15 August, 2016

नागरिकांनी जल पुनर्भरणासाठी योगदान द्यावे
---पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली,दि.15: दूष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेवून नागरिकांनी नागरिकांनी जल पुनर्भरणासाठी योगदान द्यावे असे आवाहन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री. कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार रामराव वडकुते,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई यशवंते, नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक सी. एस. बोईनवाड, निवासी उप जिल्हाधिकारी लतीफ पठाण , अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले, मागील कालावधीतील दुष्काळ सदृश्य परिस्थीती लक्षात घेवून त्यावर कायमची मात करण्यासाठी शासनामार्फत ‘जलयुक्त शिवार अभियान’ हे महत्वकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्तच्या पहिल्या टप्प्यात समावेश असलेल्या जिल्ह्यातील 124 गावांमध्ये 90 टक्यापेक्षा जास्त विविध जलसंधारणांची कामे पूर्ण झाली आहेत. तर दूसऱ्या टप्प्यात 100 गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त अंतर्गत नदी-नाला खोलीकरण व सरळीकरणाची सुमारे 150 कि.मी. पेक्षाही जास्त लांबीचे कामे झाली आहेत. तसेच प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून गाळ उपसा करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून जिल्ह्यात जलसंवर्धनाची लोक चळवळ उभी केली असुन, जलयुक्त अभियानातील गावांशिवाय जिल्ह्यातील इतर गावातील जनतेनेही लोकसहभागातून जलसंधारणाची कामे घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून, पावसाचे जास्तीत-जास्त पाणी गावाच्या शिवारात मुरवून जल पुनर्भरणासाठी नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन श्री. कांबळे यांनी केले.
जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला असून वार्षिक सरासरीच्या 64 टक्के एवढा इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 104 टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-2016 अंतर्गत जिल्ह्यातील 1 लाखाहून जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दराप्रमाणे धान्य वितरीत करण्यात येत आहे. राज्यात तुर डाळीचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तुर डाळ विक्री केंद्र सुरु करुन अंत्योदय अन्न योजना व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका दरमहा 1 किलो तुर डाळ माफक दराने वितरीत करण्यात येणार आहे.
राज्यातील सार्वजनीक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत असून त्याअंतर्गत रास्त भाव दूकानामध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पध्दतीने ओळख पटवून शिधा वस्तूंचे वाटप करण्यासाठी पाँईट ऑफ सेल उपकरण लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
            महसूल दिनानिमित्त 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात महिला सक्षमीकरण पंधरवाडा राबविण्यात आला. या सप्ताहामध्ये महिलासाठींचे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच राज्यात 1 जुलै रोजी राबविण्यात आलेल्या 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली.







सायबर क्राईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब तयार केली असुन याची सुरुवात आजपासून होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
येणाऱ्या 3 वर्षात संपुर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्यासाठी ‘अठरा लक्ष गृह भेटी, स्वच्छ महाराष्ट्रासाठी’ हे राज्यव्यापी अभियान 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर, 2016 या दरम्यान राबविण्यात येणार आहे.
तसेच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या स्मृती वर्षानिमित्त 2 ऑक्टोंबर 2016 पासून संपूर्ण राज्यात ‘महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी दिली.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मदन मार्डीकर यांनी केले.

**** 

No comments: