05 February, 2024

 

देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी

9 फेब्रुवारी पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

  • सोडत काढून होणार लाभार्थ्यांची निवड

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 :   विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याव्दारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी इत्यादीव्दारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार सन 2023-24 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झरलँड, ऑस्ट्रीया, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरु, ब्राझील, चिली, ऑसलिया, सिंगापूर इत्यादी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषि विभागामार्फत निवड केलेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याच्या खर्चाचा संपूर्ण 100 टक्के हिस्सा कृषि आयुक्तालय स्तरावरुन निश्चित होणाऱ्या प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक आहे. ही रक्कम शेतकऱ्यांने कॅशलेस पध्दतीने त्यांच्या आधार क्रमांकाशी निगडीत स्वतःच्या बँक खात्यातून एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, धनाकर्ष किंवा धनादेशाव्दारे प्रवासी कंपनीस अदा करणे आवश्यक राहील. शेतकऱ्यांना देय असलेले 50 टक्के शासकीय अनुदान कमाल एक लाख रुपये अभ्यास दौरा पूर्ण करुन परत आल्यानंतर व आवश्यक ती कागदपत्रे (प्रवासाचे विमान तिकीट, बोर्डींग पास, बँकेचा सविस्तर तपशोल इ.) दौऱ्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतरच त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या नावे बँक खात्यात डीबीटीव्दारे थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल.

हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी आपले पारपत्र (Passport), सातबारा, आठ अ, आधारकार्ड, शिधापत्रिका व बँक खात्यांचा तपशील इ. कागद पत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी / मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 09 फेब्रुवारी, 2024 पूर्वी सादर करावेत. प्राप्त अर्जामधून सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*******

No comments: