31 August, 2023

 

जिल्हा प्रशासनाला व्यसनमुक्तीचे बंधन

नशाबंदी मंडळाचा उपक्रम

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या राज्यव्यापी नशाबंदी मंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांना रक्षाबंधन दिनानिमित्त बुधवार, दि. 30 ऑगस्ट रोजी व्यसनमुक्ती राखी बांधण्यात आली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्तीच्या प्रसारार्थ रक्षाबंधन उपक्रम राबविण्यात आले.

व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनींचे मत परिवर्तन करुन त्यांना निर्व्यसनी बनविण्याचा उपक्रम सुरु आहे. रक्षाबंधन हा कठीण काळात साथ देणाऱ्या, रक्षण करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्याचा दिवस आहे. रक्षाबंधनाचा मुख्य गाभा म्हणजे रक्षण, संरक्षण करणाऱ्यांना अभिवादन करणे, त्यांचे आभार मानणे हा आहे. रक्षाबंधन या उत्सवामध्ये एक प्रकारची बांधिलकी आहे. जी बांधिलकी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने अभिप्रेत करते आणि म्हणूनच हे असे बंधन आहे. जे सातत्याने व्यसनांपासून रक्षा करण्याची यथोचित मागणी करते. महाराष्ट्र शासनाचे व्यवसनमुक्ती धोरण अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी रक्षाबंधनानिमित्त नशाबंदीमंडळाच्या वतीने विनंती करण्यात आली. या उपक्रमात नशाबंदी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा शुभदा सरोदे, जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, अनुप्रिता भाले, अनिता चोंढेकर, ज्योती काथळकर, आर.एस.गडगिळे आदीनी सहभाग घेतला.

रक्षाबंधनानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा उपक्रम राबविल्याबद्दल नशाबंदी मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे सहायक आयुक्त समाज कल्याण तथा नशामुक्त भारत अभियान समितीचे सचिव आर. एच. एडके यांनी कौतूक केले.

 

*****  

 

विशेष वृत्त 

हिंगोली जिल्ह्यातील 3 हजार 667 एपीएल  शिधापत्रिकाधारक  शेतकऱ्यांना

आतापर्यंत 82 लाख 67 हजार 400 रुपयाचे डीबीटीद्वारे वितरण

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : शासनाने 1 जानेवारी 2023 पासून राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी  बांधवाना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण (Direct Benefit Transfer-DBT) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती लाभार्थी वार्षिक एक हजार आठशे रुपये देण्यात येणार आहेत. याचा लाभ  हिंगोली  जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 630 लाभार्थ्यांना मिळणार आहे.

            राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी  कुटुंबांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. मात्र राज्य शासनाने अन्नधान्याऐवजी  रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंगोली  जिल्ह्यातील एकूण 37 हजार 507 शेतकरी कुटुंबातील 1 लाख 59 हजार 630 लाभार्थ्यांना दरवर्षी 1 हजार 800 रुपये डीबीटीद्वारे देण्यात येणार आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्यातील 40 हजार 46, कळमनुरी 39 हजार 433, सेनगाव 27 हजार 149, वसमत 27 हजार 748 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 25 हजार 254 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

            राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार राज्य शासनाकडून या योजनेसाठी गहू, तांदूळ आदी आवश्यक अन्नधान्याची  खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एनएफएसए योजनेत केली जात होती. तसेच शेतकऱ्यांना प्रतिमाह प्रती सदस्य 5 किलो अन्नधान्य  दोन रुपये प्रती किलो गहू व तीन रुपये प्रती किलो दराने तांदूळ उपलब्ध करुन देण्यात येत होते. तथापि, या योजनेत काही कारणास्तव गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने कळविले आहे. त्यामुळे शेतकरी  योजनेतील  लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी  थेट रक्कम डीबीटीद्वारे  देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार  प्रती  लाभार्थी  प्रती महिना 150 रुपये याप्रमाणे 1 हजार 800 रुपये वार्षिक देण्यात येणार आहेत.

            हिंगोली  जिल्ह्यात प्रती  लाभार्थी  150 प्रमाणे माहे जानेवारी ते मार्च,2023 साठी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर 7 कोटी 28 लाख 99 हजार 700 रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आतापर्यंत 3 हजार 667 लाभार्थ्यांना लाभ दिला असून 82 लाख 67 हजार 400 एवढी रक्कम डीबीटीद्वारे खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            कळमनुरी तालुक्यातील 1800 लाभार्थ्यांना 32 लाख 56 हजार 200, वसमत तालुक्यातील 1220 लाभार्थ्यांना 32 लाख 6 हजार 400 , सेनगाव तालुक्यातील 555 लाभार्थ्यांना 14 लाख 90 हजार 400, हिंगोली तालुक्यातील 02 लाभार्थ्यांना 4800 व औंढा तालुक्यातील 90 लाभार्थ्यांना 3 लाख 9 हजार 600 रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची माहिती जमा करण्याची  कार्यवाही  सुरु असून माहिती प्राप्त होताच लाभार्थ्याच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी  या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन पुरवठा विभागाने  केले आहे. 

 

*****  

 

30 August, 2023

 

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळीच काळजी घ्यावी

 

कीड रोग नियंत्रणासाठी निविष्ठांची खरेदी करुन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी

30 सप्टेंबर पूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यात यंदा 3 लाख 28 हजार 968 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यात 2 लाख 49 हजार 549 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. जिल्ह्यामध्ये आयोजित मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटी दरम्यान सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी पिकाची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

                रोगाची लक्षणे : पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे पट्टे दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुले आणि शेंगा कमी लागतात. दाण्यांचा आकार लहान राहतो. शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोटी घट येते.

                उपाययोजना : सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रसार मुख्यत: पांढरी माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून त्यांना जाळून किंवा जमिनीत पुरुन नष्ट करावीत. पांढरी माशी आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे प्रती एकरी  10 याप्रमाणे लावावेत.

                आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास पांढरी माशी आणि पिवळ्या मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणताही एका रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

                थायमिथोक्झाम 12.6 टक्के+लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6 टक्के+ झेडसी या कीटकनाशकाची बाजारातील नावे अलिका, टॅगेटा, इरुका, अनोलिका, झपॅक ही असून प्रती 10 लिटर पाण्यात 2.5 मिली टाकून साध्या पंपाद्वारे प्रति एकर 50 मिली प्रमाणे फवारणी करावी. असिटामिप्रीड 25 टक्के+बाइफेन्थ्रीन 25 टक्के+ डब्लयूजी या कीटकनाशकाची बाजारातील नावे स्पेरटो, अरजित ही असून प्रती 10 लिटर पाण्यात 5 ग्रॅम टाकून साध्या पंपाद्वारे प्रति एकर 100 ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी. बीटा साइफलुथ्रीन 8.49 टक्के+इमिडाक्लोप्रीड 19.81 टक्के+ओडी या कीटकनाशकाची बाजारातील नाव सोलोमन हे असून प्रती 10 लिटर पाण्यात 7 मिली टाकून साध्या पंपाद्वारे प्रति एकर 140 मिली प्रमाणे फवारणी करावी. पावर पंपासाठी किटनाशकाची मात्रा तीनपट वापरावी.

                त्यानुषंगाने नियंत्रणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पिकांसाठी सन 2023-24 या योजनेंतर्गत एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे/जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये प्रती हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देय आहे.

                हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या व इतर कीड रोग नियंत्रणासाठी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती, सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबर, 2023 पूर्वी सादर करावेत. त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

******

 

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी

15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. ३० : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

            या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक

            उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 18 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस 1 ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

            राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या         4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००००

 

लंपी आजाराला त्वरित आळा घाला ; पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा…!!

 

            लंपी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे गाई मध्ये आढळून येतो. सर्व वयोगटातील नर व मादी जांनावरांमध्ये हा आजार आढळून येतो. उष्ण व दमट हवामान (कीटकांची वाढ जास्त प्रमाणात ) रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावर अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. वेळीच उपाययोजना नाही केल्यास मरतुक होते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माशा (स्टोमोकसिस ) , डास (एडीस), गोचीड, चिलटे (क्यूलीक्वाईड्स) यांच्यामार्फत होतो. तसेच या आजाराचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होतो.

            भारतात या रोगाची पहिली नोंद ऑगस्ट, 2019 मध्ये ओरिसा राज्यात झाली. तर राज्यात या आजाराचा प्रसार मार्च, 2020 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दिसून आला आहे.

            राज्यात सन 2022-23 मध्ये जळगाव, अकोला, पुणे, नगर, औरंगाबाद, लातूर व बीड जिल्हयात गाय वर्गीय जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. यावर्षीही हिंगोली जिल्ह्यात लम्पी रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे हिंगोली जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात लंपी चर्म रोगास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने विशेष सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लंपी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल.

लंपी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे :

बाधित जनावरामध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2-5 आठवडे एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. सुरुवातीस भरपूर ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी अथवा बंद होते. दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर हळूहळू 10-20 मिमी व्यासाच्या गाठी येतात. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह व स्तनदाह आजाराची बाधा पशुमध्ये होऊ शकते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी :

तापीच्या कालावधीमध्येच जनावरास उपचार होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चारा कमी खाणाऱ्या जनावराचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावा. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, माशा, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करणे. तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येऊ नयेत म्हणून औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे. आजारी जनावरांवर विषारी औषध फवारणी करु नये. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करणे. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम 4(1) अन्वये पशूंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

हिंगोली जिल्ह्यात लम्पी रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे हिंगोली जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या लम्पी रोग प्रादुर्भाव वाढलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष वार रुम तयार करण्यात आले आहे. या वार रुमध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एम. आर. रत्नपारखी यांच्या नियंत्रणाखाली लम्पी प्रादुर्भावामुळे मृत पशुधनाचे अर्थसहाय्याचे प्रस्ताव त्वरित मागवून पशुपालकांना अनुदान देणे सुलभ होण्यासाठी खालील अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. आर. ए. कल्यापूरे (मो. 9518399323), सहायक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, हिंगोली, डॉ. एस.बी.खुणे (मो. 9850737324), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली, डॉ.डी.ए.टाकळीकर (मो. 9881480083), सहायक आयुक्त पसं जिपवैसचि, हिंगोली, डॉ. एस. पी. पवार (मो. 9665138403) , पशुधन विकास अधिकारी, जिपवैसचि, हिंगोली, व्ही. आर. पोटे (9822073595), पशुधन पर्यवेक्षक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, हिंगोली, के. के. शेवाळकर (9075097483), डाटा एंट्री ऑपरेटर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, हिंगोली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

            लंपी स्कीन डिसीजचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालक तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे व शंकाचे निरसन करणे यासाठी तालुकानिहाय पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती सर्व तालुके यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

            तालुकास्तरीय नियंत्रण कक्षामध्ये हिंगोली  तालुक्यासाठी डॉ. जेजेराम केंद्रे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो.8788885187) यांची, वसमत तालुक्यासाठी डॉ. प्रिया धुतराज, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9527417019), कळमनुरी तालुक्यासाठी डॉ.नंदकिशोर जाधव, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9960784664), औंढा नागनाथ तालुक्यासाठी डॉ. जेजेराम केंद्रे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो.8788885187) व सेनगाव तालुक्यासाठी डॉ. श्रीकांत देवकर, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 7498203408) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

लंपी स्कीन या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

                                                                        -- चंद्रकांत कारभारी

                                                                            माहिती सहायक

                                                                                                                 जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

*****  

29 August, 2023

 

कृषि पायाभूत निधी योजनेच्या घडीपत्रिकेचे

स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या हस्ते विमोचन


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : मा.बाळासाहेब ठाकरे कृषिव्यवसाय ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या विभागीय अंमलबजावणी कक्षाचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा अमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हा अमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक (आत्मा) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृषि पायाभूत निधी योजना (AIF) अंतर्गत घडीपत्रिकेचे विमोचन स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याप्रसंगी  विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनी (CBO) यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील यावर मार्गदर्शन केले.

यावेळी लातूर येथील विभागीय एमआयएस तज्ञ बाबासाहेब वीर, जिल्हा अंमलबजावणी  नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, मूल्य साखळी तज्ञ गणेश कच्छवे, अर्थतज्ञ तथा वित्तीय सल्लागार जितेश नालट, एमआयएस तज्ञ बालाजी मोडे, लेखापाल मोहिब शेख, संगणक चालक अजय चक्के, तसेच शेतकरी उत्पादक कंपनी (CBO) चे संचालक प्रमुख उपस्थित होते.  

****

 

घरोघरी भेटी देऊन मतदार पडताळणीचे काम शंभर टक्के पूर्ण करावेत

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी हा कार्यक्रम सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सर्व तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या स्तरावरुन राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवार, दि. 21 जुलै, 2023 पासून घरोघरी भेटी देऊन मतदार पडताळणीचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण मतदार संक्ष्या 9 लाख 34 हजार 368 इतकी असून आतापर्यंत 5 लाख 90 हजार 893 इतक्या मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी 63.24 टक्के इतकी आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी , सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन मतदारांची शंभर टक्के पडताळणी करण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. तसेच काम न केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यावर नियमानुसार जिल्हास्तरावरुन कार्यवाही केली जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत.

*******   

28 August, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष

 

विविध कार्यक्रमाद्वारे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील

आठवणींना उजाळा देण्याचे काम करावे

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : मराठवाडा मुक्ती संग्रामास या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीद लोकांची आठवण म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शासनाने जिल्हानिहाय कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून दिली आहे. त्यानुसार सर्व विभागांनी दररोज राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन तात्काळ सादर करावे. तसेच नियोजनानुसार दररोज विविध कार्यक्रम घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामातील आठवणींना उजाळा देण्याचे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  यावेळी दिल्या.  

                मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 28 ऑगस्ट, 2023 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी सुशिल आग्रेकर, सहायक नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, माधव सलगर, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेश एडके, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त कळमनुरी तालुक्यातील दाती व वसमत तालुक्यातील वापटी येथे हुतात्मा स्मारक उभारणे, सध्या कार्यरत असलेल्या हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करणे, प्रत्येक गावातील भिंतीवर स्लोगने रंगवणे, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करणे, तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नाटिका, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे, मराठवाडा मुक्ती संग्राम चित्ररथ तयार करुन मंडळनिहाय रथयात्रा काढणे, मुक्ती संग्राम संदर्भात छायाचित्रे, पोस्टर्स, भितीचित्रे, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, मुक्तीसंग्रामासंदर्भात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करणे, डिजिटल बोर्ड लावणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्याठिकाणापर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करावयाचा आहे. तसेच आयोजित कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांला बोलावून त्यांचा सन्मान करावा. ज्येष्ठ नागरिंकाची आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. यासाठी सर्व विभागांनी आपण राबवित असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन सादर करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या .  

*******  

 

 

शासन आपल्या दारी व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी 1 सप्टेंबर रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

                                                                                                             

  हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासन आपल्या दारी’ व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार, दि. 01 सप्टेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेनगाव येथे पंडित दीनदयाळ महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि.हिंगोली, स्वतंत्र मायक्रो फायनान्स छत्रपती संभाजीनगर, फ्रोबस अँड कंपनी वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर, अमधानी प्रा.लिमिटेड हैद्राबाद (धूत इलेक्ट्रीकल, नुबनो, डिमार्ट, लावा, सनप्लास्ट), एक्सेल प्लेसमेंटस प्रा. छत्रपती संभाजीनगर (लंबोदर मोल्डर, ऑटो एंसीलरी, एनएचके ऑटोमोटीव्ह इंडिया प्रा.लि., लक्ष्मी अग्नी कॉम्पो प्रा.लि.), नवकिसान बायोप्लॅनटेक प्रा.नांदेड, मनसा मोटर्स (महिंद्रा) हिंगोली, मनसा मोटर्स प्रा.लि. (टाटा मोटर्स) हिंगोली, पिपल्स ट्री व्हेचर्स प्रा.लि.अमरावती, एसबीआय लाइफ इन्शूरंस हिंगोली, रोहन सिक्युरिटी फोर्स हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपनी व हिंगोली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार दिड हजार (1500) पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली असून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे शुक्रवार, दि. 01 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****   

25 August, 2023

 वार्षिक कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष आज्ञावलीमध्ये

माहिती नोंदविण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 : शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष-2023 तयार करण्याचे काम  जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरु आहे.  जिल्ह्यातील  सर्व  राज्य  शासकीय  कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाची व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेत्तर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दि. 01 जुलै 2023 या संदर्भ दिनांकास अनुसरुन माहिती ऑनलाईन आज्ञावली मध्ये नोंदविणे बंधनकारक आहे.

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या https://mahades.maharashtra.gov.in/CGE या संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची माहिती अद्ययावत करावयाची आहे.  ही माहिती ऑनलाईन आज्ञावलीत नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी कार्यालय, हिंगोली यांचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय माहे नोव्हेंबर, 2023 ची वेतन देयके कोषागार कार्यालयामार्फत स्वीकारण्यात येणार नाहीत. याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एस. एम. रचावाड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

 

अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करु नये

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 : शेजारच्या गुजरात राज्याकडून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात , कररहीत स्वरुपात महाराष्ट्र राज्यात विकले जात आहे. त्यामुळे स्थानिक वजन काटे उत्पादक , दुरुस्तक व विक्रेते यांचे नुकसान होत आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महसूल सुध्दा बुडत आहे, अशी तक्रार प्राप्त झाली असल्याचे राज्याचे नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कळविले आहे.

तसेच चीन मधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्याची सुध्दा राज्यात कमी दरात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या वजन काट्यांना राज्य शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. हे वजन काटे अप्रमाणित असल्याने ग्राहक हित हानी होत आहे. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टीकर लावून त्यांची विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महसूलावर परिणाम होत आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वजन काटे उपयोगकर्त्यांनी अशा प्रकारच्या अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करु नये, असे आवाहन उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, परभणी व हिंगोली जिल्हा यांनी केले आहे.

****

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 : राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार दि. 29 ऑगस्ट, 2023 हा दिवस हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्या येतो. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने दि. 29 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मैदानी क्रीडा स्पर्धा या हिंगोली तालुका क्रीडा संकुलावर तर बॅडमिंटन व कुस्ती स्पर्धा या जिल्हा क्रीडा संकलामध्ये घेण्यात येणार आहेत. मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी संपर्क प्रमुख म्हणून क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, बॅडमिंटन स्पर्धेसाठी संपर्क प्रमुख म्हणून क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, कुस्ती स्पर्धेसाठी खेलो इंडिया सेंटरचे प्रशिक्षक नफीस पैलवान हे काम पाहणार आहेत.

वरील कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन क्रीडा दिन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी आपली प्रवेशिका दि. 28 ऑगस्ट, 2023 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.

****

 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषि पायाभूत निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी

जवळा बाजार येथील कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 


 

हिंगोली (जिमाका),  दि. 25 : जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील स्वस्तिक फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी पायाभूत निधी (AIF) योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रचार-प्रसार व लाभार्थी नोंदणीसाठी कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अंमलबजावणी  नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, मूल्य साखळी तज्ञ गणेश कच्छवे, MIS तज्ञ बालाजी मोडे, CBO संचालक मंगेश बुलाके यांनी कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF) योजने अंतर्गत वेब पोर्टलवर अर्ज कसा करावा, कोणत्या व्यवसायासाठी लाभ घेता येतो याची माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 3 टक्के व्याज सवलतीचा लाभ कसा मिळतो याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.          

या कार्यशाळेसाठी उपस्थित स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे  अध्यक्ष नारायण बुलाखे, सभासद शेतकरी मोहन दशरथे, शकुराव कदम, मारोती अस्वार, मारोती चव्हाण, नारायण बुलाखे, संभाजी चव्हाण आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

****

 

शासनाने दिलेल्या आराखड्यानुसार

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी अभियान प्रभावीपणे राबवावा

-- उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : मराठवाडा मुक्ती संग्रामास या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीद लोकांची आठवण म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शासनाने जिल्हानिहाय कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून दिली आहे. त्यानुसार सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून व योग्य नियोजन करुन मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांनी  यावेळी दिल्या.  

            मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 25 ऑगस्ट, 2023 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, गणेश वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी सुशिल आग्रेकर, सहायक नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. मंगेश टेहरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. पोत्रे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेश एडके, सर्व गटविकास अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी श्री. मोरे म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करणे, तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नाटिका, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे, मराठवाडा मुक्ती संग्राम चित्ररथ तयार करुन मंडळनिहाय रथयात्रा काढणे, मुक्ती संग्राम संदर्भात छायाचित्रे, पोस्टर्स, भितीचित्रे, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, मुक्तीसंग्रामासंदर्भात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करणे, डिजिटल बोर्ड लावणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्याठिकाणापर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करावयाचा आहे. तसेच आयोजित कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांला बोलावून त्यांचा सन्मान करावा. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दर्शनी बोर्ड तयार करावेत. तसेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे फलक लावावेत. ज्येष्ठ नागरिंकाची आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. यासाठी सर्व विभागांनी आपण राबवित असलेल्या कार्यक्रमाचा आराखडा सादर करावा, अशा सूचनाही उपजिल्हाधिकारी श्री. मोरे यांनी दिल्या .  

*******

24 August, 2023

 हिंगोली तालुका कोतवाल पदभरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरण सुरु

 

हिंगोली (जिमाका),  दि. 24 : हिंगोली  तालुक्यातील कोतवाल पदभरती 2023 करिता लेखी परीक्षा दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार असून त्यासाठीचे प्रवेशपत्र वितरण प्रक्रिया सुरु आहे. ज्या उमेदवारांना अद्याप लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळालेले नाही त्यांना दि. 24 ऑगस्ट व 25 ऑगस्ट, 2023 या दिवशी तहसील कार्यालय हिंगोली येथे प्रवेश पत्र वितरित करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या https://hingoli.nic.in अधिकृत वेबसाईटवर देखील प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आले असून उमेदवारांना या वेबसाईटवरुन ते डाऊनलोड करुन घेता येतील, असे तहसीलदार, हिंगोली यांनी कळविले आहे.  

*****  

 

कोतवाल भरती परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू

 

            हिंगोली (जिमाका), दि. 24 : हिंगोली उपविभागातील हिंगोली व सेनगाव तहसील कार्यालयांतर्गत कोतवाल भरती परीक्षा-2023 ही हिंगोली जिल्हा मुख्यालयी दि.27 ऑगस्ट,2023 रोजी स. 11.00 ते दु. 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे.

            ही परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-अ, आदर्श महाविद्यालय अकोला रोड हिंगोली भाग-ब, पोदार इंटर नॅशनल  स्कूल अकोला रोड, हिंगोली, सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल शास्त्रीनगर हिंगोली, शासकीय तंत्रनिकेतन लिंबाळा एमआयडीसी, हिंगोली,  जिल्हा परिषद कन्या प्रशाला शिवाजीनगर हिंगोली, सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला शिवाजीनगर हिंगोली, श्री संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय अकोला रोड हिंगोली, कै.बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अकोला रोड हिंगोली, अनुसया मंदिर खकाळी बायपास हिंगोली, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र अकोला रोड हिंगोली या 12 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या 12 केंद्रावर 2 हजार 621 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

हिंगोली उपविभागातील वरील परीक्षा केंद्र परिसरात दि. 27 ऑगस्ट, 2023 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****