27 July, 2017

गोळीबार सरावासाठी मैदान ( फायर बट ) ची उपलब्धता

        हिंगोली, दि. 27 : पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी जिल्ह्यातील आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन 2017-18 चा वार्षिक गोळीबार सराव दिनांक 22 ते 31 जुलै, 2017 या कालावधीत घेण्याचे आयोजित केलेले आहे. तरी गोळीबार सरावासाठीचे मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी आलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करीत आहे, सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सुचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                            ***** 
भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

हिंगोली, दि. 27 : भारतीय डाक विभागामार्फत महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून या वर्षी ढाई आखर अखिल भारतीय पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेसाठीचा विषय हा प्रिय बापू (महात्मा गांधी) तुम्ही मला प्रेरित करीत आहात Dear Bapu (Mahatma Gandhi) you inspire me.. असा आहे. पत्र इंग्रजी, हिंदी, स्थानिक भाषेतून मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई महाराष्ट्र यांना दि. 15 ऑगस्ट, 2017 रोजीपर्यंत मिळतील, अशा पध्दतीने पाठवायचे आहे.
पत्र ए-4 आकाराच्या कागदावर लिहू शकतात. ते 1 हजार शब्दांपेक्षा जास्त नसावे. तसेच इनलॅण्ड लेटर कार्ड (Inland letter card) वरही हे पत्र लिहू शकतात. त्यासाठी शब्द मर्यादा 500 एवढी आहे. इम्बॉस इनव्हलप आणि Inland letter card हेच वापरण्यासाठी परवानगी असेल. ही स्पर्धा सर्वांसाठी असेल. तसेच वयोमर्यादेचे कुठलेही बंधन नाही. ज्या व्यक्तीने पत्र लिहले असेल त्यांनी स्वत: नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खास या पत्रलेखनासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रपेटीत टाकावे किंवा संबंधित पोस्टमास्तर यांच्याकडे सोपवावे.
पत्रलेखन स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे श्रेणी असतील. त्यात अ) वय वर्षे 18 पर्यंत 1) Inland letter card, 2) Envelope. ब) 18 वर्षांवरील 1) Inland letter card, 2) Envelope. प्रत्येक पोस्टल सर्कलमधून प्रत्येक श्रेणीचे 3 सर्वोत्कृष्ट पत्र निवडले जातील आणि डाक निदेश कार्यालय, नवी दिल्ली यांना पाठविण्यात येतील. यापैकी प्रत्येक श्रेणीतून 3 सर्वोत्कृष्ट पत्र निवडले जातील आणि साबरमती आश्रमात पाठविण्यात येतील. निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट पत्र लेखकांना 2 ऑक्टोबर, 2017 रोजी साबरमती आश्रम येथे सन्मानित करण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या लेखकांना मान म्हणून पोस्टाचे आश्रयदाता ही पदवी देण्यात येईल. तसेच बक्षिसपात्र पत्रे मुख्य वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात येतील.
राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसांची रक्कम ही पुढीलप्रमाणे अ) प्रत्येक श्रेणीमधील प्रथम पारितोषिक आणि रु. 50 हजार (पोस्टाचे आश्रयदाता), ब) प्रत्येक श्रेणीमधील द्वितीय पारितोषिक आणि रु. 25 हजार (पोस्टाचे सोबती), क) प्रत्येक श्रेणीमधील तृतीय पारितोषिक आणि रु. 10 हजार पोस्टाचे मित्र). प्रत्येक सर्कल (राज्य) स्तरावरील बक्षिसाची रक्कम ही पुढील आहे. अ) प्रत्येक श्रेणीमधील प्रथम पारितोषिक आणि रु. 25 हजार, ब) प्रत्येक श्रेणीमधील द्वितीय पारितोषिक रु. 10 हजार आणि क) प्रत्येक श्रेणीमधील तृतीय पारितोषिक रु. 5 हजार. तरी सर्व इच्छूक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे तसेच सविस्तर माहितीकरिता जवळील डाकघरशी संपर्क साधावा किंवा www.indiapost.gov.in वर लॉग ऑन करण्याचे आवाहन परभणी विभागाचे डाकघर अधीक्षक मनोहर पत्तार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

26 July, 2017

पावसाळ्यात उद्भवणारे आजार व त्यावरील उपाययोजना
            पावसात भिजणे सर्वांना आवडते, या दिवसाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण बाहेर फिरायला किंवा सहलींचे नियोजन करतात. पण या ऋतूचा आनंद घेण्याच्या नादात अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. जिल्हयात साथरोग पसरु नये म्हणून आरोग्य खात्याने पावसाळयापुर्वी उपाययोजना केली असून साथरोग नियंत्रण कृती नियोजन तयार करण्यात आले आहे. या कृती योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
            राज्यात जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होत असते आणि त्याप्रमाणे यावेळीही पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसाळा सुरु झाला की, मोठ्या प्रमाणात जिवोत्पत्तीची पैदास होत असते. पावसाळ्यात जिकडे तिकडे पाणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. गावातील, शहरातील नाल्या तुडूंब भरून वाहतात. हे दुषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास यापासून जलजन्य साथीचे रोग निर्माण होतात. पावसाचे वाहणारे पाणी आड, विहीर, हातपंप, विंधन विहिरींचे पाणी दुषित करते. हे दूषित पाणी जनतेच्या पिण्यात आल्यामुळे जलजन्य साथ रोग उद्भवतात. त्यात ग्रॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, काविळ, विषमज्वर या साधीच्या रोगांचा समावेश अहे.
            या साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बाहेरील दूषित पाणी ज्या ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते, त्या ठिकाणी जाणार नाही यासाठी नळ योजनेतील नळ गळत्या, वॉल गळत्या दुरुस्त करणे, आड, विहीरीचे कठडे बांधून देणे, हातपंप, विंधन विहीर परिसर 50 फुटापर्यंत स्वच्छ ठेवणे, सांडपाणी वाहते ठेवणे, त्याचे कठडे फुटले असतील तर दुरुस्त करणे ही काळजी पावसाळयापुर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मग ते नगरपालिका असो किंवा ग्रामपंचायतीने करणे आवश्यक असते. पाण्यामध्ये दररोज ब्लिचिंग पावडर टाकून शुध्दीकरण करावे तसेच हातपंप, विंधन विहीरींचे शुध्दीकरण दर सहा महिन्याला करणे आवश्यक आहे.
            याबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व पावसाळ्यातील आजारापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी आप-आपल्या परीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या दिवसात गुरांचे गोठे, शेणखताचे खड्डे येथे मॅलॅथिऑन पावडर टाकावी. घराच्या आजूबाजुच्या परिसरातील नाल्या, गटारात पाणी साचू न देणे, शिर्ष खड्याद्वारे पाण्याचा निचरा करणे, घर, परिसर तसेच गुरांचा गोठा स्वच्छ ठेवणे, घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, घरातील अडगळी, भिंतीच्या भेगा बुजविणे, शेणाचे खड्डे वस्तीपासून दुर ठेवणे, डास व किटकापासून बचाव करण्यासाठी झोपतांना मच्छरदाणीचा वापर करणे या प्रकारच्या दक्षता रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये घ्याव्यात.
            जलजन्य आजारात प्राधान्याने होणारे आजार म्हणजे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण या आजारामध्ये शरीरातील पाणी जीवनावश्यक घटकातून मोठया प्रमाणात शरीराबाहेर उलटी व संडासद्वारे निघून गेल्यामुळे शरीरात तिव्र स्वरुपाची जलशुष्कता निर्माण होते व प्रसंगी मृत्यू देखील ओढवतो. त्यामुळे रोगीला वेळेवर उपचार करण्यासाठी दवाखान्यात न्यावे किंवा प्रथम ओ.आर.एस. पावडर सोल्यूशन अथवा जलसंजीवनीचा वापर मोठया प्रमाणात व आवश्यकतेनुसार करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात कुठलेही पाणी पिणे, उघड्यावरचे पदार्थ खाणे, सडकी फळे व शिळे अन्न खाणे हे नागरिकांनी टाळले पाहिजे असा डॉक्टरांचा सल्ला आहे. तसेच शुध्दीकरण केलेलेच पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुले व एक वर्षाच्या आतील व वृध्द रुग्णांना उकळलेले पाणी पिण्यास देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.      
             जिल्ह्यात साथरोग पसरु नये म्हणून आरोग्य खात्याने पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केली असून साथरोग नियंत्रण कृती नियोजन तयार करण्यात आले आहे. या कृती योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
            याबरोबरच जलजन्य रोग उद्भवू नये म्हणून सर्व ग्रामपंचायत व गाव स्तरावर ब्लीचींग पावडर उपलब्ध करण्यात आले असून नियमीत पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांच्या कक्षात औषधीचा एपीडेमीक कीट तयार ठेवण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याच्या सक्त सूचना जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्या आहेत. पावसाळयात गावातील प्रत्येक उद्भवनाचे पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत. अशा प्रकारची तपासणी इतर कालावधीतही गावातील उद्भवनाचे पाणी तपासण्यात येते. गावात अतिसार, हगवण, कॉलरा, गॅस्ट्रो या रुग्णांचे शौच नमुने तपासण्याचे व ग्रामपंचायतीतील ब्लिचिंग पावडर दर तीन महिन्यांनी तपासण्याची कार्यवाही ही नियमीतपणे करण्यात येत आहे.
                                                                                                                     ---  अरुण सुर्यवंशी
                                                                             जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                         हिंगोली


*****  
जिल्ह्यात किड रोग नियंत्रणासाठी क्रॉपसॅप प्रकल्प
            हिंगोली, दि. 26 : पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प 2017-18 सोयाबीन, कापूस, तुर व रब्बीमध्ये हरभरा या महत्वाच्या पिकावर वारंवार तसेच आकस्मिकरित्या उद्भवणाऱ्या किडरोगामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान त्यामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेऊन क्रॉपसॅप प्रकल्प राबविला जात आहे. आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी पध्दतीने निविदा प्रक्रीयेव्दारे एम. डी. एस फॅसिलीटीज, अमरावती यांनी किड सर्वेक्षक म्हणून 22 पद भरले असून त्यांचे सनियंत्रण करण्यासाठी उपविभाग स्तरावर कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक बोथीकर के. एच. व खंदारे एम. पी. यांची नियुक्ती आहे.
            या प्रकल्पांतर्गत  शेतकऱ्यामध्ये किड रोगाची ओळख निर्माण करणे त्यांना प्रशिक्षीत करुन किड रोगाचे वेळीचे व्यवस्थापन करणे. किड रोगाच्या प्रादुर्भावाबाबत जागरुकता निर्माण करणे व पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे. किड रोगाच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळणे. वारंवार येणाऱ्या किड रोगाबाबत सांख्यिकी माहिती संकलित करून व कायम स्वरूपाच्या व्यवस्थापनाबाबत कृषि विद्यापीठाच्या सहाय्याने शिफारशी निश्चित करणे.
            वरीलप्रमाणे कार्ये करण्यासाठी पुर्वी उपविभाग स्तरावर संगणक प्रचालक हे पद होते परंतू 2016-17 मध्ये संगणक प्रचालक हे पद वगळण्यात आले आहे. त्यामुळे सदरील प्रकल्पाचे शेतकऱ्याना एसएमएस व्दारे देण्यात येणारे पिक संरक्षण सल्ले व इतर कामे मा.प्र.अ., पाक्षिक अहवाल उपस्थिती अहवाल देण्यासाठी अडचणी येणार आहेत.
किड सर्वेक्षक यांना स्मार्ट मोबाईल फोन असणे बंधनकारक असून मोबाईल व्दारे एनआयसी पुणे यांचे संकेत स्थळावर ऑनलाईन अहवाल नोंदणी डाटा एन्ट्री सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, दरदिवशी चार फिक्स व चार रॅडम प्लॉट प्रमाणे 5 दिवस काम करण्यात येणार आहे. पहिल्या 3 दिवसाच्या अहवालावर गुरूवारी अडव्हायजरी तसेच गुरूवार शुक्रवारच्या अहवालावर सोमवारी ॲडव्हायजरी येईल ती तालूका कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत ॲडव्हायजरीच्या जम्बो झेरॉक्स करून गावातील वार्ताफलकावर लावण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
            किटकनाशकाचा व रसायनाचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी तसेच किड रोगामुळे पिकाचे होणारे नूकसानीची पातळी ओलांडताच शेतकऱ्यानी कृषि विभागामार्फत प्रसारित होणाऱ्या संदेशानुसार वेळीच व योग्य पध्दतीने उपाययोजना करून किड नाशकाचा वापर करावा व होणारे नुकसान टाळून पिकाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे व उपविभागीय कृषि अधिकारी यु. जी. शिवणगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****  
जिल्हा नियोजन समितीची सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिध्द
हिंगोली, दि. 26 : जिल्हा नियोजन समितीवर निवडणूकीने निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य, नगर पालिका सदस्य आणि नगरपंचायत सदस्यांची मतदार यादी दि. 18 जुलै, 2017 रोजीपासून पुढील आदेशापर्यंत अंतिम करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगर पालिका व नगर पंचायत सदस्यांची यादी सर्व तहसिल, नगर पालिका, नगर पंचायत व पंचायत समितीमध्ये डकविण्यात आली आहे.
*****


सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी कार्यशाळेचे आयोजन
            हिंगोली, दि. 26 : सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे सन 2015-16 या शैक्षणिक वर्षाचे ऑनलाईन भरावयाचे शिल्लक राहिलेले अर्ज व सन 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन व जुने अर्जाचे नुतनीकरण दि. 25 जुलै, 2017 नंतर ऑनलाईन पध्दतीने सादर करता येणार नाहीत.
            सन 2015-16 व 2016-17 मधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन करणे शक्य झाले नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती इ.सी.एस. विवरणपत्रानुसार व ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे प्रपत्र ब नुसार यादी गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत प्रमाणित करून तालुका निहाय कार्यशाळेस सर्व मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहुन सर्व माहिती प्रकल्प कार्यालयात सादर करावी. सदरील यादी आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याने विलंब टाळावा व या बाबत हिंगोली जिल्ह्यातील सर्व निमशासकीय, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेतील मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची वर्षनिहाय माहिती भरणे अनिवार्य आहे.
पुढीलप्रमाणे तालुकानिहाय मुख्याध्यापक यांनी दि. 4 ऑगस्ट, 2017 सेनगाव, दि. 5 ऑगस्ट, 2017 वसमत, दि. 7 ऑगस्ट, 2017 हिंगोली, दि. 8 ऑगस्ट, 2017 औंढा नागनाथ आणि दि. 9 ऑगस्ट, 2017 कळमनुरी येथील प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली येथे कार्यशाळेच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

24 July, 2017

अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याव्दारे सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी युवक कल्याण विषयक कार्यक्रमाअंतर्गत समाजसेवा शिबीर व स्वयं रोजगार शिबीर (सर्वसाधारण / विशेष घटक), क्रीडांगण विकास योजना (सर्वसाधारण/विशेष घटक/आदिवासी), व्यायामशाळा अनुदान (विशेष घटक/आदिवासी)  योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था, नोंदणीकृत क्रीडा मंडळे, युवा मंडळे, सेवाभावी संस्था, महिला मंडळे यांचेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर योजनेचे विहित अर्ज क्रीडा निधी शुल्क भरुन दि. 25 जुलै ते 2 ऑगस्ट  2017 या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. सदर योजनेअंतर्गत परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम   दिनांक 04 ऑगस्ट 2017 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयास सादर करुन विहित अर्ज प्राप्त करावेत व परिपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास दि. 04 ऑगस्ट 2017 पर्यंत सादर करावेत. अपुर्ण प्रस्ताव व  विहित मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तरी अधिक माहितीसाठी संबंधितांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

21 July, 2017

जिल्ह्यागत 24 तासात सरासरी 5.46 मि.मी. पाऊस
          हिंगोली, दि. 21 :  जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 21 जुलै, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 27.29 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  5.46  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 269.40 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 30.26 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  शुक्रवार दि. 21 जुलै, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 2.43 (336.42), वसमत - 16.86 (229.67), कळमनुरी - 0.00 (168.51), औंढा नागनाथ - 3.50  (297.65) , सेनगांव - 4.50 (314.77). आज  अखेर  पावसाची सरासरी 269.40 नोंद झाली.

*****  
भारत सरकार व सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती 2016-17 साठी मुदतवाढ
हिंगोली, दि. 21 : हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानीत महाविद्यालय तसेच शाळेतील प्राचाय / मुख्याध्यापक / विद्यार्थ्यांनी ई-ट्रायबल (www.etribal.gov.in) संकेतस्थळावर भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे / सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे करिता दि. 25 जुलै, 2017 अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानंतर भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीप / सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास सर्व जबाबदारी महाविद्यालयाची राहिल. सदरील कार्यवाहीबाबत सर्व महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****


20 July, 2017

जिल्ह्यागत 24 तासात सरासरी 11.41 मि.मी. पाऊस
          हिंगोली, दि. 20 :  जिल्ह्यात गुरूवार दिनांक 20 जुलै, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 57.04 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  11.41  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 263.95 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 29.65 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  गुरूवार दि. 20 जुलै, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 12.29 (333.99), वसमत - 15.00 (112.81), कळमनुरी - 2.33 (168.51), औंढा नागनाथ - 6.25  (294.15) , सेनगांव - 21.17 (310.27). आज  अखेर  पावसाची सरासरी 263.95 नोंद झाली.

*****  
अनुसूचित जातीच्या प्रवर्गाकरिता फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण
हिंगोली, दि. 20 : स्थानिक कळमनुरी व कळमनुरी तालुक्यातील येथे अनुसूचित जाती (एस. सी.) प्रवर्गाकरिता विशेष घटक योजनेतंर्गत फॅशन डिझाईन वर आधारित एक महिना कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी) हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमात फॅशन डिझाईन नियोजन कसे करावे, पिनो, ए लाईल पॅटर्न, फ्रॉक, ब्लाऊज, परकर, सलवार सुट विविध प्रकारचे या अनेक तांत्रिक प्रात्यक्षिक रित्या प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, आदिबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महिला व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, शिक्षण सुरू नसावे. जातीचे प्रमाणपत्र नॅशनल बँकेचे पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 24 जुलै, 2017 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक विकास उंडाळ मो. 8412089272 एमसीईडी व्दारा एस-12, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा. या कार्यक्रमाच्या मुलाखती दि. 25 जुलै, 2017 रोजी सकाळी 12.00 वाजता आयोजित करण्यात आले आहेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी) चे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 
नोंदणीकृत युवा/क्रीडा/महिला मंडळांनी संस्था संलग्नीत करण्यासाठी अर्ज करावेत
हिंगोली, दि. 20 : नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून 18 ते 29 वयोगटातील ग्रामीण युवकांसाठी कार्य करते आणि कार्यक्रम राबविले जातात, त्यांची उद्दिष्ट म्हणजे युवकांचा शारीरिक, मानसिक, नैतिक व बौध्दीक विकास करणे, युवकांमध्ये सामाजिक प्रश्नांबद्दल जागृती करणे व सामाजिक कुप्रथांच्या विरोधात लढण्याकरीता त्यांना तयार करणे, स्वीकृत राष्ट्रीय मुल्यांबाबत युवकांमध्ये अभिमानाच्या भावनेची निर्मिती राष्ट्रीय एकात्मकता, पर्यावरण, सांस्कृतिक वारसा, इत्यादीबाबत जाणिवेचा विकास, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास इत्यादी उद्देशपूर्तीच्या दृष्टीने नेहरु युवा केंद्रामार्फत कार्यक्रम घेतले जातात. तरी या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी वर्ष 2016-17 मध्ये जिल्ह्यातील नोंदणीकृत युवा मंडळ / क्रीडा मंडळ / महिला मंडळ यांनी नेहरु युवा केंद्र, हिंगोली दिपक ज्योती मेडीकल एजन्सीच्या वर दुसरा मजला, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली या कार्यालयाशी संपर्क साधुन विहीत नमुन्यातील अर्ज सादर करून आपल्या संस्था संलग्नीत करून घ्याव्यात. संलग्नीत 10 युवा मंडळ/क्रीडा मंडळ यांना क्रीडा साहीत्याचे वितरण करण्यात येईल.

***** 
ऑगस्ट महिन्यासाठी 273.09 क्विंटलचे साखर नियतन मंजुर
हिंगोली, दि. 20 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय कुटूंबांना प्रति शिधापत्रिकाधारकांसाठी माहे ऑगस्ट - 2017 या महिन्याकरीता  साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  हिंगोली  यांनी कळविले आहे
या नियतनानुसार प्रती  शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. त्यानुसार तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 73.09, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 35, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 58, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 57, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 50 असे एकूण 273.09 क्विंटल साखरेचे नियतन मंजुर करण्यात आले आहे. सर्व बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांनी केले आहे.

                                                                        ***** 

19 July, 2017

जिल्ह्यागत 24 तासात सरासरी 4.82 मि.मी. पाऊस
          हिंगोली, दि. 19 :  जिल्ह्यात बुधवार दिनांक 19 जुलै, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 24.09 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  4.82  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 252.54 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 28.36 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  बुधवार दि. 19 जुलै, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 7.57 (321.70), वसमत - 1.85 (197.81), कळमनुरी - 3.50 (166.18), औंढा नागनाथ - 5.00  (287.90) , सेनगांव - 6.17 (289.10). आज  अखेर  पावसाची सरासरी 252.54 नोंद झाली.

*****