11 April, 2023

 

सामाजिक न्याय विभागातर्फे

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 

  • मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीचा शुभारंभ
  • विविध योजनेची जनजागृती होण्यासाठी मोबाईल व्हॅनचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन
  • विविध स्पर्धेत विजयी उमेदवारांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस व प्रमाणपत्राचे वाटप





 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने दि. 11 एप्रिल, 2023 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त  विविध कार्यक्रम घेण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती  निमित्ताने  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक परिसरात महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, समाज भूषण पुरस्कारार्थी  मधुकर मांजरमकर, डॉ. विजय निलावार, हर्षवर्धन परसवाळे, रत्नाकर महाजन, डॉ.संजय नाकाडे, मधुकर या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी महामानवास अभिवादन करुन महात्मा ज्योतिबा फुले चौक येथून समता रॅलीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून समता रॅलीचा शुभारंभ  करण्यात आला. या रॅलीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे हुबेहुब प्रतिकृतीची  भूमिका कु.पुजा विलास कुऱ्हे यांनी बजावली तर सावित्रीबाई फुले यांची हुबेहुब प्रतिकृतीची  भूमिका कु. पुजा भुइनवार यांनी बजावली. तसेच ही रॅली हिंगोली शहरातील अग्रसेन चौक, इंदिरा गांधी  यांचा पुतळा, महात्मा गांधी यांचा पुतळा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळयास पुष्पहार अर्पण करुन या रॅलीचा समारोप  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे करण्यात आला. या रॅलीमध्ये प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, बाभुळगांव, गांगलवाडी  व औंढा ना., तसेच मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी / कर्मचारी शिक्षक कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. रॅलीच्यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्तम बंदोबंदासह मोलाचे सहकार्य केले. तसेच आरोग्य विभागचे पथकही रॅलीच्या समवेत उपस्थित होते.

येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवाच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुनिल महेंद्रकर, माळी समाजाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक चंदु लव्हाळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके, समाज भुषण पुरस्कारर्थी तथा महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कारर्थी  डॉ.विजय निलावार, समाज भुषण पुरस्कारार्थी मधुकर मांजरमकर, जयाजी पाईकराव, हर्षवर्धन परसवाळे, सुरेश शेळके, डॉ.संजय नाकाडे, सिध्दार्थ गोवंदे  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.            यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर ॲड.साहेबराव सिरसाट यांनी व्याख्यान दिले.

यावेळी हिंगोली जिल्हाभरातून घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धा, निंबध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना  अनुक्रमे 2 हजार, दीड हजार, एक हजार याप्रमाणे धनादेश स्वरुपात बक्षीस व प्रमाणपत्राचे 12 विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यालय अधीक्षक सत्यजीत नटवे यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनेची जनजागृती होण्यासाठी व त्याचा लाभ जनसामान्यांना होण्यासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बार्टी,हिंगोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

*****

No comments: