31 August, 2016

अवयवदान कसे व केंव्हा करता येते ?  
अवयव दान म्हणजे काय ?
जिवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयव दान होय. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयव दान करुन अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णाचे अवयव कायम स्वरुपी निकामी झाले आहे, अशा रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे.
अवयव प्रत्यारोपण / प्रतिरोपण म्हणजे काय ?
 मानवी आवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धीच आहे. या उपचारामध्ये एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा मानवी अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करुन तो एखाद्या गरजवंत रुग्णामध्ये प्रत्यारोपित करतात. ज्यांचा एखादा अवयव कायमस्वरुपी निकामी झाला आहे. अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पध्दती आहे.
आपण कोणत्या अवयवांचे दान करु शकतो ?
अ) मेंदू स्तंभ मृत्यू (Brain Death) : मृत व्यक्ती जिची ह्दयक्रिया चालू आहे. पण जिचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाला आहे. अशी व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मुत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, ह्दयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचे देखील दान करु शकते.
ब) सामान्य मृत्यू (Normal Death) : मृत व्यक्ती जिची ह्दयक्रिया बंद पडली आहे. अशी व्यक्ती फक्त डोळे व त्वचा या अवयवांचे दान करु शकते.
क) जिवंत व्यक्ती (Live Donor) : जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयवदान करु शकते. रुग्ण दात्याच्या जवळचा नातेवाईक म्हणजे आजी, आजोबा, नातू, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण अथवा पती किंवा पत्नी असावा लागतो. या व्यतिरिक्त कोणालाही रुग्णासाठी अवयवदान  करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. शासन, रुग्ण व दाता यामध्ये काही अर्थिक देवाण घेवाण नसून फक्त  प्रेम व स्नेह या नात्यानेच अवयवदान होत आहे, याची खात्री झाल्यावरच अवयवदानास परवानगी देते. जिवंत व्यक्ती फक्त काही मर्यादित आवयवांचे म्हणजेच मूत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग दान करु शकतो.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू म्हणजे काय ?
वैद्यकीय शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छवास कायम स्वरुपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित करता येते. चेतना व श्वासोच्छवास या दोन्हीचे केंद्र आपल्या मेंदूतील मस्तिष्क स्तंभ’ या भागात असते. अपघातात डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायम स्वरुपी इजा झाल्यास त्या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता विभागात उपकरणांच्या सहाय्याने हृदय कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवले असेल तसेच काही ठरविक व प्रमाणित वाचण्यांच्या अधारे जर तिचा मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निश्चित झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषित करता येते. अशा व्यक्तीचे ह्दय जास्तीत-जास्त 16 ते 72 तासांपर्यंत कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवता येते व याच कालावधीत प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होऊ शकते. यासाठी त्या रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते. असे अवयवदान फक्त शासनाने प्रतिरोपणासाठी मान्यता दिलेल्या रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्यासच होऊ शकते.
मस्तिष्क स्तंभ मृत्यूचे निदान कसे होते ?
सरकाने मान्यता दिलेले चार डॉक्टर्स एकत्रीतपणे मस्तिष्क स्तंभ मृत्यूच्या चाचण्या करुन एखाद्या रुग्णास ब्रेन डेड अथवा मस्तिष्क स्तंभ मृत घोषित करतात. या चार डॉक्टरांचा अवयव प्रत्यारोपणाशी काहीही संबंध नसतो. मस्तिष्क स्तंभ मृत्यू फक्त अवयव प्रतिरोपणासाठी आणि निव्वळ अवयव काढण्याकरिता सरकारी मान्यता असलेल्या रुग्णालयामध्येच घोषित करता येतो. मस्तिष्क मृत्यूला आपल्या देशात नाही तर जगात मान्यता आहे व मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मस्तिष्क स्तंभ मृत्यूचा दाखला देण्यात येतो.
मस्तिष्क स्तंभ मृत अथवा ब्रेन डेड व्यक्ती जगण्याची काही शक्यता असते का ?
नाही. एखाद्या व्यक्तीस मस्तिष्क स्तंभ अथवा ब्रेन डेड घोषित केले असेल तर ती व्यक्ती जगण्याची शक्यता अजिबात नसते व ती व्यक्ती मृत असते मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती व कोमातील रुग्ण यामध्ये फरक आहे. कोमातील रुग्ण मृत नसतात व ते परत जगण्याची शक्यता असते. तसेच मस्तिष्क स्तंभ मृत घोषित करणे म्हणजे इच्छामरण असे बिल्कूल नाही. मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती ही मृत असते.
अवयवदान करायचे असल्यास मृत्यू हा रुग्णालयात येणे गरजेचे आहे का ?
हो. मस्तिष्क स्तंभ मृत्यू हा प्रतिरोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयात घोषित करता येत असल्याने अशा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच मृत्यू झाल्यास अवयवांचे दान होऊ शकते. परंतु, डोळे व त्वचा यांचे दान मृत्यूनंतर सहा तासांपर्यंत घरी मृत्यू झाला तरी होऊ शकते.                                                                                       
मस्तिष्क स्तंभ मृत्यू करणे व अवयवदान कायदेशीर आहे का ?
हो. भारतामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या दोन्हींना मान्यता दिली आहे. या कायद्याची खालील विशेष उद्दिष्टे आहेत.
·         मस्तिष्क स्तंभ मृत्यूला मान्यता देणे जेणेकरुन मृत्यूनंतर अवयवदान होऊ शकेल.
·         रुग्णांच्या उपचारासाठी मृत व्यक्तींचे अवयव काढणे, साठवणे व प्रतिरोपण करणे यावर नियंत्रण ठेवणे.
·         मानवी अवयवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे. कायद्याने अवयव विकणे, विकत घेणे व त्यासाठी जाहिरात किंवा अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्थी करणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
अवयव दानानंतर मस्तिष्क स्तंभ व्यक्तींचे शरीर त्यांच्या नातेवाईकांना परत दिले जाते का ?
हो. मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तींचे अवयव काढल्यानंतर त्याचे शरीर सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी परत दिले जाते. अवयवदान व देहदान या दोन्हींमध्ये फरक आहे. देहदानामध्ये मृताचे शरीर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यलयांमध्ये ठेवून घेतले जाते. अवयदानामधील सदर अवयव प्रत्यारोपणासाठी वापरले जातात व शरीर नातेवाईकांना परत केले जाते.
दान केलेल्या अवयवांचे वितरण कसे होते ? ते फक्त श्रीमंत व्यक्तींनाच दिले जाते का ?
नाही. गरजू रुग्णांचे वय, रक्त गट, त्यांच्या आजाराची तीव्रता, ते किती दिवस अवयवांची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांची वैद्यकीय गरज या सर्वांसाठी प्रत्येक रुग्णास काही गुण दिले जातात. या सर्व गरजू रुग्णांची एक सामाईक प्रतीक्षा यादी केली जाते व सर्वाधिक गरजू रुग्णास अवयव दिला जातो. रुग्णांची आर्थिक स्थिती, त्याची जात व धर्म याचा प्रमीक्षा यादीत त्याचे स्थान ठरविताना काही संबंध नसतो. अवयवांचे वितरण हे महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्यामार्फत पारदर्शकपणे होते.
मस्तिष्क स्तंभ मृत दात्याच्या नातेवाइकांना अवयव कोणाला दिले आहेत हे कळू शकते का ?
नाही. नातेवाईकांना अवयव मिळालेल्या रुग्णांचे नाव व पत्ता सांगितला जात नाही.
अवयव दान केल्याने मस्तिष्क स्तंभ मृत दात्याच्या शरीरावर काही विद्रुपता येते का ?
नाही. मस्तिष्क स्तंभ दात्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्याचे अवयव काळजीपूर्वक काढले जातात व शरीरावर विद्रुपता येत नाही. एखाद्या जिवंत व्यक्तीची शस्त्रक्रिया जितक्या काळजीपूर्वक केली जाते. तितक्याच काळजीपूर्वकरितीने अवयव काढले जातात व जखम पुन्हा शिवली जाते. शरीरावर, पोटावर अथवा छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात.
अवयव दानाला धर्माची परवानगी आहे का ?
हो. भारतातील सर्वच धर्मांनी अवयवदानाला पाठिंबा दिला आहे व अवयवदान हे एक पुण्याचे काम आहे.
अवयव दान केल्यानंतर मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीच्या नातेवाईकांला काही मोबदला दिला जातो का ?
नाही. अवयवदानासाठी मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तींच्या नातेवाईकाला आर्थिक अथवा कुठल्याही स्वरुपाचा मोबदला दिला जात नाही. म्हणून अवयवदान हे शुध्द व श्रेष्ठ दान ठरते. परंतु, अवयवदानाला संमती दिल्यानंतर अवयव दानासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांचा तसेच इतर काही वैद्यकीय खर्च मृताच्या नातेवाईकांना करावा लागत नाही.
अवयदान करायची इच्छा असल्यास काय करावे ?
एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीनुसार करणे आवश्यक आहे. संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या सज्ञान नातेवाईकांना सही घेणे देखील आवश्यक आहे. असा फॉर्म भरल्यावर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाईल, हे कार्ड दात्याने सतत आपल्या जवळ बाळगावे, जेणे करुन त्याच्या नातेनाईकांना अथवा मित्र परिवाराला त्याच्या अवयव दान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल.
जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमती शिवाय अवयवदान होऊ शकत नाही. म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.
डोनर कार्ड व अवयवदानासंबंधी काही अधिक माहिती हवी असल्यास खालील पत्यावर संपर्क साधावा
www.dmer.org. व www.notto.nic.in विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, मुंबई , एल. टी. एम. जी.  हॉस्पीटल (सायन हॉस्पिटल), कॉलेज बिल्डींग, दुसरा मजला, औषध भांडाराच्या बाजूला, सायन (पश्चिम), मुंबई-400022. www.ztccmumbai.org, organtransplant@ztccmimbai.org, दूरध्वनी 022-24028197, मो. 9320063468, 9167663469.  विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, पुणे, द्वारा केईएम हॉस्पिटल, रास्ता पेठ, पुणे-11. www.ztccpune.org,  मो. 9890210011. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती-औरंगाबाद, नेफ्रोलॉजी विभाग, एम. जी. एम. मेडिकल कॉलेज, एन-6, सिडको, औरंगाबाद-431003. Sudhirkul1979@gmail.com. दूरध्वनी 0240-2333591 मो. 9422713691. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानेवाडा, नागपूर-440003. raviwankhede@gmail.com, gmcssh@gmail.com, मो. 9423683350.

                                                                                                                      संकलन
जिल्हा माहिती कार्यालय

          हिंगोली
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
‘महाराष्ट्र माझा’ संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा
 निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
 पंधरा, दहा व पाच हजार रुपयांची पारितोषिके
 एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे
हिंगोली - महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा, मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन(एचडी) छायाचित्रे dgiprnews01@gmail.comया ई मेल पत्यावर दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक वरिष्ठ सहायक संचालक अजय जाधव (9702973946), (dloajayjadhav2012@gmail.com), सहायक संचालक सागरकुमार कांबळे (8605312555), (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.

30 August, 2016

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान
जीवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दूसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयव दान होय. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयव दान करुन अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायम स्वरुपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे.
आज मानवाने आपल्या बुध्दीच्या जोरावर अनेक क्षेत्रात प्रगती केलेली आहे. पृथ्वी जमीन, आकाश, समुद्र असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्या ठिकाणी मनुष्य पोहचला नाही. चंद्र मंगळाला गवसणी घातली. समुद्राचा तळ शोधला. जमिनीच्या पोटात शिरुन विश्वाची निर्मिती कशी झाली याचा शोध घेणे अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे सर्व करत असतांना मानवाचे जीवन इतके गतिमान झाले आहे की, ‘ थांबला तो संपला ’ अशी  परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगावर नियंत्रण उरले नाही की, अपघात हा ठरलेलाच, अपघात म्हटले की हानी अपरिहार्य मग ही हानी शारिरीक, मानसिक, सामाजिक आर्थिक असे स्वरुप धारण करु लागते. वाढते रस्ते अपघात, व्यसनाधिनता, जीवनशैलीशी निगिडीत आजार उदा. उच्च रक्तदाब मधुमेह, वाढत्या प्रदुषणामुळे होणारे फुफ्फुसाचे आजार इत्यादीमुळे अनेक रुग्ण संकटाशी सामना करत आहेत. यामध्ये कुणाचे वडील, आई, भाऊ, बहिण, पती, पत्नी आहे. प्रत्येकालाच आपली जवळची व्यक्ती प्रिय असते. त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे त्यांच्यांशी निगडीत इतर अनेक व्यक्तीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो, अशा व्यक्तींच्या जीवंत राहण्यामुळे कुटूंबांच्या एकूण व्यवस्थेवर सकारात्मक असा परिणाम होत असतो.
निसर्गरुपी अभियंत्याने मानवी शरीराची अत्यंत काळजीपूर्वक रचना केल्याचे दिसून येते. शरिरासाठी प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. हे पदोपदी जाणवते. मुनष्य देह नश्वर असून आज किंवा उद्या तो मातीत मिळणार आहे. पण त्या देहातील एखादा अवयव दुसऱ्याच्या उपयोगी पडणार असेल तर त्याहून दुसरे पुण्य ते काय ? आपण आपले अवयव दान करुन दुसऱ्या मानलवाला पुनर्जन्म देणे याहून मानवतेची वेगळी सेवा कोणती असू शकते ?
जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टीमध्ये मृत्यू हा अटळ आहे. त्याननंतर  वेगवेगळ्या  जाती धर्मामध्ये वेगवेगळया पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावतात. परंतू, देह व त्यातील अवयव हे अमूल्य आहेत. त्यांची अशा पद्धतीने जाळून राख करणे, किंवा जमिनीत माती करून नष्ट करणे, हे ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत समाजात करत आहेत हे कितपत योग्य आहे ? याबाबत विचार करण्याची गरज आहे. जर प्रत्येकांनी मृत्यू पूर्वी अवयवदान करण्याची इच्छा असेल तर त्यांनी इच्छा संमतीपत्र भरून द्यावयाचे आहे. त्यानंतर आपणांस एक ओळखपत्र दिले जाणार असून ते नेहमी आपल्या सोबत ठेवणे गरजेचे आहे.
             अवयवदान प्रामुख्याने तीन प्रकारे करता येते. यामध्ये जीवंतपणी  आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना आई, भाऊ, बही, मुले, पत्नी इत्यादींना. एक किडनी किंवा लिव्हरचा तुकडा अवयवाच्या स्वरुपात दान करु शकतो.              ब्रेन-डेथ  झाल्यावर म्हणजेच मेंदूमृत झाल्यावर, त्यासाठी नेमून दिलेल्या समितीने अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णाचा मेंदूमृत घोषित केल्यावर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती द्यावयाची असते. त्यानंतर अशा रुग्णाचे दोन्ही किडनी, डोळे, फुप्फुसे, लिव्हर, स्वादूपिंड, हृदय, कानाचे  पडदे  तसेच हाडे, त्वचा इत्यादी प्रकारच्या अवयवाचे दान करता येते. त्यामुळे अनेक प्रकारच्या गरजू रुग्णांना एका अवयव दात्याकडून जीवनदान मिळते व मृत्यू झालेल्या व्यक्तींना अवयवदानाच्या रूपाने, अनेकांत जीवंत असल्याचे समाधान मिळते. मृत्यू झाल्यानंतर सहा तासाच्या आत आपण डोळे, त्वचा व हाडे दान करु शकतो. अवयवदान  करताना संमती पत्रात दोन व्यक्तीच्या साक्षीदार म्हणून स्वाक्षरी आवश्यक आहेत. त्यापैकी एक साक्षीदार हा जवळचा नातेवाईक असणे आवश्यक आहे. आपल्या नातेवाईकाचा किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या शरीरात मृत्यूनंतरही जीवंत राहतो. यासारखी आनंदाची दुसरी बाब जीवनात असूच शकत नाही. त्यामुळे अवयव दान हे महादान आहे. 
विविध कारणांमुळे आज देशभरात अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. प्रतिक्षा करतांना अनेकजण आपला जीव गमावत असून मागणी अधिक व पुरवठा कमी अशी परिस्थिती आहे. अशा वेळी गरज आहे आपल्या एका अवयवाची हा अवयव एखाद्याला पुनर्जन्म देवू शकतो. हे विश्वच माझे घर असलेल्या माझ्याच एका सदस्याचे प्राण मी वाचवू शकतो हा विश्वास मनी बाळगून कोणत्याही शंका-कुशंका मनात न आणता जीवंत असतांना व मृत्यू नंतरही (जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी) अवयवरुपाने मागे राहून जगाला प्रेम अर्पण करण्याचा संकल्प आज करु या !
मानवसेवा हिच ईश्वर सेवा *
आहे महत्वाची ही जाण **
वसुधैव कुटूंबकम म्हणत  *
देऊ मानवधर्माला मान **
शंका-कुशंका मिटवून साऱ्या *
करु या अवयवांचे दान **
प्रेमाचेच रुप हे *
हिच असे मानवाची शान **
करुन अवयव दान *
देऊ इतरांस जीवनदान **
मरावे परी अवयवरुपी उरावे *

                                                                                                                     डॉ. चंद्रकांत शेरखाने
निवासी वैद्यकीय अधिकारी

                                                                                                                          जिल्हा रुग्णालय, हिंगोली
राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य मंत्री
श्री. विजय शिवतारे यांचा हिंगोली दौरा

हिंगोली, दि. 30 :- राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे दिनांक 4 सप्टेंबर, 2016 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
रविवार, दिनांक 4 सप्टेंबर, 2016 सकाळी 7-28 वाजता परभणी आगमन व मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण.               8-45 ते 9-00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह , हिंगोली येथे राखीव. सकाळी 9-00 ते 10-00 शिवसेना पक्ष्‍ा लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसमवेत हिंगोली जिल्हा पाहणी दौऱ्यासंदर्भात नियोजन बैठक . 10-00 ते 2-00 हिंगोली तालुक्यातील गावांना भेटी व ग्रामस्थांशी चर्चा. दुपारी 2-30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त परिस्थितीवर उपायोजना व सध्याची पीकपाहणी परिस्थितीबाबत आढावा बैठक आणि 4-00 वाजता  पत्रकार परिषदेस उपस्थिती.  सांयकाळी 5-00 वाजता हिंगोली येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 7-30 वाजता देवगिरी एक्सप्रेसने परभणी येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

***** 
महाअवयदान जनजागृती फेरी
हिंगोली, दि. 30 :- अवयवदान जनजागृती करण्याबाबत महाअभियान सन -2016 दिनांक 30 ऑगस्ट, 2016 ते दिनांक 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, हिंगोलीमार्फत आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जनतेतून अवयव दानाला चालना मिळवी याकरिता महाअवयवदान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी  जिल्हा रुग्णालय येथील महाअवयवदान  प्रभातफेरीस हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात केला.
सदर जनजागृती फेरीची सुरुवात करुन जिल्हा रुग्णालय हिंगोली येथून तहसील कार्यालय-शासकीय विश्रामगृह चौक-भारतीय विद्या मंदिर - जवाहर रोड मार्गे- गांधी चौक येथे समारोप करण्यात आला .
यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, बालरोतज्ज्ञ डॉ. गापाल कदम, निवासी वैद्यकीय अधिकारी श्री. चंद्रकांत शेरखाने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बाबासाहेब रोडगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता धनवे , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, समाजसेवक धरमचंद बडेरा, तसेच दंत महाविद्यालय व आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थी , प्राध्यापक आदींची उपस्थिती यावेळी होती.    
यावेळी नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ म्हणाल्या की, अवयव दान हेच, श्रेष्ठ दान अूसन याकरिता सर्वांनी सदर अभियानात आपले नांव नोंदणी करावी. समाजामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी अवयवदान करण्यासंदर्भातील सर्व उपस्थितांना सविस्तर माहिती देत अवयवदानाचे महत्व पटवून दिले.
तसेच दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी व विद्यार्थ्यांनी कु. मिरा आसवा, कांचन गापछडे, आदर्श महाविद्यालयाची विद्यार्थिंनी प्रियंका दिंद्रे यांनीही महाअवयवदानाविषयीची आपली मनोगते व्यक्त केली. महाअवयवदान अभियानात अनेक विद्यार्थींनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने अवयव दानाचे अर्ज भरुन दिले.  
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उध्दव कदम यांनी केले, तर समारोप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी  केला.  

****











 

29 August, 2016

अवयवदान जागृती प्रभावी परिणामकारक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत
--- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 29 :- अवयवदान जनजागृती करण्याबाबत महाअभियान सन -2016 दिनांक 30 ऑगस्ट, 2016 ते दिनांक 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जनतेतून अवयव दानाला चालना मिळवी याकरिता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.  
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी , नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, समाजसेवक धरमचंद बडेरा आदि सदस्य तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.  
अवयवदान महाअभियानामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत महाअवयवदान जागृतीबाबत महसूल विभाग, गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी मागर्दर्शक सुचना केल्या.  
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी अवयवदान जनजागृती करण्याबाबत महाअभियान सन -2016 दिनांक 30 ऑगस्ट, 2016 ते दिनांक 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक 30 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8-00 वाजता प्रभातफेरी (वॉकेथॉन कार्यक्रम) जिल्हा रुग्णालय हिंगोली येथून हिरवी झेंडी दाखवून प्रभातफेरीची सुरुवात करण्याचा मानस असून सदर प्रभातफेरी तहसील कार्यालयासमोरुन -शासकीय विश्रामगृह चौक-भारतीय विद्या मंदिर - जवाहर रोड मार्गे- गांधी चौक येथे पोहचेल . प्रभातफेरीमध्ये जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी आणि महाविद्यालयीन युवक-युवती यांचा सहभाग असणार आहे. गांधी चौकामध्ये उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन व अवयवदान करण्याबाबत जनतेस आवाहन करुन प्रभात फेरीचे विसर्जन करण्यात येणार आहे. गांधी चौकामध्ये अवयव दान करणाऱ्या इच्छूक लोकांकरिता अवयवदान नोंदणी केंद्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.        
प्रसिध्दी (आयईसी) साहित्य वितरण :- प्रभातफेरी दरम्यान व गांधी चौक, हिंगोली येथे अवयवदानासंबंधी जनगृतीपर मार्गदर्शन / माहिती पत्रकाचे वितरणही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. दिनांक 31 ऑगस्ट, 2016 रोजी अवयवदान जनजागृतीबाबत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. हिंगोली शहरातील महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेल्या आहेत. तसेच गांधी चौकामध्ये अवयवदान नोंदणी कक्ष स्थापन करुन सकाळी 10.00 ते सायंकाळी 5-00 वाजेपर्यंत इच्छूक अवयवदान दात्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयात युवक-युवतींना अवयवदानासंबंधी मार्गदर्शन व व्याख्यानाचेही आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 31 ऑगस्ट, 2016 रोजी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. अवयवदान नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येवून अवयवदान दात्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी माहिती दिली.
*****

                                                          

28 August, 2016

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18.08 मि.मी. पावसाची नोंद
सर्वाधिक पाऊस औंढा नागनाथ तालुक्यात

          हिंगोली, दि. 28 :- जिल्ह्यात रविवार दिनांक 28 ऑगस्ट, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 90.39 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  18.08  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 598.07 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 67.17 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात रविवार दिनांक 28 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 6.00 (611.43), वसमत - 14.14 (572.39), कळमनुरी - 1.50 (619.65), औंढा नागनाथ - 54.25  (666.25), सेनगांव - 14.50 (520.65). आज  अखेर  पावसाची सरासरी 598.07 इतकी आहे.

*****

25 August, 2016

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानात गणेश मंडळांनी सहभागी व्हावे
29 ऑगस्ट पर्यंत तालुका गट शिक्षणाधिकाऱ्याकडे अर्ज करण्याचे गणेश मंडळांना आवाहन

हिंगोली,दि.25: राज्याच्या पर्यटन व सांस्कृतीक विभागामार्फत लोकमान्य महोत्सव व लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान-2016 या वर्षीपासून राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील जास्तीत-जास्त गणेश मंडळांनी या अभियानात सहभागी होऊन, समाजपयोगी उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करुन जिल्ह्याचा  लौकिक वाढवावा, असे आवाहन आज येथे लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान तसेच लोकमान्य उत्सव या निमित्ताने आयोजित बैठकीत करण्यात आले.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अभियान समिती सदस्य बसवराज मंगरुळे, पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, जिपचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, श्रीमती अनुराधा ढालकरी, अतिरीक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांची प्रमुख उपस्थीती होती.
बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या अभियानातील स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी  होण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि अभियानाचे सदस्य बसवराज मंगनाळे यांनी केले. ‘स्वराज्य...हा माझा जन्मसिदध हक्क आहे..आणि तो..मी मिळवणारच’ या उद्गारास 100 वर्ष पुर्ण असून हे वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे 160 वी जयंती वर्षे आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त साधून हे सांस्कृतिक उपक्रम राज्यात यंदा वर्षभर राबविण्यात येणार. सार्वजनिक गणेशोत्सव अभियानात सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन संकल्पनेवरील देखावा तयार करणे आवश्यक असणार आहे. या स्पर्धेसाठी 29 ऑगस्ट 2016 पर्यंत अर्ज तालूका शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहेत.
उत्कृष्ट गणेश मंडळाना तालुकास्तरासाठी अनुक्रमे 25 हजार, 15 हजार व तृतीय क्रमांकासाठी  10 हजार रुपये असे बक्षिस असणार आहे. तर जिल्हास्तरासाठी प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार तर तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे बक्षिस आहे.  विभागीय स्तरावर अनुक्रमे 2 लाख, 1 लाख 50 हजार आणि एक लाख रुपये अशी बक्षिसे असणार आहेत.
यावेळी बैठकीस पोलीस उपविभागीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी / प्रतिनीधींची  उपस्थिती होती.
*****





23 August, 2016

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3.99 मि.मी. पावसाची नोंद
सर्वाधिक पाऊस हिंगोली तालुक्यात

          हिंगोली, दि. 23 :- जिल्ह्यात मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 19.93 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  3.99  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 573.85 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 64.45 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 8.14 (598.72), वसमत - 0.29 (556.82), कळमनुरी - 3.83 (609.15), औंढा नागनाथ - 0.50  (603.75) , सेनगांव - 7.17 (500.82). आज  अखेर  पावसाची सरासरी 573.85.

*****