28 April, 2023

 

मौजे गोळेगाव येथील बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात बाल विवाह समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापना करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील गोळेगाव ता. औंढा ना. जि. हिंगोली येथे एका अल्प वयीन मुलींचे दि. 23 एप्रिल, 2023 रोजी बाल विवाह होणार असल्याबाबत पोलीस प्रशासनास गोपनीय माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर.मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही. के.झुंजारे सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती डी.सी.लोकडे, पोलीस उप निरीक्षक बी.एस. खारडे यांच्या सहकार्याने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ती श्रीमती रेशमा पठाण यांनी सदर घटनास्थळी भेट देवून उपस्थित सर्वांना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम-2006 अंतर्गत मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे वय मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात, व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परीणाम या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. व बालीकेच्या आई-वडीलांकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होई पर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब लिहुन घेण्यात आला.

यावेळी गोळेगाव येथील अंगणवाडी सेविका श्रीमती पुष्पा सरपाते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश थिटे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी पी.जी.देशमुख आदिं उपस्थित होते.

******

No comments: