31 January, 2023

 

अकरावी कृषि गणना करण्यासाठी

तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांना प्रशिक्षण



 

            हिंगोली (जिमाका), दि. 31 :  अकरावी कृषी गणनेचे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी  जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश आहेत.  त्याअनुषंगाने केंद्र शासनास अकरावी कृषि गणना 2021-2022 साठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेतील वेळापत्रकाप्रमाणे आज येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

            या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे होते. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी  मार्गदर्शन केले.

            या प्रशिक्षणास जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कृषि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

*****

 

व्हॅलेंटाइन डे (मैत्री दिवस) साजरा करा परंतु व्यसनमुक्त मित्र बनवा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



 

        हिंगोली (जिमाका), दि. 30 :  आजमितीस 14 फेब्रुवारी  हा दिवस सर्वत्र व्हॅलेंटाईन डे (मैत्री दिवस) साजरा करण्याची प्रथा युवा पिढीमध्ये रुजत आहे. त्यानिमित्ताने नवीन मित्र बनवताना व्यसनमुक्त मित्र बनवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.  

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नशामुक्त भारत अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक आज घेण्यात आली. यावेळी प्र.पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेश येडके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, व्यसनमुक्ती कार्यक्रम कार्यकर्ता विशाल अग्रवाल, शाम सोळंके, दिपक वडकुते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले, व्हॅलेंटाइन डे साजरा करताना व्यसनमुक्त मित्र मिळवा. तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयातून विशेष कार्यक्रम घेऊन नशामुक्तीचे कार्यक्रम घेण्यात यावेत. याद्वारे समाजात जनजागृती करावी. पोलीस प्रशासनाच्या मदतीने आगामी येणाऱ्या होळी सणानिमित्त व्यसनाची आहुती देऊन होळी साजरी करावी. प्रत्येक कार्यक्रमानंतर व्यसनमुक्तीचा संकल्प घेण्यात यावा, असे सांगितले.

            जिल्हाभरात नशामुक्ती अभियान राबविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्याबाबत बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सूचना दिल्या. पोलीस विभागाच्या सहाय्याने प्रत्येक गावातील व्यसनाधीन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे समुदेशन करणे, व्यसनाच्या दुष्परिणामाची पोस्टर, प्रदर्शने, पथनाट्य, चित्र प्रदर्शन, व्याख्यान, प्रबोधन अशा विविध स्वरुपाचे उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

*******

 

हातात हात मिळवू या, कुष्ठरोगाला पळवू या…!

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्श जनजागृती अभियान साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्यामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षीचे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गतचे ‘‘कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात (Lets Fight Leprosy and make Leprosy a History)’’ हे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती अभियानाची माहिती देणारा हा लेख …

कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जंतूपासून होणारा सौम्य सांसर्गिक आजार आहे. औषधोपचार न घेतलेल्या सांसर्गिक रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला कुष्ठरोगाचा संसर्ग होऊ शकतो. समाजात 95 टक्के लोकांना हा रोग होत नाही. उर्वरित 05 टक्के लोकांना त्यांच्या नैसर्गिक रोग प्रतिकार शक्तीनुसार हा रोग होतो.

कुष्ठरोगाची निदानात्मक लक्षणे : शरीरावर एक किंवा अनेक फिक्कट तांबूस रंगाचे बधीर चट्टे, परावर्तीय मज्जा जाड व दुखऱ्या होणे. तसेच संबंधित भागावर बधीरता आढळणे, हात, पाय व चेहरा यांच्या स्नायूमध्ये अशक्तपणा जाणवणे, जंतू परीक्षणात कुष्ठजंतू आढळणे.

जगात कुष्ठरोगाची व्याप्ती कमी जास्त प्रमाणात आढळते. साधारणत: कुष्ठरोगाचे रुग्ण जगातील सर्व देशामध्ये आढळतात. तथापि, विविध देशामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे वेगवेगळ्या पध्दतीने दिसून येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सन 2021 मध्ये जगात 1 लाख 40 हजार 594 कुष्ठरोगाचे रुग्ण आहेत. यामध्ये एकट्या भारतात 75 हजार 394 इतके कुष्ठरोगाचे रुग्ण आहेत. जागतिक आकडेवारीनुसार 54 टक्के रुग्ण हे भारतात आहेत.

               भारतात सन 2030 पर्यंत शून्य कुष्ठरोग रुग्ण, कुष्ठरोगाच्या संसर्गाचे शून्य प्रसारण, कुष्ठरोगामुळे शून्य अपंगत्व, शून्य कलंक आणि भेदभाव हे व्हिजन राबविण्यात येणार आहे. 
               राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सन 1955-56 साली पाहणी, शिक्षण व उपचार या तत्वावर एकविध पध्दतीने राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 1981-82 पासून प्रभावी औषधोपचाराचा समावेश असलेली बहुविध औषधोपचार पध्दत राज्यात टप्याटप्याने लागू करण्यात येऊन 1995-96 सालापर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये उपचार चालू करण्यात आले. 

हिंगोली जिल्ह्यात सन 1981-82 साली दर दहा हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण 71.1 एवढे होते. सन 1997-98 साली दर दहा हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण 6.7 एवढे होते. सन 2005-2006 साली दर दहा हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण 0.39 एवढे होते.

यावर्षी जिल्ह्याचे कुष्ठरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. सन 2021-22 या वर्षी दर हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण 0.08 एवढे आहे. तर डिसेंबर, 2022 अखेर दर हजार लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण 1.35 एवढे आहे.

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जानेवारी, 2023 रोजीच्या ग्रामसभेत जिल्हाधिकारी यांच्या घोषणापत्राचे ग्रामसेवत वाचन, ग्रामप्रमुख/सरपंचाचे भाषण, कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेणे, गावातील प्रौढ व्यक्तीस महात्मा गांधीचा (बापू) पेहराव करुन त्यांच्यामार्फत अथवा सपना या शाळकरी मुलीमार्फत कुष्ठरोग व क्षयरोग विषयक माहिती व संदेश देण्यात आले. तसेच कुष्ठरोगाविषयी प्रश्न उत्तरे कार्यक्रम राबविण्यात आले आहे.

तसेच दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, 2023 या पंधरवाड्यात शाळांमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन, शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबत संदेश लिहिणे, शाळेमध्ये नुक्कड-नाटक, प्रश्न-मंजुषा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणे, कविता, रांगोळी स्पर्धा, कटपुतळी, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य इत्यादी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

स्थानिक महिला मंडळे, बचत गट, तरुण मंडळे यांच्या सभा घेणे, खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शन, आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे. शहरी भागात रोटरी क्लब, लायन्स क्लब इत्यादी संस्थेच्या सहाय्याने कुष्ठरोगाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 23 जानेवारी, 2023 रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक घेऊन आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा आशा समन्वयक अशा विविध विभागांना जबाबदारी सोपविली आहे. विविध विभागाने आपापली जबाबदारी पार पाडून ही मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी बैठकीत दिले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी कार्यकर्ती, आशांच्या मदतीने जिल्ह्यातील 24 प्राथमिक आरोग्य केंद्र, 132 आरोग्य उपकेंद्रात, 563 ग्रामपंचायती व 711 गावामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवून कुष्ठरुग्णाचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करुन आपला हिंगोली जिल्हा कुष्ठरोग मुक्त करुया आणि हातात हात मिळवून कुष्ठरोगाल पळवू या …. !

 

                                                                                                       -- चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                            माहिती सहायक

                                                                                                            जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

30 January, 2023

 

फुटबॉल क्लब बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 :  राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबदध्द प्रशिक्षण, पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्या करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दा नमूद असून या अंतर्गत राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. (फुटबॉल क्लब) बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करुन त्यातून निवडलेल्या 20 खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे , तेथील निवास, प्रशिक्षण इत्यादी बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्याची मुभा दिलेली आहे. तसेच एफसी बायर्न महाराष्ट्र कप टीव्ही-9 मराठी हे मिडिया पार्टनर आहेत.

            राज्यातून 20 खेळाडू जर्मनी येथे सदर प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. या फुटबॉल स्पर्धा 14 वर्षाखालील मुलांच्या गटात घेण्यात येणार आहे.

            यासाठी 14 वर्षाखालील वयोगट असलेली मुले दि. 01 जानेवारी, 2009 नंतर जन्मलेला असावा. एकूण खेळाडूंची संख्या 20 मुले असणार आहे. तसेच 02 मार्गदर्शक व व्यवस्थापक असे एकूण 22 जण असणार आहेत.

            जिल्हास्तर एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप (14 वर्षाखालील मुले) स्पर्धेसाठी शाळांचे प्रवेश अर्ज दि. 01 ते 06 फेब्रुवारी, 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावे. स्पर्धेची तारीख व स्थळ लवकरच कळविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, फुटबॉल क्लब, फुटबॉल संघटना यांनी याची नोंद घेऊन जास्तीत जास्त 14 वर्षाखालील मुलांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

*****

 

जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन


 

        हिंगोली (जिमाका), दि. 30 :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि आदर व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचारी यांनी मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*******

29 January, 2023

 स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ

दोन मिनिटे मौन पाळून हुतात्मा दिन साजरा करण्याचे आवाहन


हिंगोली(जिमाका), दि. 29 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही जिल्ह्यात सोमवार, दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा. 

सोमवार, दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी ठिक 10.59 पासून 11.00 वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात येईल. सदर इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये/ आस्थापना / शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे या मधील अधिकारी/कर्मचारी/ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी / विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे. सकाळी ठिक 11.02 मिनिटांनी मौन ( स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी ठिक 11.03 मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल.

         जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ठिक 11.00 वाजता मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता ) पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.                                   

*****

28 January, 2023

 शिक्षक मतदारसंघ निवडणूक

मतदानासाठी शिक्षकांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा


हिंगोली (जिमाका), दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवार, दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. 

या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या जिल्ह्यातील शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून 2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार एक दिवसाची विशेष नैमित्तक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा शिक्षकांना अनुज्ञेय नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, अशी माहिती हिंगोली जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 

*****

 ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथासाठी ‘ऑनलाईन वोटिंग’ करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 28  : यंदाच्या वर्षी ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ हा विषय चित्ररथाद्वारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने दिमाखात सादर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखवण्यात आली होती. चित्ररथाला दोन प्रकारचे पुरस्कार असून, पहिल्या प्रकारचा पुरस्कार तज्ञ समितीच्या अहवालावरून मिळेल, तर दुसऱ्या प्रकारचा पुरस्कार लोकप्रिय चित्ररथ या सदराखाली नागरिकांच्या ‘ऑनलाइन वोटिंग’ नुसार मिळणार आहे. तरी यासाठी नागरिकांनी ‘ऑनलाईन वोटिंग’ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी अशी नोंदवा सर्वोत्कृष्ट पसंती*

‘साडेतीन शक्तीपीठे व नारीशक्ती’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला क्रमांक 1 च्या पसंतीसाठी मंगळवार, 31 जानेवारी 2023 च्या रात्री 11.45 वाजेपर्यंत आपल्या मोबाइल क्रमांकावरून MYGOVPOLL (space) 337011, 12 हा एसएमएस 7738299899 या मोबाईल क्रमांकावर पाठवा किंवा https://www.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ या लिंकवर जावून ‘महाराष्ट्र’ या नावासमोर आपले ऑनलाईन मत नोंदवावे. सर्वांनी वरीलप्रमाणे ‘ऑनलाईन वोटिंग’ करावे,  तसेच आपल्या संपर्कातील सर्वांना ऑनलाईन वोटिंग करण्याबाबत कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

27 January, 2023

मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू

 

मतदान केंद्र परिसरात कलम 144 लागू

 

            हिंगोली, दि.27 (जिमाका) : मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूकीचा कालावधी दिनांक 29 डिसेंबर 2022 ते दिनांक 04 फेब्रुवारी 2023 पर्यंत राहणार आहे.

            05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक -2023 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असुन कार्यक्रम घोषित झाल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्‍याने, हिंगोली जिल्‍ह्यातील या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून आणि कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहण्‍यासाठी जिल्‍ह्यातील खालील मतदान केंद्रावर निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान होणार आहे.

 

अ.क्र.

मतदान केंद्र क्रमांक

तालुका

मतदान केंद्र असलेल्या हद्दीचे पो.स्टे. चे नाव

मतदान केंद ठिकाण

1

83

हिंगोली

हिंगोलीशहर

तहसिल कार्यालय हिंगोली

2

84

हिंगोली

बासंबा

जिल्हा परिषद प्रशाला, बासंबा

3

85

कळमनुरी

कळमनुरी

तहसिल कार्यालय, कळमनुरी                                री

4

86

कळमनुरी

आखाडाबाळापूर

जिल्हा परिषद प्रशाला,बाळापुर

5

87

कळमनुरी

आखाडाबाळापूर

जिल्हा परिषद प्रशाला डोंगरकडा

6

88

सेनगांव

सेनगांव

जिल्हा  परिषद प्रशाला, सेनगांव

7

89

सेनगांव

गोरेगांव

जिल्हा परिषद प्रशाला,आजेगाव

8

90

वसमत

वसमतशहर

तहसिल कार्यालय वसमत

9

91

वसमत

हट्टा

जिल्हा परिषद प्रशाला, हट्टा

10

92

वसमत

कुरुंदा

जिल्हा परिषद प्रशाला, कुरुंदा

11

93

औंढाना.

औंढाना

तहसिल कार्यालय औंढाना.

12

94

औंढानां.

हट्टा

जिल्हा परिषद प्रशाला, जवळाबाजार

 

वरील मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे असणार नाहीत,  याबाबत प्रतीबंध, परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावेत. तसेच मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे या परिसरात वापरता येणार नाहीत.  निवडणुकीच्‍या कामा व्‍यतिरीक्‍त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामा व्‍यतिरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश  करण्‍याकरीता याद्वारे प्रतिबंध करण्‍यात येत आहे. 

सर्व संबंधितांना नोटीस देवून त्‍यांचे म्‍हणने ऐकुन घेणे सद्य परिस्थितीत शक्‍य नसल्‍याने एकतर्फी आदेश काढणे आवश्‍यक असल्याने  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक -2023 या करीता हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्‍हणुन दिनाक 30 जानेवारी 2023 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान होईपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

26 January, 2023

 





प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ

-- पालकमंत्री अब्दुल सत्तार

 

            हिंगोली(जिमाका), दि.26 : राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज भारतीय संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले .

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी  आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्र. पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,  अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 यावेळी  पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली. आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला, असे सांगितले.

आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सांगण्यास आनंद वाटत असल्याचेही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

            संविधानामुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे आपणांस विदितच आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व असून आपण जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून देशाच्या सर्वा‍गिंण विकासासाठी काम करत आहोत. राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्ती व कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली. तसेच आंतरराष्ट्रीय  पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*****

 




प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

            हिंगोली(जिमाका),दि.26: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविणकुमार धरमकर, तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली. 

*****

 


प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात तंबाखू व ई- सिगारेट मुक्तीची शपथ

 




प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात

तंबाखू व ई- सिगारेट मुक्तीची शपथ

 

हिंगोली,दि.26 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्य तंबाखु  व ई- सिगारेट मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता प्रत्येक शाळामध्ये तसेच शासकीय कार्यालयामध्ये तंबाखू  व ई- सिगारेटच्या मुक्तीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.

येथील जिल्हा माहिती कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त तंबाखू व ई- सिगारेटच्या मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी उपसंपादक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, लिपिक टंकलेखक कैलास लांडगे, शिपाई चंद्रकांत गोधने आदी उपस्थित होते.

000000

25 January, 2023

 

हिंगोली येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा



            हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व आदर्श महाविद्यालयाच्या  संयुक्त विद्यमाने आज दिनांक 25 जानेवारी, 2023 रोजी  राष्ट्रीय  मतदार दिन  उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य विलास आघाव, इतर अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महसूल सहायक अंकुश सोनटक्के यांनी नव मतदारांना मतदार नोंदणी साठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक कोकरे यांनी केले .

            नवमतदारांनी जानेवारी, एप्रिल, जुलै, आक्टोंबर, या माहिन्याच्या 1 तारखेला किंवा त्यांच्या आधी 18 वर्षाचे होणार असाल तर त्या त्या तिमाहीत अर्ज क्र. 6 भरुन मतदार नोंदणी करु शकाल. तसेच मतदार व्होटर हेल्पलाईन ॲपव्दारे मतदार नोंदणी व दुरुस्ती करु शकतील. किंवा  बिएलओ मार्फत गरुडा ॲपव्दारे देखील मतदार नोंदणी किंवा दुरुस्ती करु शकतील. 

            या कार्यक्रमावेळी तहसील कार्यालय, हिंगोली येथे लोकशाहीवर आधारीत रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  नवमतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. आदर्श महाविद्यालय येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच मा. भारत निवडणूक आयोगाडुन प्राप्त झालेल्या लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याबाबतची शपथ घेण्यात आली. यावेळी भारत निवडणूक आयोगाकडुन प्राप्त झालेल्या विशेष संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

या कार्यक्रमास नायब तहसीलदार जि.ए.जिडगे,  श्रीमती ए.वडवळकर,अव्वल कारकून एस.एस.दराडे,  सी.आर.गोळेगावकर, महसूल सहायक टी डी कुबडे व इतर अधिकारी, कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.                                                             

*****