03 April, 2023

 

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रती थेंब अधिक पिक

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात 10 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी घेतला लाभ

·        6 हजार 719 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रती थेंब अधिक पिक ही केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे.

सन 2014-15 पर्यंत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 80:20 (केंद्र 80 टक्के व राज्य 20 टक्के) या प्रमाणात राबविण्यात येत होती. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 निश्चित केलेले आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा अत्यल्प व अल्प भूधारक अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभ घेता येते.

योजनेची उद्दिष्ट्ये :

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे. समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेची उद्दिष्टे आहेत.

योजनेत अंतर्भूत घटक :

ठिबक सिंचन : इन लाईन, ऑऊटलाईन, सबसरफेस, मायक्रोजेट, फॅनजेटस हे घटक अंतर्भूत आहेत .
तुषार सिंचन : सुक्ष्म तुषार संच, मिनी तुषार संच, पोर्टेबल स्प्रिंकलर (हलविता येणारे तुषार संच) व रेनगन.सेमी परमनंट इरिगेशन सिस्टीम या घटकाचा समावेश आहे.

अनुदान मर्यादा :

अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी अनुदानाची मर्यादा 55 टक्के आहे, तर सर्वसाधारण भूधारकांसाठी 45 टक्के आहे.

गेल्या दोन वर्षात 10 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी घेतला लाभ :

हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन संच मिळविण्यासाठी सन 2021-22 मध्ये 5701 महाडीबीटी पोर्टलव्दारे  सहभाग नोंदवलेला आहे. त्यापैकी 5579 लाभार्थ्यांना 977.82 लाख रुपये अनुदान अदा करण्यात आले आहे. यामुळे 3643.51 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे.

तसेच सन 2022-23 मध्ये 8035 लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलव्दारे  ऑनलाईन सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी 4711 लाभार्थ्यांनी खरेदी करुन संच कार्यान्वित केलेले आहेत, त्यापैकी 1723 लाभार्थ्यांना 358.28 लाख रुपये अनुदान अदा करण्यात आले आहे. यामुळे  3076 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली  आले आहे.

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजनेत सन 2021-22 मध्ये 5579 आणि सन 2022-23 मध्ये 4711 असे एकूण 10 हजार 290 शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून यामुळे 6 हजार 719 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे,

या योजनेमध्ये राज्य शासनामार्फत अल्प व अत्यल्प भूधारकांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना 30 टक्के इतके पूरक अनुदान देण्यात येते. अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना 75 ते 80 टक्के अनुदान उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून सन 2021-22 व सन 2022-23 या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील 5714 शेतकऱ्यांना 5 कोटी 3 लाख इतके पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली आहे.  

****

No comments: