01 February, 2024

 

अधिक दोन स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रमांतर्गत नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु

अधिक माहितीसाठी नजीकच्या महाविद्यालयास भेट देण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि.01 :  राज्यात सद्यस्थितीत सुरु असणारे अधिक दोन स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम बंद करुन राष्ट्रीय व्यवसाय आराखडयाप्रमाणे (NSQF) नवीन व्यवसाय सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित व अशासकीय कायम विनाअनुदानित संस्थामध्ये शैक्षणिक सत्र 2024-25 पासून सुरु करण्यास व अभ्यासक्रमाच्या मानकांना शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत सुरु असलेल्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रममध्ये सत्र 2024-25 पासुन इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश करण्यात येऊ नये. सद्यस्थितीत सुरु असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमा ऐवजी पॅसीव भोपाळ यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमामध्ये वर्ष 2024-25 मध्ये प्रवेश करण्यात यावेत. या नवीन अभ्यासक्रमाच्या सैध्दांतिक व प्रात्यक्षिक परीक्षाचे नियोजन व आयोजन हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत होणार असून या विषयांच्या सैध्दांतीक परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व प्रात्यक्षिक परीक्षा महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात येणार आहेत.

नवीन अभ्यासक्रम हे NSQF (National Skill Qualification Framework) प्रमाणे Pandit Sundarlal Sharma Central Institute of Vocational Education (Passcive) Bhopal यांच्याकडून मान्यता प्राप्त आहे. विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत 200 गुणांचा एक अभ्यासक्रम द्विलक्षी अभ्यासक्रम निवडावा लागतो. त्याऐवजी गटातील प्रत्येकी 100 गुणांचे विषय-1 व विषय -2 निवडणे आवश्यक राहील. नवीन द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले मानके उदा. विद्युत भार, वर्ग खोली, कार्यशाळा इत्यादी आवश्यक मानकांची पूर्तता संस्थेला पुढील दोन वर्षात पूर्ण करणे बंधनकारक राहील. द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवित असलेल्या विद्यमान शासकीय, अशासकीय, अनुदानित व अशासकीय विना अनुदानित महाविद्यालयांना जुन्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सुरु करावयाच्या नवीन अभ्यासक्रमांना ग्रीन चैनल पध्दतीने मान्यता देण्याबाबतचे आदेश शासनामार्फत लवकरच निर्गमित करण्यात येणार आहेत. विद्यमान संस्थांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

विद्यमान महाविद्यालयातील सद्यस्थितीत कार्यरत शिक्षकांनीच नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यावयाचे असल्याने सद्यस्थितीत कार्यरत पूर्ण वेळ शिक्षण व पुर्ण वेळ शिक्षण (प्रात्यक्षिक) यांना आवश्यकते प्रमाणे प्रशिक्षण पॅसिव भोपाळ, सेक्टर स्कील कॉन्सिल किंवा अन्य यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे Chemical Plant Operator, Fish Processing Technology व Fresh Water Fish Culture हे व्यवसाय सुरु राहणार नसल्याने या अभ्यासक्रमामध्ये सत्र 2024-25 साठी इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश करता येणार नाही. पुनर्रचित अभ्यासक्रमातील प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विषय-1 अकरावी व बारावीसाठी 300 तासांचे तासिका राहतील. या 300 तासामध्ये 190 तास व्होकेशनल स्कील व 110 तास एन्प्लॉयबीलीटी स्कील राहील. द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विषयासाठी मुल्यमापन योजना आहे. लेखी परीक्षेसाठी ८० गुण (30 गुणामध्ये रुपांतरीत) व प्रात्यक्षिक 50 गुण, प्रकल्प व अंतर्गत मुल्यमापन 20 गुण असे एकुण 100 गुणांची परीक्षा राहील. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवित असलेल्या महाविद्यालयास भेट द्यावी, असे आवाहन वि. प्र. रांगणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*******

No comments: