31 October, 2019






राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकता दौड’ संपन्न

            हिंगोली, दि.31: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज 'राष्ट्रीय एकता दौड' व इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त 'राष्ट्रीय संकल्प दिन' म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त अग्रसेन चौक - बसस्टँड - इंदिरा गांधी चौक - महात्मा गांधी चौक पर्यंत राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकता दौडला हिंगोली शहराचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राज्य राखीव बलाचे समादेशक मंचक इप्पर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी हिरवी झेंडी दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला. यावेळी राज्य राखीव बलाचे अतिरिक्त समादेशक आर.बी. जाधव, नायब तहसीलदार एम.जी खंडागळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुकी, क्रीडा अधिकारी संजय बेतेवार, मारोती सोनकांबळे, शारीरिक शिक्षण संघटनेचे रमेश गंगावणे, योग विद्यालयाचे रत्नाकर महाजन, आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी  कलीमोद्दीन फारुकी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  या एकता दौड मध्ये राज्य राखीव बलाचे जवान, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक, खेळाडु, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, पत्रकार बंधू आदी सहभागी झाले होते.
*****


19 October, 2019

कामगार आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना


कामगार आयुक्त कार्यालयात
नियंत्रण कक्षाची स्थापना

हिंगोली,दि.19: विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात नांदेड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लेखापाल वसंत पाटील या कक्षाचे प्रमुख असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9890561687 असा आहे. श्री. उत्तम वडकुते या कक्षात सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 8007901738 असा आहे, असे सहाय्यक कामगार आयुक्त मो. अ. सय्यद यांनी कळवले आहे.
0000

जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू


जिल्ह्यात सर्वत्र
कलम 37 (1) (3) लागू

             हिंगोली,दि.19: कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी हिंगोली शहर आणि पूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) लागू करण्यात आला आहे. हा आदेश 19 ऑक्टोबर 2019 ते दोन नोव्हेंबर 2019 या कालावधीत लागू असेल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळवले आहे.
            विधानसभा निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी, विजयी मिरवणुका निघण्याची शक्यता आणि दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्र, काठी, तलवार, बंदुक बाळगता येणार नाही. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक जन्य बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणिक उपकरणे गोळा करता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक बाळगण्यास मनाई असेल. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील असे असभ्य वर्तन करता येणार नाही. पाच किंवा अधिक व्यक्तींना रस्त्यावर जमता येणार नाही. मात्र शासकीय कामावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी , विवाह अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, परवानगी दिलेले मिरवणूक कार्यक्रमास हे आदेश लागू होणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रम मिरवणुकीस परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000

18 October, 2019

प्रमाणित केल्याशिवाय २०, २१ ऑक्टोबरला जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करू नये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन


प्रमाणित केल्याशिवाय २०, २१ ऑक्टोबरला
जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करू नये
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

हिंगोली, दि 17 :- प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या ४८ तासात; म्हणजेच २०;२१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रचारासंबंधी कोणतीही जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्यासाठी  माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. तशा आशयाच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
राजकीय पक्ष, उमेदवार, सामाजिक संस्था किंवा इतर कुणीही व्यक्ती यांना जर शेवटच्या ४८ तासात उमेदवाराच्या किंवा पक्षाच्या प्रचारासंबंधी जाहिरात प्रसिद्ध करायची असेल तर त्या जाहिरातीमधील मजकूर प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही; असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे, असे श्री. जयवंशी यांनी सांगितले.
मागील काही निवडणुकीमध्ये अपमान करणाऱ्या, अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या  जाहिराती  मतदानाच्या अगोदरच्या दिवशी काही प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा जाहिरातीचा  विपरीत परिणाम निवडणूक प्रक्रियेवर  होतो. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नाही. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या प्रक्षोभक, द्वेषपूर्ण आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे मतदानाच्या दिवशी काही अनुचित  घटना घडू नये म्हणून भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या कलम 324 नुसार अधिकार वापरून आदेश काढले आहेत. या आदेशानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रातून  प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही, असे श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले.
राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत असून त्याअनुषंगाने दिनांक २०  आणि २१ ऑक्टोबर रोजीच्या दैनिकात प्रसिद्धीस दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. जाहिरात प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी किमान 48 तास अगोदर एमसीएमसी समितीकडे अर्ज करावा, असेही श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
*****

मतदानासाठी अकरा कागदपत्रे ग्राह्य छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यावरही मतदान करता येणार


मतदानासाठी अकरा कागदपत्रे ग्राह्य
छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यावरही मतदान करता येणार

            हिंगोली, दि. 17 :  छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करु शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावीत, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी  स्पष्ट केले आहे.
भारत निवडणक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनाचालक परवाना,     केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक/पोस्टाद्वारा वितरित छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉबकार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत देण्यात आलेले हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र आणि खासदार व आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड मतदारांना ओळख पटविण्यासाठी ग्राह्य केली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
            मतदाराचे नाव ज्या ठिकाणी मतदान करीत आहे त्या मतदार यादीत आहे, परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांने वितरित केलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारले जाईल. मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटविणे शक्य नसल्यास अशा मतदारास भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांपैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे, असेही  श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले.

‘ओळखीचा पुरावा म्हणून
मतदार चिठ्ठी ग्राह्य नाही’

मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे. मतदारांकडे आधारकार्डही  असून अन्य अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांना छायाचित्रासह असलेली मतदार चिठ्ठी  ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर ग्राह्य मानली जाणार नाही, असा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह  मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 अतिरिक्त ओळख कागदपत्रापैकी एक कागदपत्र सोबत आणावे.
      प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही श्री.  जयवंशी यांनी  स्पष्ट केले आहे.

*****

आपला नारा....मतदान करा... मतदान जनजागृतीसाठीच्या सायकल रॅलीला हिंगोलीत प्रतिसाद


आपला नारा....मतदान करा...


मतदान जनजागृतीसाठीच्या सायकल रॅलीला हिंगोलीत प्रतिसाद

        हिंगोली, दि. 17 : आपला नारा....मतदान करा.....अशा घोषणांसह  मतदारांत  जागृती करण्यासाठी  आयोजित सायकल रॅलीला आज हिंगोलीत चांगला प्रतिसाद मिळाला.
            रॅलीची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापासून झाली. पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.
            सायकल रॅली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ते  पाण्याची टाकी- जिल्हा न्यायालय-माधव हॉस्पीटल-शिवाजी चौक-पोस्ट ऑफिस-जवाहर रोड-गांधी चौक-कापड गल्ली-दत्त मंदिर-मंगळवारा-पोळा मारुती-हरण चौक-इंदिरा गांधी चौक या मार्गे जाऊन शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी आली. यादरम्यान रॅलीत सहभागी झालेल्या सायकल स्वारांनी नागरिकांशी संवाद साधून मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी मतदान करा....राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा..., आपला नारा...मतदान करा....अशी घोषवाक्ये देण्यात आली.
रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ  झाला.   मतदारांनी येत्या 21 तारखेला मतदानासाठी घराबाहेर पडून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. जयवंशी यांनी केले. याप्रसंगी जिल्हा शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के, मुख्याधिकारी शैलेश फडसे, योगविद्या प्रतिष्ठानचे सुभाष तापडिया, मनमोहन सोनी, रत्नाकर महाजन, दिनशे होकर्णे, ज्ञानेश्वर मुरुळे, रामेश्वर झंवर, हनुमान केडीया, अजय गौड, राधेशाम कुमावत किशोर दोडल आदी सहभागी झाले.
नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश हेबांडे, देविसिंह ठाकूर, बाळू बांगर, रघुनाथ बांगर, माधव घुगे, संदीप घुगे, उत्तम टेमकर, कैलास थिट्टे, सुनील चव्हाण, गजानन बांगर, विनय साहू यांनी नियोजन केले.

15 October, 2019

आयोगांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा - जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या सूक्ष्म निरीक्षकांना सूचना


आयोगांच्या सूचनांचे
काटेकोर पालन करा



जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या सूक्ष्म निरीक्षकांना सूचना

          हिंगोली, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचा अभ्यास करा. त्यानुसार कामकाज करा. कामकाज करताना सूक्ष्म निरीक्षकांनी काटेकोर पालन करा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिलहधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे दिल्या.
            जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील नियुक्त करायच्या सूक्ष्म निरीक्षकांचे आज प्रशिक्षण झाले. त्यावेळी श्री. जयवंशी यांनी या सूचना दिल्या. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षक डॉ. रेणू राज, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर आदी उपस्थित होते.
            सूक्ष्म निरीक्षकांनी मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल काळजीपूर्वक पार पाडायचे आहे. मॉक पोल झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या सुरवात होण्यापूर्वी मॉकपोल न चुकता डिलीट करावा. व्हिव्हिपॅट आणि ईव्हीएम यांची जोडणी करताना काळजी घ्यावी, अशा सूचना श्री. जयवंशी यांनी दिल्या.
            सूक्ष्म निरीक्षकांनी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याबरोबरच विविध प्रकारचे फॉर्म अचूकपणे भरावेत. या फॉर्ममध्ये माहिती भरताना आयोगाच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. शंका असल्यास शंकाचे निरसन करुन घ्यावे,  असे श्री. जयवंशी यांनी सांगितले.
            श्री. नंदकर यांनी सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना आजच मागणी कळवावी, असे सांगितले.
            मतदान आणि मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळावी, अशी काही बॅक अधिकारी-कर्मचारी यांनी मागणी केली. त्यावर निवडणूक कामकाजावर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना दुसऱ्या दिवशी बँक अथवा त्यांच्या कार्यालयात गैरहजर राहण्यासाठी परवानगी देण्याबाबत कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. त्याचबरोबर सूक्ष्म निरीक्षकांचे मानधन रोखीने तात्काळ दिले जाईल, असेही श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले.
*****

वाचनामुळे व्यक्तिमत्व समृध्द : जिल्हाधिकारी


वाचनामुळे व्यक्तिमत्व
समृध्द : जिल्हाधिकारी

          हिंगोली, दि. 15 : दररोज किमान दहा मिनिटे वाचन करा. वाचनामुळे मानवाचे व्यक्तिमत्व समृध्द होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे केले.
            माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आज वाचन प्रेरणा दिन आयोजित केला गेला. जिल्हा प्रशासनातर्फे डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

वाहनांची तपासणी बारकाईने करा खर्च निरीक्षक जुंगीओ यांच्या सूचना





वाहनांची तपासणी
 बारकाईने करा
खर्च निरीक्षक जुंगीओ यांच्या सूचना

          हिंगोली, दि. 14 : मतदानाची तारीख अवघ्या सात दिवसांवर आल्यामुळे वाहनांची तपासणी अधिक बारकाईने करा. संशयास्पद वाहतुकीवर नजर ठेवून तपासणी करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक नानगोथुंग जुंगीओ यांनी आज येथे दिल्या.
            खर्च निरीक्षक जुंगीओ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च विषयक समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळीस त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी खर्च विषयक समितीचे जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. देविदास हिवाळे, संपर्क अधिकारी गणेश वाघ, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदार संघातील खर्च समन्वय अधिकारी आणि भरारी पथकाचे अधिकारी उपस्थित होते.
            खर्च निरीक्षक नानगोथुंग जुंगीओ यांनी सांगितले की, मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसे बेकायदेशीर वाहतूक होण्याची शक्यता आहे. या वाहतूकीव्दारे मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे अथवा वस्तूंची वाहतूक होऊ शकते. त्यामुळे आता संशयास्पद वाहतूकीवर बारकाईने लक्ष ठेवा. त्याचबरोबर वाहनांच्या तपासणीवेळी नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
            फ्लाईंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना श्री. जुंगीओ यांनी समन्वय अधिकारी श्री. हिवाळे यांना केल्या.
*****

07 October, 2019

समन्वयाने अचूक काम करा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सूचना









समन्वयाने अचूक काम करा
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सूचना

      हिंगोली, दि.7: जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी  सर्व नोडल अधिकारी आणि पथके यांनी समन्वयाने अचूक काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे दिल्या.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज नोडल अधिकारी यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी वरील सूचना दिल्या. बैठकीस निवडणूक निरीक्षक डॉ. रेणू राज, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक दिपक कुमार, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर आदी उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी निवडणूक  निरीक्षक डॉ. रेणू राज आणि श्री. दीपक कुमार यांना जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेली विविध पथके आणि त्यांच्या कामकाजाच्या पध्दतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तीनही मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रशिक्षण सुरु आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत.
        जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. नवरात्र उत्सव, दसरा महोत्सव येथे मतदार जनजागृतीचे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या बूथवर जाणीव जागृती केली जावी, यासाठी कला पथकांच्या माध्यमातून मतदार जागृती केली जात आहे, अशी माहिती त्यांनी बैठकीत दिली.
        निवडणूक निरीक्षक डॉ. रेणू राज यांनी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट ची तयार आयोगाच्या निर्देशानुसार करावी. मतदारांना व्होटर स्लिप  वितरीत करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या.
         प्रारंभी सर्व नोडल अधिकारी यांनी निवडणूक निरीक्षकांना परिचय देऊन निवडणूक कालावधीत देण्यात आलेल्या जबाबदारीची थोडक्यात माहिती दिली. बैठकीत उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहायक आयुक्त भाऊसाहेब चव्हाण, कोषागार अधिकारी पी.व्ही. पुंडगे, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक महेश देशमुख, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एम.पी. राऊत आदी उपस्थित होते.
       



06 October, 2019

मतदार जागृती कक्षाचे दसरा महोत्सवात उद्घाटन


मतदार जागृती कक्षाचे



दसरा महोत्सवात उद्घाटन

हिंगोली, दि.5 : येथील रामलीला मैदानावरील दसरा महोत्सवात मतदार जनजागृती कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
 जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते उदघाटन झाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, मुख्याधिकारी शैलेश फडसे, शिक्षणाधिकारी  संदीपकुमार सोनटक्के,  स्वीपचे नोडल अधिकारी  गणेश शिंदे, समाज कल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
 या कक्षातून प्लास्टिक मुक्ती स्वच्छता जाणीव जागृती तसेच मतदार जाणीव जागृती याबाबत संदेश देण्यात येतो.  याठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले असून मी मतदान करणारच आपणही करावे, असे आवाहन करणारा फलक आहे. स्वाक्षरी मोहीमसाठीही ही सोय करण्यात आलेली आहे.  नगरपरिषद हिंगोली व जिल्हास्तरीय स्वीप समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कक्ष दसरा संपेपर्यंत कार्यान्वित असणार आहे, असे श्री. गणेश शिंदे यांनी सांगितले.

कायदा व सुव्यवस्था निरीक्षक दिपक कुमार यांचे हिंगोलीत आगमन


कायदा व सुव्यवस्था  निरीक्षक
दिपक कुमार यांचे हिंगोलीत आगमन

            हिंगोली, दि.5 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली मतदार संघाकरिता भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी दिपक कुमार यांची कायदा व सुव्यवस्था निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
श्री. दिपक कुमार यांचे हिंगोली येथे आगमन झाले आहे. त्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वागत केले. श्री. दिपक कुमार निवडणुकीबाबत नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 10 ते 11 या वेळेत  उपलब्ध असतील त्यांचा संपर्क क्रमांक 7820874073 असा आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी चेरले त्यांचे संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक  9923588115 असा आहे.
*****

आम्ही मतदान करणार… चुनाव पाठशालेत महाविद्यालयीन-युवकांचा निर्धार


आम्ही मतदान करणार…
चुनाव पाठशालेत महाविद्यालयीन-युवकांचा निर्धार




            हिंगोली, दि.5 : आम्ही मतदान करणार, नातेवाईकांनाही करण्याचा आग्रह धरणार, असा निर्धार आदर्श महाविद्यालयातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी आज केला.
            हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आदर्श महाविद्यालयात ‘चुनाव पाठशाला’ आयोजित करण्यात आली होती. या पाठशाळेत विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाणे निर्धार केला.
            या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेष फडसे, स्वीपचे समन्वय अधिकारी प्रा. गणेश शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य बी. डी. वाघमारे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, पशुसंवर्धन अधिकारी प्रवीणकुमार घुले आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, मतदान राज्यघटनेने दिलेला पवित्र अधिकार आहे. तो युवकांनी बजवावा. त्याचबरोबर भाऊ-बहिण, आई-वडील आणि इतर नातेवाईकांनाही मतदान करण्यासाठी आग्रह करा.
            पोलीस अधीक्षक योगेश कुमार म्हणाले,युवकांनी मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट होण्यासाठी योगदान द्यावे.
            श्री. फडसे यांनीही युवकांना मतदान करुन लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
            यावेळी प्रा. गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी युवकांना निवडणूक, लोकशाहीतील महत्व, मतदानाचा अधिकार यांची माहिती दिली. आभार शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी मानले. सूत्रसंचालन दीपक कोकरे यांनी केले. बालाजी काळे, विजय बांगर, मुकुंद पवार, अण्णासाहेब कुटे, अरुण बैस यांनी संयोजन केले.
*****

निवडणूक निरीक्षक डॉ.रेणू राज हिंगोलीत


निवडणूक  निरीक्षक
डॉ.रेणू राज हिंगोलीत

            हिंगोली, दि.5 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनूरी व 94-हिंगोली मतदार संघाकरिता भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. रेणू राज यांची सर्वसाधारण निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
डॉ. रेणू राज यांचे हिंगोली येथे आगमन झाले आहे. त्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी शासकीय विश्रामगृह येथे स्वागत केले. डॉ. रेणू राज निवडणुकीबाबत नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 ते 11 या वेळेत  उपलब्ध असतील त्यांचा संपर्क क्रमांक 8080933619 असा आहे.
कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक रेणुका तम्मलवार त्यांच्या संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक  9373777934 असा आहे.
*****

01 October, 2019

निवडणूक आयोगांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा : फुलारी


निवडणूक आयोगांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा : फुलारी

          हिंगोली, दि. 1 : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना वसमत मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी आज येथे दिल्या.
            वसमत मतदारसंघातील निवडणूक विषयाच्या संदर्भात वसमत तहसील कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत श्री. फुलारी यांनी सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ज्योती पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक साबळे आदि उपस्थित होते.
श्री. फुलारी यांनी साहित्य वितरण व्यवस्था, तपासणी सूची जोडपत्र, मतदान साहित्य तपासणी, व्हीव्हीपॅट, मशीन कसे सुरु करावे. मॉक पोल कसा घ्यावा, नमुना 17-क, अर्ज कसा भरावा याची माहिती दिली.
            विधानसभा मतदारसंघतील जवळा बाजार, शिरड शहापूर, लोहरा बु. बाभुळगाव येथील मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रावर जास्तीत-जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे त्यांनी सांगितले. मतदान अधिकारी क्र. 1, 2, 3 यांची कर्तव्ये, चॅलेंज वोट, टेंडर वोट याची माहिती त्यांनी दिली. दिव्यांगासाठी केलेल्या सुविधेबद्दल त्यांनी सांगितले.  या बैठकीस क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी आदि उपस्थित होते.
*****

मतदाना दिवशी सुट्टी देण्याचे आदेश


मतदाना दिवशी
सुट्टी देण्याचे आदेश

          हिंगोली, दि. 1 : राज्य विधानसभेसाठी येत्या 21 ऑक्टोबर, 2019 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी सुट्टी जाहिर करावी, अशा सूचना राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून देण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
            या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूकीतील मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिनी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक स्थितीत अधिकारी, कामगार, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर त्याएैवजी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पुर्वपरवानगी घ्यावी लागेल.
कामगारांना दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदारांकडून मतदानासाठी सूट्टी अथवा सवलत न मिळाल्यामुळे मतदान करता न आल्याची तक्रार आल्यास संबंधित आस्थापना मालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
*****

कलापथकाच्या कार्यक्रमातून होणार मतदारांची जागृती


कलापथकाच्या कार्यक्रमातून
होणार मतदारांची जागृती


          हिंगोली, दि. 1 : जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातील गावा-गावांत कलापथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जाणार आहे. शाहीर प्रकाश दांडेकर यांच्या पथकाव्दारे हे कार्यक्रम केले जाणार आहेत.
            मतदान प्रक्रियेत जास्तीत-जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शाहीर प्रकाश दांडेकर यांचे पथक जनजागृतीचे काम करणार आहे.
            शाहीर दांडेकर यांच्या पथकाचा आज जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजीव नंदकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीप समितीच्या सदस्य सचिव रेणुका तम्मलवार उपस्थित होते.
            शाहीर दांडेकर यांचे पथक वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघातील विविध गावांत कार्यक्रम घेणार आहेत. ज्या गावात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्या गावात जनजागृती केली जाणार आहे. शाहीर दांडेकर यांच्या पथकात किरण दांडेकर, अशोक केंद्रेकर, विठ्ठल कांबळे यांचा समावेश आहे.
*****

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी माध्यम प्रमाणिकरण समितीची स्थापना


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी
माध्यम प्रमाणिकरण समितीची स्थापना

          हिंगोली, दि. 1 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी MCMC) स्थापना जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.
निवडणूक  कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणाऱ्या सोशल मिडीया, टी.व्ही.चॅनेल, रेडीओ, केबल्स व वर्तमानपत्रातील निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवणे, जाहिरातींना परवानगी देणे,एखादी बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून त्याबाबत योग्य कारवाई करणे आदी कामे समिती  करणार आहे.
समितीमध्ये जिल्‍ह्यातील वसमत मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, कळमनुरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, हिंगोली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे,  स्वतंत्र नागरिक म्हणून प्रा. मदन मार्डीकर सदस्य असून जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत  सदस्य सचिव आहेत.
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज :- टीव्‍ही चॅनेल,  रेडीओ एफएम, आकाशवाणी, प्रचाररथ, सिनेमागृह, सोशल मिडीया तसेच वृत्‍तपत्रांच्‍या इ-आवृत्‍तीतील (जाहिराती)  सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्‍या दृक-श्राव्य (ऑडिओ-व्‍हिज्‍युअल) जाहिरातींसाठी  प्रसारणपूर्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्‍यासाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज (इंग्रजी किंवा  मराठी भाषेतील) दोन प्रतींमध्‍ये आवश्यक माहिती भरुन सादर केला जावा. अर्जासोबत दोन सीडी ( सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्‍या टंकलिखीत मजकुरासह दोन प्रती -  ट्रान्‍सस्‍क्रीप्ट )  जिल्‍हा  माहिती कार्यालय, दुसरा मजला,  मध्‍यवर्ती  प्रशासकीय इमारत,  जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली   ( दूरध्‍वनी क्रमांक : 02456-222635) येथील जिल्‍हास्‍तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्‍या कक्षाशी संपर्क साधावा.
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण समितीकडे फक्त उमेदवारांच्या  जाहिरातीचे प्रमाणिकरण करून दिले जाणार आहे. राजकीय पक्षांच्‍या  जाहिराती  राज्‍यस्‍तरावरील समितीकडून प्रमाणित करुन दिल्‍या जातील. त्‍यासाठी मुंबई येथील समितीशी संपर्क साधावा. हिंगोली जिल्‍ह्यातील विधानसभेचे  उमेदवार अथवा त्‍यांचे प्रतिनिधी(प्राधिकृत असलेले) जिल्‍हा समितीकडे अर्ज सादर करु शकतात. त्याप्रमाणेच फक्‍त उमेदवाराच्‍या वैयक्तिक सोशल मिडीयाच्‍या अकाऊंटवरील पोस्ट, फोटो,  व्हिडीओ यांच्‍यासाठी पुर्व प्रमाणिकरण करुन घेण्याची  गरज नाही.
प्रत्‍येक  ऑडिओ  जाहिरात किंवा ऑडिओ-व्‍हिज्‍युअल जाहिरात  स्‍वतंत्र असावी.  एकाच सीडीमध्‍ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नये. अर्जदाराचे पूर्ण नाव,  पत्‍ता,  जाहिरात कोणत्‍या उमेदवारासाठी आहे  त्‍याचे नाव,  पक्षाचे नाव,  जाहिरात कुठे दाखवणार,  जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च,  जाहिरातीतील भाषा यांचा स्पष्ट उल्‍लेख असला पाहिजे.
मान्‍यताप्राप्त राजकीय  पक्षाचे उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी तीन  दिवस  आणि  इतर उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी सात  दिवस आगोदर अर्ज करु शकतात. सीडीमधील मजकूर प्रसारण योग्‍य असावा. इतरांची  बदनामी  करणारा, जाती-जातींमध्‍ये,  धार्मिक  तेढ निर्माण  करणारा नसावा. देशविघातक कृत्‍याला  प्रोत्‍साहन देणारा  नसावा. तसेच मुद्रीत माध्‍यमातील  (प्रिंट मिडीया) जाहिराती  मतदानाच्‍या दिवशी  किंवा  मतदानाच्‍या एक दिवस अगोदर प्रकाशित  करावयाची  असल्‍यास जिल्‍हास्‍तरीय  समितीचे  प्रमाणपत्र  अनिवार्य  आहे.
*****