25 April, 2023

 

नदीची सभ्यता टिकविण्यासाठी सर्वांनी पाऊल उचलणे गरजेचे

- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा




 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सूर्याकडून होणाऱ्या बाष्पीभवनाची टक्केवारी कमी करण्यासाठी पाण्याला जमिनीच्या गर्भात ठेवले पाहिजे. जमीन सर्वात मोठी बँक आहे तिच्यावर जीवनाचा प्रवास अवलंबून आहे. नदीची सभ्यता नष्ट होण्यापूर्वी तेथील जैविक सभ्यता नष्ट होत असते. त्यामुळे सभ्यता टिकविण्यासाठी सर्वानी पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत वसमत येथे आयोजित सभेत केले.  

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन हिंगोली, वन विभाग हिंगोली आणि  उगम ग्रामीण विकास संस्था हिंगोली, सर्व शिक्षक संघटना वसमत, औंढा ना. यांच्या संयुक्त विद्यमाने चला जाणूया नदीला अभियानंतर्गत वसमत येथे आसना नदी जनसंवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यावेळी डॉ. राणा बोलत होते.  यावेळी चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य सर्वश्री. नरेंद्र चुग, प्रमोद देशमुख, सुमंत पांडे, जयाजी पाईकराव, नदी समन्वयक तानाजी भोसले, बालाजी नरवाडे, सुशिलाताई पाईकराव, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, समाज कल्याणचे विभागीय उपायुक्त अविनाश देवसटवार, वन परिक्षेत्र अधिकारी शेळके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, महाराष्ट्र सर्वात जास्त बांध असलेले राज्य असून सुध्दा सर्वात जास्त पाणी उपसा महाराष्ट्रामध्ये होतो. त्याच बरोबर सर्वात जास्त आत्महत्या सुध्दा महाराष्ट्रात होतात, ही दुखा:ची बाब आहे. आपण धरतीमातेचे दुध कधीच समाप्त केले आहे. आता आपण धरतीआईचे रक्त पीत आहोत. पुनर्भरण मोठ्याप्रमाणावर होत आहे, पण संतुलित वापर हा प्रकार अजून लोकांमध्ये दिसत नसल्याचे त्यांनी मार्गदर्शनातून नमूद केले. नदीला पुनर्जीवित करण्यासाठी शासन, महाजन, समाज व संत एकत्र येणे गरजेचे आहे. नदी पुनर्जीवनाचे टप्पे ठरलेले असून जन संवाद यात्रा याचाच एक भाग आहे. सर्वानी मिनिटे देऊन भागणार नाही तर समोर ध्येय आणि सातत्य ठेवून काम करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

इंग्रज भारतातून गेले तेव्हा त्यांनी निर्माण केलेल्या व काबीज केलेल्या सर्व बाबी नियंत्रणासाठी सरकारच्या हाती दिल्या. मात्र पाणी स्वातंत्र्य राहिले ही चांगली घटना झाली. नाहीतर बहुतांश लोकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागले असते. परंतु ते दिवस जास्त दूर नाहीत. आफ्रिकेमध्ये कंपनीने सर्व पाणी विकत घेतले आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर दारु देतात मात्र पाणी नाही. हीच वाटचाल आपण करताना दिसत आहे. त्यामुळे पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब जिरवला पाहिजे व मोजून वापरला पाहिजे तर पाणी समृद्धी होणे शक्य आहे. पाणी उपसा, वृक्षतोड, नगदी पिकांचा अवलंब व पर्यावरणाचा ऱ्हास हा विकासाच्या नावाखाली होत असलेला विनाश असल्याची भावना व्यक्त केली. यामुळे वातावरणीय बदल होत आहेत. अवेळी पाऊस येतो, जास्त तापमान वाढते, बैलाच्या एका शिंगावर पाऊस पडतो तर दुसऱ्या शिंगावर पाऊस पडत नाही. जर अशी स्थिती निर्माण होत असेल तर आपण कोणत्या विकासाकडे जात आहे याचा विचार करण्याची नितांत गरज आहे, असेही डॉ. राणा यांनी सांगितले.

पाणी आपण निर्माण करु शकत नाही तसेच पडणारा पाऊस आपल्याकडेच पडेल याची शाश्वतता नाही म्हणून पाण्याचे नियोजन करा. पूर्वी विशिष्ट दगडापर्यंत पाणी आले म्हणजे किती पिक घेता येतात त्याचा ठोकटाळे असत पण आता तसा काही ठोकताळा राहिला नाही. आता शेजारील पाणी उपसा करतो मग आम्ही उपसा करायचा. राजस्थानमध्ये जेवढे पाणी वाया घातले तेवढे आयुष्यातील दिवस कमी झाले अशी समज आहे. कारण ते पाण्याला तेवढे महत्व देतात.

पाण्याचा आदर करा, पुनर्वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा व पुनर्जीवित करा अशा सूचना डॉ. राणा यांनी दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी भोसले यांनी केले. तसेच नरेंद्र चुग, प्रमोद देशमुख, सुमंत पांडे व जयाजी पाईकराव यांनीही मार्गदर्शन केले. तर सूत्र संचालन नामदेव दळवी व शिवानंद पोटे यांनी केले. यावेळी जनसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या शिक्षक, विद्यार्थी, नदी प्रहरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक संघटना, श्याम संगेवार, दिशांत पाईकराव, बालाजी नरवाडे, विकास कांबळे, सिद्धार्थ निनूले व दीपक सागरे यांनी प्रयत्न केले.

******

No comments: