21 December, 2019

विविध योजनेअंतर्गत नवीन विहिर, जुनी विहीर दुरुस्ती व इतर बाबींच्या लाभाथींची निवड 23 डिसेंबर रोजी सोडत पध्दतीने होणार


विविध योजनेअंतर्गत नवीन विहिर, जुनी विहीर दुरुस्ती व इतर बाबींच्या लाभाथींची
निवड 23 डिसेंबर रोजी सोडत पध्दतीने होणार


             हिंगोली,दि.21: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहिर, जुनी विहीर दुरुस्ती व इतर बाबींच्या लाभार्थ्यांची निवड अति. मुख्य कार्यकारी अधिकारी,कृषि पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय समितीचे सभापती व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी षटकोनी सभागृह, जिल्हा परिषद, हिंगोली येथे सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात नवीन विहिरींसाठी 311, जुनी विहिर दुरुस्तीसाठी 52, इतर बाबींचे 96 व राष्ट्रीय कृषि कार्यक्रमा अंतर्गत नवीन विहिरीचे 47, तर बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या पात्र प्रस्तावामधून नवीन विहिरींचे 57, जुनी विहिर दुरुस्ती 11 व इतर बाब 20 अशा लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी कळविले आहे.
00000

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 24 डिसेंबर रोजी आयोजन


जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 24 डिसेंबर रोजी आयोजन



             हिंगोली,दि.21 :- येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याद्वारे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 24 डिसेंबर 2019 रोजी नागनाथ महाविद्यालय, औंढा नागनाथ येथे घेण्यात येणार आहे.
            या युवक महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (इंग्रजी/ हिंदी), शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी), शास्त्रीय नृत्य, सितार, बासरी, तबला, वीणा, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गिटार मणिपूरी नृत्य, ओडिसी नृत्य, भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी नृत्य, वक्तृत्व याबाबींचा समावेश असून यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयाच्या संघांनी भाग घ्यावा . शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्या प्रवेशिका दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकूल परिसर, लिंबाळा जि. हिंगोली येथे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलिमओद्दीन फारुखी यांनी केले आहे.
00000

19 December, 2019



दिव्यांगांना मोफत साहित्य वाटपासाठी तपासणी शिबीराचे आयोजन
·        पुर्वतयारी बैठक संपन्न  
            हिंगोली,दि.19: सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या एडीप (ADIP)  या योजनेंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ॲलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र हिंगोली व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व साह्यभूत साधने वाटप करण्यासाठी पहिल्या टप्यामध्ये तालुका निहाय तपासणी व मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यासाठीची पुर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल) गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, शिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (ॲलिम्को) कानपूरचे विभागीय अधिकारी संजय मंडल, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक विष्णू वैरागड, दिलीप बांगर, शेषरावजी कावरखे यांच्यासह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी  यांची प्रमुख उपस्थिती होती.
             यावेळी  जिल्हाधिकारी  जगदिश मिनियार यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामीण रुग्णालय सेनगांव येथे दिनांक 29 डिसेंबर 2019 रोजी, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे दिनाक 30 डिसेंबर 2019 रोजी, उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी, नागनाथ महाविद्यालय, औंढा नागनाथ येथे दिनांक 01 जानेवारी 2020 रोजी तर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अधिपरिचारीका महाविद्यालयातील सभागृहात हिंगोली येथे दिनांक 02 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी श्री. मिनियार यावेळी म्हणाले की, सर्व वयोगटातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबिरात तीन चाकी सायकल, मोटाराईज ट्रायसायकल  व्हिलचेअर, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या, अंधांना ब्रेल किट, वय वर्ष 14 ते 26 या वयोगटातील महाविद्यालयीन अंध युवकांसाठी स्मार्ट केन, स्मार्ट फोन, कर्नबधीर दिव्यांगांना डिजीटल श्रवणयंत्र आणि मतिमंद वय वर्ष 05 ते 18 वयोगटातील दिव्यांगांना एम.आर. कीट व गरज असल्यास व्हिलचेअर इत्यादी साहित्य वाटपासाठी तालुका निहाय मोजमाप व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
            या शिबीराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्रत, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड व एक पासपोर्ट आकाराचा फोटो हे आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. बैठकीचे प्रास्ताविक  जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक विष्णू वैरागड यांनी केले.  यावेळी संबंधीत विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

*****

18 December, 2019




अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात संपन्न
                                                                                   
            हिंगोली,दि.18: संयुक्त राज्य संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला होता. त्याकरीता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. तसेच अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी याकरीता अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
            त्याअनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, शिक्षणाधिकारी (प्राथ.) संदिपकुमार सोनटक्के,  कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार, खुदाबक्ष तडवी, असद पठाण, नजीर अहेमद शेख, मंजीतसिंग अलग, यांची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांनी अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजना यामध्ये  अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आत्याधुनिकीरण योजना,  अल्पसंख्यांक शासनमान्य खाजगी शाळांना पायाभूत सुविधा, मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ आदि योजनांची माहिती देवून अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर यांनीही जिल्ह्यात अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.  श्री. इरशाद पठाण यांनीही  अल्पसंख्यांक विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर मठपती यांनी केले.  यावेळी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक, मार्गदर्शक आणि अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****

10 December, 2019

12 डिसेंबर रोजी डी.पी.सी. सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन शुभारंभ


12 डिसेंबर रोजी डी.पी.सी. सभागृह येथे
सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन शुभारंभ


             हिंगोली,दि.10 :- 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता डी.पी.सी. सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक, विधवा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000

09 December, 2019

सेवानिवृत्तीच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल करण्याबाबत अंतिम सूचना


सेवानिवृत्तीच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल करण्याबाबत अंतिम सूचना


             हिंगोली,दि.9 :- सेवानिवृत्त ग्रामसेवक बी.बी. पवार (मु.पो. पळसोना, ता.जि. हिंगोली) हे दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. गट विकास अधिकारी वर्ग-1, पंचायत समिती, कळमनुरी यांच्यामार्फत वारंवार लेखी पत्रव्यवहार करुनही अद्यापपर्यंत बी.बी. पवार यांनी सेवानिवृत्ती पूर्वी सहा महिने पूर्व सेवानिवृत्ती प्रस्ताव दाखल केला नाही. श्री. पवार यांनी सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्याबाबत संबंधित कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावा, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

07 December, 2019

ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन


ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.7 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकत्ता  यांच्या असमान निधी योजनेअंतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात.त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध्‍ आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी  अर्जाचा नमुना सदर संकेतस्थळावर उपलब्ध्‍ करुन घ्यावा.
सन 2019-20 साठीच्या असमान निधी योजना (Non Matching scemes) पुढील प्रमाणे आहे.
ग्रंथालय सेवा देणा-या स्वयंमसेवी संस्थांना ग्रंथ,साधन सामग्री,फर्निचर,इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य,"राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य,महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य,राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र,कार्यशाळा,प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य,बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.
या योजनांसाठी करावयाचा अर्ज : वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in  हे संकेतस्थ्ळ पहावे.आवश्कता असल्यास संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क  साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने  व मुदतीत आवश्यक कागदपत्रासह  इंग्रंजी/हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत,असे आवाहन ग्रंथालय संचालक,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगर भवन,मुंबई यांनी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे. 00000

बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियमात नवीन तरतुदींचा समावेश


बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियमात नवीन तरतुदींचा समावेश


             हिंगोली,दि.7 :- केंद्र शासनाने बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियम 2012 (POCSO AcT ) मध्ये सुधारणा केल्या असून बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध (सुधारीत) अधिनियम 2019 अधिसूचित करण्यात आला आहे. सदर अधिनियम दिनांक 6 ऑगस्ट 2019 पासून लागू करण्यात आला आहे. बालकांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर अपराधांना प्रतिबंध व्हावा, यासाठी सुधारीत अधिनियमात नवीन तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत-बाल लैंगिक शोषणात सहभागी असणाऱ्या आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा, ज्यामध्ये जन्मठेपेसारख्या शिक्षेचा समावेश , Aggravated Penetrative sexual Assault  सारख्या अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद, बाल लैंगिक शोषणासंबंधित प्रकरणांच्या तपासणी दरम्यान बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियम व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियमातील  तरतुदींचे काटेकोर पालन करणे, अधिनियमात नमूद बाल स्नेही तरतुदींची काळजीपूर्वक अंमलबजावणी करणे ज्यामध्ये बालकांना समजेल अशी व सोपी भाषा वापरणे आवश्यकतेनुसार दुभाष्याची मदत घेणे इत्यादी, बालकाचा जबाब घेताना शक्यतो बालकांच्या घरी किंवा बालकास योग्य वाटेल अशा ठिकाणी उप निरीक्षक पेक्षा कमी नाही अशा दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे, बालकाचा आरोपीशी कोणताही प्रकारचा संपर्क येणार नाही याची दक्षता घेणे, लैंगिक शोषणातील पिडीत बालकांसंबंधित माहिती प्राप्त होताच अशा पिडीत बालकास 24 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करणे, तरी बाल लैंगिक शोषण प्रतिबंध अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी व व्यापक प्रसिध्दी होणे आवश्यक आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
00000

06 December, 2019

शासकीय कापूस खरेदीचा दिनांक 9 डिसेंबर रोजी शुभारंभ


शासकीय कापूस खरेदीचा दिनांक 9 डिसेंबर रोजी  शुभारंभ

             हिंगोली,दि.6 :- हंगाम 2019-20 मधील परभणी विभागातील शासकीय कापूस खरेदी सीसीआय चे सबएजंट म्हणून कापूस पणन महासंघातर्फे हिंगोली येथे सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता केंद्र शासनाच्या किंमत आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीचा शुभारंभ करण्याचे योजिले आहे.
            यावर्षी कापूस खरेदी केल्यावर शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आरटीजीएस/ एनईएफटी ने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे चालू हंगामातील कापूस पेऱ्याची अद्ययावत नोंद असलेला 7/12 उतारा, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचे आईएफएससी कोड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व शेतकऱ्यांचा बँकेशी संलग्न (लिंक) केलेला मोबाईल नंबर व ई-दस्ताऐवज सोबत आणावेत.
            वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार यांचे परिपत्रकानुसार शासकीय कापूस खरेदी केंद्रावर फक्त FAQ  दर्जाचाच कापूस स्विकारण्यात येणार आहे. FAQ दर्जाच्या कापसाला रुई धाग्याची लांबी, तलमता व आर्द्रता यानुसार भाव देण्यात येणार आहे. 12%  च्या वर आर्द्रता असलेला कापूस केंद्रावर स्विकारला जाणार नाही.
            शेतकरी बांधनानी जास्तीत जास्त कापूस शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा, असे आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट व विभागीय व्यवस्थापक ए.डी. रेणके यांनी केले आहे.
00000

05 December, 2019

जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू


जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू

             हिंगोली,दि.5: कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी हिंगोली शहर आणि पूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) लागू करण्यात आला आहे. हा आदेश 6 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत लागू असेल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळवले आहे.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, मुस्लिम समाजातर्फे  बाबरी मस्जीद पतन दिन म्हणून जिल्हयात काळा दिवस पाळण्यात येतो, श्री. दत्त जयंती, महानुभव पंथीय सत्संग सोहळा व संत संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्र, काठी, तलवार, बंदुक बाळगता येणार नाही. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक जन्य बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणिक उपकरणे गोळा करता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक बाळगण्यास मनाई असेल. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील असे असभ्य वर्तन करता येणार नाही. पाच किंवा अधिक व्यक्तींना रस्त्यावर जमता येणार नाही. मात्र शासकीय कामावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी , विवाह अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, परवानगी दिलेले मिरवणूक कार्यक्रमास हे आदेश लागू होणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रम मिरवणुकीस परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****


03 December, 2019

संत श्री जगनाडे महाराज यांची 8 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्याचे आवाहन


संत श्री जगनाडे महाराज यांची 8 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्याचे आवाहन


हिंगोली,दि.3: महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती यावर्षी पासून प्रथमच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये संत श्री जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबर रोजी साजरी करण्यात यावी. असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

****


परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन


परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

हिंगोली,दि.3: सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 4  ते 13 जानेवारी, 2020 या कालावधीत सोल्जर (जनरल ड्युटी), सोल्जर टेक्निकल व सोल्जर ट्रेड्समन या पदासाठी परभणी येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. 19 डिसेंबर, 2019 पर्यंत आपली नोंद करावी.  तसेच दि. 20 डिसेंबर ते दि. 2 जानेवारी, 2020 पर्यत भरती करीता ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले .

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2020 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2020 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

हिंगोली,दि.3: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये  होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची मुख्य परीक्षा शनिवार पासून 3 दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार आहे. उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे.
राज्यसेवा परीक्षा 2020 साठीची जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा दि. 5 एप्रिल, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि. 8 ऑगस्ट ते सोमवार दि. 10 ऑगस्ट, 2020 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 1 मार्च रोजी तर मुख्य परीक्षा दि. 14 जून, 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020 साठी जानेवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा दि. 15 मार्च, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 12 जुलै, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 3 मे, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 साठी मार्च-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा दि. 10 मे रोजी तर मुख्य परीक्षा दि. 11 ऑक्टोबर, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 17 मे, 2020 मध्ये घेण्यात येणार आहे. सदर वेळापत्रक किंवा अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
****


02 December, 2019

समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याणाकरिता विविध योजना


समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याणाकरिता विविध योजना

            हिंगोली, दि.2 : जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयाकडून दिव्यांग कल्याणाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात- सदर योजनांची माहिती खालील प्रमाणे आहे.
व्यंग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजना- सदर योजनेतंर्गत एखादया दिव्यांग व्यक्तीसोबत सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास अशा जोडप्यास प्रोत्साहनपर अनुदान म्हणून विभागाकडून रु.25000/- रोख व रु.25000/- चे राष्ट्रीय बचत पत्र या स्वरुपात अनुदान देण्यात येते. दिव्यांग जनांसाठी बीज भांडवजल योजना- सदर योजनेतंर्गत दिव्यांग व्यक्तींना लघुउदयोगासाठी बॅकेमार्फत रु.150000/- च्या मर्यादेत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सदर मंजुर कर्जाच्या एकूण रकमेवर 20 टक्के सबसीडीची रक्कम विभागाकडून बॅकेस अदा केली जाते. 5 टक्के दिव्यांग कल्याण निधी - सदर योजनेतंर्गत प्रत्येक आर्थीक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वउत्तपन्नाच्या 5 टक्के एवढा निधी हा दिव्यांग कल्याण करिता राखून ठेवण्यात येतो. सदर निधीमधून दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी विविध साहित्य खरेदी साठी 100 टक्के अनुदान देण्यात येते. शालांतपूर्व शिक्षण घेणा-या दिव्यांग विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती - सदर योजनेतंर्गत इ.1 ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणा-या दिव्यांग विदयार्थ्यांना शासनाकडून दिव्यांगांच्या प्रवर्गानुसार शिष्यवृत्तीचे विदयार्थ्यांच्या बॅकखातेवर अनुदान जमा करण्यात येते. तरी  वरील योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग बंधूनी लाभ घेणेबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.
000



ओल्या दुष्काळातही रेशीम शेतीने तारले






ओल्या दुष्काळातही रेशीम शेतीने तारले

हिंगोली, दि.2: संपूर्ण राज्यात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले. परंतू रेशीम शेती याला अपवाद ठरली हिंगोली जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांनी या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
वसमत तालूक्यातील पांगरा शिंदे या गावातील रेशीम शेतकरी श्री. सुशील रावसाहेब शिंदे यांनी जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 या पाच महिन्याच्या कालावधीत चार वेळा एकूण 750 रेशीम आणि त्याचे संगोपन करून 708 कि.ग्रॅ. रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन या चार पिकाद्वारे 2 लाख 48 हजार 306 रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
याप्रकारे जिल्ह्यातील सुमारे 50 रेशीम शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत अवघ्या 5 महिन्याच्या कालावधीत 1 लाखाहून अधिक रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. तसेच 140 शेतकऱ्यांनी 50 हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न घेऊन रेशीम शेतीने प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकऱ्यांना संजीवनी देणारी उत्तम जोड व्यवसाय असल्याचे सिद्ध केले आहे.
ओल्या दुष्काळात पारंपारिक पिकांप्रमाणे रेशीम शेतीचे कुठलेही नुकसान होत नसून वाढलेल्या आर्दतेचा चांगला परिणाम कोष उत्पादनावर होवून चांगले उत्पन्न्‍ मिळते. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा मार्ग अवलंबून स्वतःची आर्थिक स्थिती बळकट करावी, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी  स्वप्नील तायडे व प्रगतीशील रेशीम शेतकरी सुशील शिंदे यांनी केले आहे.
श्री. सुशील शिंदे यांनी रेशीम शेतीत विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक श्री वडवळे, प्रवीण चव्हाण यांनी सत्कार करून गौरव केला. तसेच इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

****