15 August, 2016

निधीचे योग्य नियोजन करुन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामासाठी
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा
                                                                --- पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे

हिंगोली,दि.15:- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना सन 2016-2017 च्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीबाई यशवंते, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, संतोष टारफे, जयप्रकाश मुंदडा, रामराव वडकुते,          जिल्हाधिकारी अनिल भंडारी, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी , जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांची  प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे  म्हणाले, सर्व विभागांनी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यानुसार उपलब्ध होणारा निधी वेळेत खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी. पशुसंर्वधन विभागाने पशुवैद्यकीय दवाखाने / प्रथमोपचार केंद्रासाठी पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपूरावा करावा. शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची तपासणी करुन शाळेतील आवश्‍यक ती दूरुस्ती तात्काळ करुन घ्यावी. हिंगोली येथे शंभर खाटांचे महिला रुग्णालयाचा शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपूरवा करुन सदर रुग्णालयाचे काम लवकरात - लवकर सुरु करावे. समितीने मान्यता दिलेल्या जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावेत.
कृषि विभागाने शेतकऱ्यांना वितरीत केलेल्या बियाणांचा लेखी अहवाल सादर करावा. महावितरण कंपनीने निधी प्राप्त होताच घर, शाळा, धार्मिक स्थळे यावरुन गेलेल्या विद्युत तारा काढून घेण्याचे कामे करावीत. जिल्ह्यातील  विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारीसाठी स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु करण्यासाठी  हिंगोली नगर परिषदेने जागा उपलब्ध करुन द्यावी. तसेच त्यासाठी प्रस्ताव सादर करावा.                                       


जलयुक्त शिवार अभियानातंर्गत कामे झाली नसल्याचे सदस्यांनी सांगितले असता कृषि विभागाने  जलयुक्त शिवार अभियानातंर्गत झालेल्या कामांचा लेखी अहवाल सादर करावा. तसेच जलयुक्त शिवार अंतर्गत कामे करतांना लोकप्रतिनीधींचा त्यात सहभाग असावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. कांबळे यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना 2015-16 च्या खर्चास मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यापूर्वीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित मुद्यांवर संबंधित यंत्रणेने केलेल्या अनुपालनाचा अहवाल सादर केला. जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत सन 2016-17 जूलै, 2016 अखेर झालेल्या खर्चाचा आढावाही त्यांनी यावेळी सादर केला. 
जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 ची एकुण तरतूद 182 कोटी 79 लाख होती त्यापैकी मार्च, 2016 चा अखेर 174 कोटी 71 लाख पर्यंतचा खर्च झाली असून, मार्च 2016 अखेर एकूण 98.42 टक्के निधी खर्च झाला आहे. यामध्ये सर्व साधारण योजना 115 कोटी 63 लाख (खर्च 98.78. %), अनुसूचीत जाती उपयोजना 34 कोटी 94 लाख (99.10%), तर आदिवासी उपयोजना 25 कोटी 98 लाख (99.56%) याप्रमाणे निधी- खर्च झाला.  
तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 मध्ये सर्वसाधारण योजना 108 कोटी 9 लाख तरतूद असुन  1 कोटी 43 लाख वितरीत केले तर खर्च 1 कोटी 43 लाख झाला आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना 44 कोटी 87 लाख हजाराची असून वितरीत तरतूद 15 कोटी 24 लाख 37 हजार, तर खर्च 11 कोटी 8 लाख 85 हजार इतका झाला आहे. तर आदिवासी उपयोजना प्राप्त तरतूद 28 कोटी 9 लाख असून वितरीत तरतूद            9 कोटी 35 लाख आहे व 84 लाख खर्च झाल्याची माहिती यावेळी सभागृहात देण्यात आली.
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी मागील बैठकीचा अनुपालन अहवाल, जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 च्या खर्चाचा आढावा व सन 2016-17 च्या माहे मे, 2016 अखेर पर्यंतच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेऊन मंजूर बाबीवर व वेळेत निधी खर्च करण्याच्या सुचना विभाग प्रमुखांना दिल्या. 
            तसेच लोकप्रतिनिधी, समिती सदस्य यांनी मांडलेल्या सुचना व समस्यांची प्रशासनाने दखल घेऊन उचित कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. कांबळे यांनी दिले.
समिती सदस्य व लोकप्रतिनीधी यांनी केलेल्या सूचना व तक्रारींची प्रशासनाच्यावतीने दखल घेण्यात येऊन त्याबाबत योग्य ती कार्यवाही करत जिल्हा वार्षिक योजनेत सर्व निधी वेळेत खर्च करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी बैठकीत दिली. 
यावेळी समिती सदस्य आणि विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.
*****




No comments: