29 February, 2024

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करून बालविवाह निर्मूलनाची जनजागृती करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 29 : येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन बालविवाह निर्मूलनाची जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारील कार्यालयाच्या सभागृहात दि. 28 फेब्रुवारी, 2024 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, आरोग्य विभाग प्रतिनिधी डॉ. जाधव, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी चंद्रकांत कारभारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी बालाजी भाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी व्ही. बी. चव्हाण, कळमनुरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी बी. के. गायकवाड, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी गजानन गुंडेवार, चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, एकात्मिक बालविकास प्रकल्पच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती एल. बी. ठाकूर, माध्यमिक शिक्षण विभाग प्रतिनिधी आकाश बांगर, कायदा तथा परीविक्षा अधिकारी अनुराधा पंडित, एसबीसी 3 & यूनिसेफचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे उपस्थित होते. बालविवाहातून मुक्त होऊन उच्च शिक्षण पूर्ण करीत असलेल्या मुलींचा व मुलींच्या पालकांचा सत्कार शासन आपल्या दारी कार्यक्रमात करण्यात यावा. बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून बालविवाहाची प्रचार-प्रसिद्धी करावी. प्रत्येक गावात 20 ते 30 वयोगटातील बालमित्रांची निवड करुन जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालमित्रांच्या संपर्कात राहून बालविवाहाचा आढावा घ्यावा. बालविवाहास आळा घालण्यासाठी उमेद अभियानातील, माविम मधील महिलांमध्ये जनजागृतीचे उपक्रम घेण्यात यावे, बालविवाह निर्मूलनाबाबत 250 शाळेत घेण्यात येणारे सत्र महाविद्यालयातही घेण्यात यावे. तसेच यूनिसेफ व एसबीसी 3 यांच्याकडून 2024 ते 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या. शेवटी बैठकीचे आभार प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे यांनी केले. ******

No comments: