01 August, 2016

सर्वसामान्य जनतेला न्याय देणे महसूल विभागाचे कर्तव्य
                                                                 -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 1 : प्रशासनामध्ये महसूल विभाग हा सर्वात जूना विभाग असून यास महत्वाचे स्थान आहे.  या विभागाचा जमिनींच्या विविध प्रकारणाशी  निगडीत असलेला आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी संबंध येत असल्याने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे महसूल विभागाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक मोराळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी रोहयो खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, राहूल खंडेभऱ्हाड, अमित शेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे जिल्हाधिकारी श्री. भंडारी म्हणाले की, महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून  ते लोकप्रतिनिधी व जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहे. महसूल विभागाकडे महसुली कामकाजाशिवाय अनेक कामे सोपविली जातात. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रत्येकवर्षी ठरविलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे काम करतात. तसेच महसूल विभागास शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे आणि महसूल विभाग नेहमी अग्रेसर असतो. महसूल विभाग लोकाभिमूख होण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. यामार्फत 7/12 चे संगणकीकरण करणे, कागदपत्रांचे स्कॅनिंग करणे, लाभार्थ्याना थेट लाभ देणे (DBT), आधार कार्ड काढणे, शिधा पत्रिका वितरण, विविध दाखले देणे आदी लाभ जनतेला देण्यात येत आहे.
            यावर्षी महसूल सप्ताहात महिला सक्षमीकरणासाठी उपाययोजना राबविण्यात येणार आहे. महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात सप्ताह राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतून महिला सक्षमीकरणासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जाणार असून यानिमित्त या सप्ताहात विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यात महिलांना निःशुल्क सातबारा देणे तसेच विविध मेळावे आयोजित करून महिलांना विविध योजनेची माहिती देत लाभ देणे असे उपक्रम ही हाती घेण्यात येणार आहेत, असे ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले.
पोलिस अधिक्षक अशोक मोरोळे म्हणाले की, महसूल विभाग हा इतर विभागाच्या तुलनेत सर्वात जूना विभाग आहे.  अनेक वर्षापासून जमीन महसूल पध्दत अस्तित्वात आहे. याची जाणीव ठेवून महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जनतेला सन्मानाची वागणुक देत त्यांची कामे केली जातात.
यावेळी जिपचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसिलदार किरण अंबेकर आदींची समयोचित भाषणे झाली.
यावेळी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसमतच्या उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले. तर सुत्रसंचालन आणि आभार तहसिलदार किरण अंबेकर यांनी मानले.
यावेळी तहसीलदार सुरेखा नांदे, किरण अंबेकर, श्याम मदनुरकर, प्रतिभा गोरे, आर. के. मेंडके यांच्यासह महसुल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****







No comments: