17 February, 2024

अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन धोरण जाहीर घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास वाळू मोफत

• जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 16 फेब्रुवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळु उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव, वसमत तालुक्यातील हट्टा, सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा व बरडा येथे वाळू डेपो तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाच्या दि. 16 फेब्रुवारी, 2024 च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार वरील नमूद डेपोवरुन तसेच अवैध उत्खनन व वाहतुक कारवाईमध्ये जप्त केलेली वाळू प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित घरकुल लाभार्थ्यांनी खालील प्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करावी. घरकुल लाभार्थी असल्याचा तपशील सबंधित विभाग, तहसील कार्यालयाकडे सादर करावेत. त्यानुसार सदर माहिती महाखनीज प्रणालीवर अद्यावत करण्यात येईल. सबंधित विभागांनी माहिती सादर करत असताना त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर, लाभार्थीचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभार्थीचे पत्ता घरकुल योजनेचे नाव मंजुरी क्रमांक (SANCTION नंबर) इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. संबधित लाभार्थ्यांची माहिती तहसील कार्यालयाकडून अद्यावत केल्यानंतर लाभार्थीनी महाखनीज प्रणालीवर वाळू बुकिंग करावी. यासाठी सर्वप्रथम WWW.MAHAKHANIJ.MAHARASHTRA.GOV.IN या संकेतस्थळावर भेट देऊन SAND बुकींग पर्यायावर क्लिक (CLICK) करुन SAND बुकींगवर लॉगिन पेजवर सर्वप्रथम आपला पासवर्ड (GENRATE PASSWARD) तयार करुन घ्यावा. त्यानंतर लॉगीन पेज वर स्वतःचा मोबाईल क्रमांक युजर नेम मध्ये समाविष्ट करावा त्यानंतर पासवर्ड टाकावा. त्यानंतर CAPTCHA कोड जसा आहे तसा टाकुन लॉगीन करावे. लॉगीन झाल्यानंतर SAND बुक या पर्यायाचा वापर करून 5 ब्रास वाळू बुक करुन बुकिंगची पावती प्राप्त करावी. बुकिंग केलेली पावती घेऊन वाळु डेपो वरुन 5 ब्रास वाळु पंधरा दिवसाच्या आत घेऊन जाणे बंधनकारक आहे. वाहतुकीचा खर्च सबंधित ग्राहकाने करावा. घरकुल लाभार्थ्यांनी वरीलप्रमाणे प्रक्रिया करुन जास्तीत जास्त जनतेने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरयांनी केले आहे. *******

No comments: