30 August, 2016

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान
जीवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दूसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयव दान होय. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयव दान करुन अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायम स्वरुपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे.
आज मानवाने आपल्या बुध्दीच्या जोरावर अनेक क्षेत्रात प्रगती केलेली आहे. पृथ्वी जमीन, आकाश, समुद्र असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्या ठिकाणी मनुष्य पोहचला नाही. चंद्र मंगळाला गवसणी घातली. समुद्राचा तळ शोधला. जमिनीच्या पोटात शिरुन विश्वाची निर्मिती कशी झाली याचा शोध घेणे अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे सर्व करत असतांना मानवाचे जीवन इतके गतिमान झाले आहे की, ‘ थांबला तो संपला ’ अशी  परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगावर नियंत्रण उरले नाही की, अपघात हा ठरलेलाच, अपघात म्हटले की हानी अपरिहार्य मग ही हानी शारिरीक, मानसिक, सामाजिक आर्थिक असे स्वरुप धारण करु लागते. वाढते रस्ते अपघात, व्यसनाधिनता, जीवनशैलीशी निगिडीत आजार उदा. उच्च रक्तदाब मधुमेह, वाढत्या प्रदुषणामुळे होणारे फुफ्फुसाचे आजार इत्यादीमुळे अनेक रुग्ण संकटाशी सामना करत आहेत. यामध्ये कुणाचे वडील, आई, भाऊ, बहिण, पती, पत्नी आहे. प्रत्येकालाच आपली जवळची व्यक्ती प्रिय असते. त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे त्यांच्यांशी निगडीत इतर अनेक व्यक्तीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो, अशा व्यक्तींच्या जीवंत राहण्यामुळे कुटूंबांच्या एकूण व्यवस्थेवर सकारात्मक असा परिणाम होत असतो.
निसर्गरुपी अभियंत्याने मानवी शरीराची अत्यंत काळजीपूर्वक रचना केल्याचे दिसून येते. शरिरासाठी प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. हे पदोपदी जाणवते. मुनष्य देह नश्वर असून आज किंवा उद्या तो मातीत मिळणार आहे. पण त्या देहातील एखादा अवयव दुसऱ्याच्या उपयोगी पडणार असेल तर त्याहून दुसरे पुण्य ते काय ? आपण आपले अवयव दान करुन दुसऱ्या मानलवाला पुनर्जन्म देणे याहून मानवतेची वेगळी सेवा कोणती असू शकते ?
जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टीमध्ये मृत्यू हा अटळ आहे. त्याननंतर  वेगवेगळ्या  जाती धर्मामध्ये वेगवेगळया पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावतात. परंतू, देह व त्यातील अवयव हे अमूल्य आहेत. त्यांची अशा पद्धतीने जाळून राख करणे, किंवा जमिनीत माती करून नष्ट करणे, हे ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत समाजात करत आहेत हे कितपत योग्य आहे ? याबाबत विचार करण्याची गरज आहे. जर प्रत्येकांनी मृत्यू पूर्वी अवयवदान करण्याची इच्छा असेल तर त्यांनी इच्छा संमतीपत्र भरून द्यावयाचे आहे. त्यानंतर आपणांस एक ओळखपत्र दिले जाणार असून ते नेहमी आपल्या सोबत ठेवणे गरजेचे आहे.
             अवयवदान प्रामुख्याने तीन प्रकारे करता येते. यामध्ये जीवंतपणी  आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना आई, भाऊ, बही, मुले, पत्नी इत्यादींना. एक किडनी किंवा लिव्हरचा तुकडा अवयवाच्या स्वरुपात दान करु शकतो.              ब्रेन-डेथ  झाल्यावर म्हणजेच मेंदूमृत झाल्यावर, त्यासाठी नेमून दिलेल्या समितीने अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णाचा मेंदूमृत घोषित केल्यावर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती द्यावयाची असते. त्यानंतर अशा रुग्णाचे दोन्ही किडनी, डोळे, फुप्फुसे, लिव्हर, स्वादूपिंड, हृदय, कानाचे  पडदे  तसेच हाडे, त्वचा इत्यादी प्रकारच्या अवयवाचे दान करता येते. त्यामुळे अनेक प्रकारच्या गरजू रुग्णांना एका अवयव दात्याकडून जीवनदान मिळते व मृत्यू झालेल्या व्यक्तींना अवयवदानाच्या रूपाने, अनेकांत जीवंत असल्याचे समाधान मिळते. मृत्यू झाल्यानंतर सहा तासाच्या आत आपण डोळे, त्वचा व हाडे दान करु शकतो. अवयवदान  करताना संमती पत्रात दोन व्यक्तीच्या साक्षीदार म्हणून स्वाक्षरी आवश्यक आहेत. त्यापैकी एक साक्षीदार हा जवळचा नातेवाईक असणे आवश्यक आहे. आपल्या नातेवाईकाचा किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या शरीरात मृत्यूनंतरही जीवंत राहतो. यासारखी आनंदाची दुसरी बाब जीवनात असूच शकत नाही. त्यामुळे अवयव दान हे महादान आहे. 
विविध कारणांमुळे आज देशभरात अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. प्रतिक्षा करतांना अनेकजण आपला जीव गमावत असून मागणी अधिक व पुरवठा कमी अशी परिस्थिती आहे. अशा वेळी गरज आहे आपल्या एका अवयवाची हा अवयव एखाद्याला पुनर्जन्म देवू शकतो. हे विश्वच माझे घर असलेल्या माझ्याच एका सदस्याचे प्राण मी वाचवू शकतो हा विश्वास मनी बाळगून कोणत्याही शंका-कुशंका मनात न आणता जीवंत असतांना व मृत्यू नंतरही (जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी) अवयवरुपाने मागे राहून जगाला प्रेम अर्पण करण्याचा संकल्प आज करु या !
मानवसेवा हिच ईश्वर सेवा *
आहे महत्वाची ही जाण **
वसुधैव कुटूंबकम म्हणत  *
देऊ मानवधर्माला मान **
शंका-कुशंका मिटवून साऱ्या *
करु या अवयवांचे दान **
प्रेमाचेच रुप हे *
हिच असे मानवाची शान **
करुन अवयव दान *
देऊ इतरांस जीवनदान **
मरावे परी अवयवरुपी उरावे *

                                                                                                                     डॉ. चंद्रकांत शेरखाने
निवासी वैद्यकीय अधिकारी

                                                                                                                          जिल्हा रुग्णालय, हिंगोली

No comments: