26 April, 2023

 



चला जाणूया नदीला अभियानात हिंगोली जिल्हा अग्रेसर

- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा

 

* नदी काठावरील वाढलेले अतिक्रमण कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे

* दोन महिन्यात शासनाला आराखडा सादर करण्यात येईल-जिल्हाधिकारी

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील कार्यालयीन फळी, नदी प्रहरी, नदी समन्वयक, जलदूत सक्रीय सहभागी होतात आणि त्यांना गावकरी मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात ही मोठी जमेची बाजू आहे. कयाधू जनसंवाद यात्रा आज समारोप होत असून हा पहिला टप्पा हिंगोली जिल्ह्याने सर्वात प्रथम पूर्ण केला आहे. तसेच चला जाणूया नदीला अभियानामध्ये हिंगोली जिल्हा अग्रेसर जिल्हा असल्याचे प्रतिपादन जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी यावेळी केले.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन हिंगोली, वन विभाग हिंगोली आणि  उगम ग्रामीण विकास संस्था हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने चला जाणूया नदीला अभियानंतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कयाधू नदी जनसंवाद यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यावेळी डॉ. राणा बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य सर्वश्री. नरेंद्र चुग, जयाजी पाईकराव, नदी समन्वयक तानाजी भोसले, डॉ.संजय नाकाडे, सुशिलाताई पाईकराव, हर्षवर्धन परसावळे, उपविभागीय अधिकारी डॉ.उमाकांत पारधी, वन परिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवारआदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, महाराष्ट्र हे देवाचे लाडके राज्य असल्याने येथे सरासरी पर्जन्यमान 700 ते 750 मिमी इतके आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे प्रमाण खूप आहे. त्यामध्ये मराठवाड्यात दुष्काळाचे सावट खूप मोठे आहे याचे कारण पाणी व्यवस्थापन नाही. राज्यात विकास व्हावा म्हणून यंत्रणा पुढे आली आणि यामुळे पाणी उपसा, वृक्षतोड व अन्य नैसर्गिक साधन संपत्ती संपुष्टात येत आहे. अशा प्रगतीला विकास म्हणावा की विकास म्हणावा हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहतो, असे सांगितले.  

कुरुंदा येथे बंधाऱ्याचे 4 पिल्लर असून त्यातील 3 पिल्लर पर्यंत बाजूच्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे आणि 01 पिल्लर केवळ नदीसाठी आहे. असे अतिक्रमण वाढले तर नदी मध्ये पाणी मुरण्यासाठी आवश्यक असणारी गवताळ जैवविविधता नष्ट होईल आणि नदीचा प्रवाह बदलून जाईल. नदी काठावरील माती वाहून नदीत येईल आणि नदी पात्र उथळ होईल. त्यामुळे नदी काठावरील वाढलेले अतिक्रमण कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. राणा यांनी सांगितले.

जमिनीचे तीन प्रकार असतात जिथे शंभर वर्षात एकदा पुर पोहचतो, जिथे 500 वर्षात एकदा पण पुर पोहचला नाही आणि जिथे 10 वर्षात एकदा पुर येतो. जिथे 10 वर्षात एकदा दुष्काळ अशा ठिकाणी पुर व्यवस्थापन साठी नियोजन होणे गरजेचे आहे. कारण पूर्वी दोन टक्के पुराचे प्रमाण होते. आता 30 टक्के पुराचे प्रमाण वाढले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कुरुंदा या गावात पुराचे असल्याचे डॉ.राणा यांनी सांगितले.

नदीचे क्रॅक (facture) शोधणे गरजेचे आहे. हे क्रॅक पाणी जिरविण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. शासनाने जर ह्या क्रॅकचा उपयोग घेतला तर पाणी पातळी वाढविण्यासाठी मोलाची भूमिका ठरेल.  शेरणी नदीच्या परिसरामध्ये नदीला पाणी नव्हते म्हणून तेथील लोक बंदूक घेऊन चोऱ्या करीत होते. पण जेव्हा नदी पुनर्जीवित झाली तेव्हा सर्वानी शस्त्र फेकून दिले. पाणी आपल्या जीवनात अविभाज्य घटक तर आहेच त्याचे प्रमाण जर वाढले तर प्रगती होईल आणि तो खरा विकास असेल, असे प्रतिपादन डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

            राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पेतून जला जाणूया नदीला हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कयाधू व आसना नदीला पुनरजिवित करण्यासाठी ही एक चळवळ तयार करण्यात आली आहे. ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचून नदीवर काम करणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यामाध्यमातून खऱ्या अर्थाने नदीला जिवंत करण्यासाठी काम करण्यात येईल. तसेच नदीवरील झालेले अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. नदीचे अतिक्रमण, नदीविषयी करावयाच्या कामाचा आराखडा सर्व विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे. जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी आमच्यात सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवला आहे. येत्या दोन महिन्यात आराखडा तयार करुन शासनाला सादर करण्यात येणार आहे. एवढ्यावरच न थांबता जिल्हास्तरावर उपलब्ध निधीचा वापर व लोकसहभाग घेऊन नदीतील छोटी-छोटी कामे करण्यात येणार आहेत. तसेच गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाच्या माध्यमातून नदीतील गाळ काढून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक होऊन त्यांचा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

            नदीचे पुनरजीवन करण्यासाठी व नदी संरक्षित करण्यासाठी पाण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपणच आपल्या पाण्याचे स्त्रोत वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्थानिक जनता आपले काम समजून या मोहिमेत सहभागी व्हावेत. सर्वांनी पुढाकार घेऊन पाण्याचा गैरवापर टाळल्यास चला जाणूया नदीला ही संकल्पना नक्कीच यशस्वी होईल, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी संजय दैने यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राला दुष्काळ व पुरापासून वाचवविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन समजून घेतले पाहिजेत. या मोहिमेच्या माध्यमातून जलयोध्दा, जलप्रहरी यांची मोठी फळी निर्माण झाली असून या माध्यमातून नदीला अमृतवाहिनी बनविण्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. यासाठी सर्व नदी प्रहरी यांनी प्रत्येक गावात जाऊन आसना व कयाधून नदीचे पुनरजीवन करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आराखडा तयार करुन तो शासनाला सादर करण्यात येणार आहे. पाण्याचा साचेबध्द ताळेबंद करुन वापर केला तर आसना व कयाधू नदी पुन्हा अविरत वाहतील, अशी अपेक्षा चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य नरेंद्र चुग यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयाजी पाईकराव यांनी केले. सूत्र संचालन कांबळे यांनी केले, तर आभार नदी समन्वयक तानाजी भोसले यांनी मानले. पाणी आणि सामाजिक विषयावर शाहीर धम्मानंद इंगोले व त्यांच्या संचनानी प्रबोधन केले.

यावेळी अधिकारी, कर्मचारी, नदी प्रहरी, जलयोध्दे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

No comments: