30 April, 2023

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा सुधारित हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30  :  राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे रविवार, दि. 30 एप्रिल, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुधारित दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 30 एप्रिल रोजी सांय. 4.00 वाजता वाजता सिल्लोड निवासस्थान येथून सिल्लोड-भोकरदन-जाफ्राबाद-देऊळगांव राजा-समृध्दी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम.

सोमवार, दि. 01 मे रोजी सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून संत नामदेव पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता संत नामदेव कवायत मैदान येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजावंदन कार्यक्रमास उपस्थिती. 8.50 वाजता जिल्हा नियोजन समितीमार्फत घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण. 9.00 वाजता शासकीय विश्रमागृह हिंगोलकडे प्रयाण, आमगन व राखीव. 9.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या सभेस उपस्थिती. सकाळी 11.00 वाजता खरीपपूर्व आढावा व पीएमएफएमई बैठकीस उपस्थिती. 11.45 वाजता हिंगोली येथून वाहनाने कळमनुरीकडे प्रयाण. दुपारी 12.10 वाजता कळमनुरी येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. 12.50 वाजता वरुड ता. कळमनुरी येथील पंडितराव धोंडिबा येगाडे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी. दुपारी 1.00 वाजता कळमनुरी येथून येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण.

*****

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


            हिंगोली (जिमाका), दि. 30  :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह‍ प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना कार्यान्वित होणार

 


हिंगोली (जिमाका), दि. 30  :  जिल्ह्यातील पाचही तालुक्यात महाराष्ट्र दिनी दि. 01 मे, 2023 पासून नव्याने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत, राज्यातील शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी, अशा भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम व दर्जेदार  आरोग्य सुविधा मिळाव्यात हा एकच ध्यास घेऊन  मा.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याची घोषणा केली आहे, उद्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरिकांच्या सेवेत समर्पित होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र हे 15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापन करण्यात आले आहेत. या आरोग्य वर्धिनी केंद्राचे टप्प्याटप्प्याने रुपांतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रामध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात  हिंगोली जिल्ह्यांमध्ये 5 तालुक्यात दि. 1 मे, 2023 रोजी महाराष्ट्र दिन निमित्ताने हे दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने उद्या दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र राज्यात एकूण 342 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे डिजिटल अनावरण लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार दिली आहे.

 हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक असे एकूण पाच ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होणार आहे. हिंगोली येथे पोळा मारोती मंगळवारा येथे, सेनगाव येथे इंदिरानगरमध्ये , कळमनुरी येथे इंदिरा नगरमध्ये, वसमत येथे सम्राट कॉलनी मध्ये तर औंढा नागनाथ येथे जवाई नगर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होणार आहेत.

या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार, किरकोळ जखमा मलमपट्टी यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे . याशिवाय क्ष-किरण, सोनोग्राफी इत्यादी चाचण्यासाठी पॅनल वरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विशेष तज्ञांची सेवा देखील उपलब्ध होतील. सध्या भाड्याचे इमारतीत हे दवाखाने  राहणार आहेत यात ओपीडी स्वरुपात सेवा देण्यात येणार आहे, आपला दवाखान्यांमध्ये बाह्य रुग्णसेवा मोफत औषध उपचार, मोफत प्रयोगशाळा चाचणी, टेलीकन्सेंल्टेशन गर्भवती माताची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषत: संदर्भ सेवा, योगा, व्यायाम बाबतचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार आहे,  हिंगोली जिल्ह्यात सुरु होणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य सेवांचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

*****

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30  :  राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे रविवार, दि. 30 एप्रिल, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 30 एप्रिल रोजी सांय. 4.00 वाजता वाजता सिल्लोड निवासस्थान येथून सिल्लोड-भोकरदन-जाफ्राबाद-देऊळगांव राजा-समृध्दी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम.

सोमवार, दि. 01 मे रोजी सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून संत नामदेव पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता संत नामदेव कवायत मैदान येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजावंदन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या सभेस उपस्थिती. सकाळी 11.00 वाजता खरीपपूर्व आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण.

*****

29 April, 2023

 

शाश्वत विकासासाठी ‘जिल्हा विकास आराखडा’

जिल्हाधिकारी यांनी दिले सर्व विभागांना आराखडा तयार करण्याचे निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 29 : भारताची अर्थव्यवस्था 2025-26 पर्यंत 5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे तसेच 2030 पर्यंत शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. याच अनुषंगाने शाश्वत विकासाच्या ध्येयांबाबत राज्य शासनाने 2023-24 पासून जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शाश्वत विकासासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची दि. 27 एप्रिल रोजी बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा विकास आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून, त्यामध्ये अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करण्यात येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचा सहभाग, मार्गदर्शन घेऊन दि. 15 मे पर्यंत आराखडा सादर करावा. हा आराखडा तयार करताना सध्याचे सकल जिल्हा उत्पन्न, त्यामध्ये पुढील पाच, दहा व पंधरा वर्षाच्या कालावधीत अपेक्षित असलेली वाढ यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून गुणात्मक सहाय्य प्राप्त करुन घेतले जाणार आहे.

            जिल्ह्याची सद्यस्थिती, जमेच्या बाजू, संधी, जिल्ह्याचे व्हिजन याबाबींचा विचार जिल्हा आराखडा तयार करताना होईल. जिल्ह्याच्या विकासासाच्या दृष्टीने हळद, सोयाबीन पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, शिक्षण क्षेत्र आदी प्रमुख क्षेत्रांसह इतर उपक्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. तसेच जिल्ह्याला गुंतवणुकीचे केंद्र अशी ओळख देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली आणि त्यादृष्टीने तयारीच्या संबंधित यंत्रणाना जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या. विकास आराखडा तयार करण्यासाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

*****

 सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात "शासकीय योजनांची जत्रा"

जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिले विभागनिहाय लार्भार्थ्यांचे उद्दिष्ट

 


हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी " शासकीय योजनांची जत्रा"चे आयोजन करायचे असून त्या दृष्टीने सर्व विभागाने तयारी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत.

             जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या सोबत दि. 27 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

"शासकीय योजनांची जत्रा" या विशेष कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग सहभागी होणार असून यात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना विभागनिहाय लाभाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करुन शासकीय योजनांची जत्रा या विशेष उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिले. याबाबत तालुकापातळीपर्यंत याचे नियोजन केले जाणार असल्याचेही यांनी यावेळी सांगितले आहे.

             लोक कल्याणाचे ध्येय समोर ठेवून शेवटच्या गरजू पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचावा यासाठी 'शासकीय योजना सुलभीकरण अभियान ' राबविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार असून त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यात " "शासकीय योजनांची जत्रा " हा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

 

हिंगोली जिल्हा न्यायालयात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 30 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.  ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल जाधव यांनी केले आहे.

*****

 

धनगर समाज बांधवानी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्ह्यातील गेली अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमातीमधील धनगर प्रवर्गातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना स्थिरता निर्माण व्हावी यासाठी धनगर समाजाच्या व्यक्तीसाठी राज्यात ग्रामीण भागात घरकुल योजना ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक धनगर बांधवासाठी लागू करण्यात आलेली आहे.

ग्रामीण क्षेत्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या घरकुलासाठी संबंधित गावाचे ग्रामसेवक यांच्याकडुन प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती या कार्यालयास सादर करण्यात यावेत. त्यानंतर संबंधित गट विकास अधिकारी यांनी परिपुर्ण पात्र प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे सादर करावे.

भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी खालील प्रमाणे अटी / शर्ती लागू आहेत. लाभार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा. लाभार्थी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, लाभार्थ्याच्या नांवे सातबारा किवा 8-अ नमुना असावा. लाभार्थ्यांच्या कुटुंबियांने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कुटुबांतीत एकाच पात्र व्यक्तीस लाभ देण्यात येईल, पात्र लाभार्थी कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरीस सेवेमध्ये नसावा. योजनेतील भटक्या जमाती प्रवर्गातील कुटूंब हे भटकंती करणारे / पालात राहणारे / दारिद्र्य रेषेखालील कुटूंब / घरात कोणीही कमावता नाही अशा विधवा, परितक्त्या किंवा अपंग महिला व पूरग्रस्त क्षेत्रातील कुटूंबियांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी यांना प्राप्त होणारे घरकुल हे भाडे तत्वावर अन्य व्यक्ती/ कुटूंबास देता येणार नाही. तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही. तसे आढळुन आल्यास घरकुलाचा लाभ रद्द करण्यात येऊन मंजुर निधीची वसूली करण्यात येईल. घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायतकडुन आकारण्यात येणारी वार्षिक घरपट्टी व पाणीपट्टी लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक राहील व घराची देखभाल दुरुस्ती लाभार्थ्यांना स्वतः करावी लागेल.

धनगर बांधवाच्या घरकुल आंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय कार्यान्वयन समिती असुन त्या समितीचे अध्यक्ष उप विभागीय अधिकारी (महसूल) हे असून जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, हिंगोली हे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्राप्त होणारे पात्र प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात येऊन निधी मागणीसाठी शासनास सदर प्रस्तावाची यादी सादर करण्यात येते.

त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर बांधवानी संबंधित पंचायत समितीमार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांच्याकडे घरकुल योजनेसाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

******

28 April, 2023

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलेसाठी केलेल्या कार्याला व्याख्यानाद्वारे उजाळा

 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने दि. 1 एप्रिल ते 1 मे पर्यंत सामाजिक न्याय समता पर्व साजरा करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान व महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मीराताई कदम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे, डॉ.राधिका देशमुख, वर्षा कोठूळे, सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख, गृहपाल व संयोजिका सिंधू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मोरे, डॉ.राधिका देशमुख, वर्षा कोठूळे, सामाजिक कार्यकर्ते  कल्याण देशमुख यांनी  व्याख्यानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल उजाळा दिला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहपाल व संयोजिका सिंधू राठोड यांनी केले तर सूत्रसंचालन गृहपाल पल्लवी गिते यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार शिल्पा वाघमारे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुलोचना ढोणे , उषा मुरकुटे, सत्यजीत नटवे, श्रीकांत कोरडे, आत्माराम वागतकर, विनोद ठाकरे , मिनाक्षी बांगर, गयाबाई खंदारे, नागनाथ नकाते, राजू ससाणे यांच्यासह समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.                               

***

 

 

वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा 

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : भारतीय हवामान विभागाने दि. 29 एप्रिल ते दि. 01 मे, 2023 या कालावधीत मराठवाड्यात हिंगोलीसह काही जिल्ह्यामध्ये पावसाच्या शक्यतेचा इशारा व वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

                           

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1)      आकाशात विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2)     जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3)      झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4)    वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5)     वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो. त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6)     विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करुन ठेवावीत.

7)     वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

 

आकाशात विजा चमकत असल्यास हे करु नका :

1)      पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.   

2)     विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3)      दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4)    धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका. 

 

*******


 




हिंगोली येथील एफएम रिले केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम

                                                                - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील रिसाला बाजार येथे सुरु करण्यात आलेल्या आकाशवाणी एफ.एम. रिले केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने आज करण्यात आले. आज हिंगोलीसह देशातील 91 तर राज्यातील 8 एफएम रिले केंद्राचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हिंगोली येथे खासदार हेमंत पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, नाना नाईक, ओम देशमुख, शिवानंद होकर्णे, कपील खंडेलवाल, परभणी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सतीष जोशी, आदी उपस्थित होते.

यावेळी मागदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचे काम होणार आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाने स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनआंदोलन तयार झाले आहे. गरीब, वंचित समाजातील घटकांना आकाशवाणीच्या माध्यमातून वेळेवर माहिती पोहचविणे ही महत्वाची भूमिका असणार आहे.  गावागावात ऑप्टीकल फायबर पोहोचत असून इंटरनेटच्या माध्यमातून जनतेची सोय झाली आहे. यामुळे वेळेत माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. तसेच फ्री-डीटीएच माध्यमातून देशातील गरीब, वंचित घटकातील 4 करोड 30 लाख घरात मनोरंजनाची सोय उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश मोठ्या बदलाला सामोरे जात आहे. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाला पुढे नेण्याचे काम श्री. मोदी करत आहेत. सन 2019 पासूनची असलेली मागणी आज एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. यामुळे या भागातील श्रोत्यांची सोय झाली आहे. आकाशवाणी केंद्र परिपूर्ण सुरु होण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. हिंगोली येथे लवकरच परिपूर्ण असे एलआरएस सेंटर चालू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच याठिकाणी स्टुडिओ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असून आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध संस्कृतीचे सादरीकरण, स्थानिक व्यापारी बांधवांना जाहिरात देण्याची सोय होणार असल्याचेही खासदार श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच जगात सर्वात जास्त हळद हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसमत येथे हळद संशोधन केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच 100 कोटी रुपयाची तरतूदही उपलब्ध करुन दिली आहे. लवकरच मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. तसेच लिंगो केंद्र सुरु करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे लिगोचा प्रकल्पास लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे खा. हेमंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी आ.रामराव वडकुते यांनी आकाशवाणी एफएम रिले केंद्राच्या माध्यमातून बऱ्याच दिवसाची मागणी पूर्ण होत आहे. हा आनंदाचा क्षण आहे. हिंगोली येथे परिपूर्ण आकाशवाणी केंद्र सुरु झाल्यास येथील नागरिकांची सोय होणार आहे, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन आकाशवाणी एफएम रिले केंद्र हिंगोलीचे तंत्रज्ञ एस.वी. पांडे, तंत्रज्ञ एम.बी. संत, आकाशवाणी नांदेड केंद्राचे केंद्र अभियंता आनंद ठेंगे, वरिष्ठ  तंत्रज्ञ शिवकुमार बुके, आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सतीश जोशी, अभियांत्रिकी विभाग प्रमुख एल.वी.पाथरीकर, अभियंता सहायक समीर ठाकरे, अभियंता सहायक आर.वी.एस.एस. श्रीनिवास यांनी केले. तर सूत्रसंचालन सीमंतिनी कुंडिकर यांनी केले.  यावेळी अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

 

मौजे गोळेगाव येथील बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापना करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील गोळेगाव ता. औंढा ना. जि. हिंगोली येथे एका अल्प वयीन मुलींचे दि. 23 एप्रिल, 2023 रोजी बाल विवाह होणार असल्याबाबत पोलीस प्रशासनास गोपनीय माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर.मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही. के.झुंजारे सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती डी.सी.लोकडे, पोलीस उप निरीक्षक बी.एस. खारडे यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ती श्रीमती रेशमा पठाण यांनी सदर घटनास्थळी भेट देवून उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम-2006 अंतर्गत मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे वय मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात, व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परीणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. व बालीकेच्या आई-वडीलांकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होई पर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहुन घेण्यात आला.

यावेळी गोळेगाव येथील अंगणवाडी सेविका श्रीमती पुष्पा सरपाते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश थिटे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी पी.जी.देशमुख आदिं उपस्थित होते.

******

27 April, 2023

 

जलजीवन मिशनची कामे तात्काळ पूर्ण करावीत

कामात दिरंगाई करणाऱ्याविरुध्द प्रशासकीय कारवाई करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर





हिंगोली (जिमाका), दि. 27 : जलजीवन मिशन अंतर्गतची अपूर्ण कामे व अद्याप सुरु न केलेली कामे तात्काळ सुरु करुन पूर्ण करावेत. या कामात दिरंगाई केल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योनांच्या कामांच्या प्रगतीबाबत तसेच पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे उपस्थित होते.

जलजीवन मिशन अंतर्गत जी कामे अद्याप सुरु झाली नाहीत त्या सर्व कंत्राटदारांना दोन दिवसाच्या आत सुरु करण्याबाबत नोटीस द्यावी. नोटीस देऊनही कामे सुरु न केल्यास त्यांची सुरक्षा अनामत जप्त करुन त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याची कार्यवाही निविदेच्या करारातील अटी व शर्तीनुसार करावी. त्याचप्रमाणे जे अधिकारी, कर्मचारी, अभियंता या कार्यक्रमातील कामे करण्यास निष्काळजीपणा , दिरंगाई केल्यास अशा सर्वांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. तसेच गावातील नळ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधी अडचण निर्माण करत असतील तर अशा गावांमधील सरपंच यांच्यावर कलम 39(3) नुसार अपात्रतेची कार्यवाही प्रस्तावित करावी. संबंधित गावातील ग्रामसेवकावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये पाणी टंचाईबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना जिल्हाधिकानी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

तसेच पुनरजोडणी अंतर्गतची कामे माहे जून 2023 अखेर पूर्ण होतील असे नियोजन करावे. त्याचप्रमाणे नवीन नळ पाणी पुरवठा योजनांची कामे माहे डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सर्व संबंधितांना दिल्या.

यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व उप अभियंता, शाखा अभियंता, डब्ल्यूएपीसीओएस कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

******

 

कृषि उत्पन्न बाजार समिती मतदान व मतमोजणी केंद्रात

मोबाईल वापरण्यास बंदी

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पारदर्शक, भयमुक्त व निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 3 (चार) अन्वये मतदान व मतमोजणी कामाची गोपनीयता भंग होणार नाही. यासाठी मतदान आणि मतमोजणी केंद्रामध्ये तसेच 100 मीटरच्या परिसरात मोबाईल, पेजर, इलेक्ट्रॉनिक डायरी, आयपॅड, टॅब व तत्सम इलेक्ट्रॉनिक्स साहित्य वापरण्यास व जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

या आदेशाची मतदान व मतमोजणी केंद्रावरील नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नवनाथ वगवाड, निवडणूक निर्णय अधिकारी कृषि उत्पन्न बाजार समिती, हिंगोली तथा तहसीलदार, हिंगोली यांनी दिले आहेत.

****

हिंगोली आकाशवाणी केंद्राचे 28 एप्रिल रोजी उद्घाटन

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील रिसाला बाजार येथे आकाशवाणी एफ.एम. केंद्र सुरु करण्यात आले आहे. या आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन दि. 28 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमास केंद्रीय माहिती प्रसारण तथा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, माहिती व प्रसारण , मस्त्य, दुग्ध व पशुपालन राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आ. प्रज्ञा सातव उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन रमेश घरडे, उपमहानिदेशक (क्लस्टर हेड), आकाशवाणी, नागपूर यांनी केले आहे.

****** 

26 April, 2023

 

खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : येथील कृषि विभागाच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि. 25 एप्रिल, 2023 रोजी खरीप हंगाम 2023 पूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्याक्रमास विभागीय कृषि सहसंचालक, लातुर विभाग लातुर कार्यालयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तिर्थकर, तंत्र अधिकारी श्री. विर यांनी खरीप हंगाम नियोजन बाबत मार्गदर्शन केले. हरिद्रा येथील कृषि संशोधन तांत्रिक अधिकारी रमेश देशमुख यांनी हळद पिक लागवड बाबत मार्गदर्शन केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र, तोंडापुर येथील शास्त्रज्ञ श्री. भालेराव यांनी सोयाबीन / तुर/ कापूस पिक लागवड तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. श्री. ओळंबे यांनी हळद पिक मुल्यवर्धन व फळबाग लागवड बाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी खरीप हंगाम पूर्व करावयाची कामे बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी श्री. वाघ, सर्व तालुका कृषि अधिकारी, सर्व मंडळ कृषि अधिकारी, सर्व कृषि पर्यवेक्षक सर्व कृषि सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कृषि सहाय्यक ते कृषि पर्यवेक्षक विभागीय परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कृषि पर्यवेक्षक यांचा श्री. तिर्थकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.बी. बंटेवाड यांनी केले व आभार प्रदर्शन तंत्र अधिकारी विस्तार श्री.वळकुंडे यांनी केले.

******

 

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडूंचा सत्कार

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : सन 2022-23 या वर्षात हिंगोली जिल्ह्यातील कुस्ती क्रीडा प्रकारातील शालेय व सांगली येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती महिला गट कु. भाग्यश्री दत्ता डुमणे ब्रान्झ पदक प्राप्त, राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा चंद्रपूर येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत व 19 वर्ष मुले या गटात स्वप्नील सावळे व विजय चव्हाण यांनी ब्रान्झ पदक प्राप्त केले. या सर्व खेळाडूंचा सत्कार येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी दि. 25 एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय हॉल येथे करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बॅडमिंटन असोसिएशनतर्फे 1100 रुपये भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

 

****

 

विम्याची रक्कम अदा करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते अद्यावत करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे पिकविम्याची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग करण्यास अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आपले बँक खाते अद्यावत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, नोडल अधिकारी बंटेवाड, ॲग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक एस.डी.सावंत, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, सन 2022 च्या खरीपाचे पिकविम्याचे पैसे त्यांचे बँक खाते अद्यावत नसल्यामुळे 43 लाख रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणे शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या आठ दिवसात आपली बँक खाते अद्यावत करुन घ्यावीत, म्हणजे सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकता येईल. तसेच यावर्षी रब्बी हंगामाचा पीक विमा भरला आहे. तसेच हवामान आधारित फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी सध्या वादळ व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या फळ पिकांची इंटिमेशन विमा कंपनीकडे द्यावेत. तसेच पिक विम्यासंदर्भात प्राप्त झालेला तक्रारीचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.  

****

 

 

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात

संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 26 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कृषि मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दिनांक 1 मे रोजी येथील पोलिस कवायत मैदानावर सकाळी 8.00 वाजता होणार आहे. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. 

महाराष्ट्र दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाचा मुख्य समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या सर्व विभागानी आपली जबाबदारी योग्यपणे व इतर विभागाशी समन्वय ठेवून पार पाडावी. सर्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस मुख्यालयावर मुख्य ध्वजारोहणाच्या अनुषंगाने मंडप, मैदानाची दुरुस्ती, ध्वजस्तंभाची रंगरंगोटी या व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करावे.  त्याप्रमाणेच मुख्य कार्यक्रमात पथ संचलनात सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचारी व विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

****

 



चला जाणूया नदीला अभियानात हिंगोली जिल्हा अग्रेसर

- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा

 

* नदी काठावरील वाढलेले अतिक्रमण कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे

* दोन महिन्यात शासनाला आराखडा सादर करण्यात येईल-जिल्हाधिकारी

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील कार्यालयीन फळी, नदी प्रहरी, नदी समन्वयक, जलदूत सक्रीय सहभागी होतात आणि त्यांना गावकरी मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात ही मोठी जमेची बाजू आहे. कयाधू जनसंवाद यात्रा आज समारोप होत असून हा पहिला टप्पा हिंगोली जिल्ह्याने सर्वात प्रथम पूर्ण केला आहे. तसेच चला जाणूया नदीला अभियानामध्ये हिंगोली जिल्हा अग्रेसर जिल्हा असल्याचे प्रतिपादन जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी यावेळी केले.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन हिंगोली, वन विभाग हिंगोली आणि  उगम ग्रामीण विकास संस्था हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने चला जाणूया नदीला अभियानंतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कयाधू नदी जनसंवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यावेळी डॉ. राणा बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य सर्वश्री. नरेंद्र चुग, जयाजी पाईकराव, नदी समन्वयक तानाजी भोसले, डॉ.संजय नाकाडे, सुशिलाताई पाईकराव, हर्षवर्धन परसावळे, उपविभागीय अधिकारी डॉ.उमाकांत पारधी, वन परिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवारआदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, महाराष्ट्र हे देवाचे लाडके राज्य असल्याने येथे सरासरी पर्जन्यमान 700 ते 750 मिमी इतके आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे प्रमाण खूप आहे. त्यामध्ये मराठवाड्यात दुष्काळाचे सावट खूप मोठे आहे याचे कारण पाणी व्यवस्थापन नाही. राज्यात विकास व्हावा म्हणून यंत्रणा पुढे आली आणि यामुळे पाणी उपसा, वृक्षतोड व अन्य नैसर्गिक साधन संपत्ती संपुष्टात येत आहे. अशा प्रगतीला विकास म्हणावा की विकास म्हणावा हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहतो, असे सांगितले.  

कुरुंदा येथे बंधाऱ्याचे 4 पिल्लर असून त्यातील 3 पिल्लर पर्यंत बाजूच्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे आणि 01 पिल्लर केवळ नदीसाठी आहे. असे अतिक्रमण वाढले तर नदी मध्ये पाणी मुरण्यासाठी आवश्यक असणारी गवताळ जैवविविधता नष्ट होईल आणि नदीचा प्रवाह बदलून जाईल. नदी काठावरील माती वाहून नदीत येईल आणि नदी पात्र उथळ होईल. त्यामुळे नदी काठावरील वाढलेले अतिक्रमण कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. राणा यांनी सांगितले.

जमिनीचे तीन प्रकार असतात जिथे शंभर वर्षात एकदा पुर पोहचतो, जिथे 500 वर्षात एकदा पण पुर पोहचला नाही आणि जिथे 10 वर्षात एकदा पुर येतो. जिथे 10 वर्षात एकदा दुष्काळ अशा ठिकाणी पुर व्यवस्थापन साठी नियोजन होणे गरजेचे आहे. कारण पूर्वी दोन टक्के पुराचे प्रमाण होते. आता 30 टक्के पुराचे प्रमाण वाढले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कुरुंदा या गावात पुराचे असल्याचे डॉ.राणा यांनी सांगितले.

नदीचे क्रॅक (facture) शोधणे गरजेचे आहे. हे क्रॅक पाणी जिरविण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. शासनाने जर ह्या क्रॅकचा उपयोग घेतला तर पाणी पातळी वाढविण्यासाठी मोलाची भूमिका ठरेल.  शेरणी नदीच्या परिसरामध्ये नदीला पाणी नव्हते म्हणून तेथील लोक बंदूक घेऊन चोऱ्या करीत होते. पण जेव्हा नदी पुनर्जीवित झाली तेव्हा सर्वानी शस्त्र फेकून दिले. पाणी आपल्या जीवनात अविभाज्य घटक तर आहेच त्याचे प्रमाण जर वाढले तर प्रगती होईल आणि तो खरा विकास असेल, असे प्रतिपादन डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

            राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पेतून जला जाणूया नदीला हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कयाधू व आसना नदीला पुनरजिवित करण्यासाठी ही एक चळवळ तयार करण्यात आली आहे. ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचून नदीवर काम करणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यामाध्यमातून खऱ्या अर्थाने नदीला जिवंत करण्यासाठी काम करण्यात येईल. तसेच नदीवरील झालेले अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. नदीचे अतिक्रमण, नदीविषयी करावयाच्या कामाचा आराखडा सर्व विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे. जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी आमच्यात सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवला आहे. येत्या दोन महिन्यात आराखडा तयार करुन शासनाला सादर करण्यात येणार आहे. एवढ्यावरच न थांबता जिल्हास्तरावर उपलब्ध निधीचा वापर व लोकसहभाग घेऊन नदीतील छोटी-छोटी कामे करण्यात येणार आहेत. तसेच गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाच्या माध्यमातून नदीतील गाळ काढून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक होऊन त्यांचा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

            नदीचे पुनरजीवन करण्यासाठी व नदी संरक्षित करण्यासाठी पाण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपणच आपल्या पाण्याचे स्त्रोत वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्थानिक जनता आपले काम समजून या मोहिमेत सहभागी व्हावेत. सर्वांनी पुढाकार घेऊन पाण्याचा गैरवापर टाळल्यास चला जाणूया नदीला ही संकल्पना नक्कीच यशस्वी होईल, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी संजय दैने यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राला दुष्काळ व पुरापासून वाचवविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन समजून घेतले पाहिजेत. या मोहिमेच्या माध्यमातून जलयोध्दा, जलप्रहरी यांची मोठी फळी निर्माण झाली असून या माध्यमातून नदीला अमृतवाहिनी बनविण्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. यासाठी सर्व नदी प्रहरी यांनी प्रत्येक गावात जाऊन आसना व कयाधून नदीचे पुनरजीवन करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आराखडा तयार करुन तो शासनाला सादर करण्यात येणार आहे. पाण्याचा साचेबध्द ताळेबंद करुन वापर केला तर आसना व कयाधू नदी पुन्हा अविरत वाहतील, अशी अपेक्षा चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य नरेंद्र चुग यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयाजी पाईकराव यांनी केले. सूत्र संचालन कांबळे यांनी केले, तर आभार नदी समन्वयक तानाजी भोसले यांनी मानले. पाणी आणि सामाजिक विषयावर शाहीर धम्मानंद इंगोले व त्यांच्या संचनानी प्रबोधन केले.

यावेळी अधिकारी, कर्मचारी, नदी प्रहरी, जलयोध्दे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******