10 February, 2024

 

वाचन संस्कृती घराघरात रुजवण्यासाठी सहकुटुंब वाचन आवश्यक

- विनोद शेंडगे

 


            हिंगोली (जिमाका), दि. 10 :  वाचन संस्कृती घराघरात रुजवण्यासाठी सहकुटुंब वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले.

येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्या अध्यक्षतेखाली 'विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात वाचनाचे महत्व' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री. विनोद शेंडगे म्हणाले, मुलांवर वाचनांचे संस्कार रुजविण्यासाठी सहकुटुंब वाचन, वाचनाचे निमित्त शोधणे जसे वाढदिवस, वाचनाची स्पर्धा घेणे, वाचन संस्कार केंद्र निर्माण करणे तसेच वाचलेल्या पुस्तकांचे ज्ञान इतरांना सांगणे या पाच तत्वाचा कृती कार्यक्रम तयार केला पाहिजे. वाचनाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे. वाचनाची आवड, गोडी निर्माण केली पाहिजे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी व विचाराचे भरण पोषण करण्यासाठी पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.  

            याप्रसंगी बोलताना उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके यांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यासाठी  शासनाने सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे सभासद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी ग्रंथालयाचे सभासद होऊन विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम करणे आवश्यक असल्याचे सांगून वाचनाचे महत्त्व विशद केले.

            शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी व स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. त्यांना ग्रंथ वाचनासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे सांगितले.

या व्याख्यानाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. अशोक अर्धापूरकर यांनी केले. या व्याख्यानास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

No comments: