13 April, 2023

 

एप्रिल महिना हिवताप जनजागृती महिना म्हणून साजरा करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस "जागतिक हिवताप दिन " म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी 01 एप्रिल ते 30 एप्रिल हा संपूर्ण महिना हिवताप जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जनतेमध्ये हिवतापाविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनाची अंमलबजावणी करणे व जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक/सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण, अॅबेटिंग, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवणे, गप्पीमासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनाविषयी आरोग्य शिक्षण देणे, गटसभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार भारतामध्ये सन 2030 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी दिनांक 01 एप्रिल ते 30 एप्रिल, 2023 या कालावधीत ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 01 एप्रिल ते 30 एप्रिल यादरम्यान संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यात यावे. तसेच हिवताप, डेंग्यू, चिकनगुणिया या किटकजन्य आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे, नाल्या/गटारे वहाते ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छरदानीचा वापर करावा, खिडक्यांना जाळ्या बसव्यावात, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर याची विल्हेवाट लावावी, कुलर/फिजच्या ड्रिपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे, पाण्याचा हौद, टाक्या, रांजन इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे. थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाचे लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन योग्य तो औषध उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.

 

*****

No comments: