणीपुरी, पोंगे, वाळलेली बोरं, मैद्याची, तांदळाची पापडी, पॉपकॉर्न, खारवड्या, कुरवड्या, फुटाणे, अगरबत्ती, चिवडा, चना, भेळ, मठ्ठा, विविध सौंदर्यप्रसाधने, वाचकांसाठी सामान्य ज्ञानवृद्धीपासून ते आर्थिक नियोजन करण्याबाबतची विविध लेखकांची पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराज, गणिततज्ञ, स्पर्धा परीक्षांविषयीची पुस्तके, सवयी, यशस्वी होण्याचा कानमंत्र देणारी, इंग्रजी शिकण्याची छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बालमित्रांसाठी श्यामची आई, सचित्र बालमित्र, सातबारा नोंद, माहितीचा अधिकार आदी विषयांची माहिती देणारी पुस्तके विक्रीसाठी संतोष ढोले यांच्या प्रगती बुक स्टोअर्सने स्टॉल लावला आहे. प्रेक्षकांनी या स्टॉलला अवश्य भेट देण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. *****

हिंगोली येथे ‘महासंस्कृती महोत्सव २०२४चे थाटात उद्घाटन

• कार्यक्रम सर्वांसाठी खुला • जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी कार्यक्रमांची रसिकांना मिळणार अनुभूती हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील रामलीला मैदानावर आज सायंकाळी ‘महासंस्कृती महोत्सव२०२४चे उद्घाटन आमदार संतोष बांगर, आणि आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकधारा यांच्यासह भारुड, पोवाडा आदीसह, कुस्ती आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पुढील पाचही दिवस विविध सुप्रसिद्ध कलाकार आणि स्थानिक कलाकार आपल्या कलांचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवातील कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रास्ताविकातून केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीव्दय देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून, जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील पाच दिवसांतील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून आस्वाद घेण्याचे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी उपस्थितांना केले. तसेच आमदार तानाजी मुटकुळे यांनीही आपल्या भाषणातून राज्याला कला व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभल्याचे सांगून रुढी परंपरा, सण उत्सव महोत्सवातून आपला महाराष्ट्र सामाजिक, वैचारिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद देत आस्वाद घेण्याचे आवाहन केले. पुढील पाचही दिवस नागरिकांना रामलीला मैदान येथे दररोज सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दररोज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या कलाकृतींचे सादरीकरण हिंगोलीकरांना पाहायला मिळणार आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात -अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. आज गुरुवारी उद्घाटनाच्या दिवशी हिंगोली येथील प्रथितयश स्थानिक कलावंतांनी त्यांच्या कलांचे सादरीकरण केले. यामध्ये विलास गंगाधर गोडसे व चमू गोंधळी, देविदास वाकुडे व चमू वासुदेव, मधुकर निवृत्ती इंचेकर व चमू शाहिरी व हास्य कलाकार शाहीर रमेश गिरी हे हसवेगिरी ही कला सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. सायंकाळी प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तूत जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा या कार्यक्रमात गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर करत प्रारंभ केला. हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी आज सायंकाळी ५ वाजता आपल्या कला सादर केल्या. यावेळी आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते स्थानिक कलावंतांचा सत्कार करण्यात आला. आज होणारे कार्यक्रम उद्या शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता प्रविण पांडे व त्यांची चमू शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन नृत्य, सुनिता भिमराव रणवीर व त्यांची चमू भारुड, नारायण धोंगडे व त्यांची चमू जागरण गोंधळ, शेख जावेद चिस्ती व त्यांची चमू कव्वाली, हाफीज फहीम आजीज व त्यांची चमू मुशायरा सादर करणार आहेत. प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तुत सदाबहार संगीत रजनी सादर करण्यात येईल. यामध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नृत्य सादर करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रविंद्र, झीटीव्ही सारेगमप विजेती गायिका अमृता नातू, मराठवाडा युवारत्न सन्मानित रॉकस्टार गायक स्वराज सरकटे हे राहणार आहेत. यामध्ये 32 कलावंताद्वारे बहारदार सादरीकरण करण्यात येणार आहे. नामवंत विनोदी कलावंत रामेश्वर भालेराव व कलीम पटेल यांचा कॉमेडियन शो रसिकांचे मनोरंजन करणार आहे. याबरोबरच दि. 22 ते 26 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व शस्त्र पद्रर्शन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन तसेच वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटनविषयक दालन उभारण्यात येणार आहेत. तसेच कुस्ती, रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आपले आसन ग्रहण करावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ******

नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागात नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मराठवाड्यातील युवक-युवतीसाठी लातूर येथे दि. 23 व 24 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो मार्गदर्शन मेळावा होणार आहे. लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच रोजगार स्वयंरोजगारातील नवीन संधीची ओळख करुन देण्यात येणार आहे. यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. तसेच 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध उद्योजक व्यावसायिक प्रत्यक्ष उपस्थित राहुन त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार भरती करणार असल्याचे सांगण्यात आले. रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीरात उपलब्ध रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ (क्यूआर कोडसह) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवार पर्याय निवडून लॉगिन करावे त्यानंतर वैयक्तीक माहिती ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, महास्वयंम नोंदणी क्रमांक यासह इतर माहिती भरुन छायाचित्र, सी. व्ही. (बायोडाटा) अपलोड करावा. करिअरच्या नवीन वाटांची माहिती दहावी, बारावी किंवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय स्वयंरोजगाराच्या संधी, करिअरच्या नव्या वाटांची माहिती युवक युवतींना व्हावी, यासाठी नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ञ व्यावसायिक उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कृषी उद्योग पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, नर्सिंग यासारख्या विविध क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारातील संधीविषयी व्याख्यान चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभाग, बँकांमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 रोजी भव्य महारोजगार मेळाव्यातून रोजगाराच्या संधी नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणाहून उद्योजक उपस्थित राहून शैक्षणिक पात्रता व मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी दि. 24 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 9 वाजेपासून लातूर शहरातून बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी व बारावी तसेच विविध विषयातील पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवी, आयटीआय (सर्व व्यवसाय) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करु शकणार आहेत. दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर व दि. 24 फेब्रुवारी, 2024 रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने नाव नोंदणी करुन मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन हिंगोली व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि. प्र. रांगणे यांनी केले आहे. ******

21 February, 2024

दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी वडवळे यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

हिंगोली (जिमाका), दि. 21 : वस्त्रोद्योग विभाग भारत सरकार यांच्या वतीने दिल्ली येथे दि. 22 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी येथील रेशीम कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारत टेक्सो दिल्ली येथील कॉन्फरन्समध्ये विविध देशाचे प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये रेशीम शेतीचा शाश्वत विकास या विषयावर चर्चा होणार आहे. या परिषदेचे आयोजन वस्त्रोद्योग विभाग भारत सरकार आणि केंद्रीय रेशीम बोर्ड यांनी केलेले आहे. ******

जिल्हा सैनिक कल्याण कक्षातील अशासकीय शिपाई पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील विनावेतन/मानधन तत्वावर सेवा देण्यास इच्छूक असलेल्या माजी सैनिक शिपाई किंवा माजी सैनिकांनी येथील जिल्हा सैनिक कक्षातील अशासकीय शिपाई पदासाठी दि. 29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत जिल्हा सेनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे नाव नोंदणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *****

जिल्हा महिला व बाल विकास विभागाची त्रैमासिक कामकाज आढावा बैठक

हिंगोली (जिमाका), दि. 21 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 106 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली असून अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक पार पडली. अप्पर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा कामकाजाचा आढावा, जिल्हा कृती दल, प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व व बाल कल्याण समिती कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत राबविलेले विविध जन जागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये बाल मित्र निवडीबाबत, कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, जिल्ह्यात थांबविलेल्या बाल विवाहाबाबत, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल, पाठपुरावा, समुपदेशन, अनाथ बालकांना प्रमाणपत्र मिळाल्याबाबत, रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या शोध मोहिमेबाबत तसेच जिल्ह्यातील कोविड-19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती तसेच बाल कल्याण समिती यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याबाबात आढावा घेण्यात आला. बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, जिल्हा आरोग्य विभागाच्या डॉ. सुवर्णा महाले, जिल्हा न्यायिक सेवेचे श्री. खुपसे सर, जिल्हा कामगार अधिकारी एन. एन. भिसे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे आ. ना. वागजकर, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे महेश राऊत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे रोशन अढाऊ, जिल्हा महिला व बाल विकास विभागातील सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती कमल शातलवार, विधी सल्लागार - विद्या नागशेट्टीवार, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य परसराम हेंबाडे, श्रीमती किरण करडेकर, संगिता दुबे, बाल न्याय मंडळ सदस्या सत्यशीला तांगडे, वर्षा कुरील, प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व समितीचे सदस्य चंद्रकांत पाईकराव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण, कायदा व परीविक्षा अधिकारी - अँड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण, रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, अनिरुध्द घनसावंत चाईल हेल्पलाईनचे प्रकल्प समसन्वयक संदीप कोल्हे यावेळी उपस्थित होते. ******

हिंगोली येथे आजपासून ‘महासंस्कृती महोत्सव 2024’

हिंगोली येथे आजपासून ‘महासंस्कृती महोत्सव 2024’ • कार्यक्रम सर्वांसाठी खुला • पालकमंत्री व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन • जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी कार्यक्रमांची रसिकांना मिळणार अनुभूती हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्यात उद्या गुरुवार (दि.22)पासून ‘महासंस्कृती महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. गुरुवार, दि. 22 ते दि.26 फेब्रुवारी, 2024 दरम्यान रामलीला मैदान येथे दररोज सायंकाळी 6 वाजता सुरु होणार असून, तत्पूर्वी स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी त्यांच्या कलाकृतींचे सादरीकरण हिंगोलीकरांना पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह खा. हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य आमदार सर्व श्री. सतीश चव्हाण, विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, श्रीमती प्रज्ञा सातव, आमदार सर्व श्री. तान्हाजी मुटकुळे, चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, संतोष बांगर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. यात गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी उद्घाटनाच्या दिवशी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश स्थानिक कलावंताच्या कलाकृतीचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये विलास गंगाधर गोडसे व चमू गोंधळी, देविदास वाकुडे व चमू वासुदेव, मधुकर निवृत्ती इंचेकर व चमू शाहिरी व हास्य कलाकार शाहीर रमेश गिरी हे हसवेगिरी ही कला सादर करणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तूत जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये गायक, गायिका म्हणून मंगेशकर घराण्यातील सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, मराठवाडा भूषण सन्मानित गायक-संगीतकार प्रमोद सरकटे, सूर नवा, ध्यास नवा विजेती सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये 32 कलाकारांद्वारे नृत्याचे सादरीकरण होणार असून कॉमेडी स्कीट म्हणून नामवंत टीव्ही कलावंत प्रकाश भागवत, प्रविण डाळिंबकर, सागर भोईर हे काम पाहणार आहेत. शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता प्रविण पांडे व त्यांची चमू शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन नृत्य, सुनिता भिमराव रणवीर व त्यांची चमू भारुड, नारायण धोंगडे व त्यांची चमू जागरण गोंधळ, शेख जावेद चिस्ती व त्यांची चमू कव्वाली, हाफीज फहीम आजीज व त्यांची चमू मुशायरा सादर करणार आहेत. सायं. 6.30 वाजता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी संकल्पना, दिग्दर्शन केलेला स्वरराज प्रस्तुत सदाबहार संगीत रजनी सादर करण्यात येईल. यामध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नृत्य सादर करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रविंद्र, झीटीव्ही सारेगमप विजेती गायिका अमृता नातू, मराठवाडा युवारत्न सन्मानित रॉकस्टार गायक स्वराज सरकटे हे राहणार आहेत. यामध्ये 32 कलावंताद्वारे बहारदार सादरीकरण करण्यात येणार आहे. नामवंत विनोदी कलावंत रामेश्वर भालेराव व कलीम पटेल यांचा कॉमेडियन शो रसिकांचे मनोरंजन करणार आहे. शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होईल. यामध्ये बबन दिपके व चमू छत्रपती शिवाजी महाराज गीत, चंद्रभान सोनार व चमू वाघ्या-मुरळी, पांडूरंग धोंगडे व चमू गोंधळ, गणपतराव इचलकर व चमू वासुदेव, अशोक इंगोले व त्यांची चमू स्वच्छता अभियान, केशव खटींग व चमूची काव्यसंमेलन ही मैफल काव्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. सायं. 6.30 वाजता सुशांत शेलार यांची संकल्पना व दिग्दर्शित केलेला महाराष्ट्राचा लोकोत्सव हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यासाठी निवेदिका म्हणून पूर्वी भावे काम पाहणार आहेत. माधुरी पवार, अभिजीत केळकर नृत्य सादर करणार आहेत. तर गायक म्हणून मनीष राजगिरे व यांच्यासोबत 45 कलाकारांचा संच असणार आहे. हास्य कलाकाराची भूमिका मंगेश मोरवेकर सादर करणार आहेत. रविवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये पांडूरंग पाबळे व चमू वाघ्या-मुरळी, शिवाजी राऊत व चमू जागरण गोंधळ घालणार असून, शेषराव कावरखे यांची चमू लेक वाचवा, लेक शिकवा, शाम धोंगडे यांची चमू नाटिका, श्रीरंग दांडेकर यांची चमू भीमगीते सादर करणार आहे. सायं. 6.30 वाजता केशर केवडा हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यासाठी कौस्तुभ दिवाण हे निवेदक म्हणून काम पाहणार आहेत. जुई बेंडखळे, आय्ली घिलीया, आरती शिंदे, सोनाली पाटील व स्मिता शेवाळे हे नृत्य सादर करणार आहेत. यासाठी आनंदी जोशी, चेतन लोखंडे व 25 कलाकारांचा संच गायन सादर करतील. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये उत्तम इंगोले यांचा चमू पोवाडा, शांताबाई पाईकराव यांचा चमू सामाजिक प्रबोधन, रामराव जाधव यांचा चमू लेहंगी नृत्य (बंजारा पारंपारिक नृत्य), नामदेव दिपके यांचा चमू लेक वाचवा-लेक शिकवा, प्रकाश दांडेकर यांचा चमू मतदार जनजागृती, शंतनू पोले यांचा चमू 'कोरलाय शिवबा काळजावर' या विषयावर सादरीकरण करणार आहे. सायं. 6.30 वाजता लख लख चंदेरी-2024 कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यासाठी पुष्कर श्रोत्री हे निवेदन करणार आहेत. राजेश्वरी खरात, गौरी कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, श्वेता खरात हे कलाकार नृत्य सादर करणार आहेत. यासाठी मयुर सुकाळे यांचे गायन असणार आहे. कमलाकर सातपुते आणि किशोरी अंबिये यांच्यासोबत 25 कलाकारांचा संच स्कीट सादर करणार आहे. याबरोबरच दि. 22 ते 26 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व शस्त्र पद्रर्शन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन तसेच वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटनविषयक दालन उभारण्यात येणार आहेत. तसेच कुस्ती, रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आपले आसन ग्रहण करावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. *******

रेणापूर येथील सर्व विषबाधितांची प्रकृती स्थिर • आरोग्य यंत्रणेकडून उपचार सुरु

हिंगोली (जिमाका), दि. 21 : कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्ल्याने रात्री उशिरा 179 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून गावातच 115 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. तर 64 जणांवर हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्ल्याने 179 जणांना त्यातून विषबाधा झाली. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाने तात्काळ गावाला भेट देऊन सर्व रुग्णांची तपासणी केली. तसेच गावातील पाण्याचे स्त्रोत तसेच भगरीचे नमुने घेतले असून, पुढील तपासणीसाठी ते प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे एकूण 32 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 18 पुरुष, 13 महिला आणि एका बालकाचा समावेश होता, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तात्काळ रेणापूर येथे भेट दिली असून, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. पठाण, साथरोग अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह वैद्यकीय पथक गावात आहे. या पथकाने गावातील पाणी स्रोत तपासणी तसेच जेवणातील पदार्थांचे नमुने घेतले असून, रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. ******

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 21 : सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली या कार्यालयांतर्गत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. या वसतिगृहामध्ये इमाव-51, विजाभज-33, विमाप्र-6, दिव्यांग-4, अनाथ-02 व आर्थिक मागास प्रवर्ग-4 असे एकूण 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थिनीसाठी प्रवेशासाठी सामाजिक आरक्षण लागू असेल. सन 2023-24 साठी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 5 मार्च, 2024 या कालावधीत ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावेत. या प्रवेशाची पहिली निवड यादी दि. 15 मार्च, 2024 पर्यंत गुणवत्तेनुसार अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 25 मार्च, 2024 ही अंतिम मुदत राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची दि. 28 मार्च, 2024 रोजी गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना दि. 5 एप्रिल, 2024 रोजी प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांचे वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांने राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद/वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषि परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयामध्ये मान्यता प्राप्त पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. उच्च शिक्षणासाठी (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये गुणवत्तेनुसार तसेच संबंधित प्रवर्गनिहाय विहित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात 70 टक्के जागा व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. विद्यार्थी स्थानिक नसावा. व्यावसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास या योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/सीजीपीएचे गुण असणे आवश्यक राहील. या वसतिगृहामध्ये प्रवेश हा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षासाठी प्रवेश देय राहील. उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्ष प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. प्रवेशासाठी लागणारे ऑफलाईन अर्ज सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी विहित वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांनी केले आहे. ******

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 22 ते 24 फेब्रुवारीदरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्यामार्फत दि. 22 ते 24 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि.पुणे या कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर, असेंब्ली, क्वालिटी चेकरच्या 30 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून, या पदासाठी 14 हजार ते 16 हजार वेतन देण्यात येणार आहे. तसेच श्री दत्तगुरु फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी प्रा.लि. कळमनुरी या कंपनीमध्ये सुपरवायझर पदाच्या 10 जागा भरण्यात येणार असून यासाठी बारावी, डिप्लोमा, पदवीधर असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. या पदासाठी मासिक वेतन 8 हजार ते 10 हजार देण्यात येणार आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा. लि. पुणे व श्री दत्तगुरु फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी प्रा.लि.कळमनुरी या कंपनीचे 40 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. इच्छुकांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 7385924589, 7972888970 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. ****

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 21 : सकल मराठा समाजाच्या वतीने होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन संबंधाने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आंदोलन काळात अचानक उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यांसोबत 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये केली आहे. या कालावधीत शहरी व ग्रामीण भागातील हा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पी. एन. रुषी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार एम. एस. खंदारे, वसमत शहर पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची, वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार अशोक भोजने, हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शारदा दळवी, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सखाराम मांडवगडे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिल सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त दंडाधिकाऱ्यांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत जिल्ह्यात सकल मराठा आरक्षण आंदोलन काळात विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले आहेत. *****

दहावी व बारावी परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 19 मार्च, 2024 पर्यंत आणि बारावीची परीक्षा दि. 01 ते दि. 26 मार्च, 2024 या कालावधीत येण्यात येत आहेत. या परीक्षा कालावधीत दहावी व बारावी परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दहावी व बारावी परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायं. 5वाजेपर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध असतील. परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परीक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्तासाठी पाठवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना परवानगी लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल. या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. *****

20 February, 2024

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, लिपिक कैलास लांडगे उपस्थित होते. *****