10 April, 2023

 

‘अल निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे निर्माण होणाऱ्या

संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध पाणी जपून वापरावेत

                                                        -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 :  भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील अल निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहे जून, 2023 नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आश्यक आहे. तसेच चालू उन्हाळ्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास विचारात घेता अचानकपणे पाणीसाठी खालावू शकतो. या परिस्थितीवर आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. त्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री. उमाकांत पारधी, डॉ. सचिन खल्लाळ, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक र. वि. मांजरमकर उपस्थित होते.  

‘अल निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे माहे जुलै ते ऑगस्ट, 2023 या कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी उपलब्ध पाण्याचा वापर  जपून करावेत. प्रकल्पाच्या ठिकाणचे अनिधकृत विद्यूत पंप कनेक्शन आहेत ते काढून घ्यावेत. सदर विद्युत पंप काढून न घेतल्यास त्यांच्याविरुध्द जप्तीची कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पातून सिंचन व इतर प्रयोजनासाठीच्या नियोजित आवर्तनाचे पुनर्विलोकन करुन संभाव्‍य पाणी टंचाई निवारणासाठी पुरेसा पाणीसाठी उपलब्ध राहील याचे नियोजन करावे. जेणे करुन उशीरा अथवा कमी पर्जन्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण झाली तरी पिण्याच्या पाणी उपलब्धतेबाबत अनिष्ट परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी बैठकीत दिले.

उन्हाळ्यासह आगामी जुलै-ऑगस्ट या कालावधीत टंचाई निवारणासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी सुयोग्य स्त्रोत सुनिश्चित करण्याची कार्यवाही करावी. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी गावे, वस्त्या व पाण्याचे स्त्रोत यांचे तालुकानिहाय, जिल्हानिहाय आराखडे तयार करावेत. अत्यंत बिकट परिस्थितीतही बाधित गावांना टँकरने पाणी पुरवठ्यासाठी नियोजन करावे. ग्रामीण भाग तसेच शहरी भागांसाठीही पिण्याच्या पाण्यासह आवश्यक पाणी पुरवठ्यासाठी नियोजन करावे. विशेषत: शहरांसाठी धरणातील पाणीसाठा आधीच कमी आहे अशा ठिकाणी पाणी वापराच्या सर्व प्रयोजनासाठी काही अंशी पाणी कपात करण्याचे नियोजन करावेत. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्ग रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे. जलसंधारणासाठी विशेषत: पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्त शिवार, अटल भूजल योजना, पाऊस पाणी संकल्न (रेन वॉटर हार्वेस्टींग), कॅच द रेना-पिण्याचे पाणी स्त्रोत बळकटीकरण या योजना अभियान स्वरुपात राबवाव्यात. जल जीवन मिशन अंतर्गत रेट्रोफिटींग अंतर्गत नियोजित कामे तसेच स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची कामे जून 2023 पर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन करावेत. वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यातील जल पातळीवर लक्ष द्यावे. पिण्याच्या पाणी पुरवठ्यासह जनावरांसाठी आपत्कालीन स्थितीत पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच जनतेनेही आपणाकडे असलेल्या पाणीसाठ्याचा जपून वापर करावा. म्हणजे भविष्यात पाण्याची अडचण भासणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी यावेळी केले.  

****

No comments: