31 March, 2022

 


जलशक्ती अभियान कॅच द रेनची प्रभावी अंमलबजावणी करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 31 : भारत सरकारने 2019 या वर्षामध्ये जलशक्ती मंत्रालय निर्माण केल्यानंतर एक महिन्याच्या आत लोकसहभागातून संपूर्ण देशात जलद गतीने जलसंधारण व्हावे या उद्देशाने धडक जलसंधारण मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील जास्तीत जास्त पाणीसाठा निर्माण होण्यासाठी व जास्तीत जास्त मत्ता तयार होण्यासाठी गाव आराखडे तयार करुन कामांचे नियोजन करावे. तसेच जलशक्ती अभियान कॅच द रेनची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित बैठकीत दिले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलशक्ती अभियान कॅच द रेन-2022 या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 मार्च, 2022 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, क्रांती डोंबे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, सरकारी कामगार अधिकारी कराड, सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

दि. 3 व 4 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभाचे आयोजन करुन जल शपथ घ्यावी. या शपथ कार्यक्रमाची कार्यवाही करताना ग्रामपंचायतीने गावातील पूर्वीचे जलस्त्रोतांचे नुतनीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि जलस्त्रोताचे पुनर्भरण व नव्याने घ्यावयाचे जलसंधारणाची कामे याबाबत गाव आराखडा तयार करावा. यास ग्रामसभेची मान्यता घेऊन तालुकास्तरावर पाठविण्यात यावा. हा आराखडा सादर करताना कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करुन सादर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी केले.

            या जलशक्ती अभियानात पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करणे, विद्यमान संरचनेची पाणी क्षमता पुनर्संचयित करणे, पाण्याचा पुनर्वापर आणि संरचनेचे पुनर्भरण, जलसंधारण संरचनेसाठी संभाव्य ग्रामस्तरीय योजना, पाणलोट योजना तयार करणे आणि गाव नकाशाचा वापर करुन नियोजनबध्द कार्यक्रम राबवणे, वनक्षेत्र आणि इतर क्षेत्रामध्ये सघन वृक्षारोपण करणे, जमिनीवरील मृद ओलावा संवर्धन, जलशक्ती केंद्र, कृषी माहिती केंद्र स्थापन करणे आणि जलआंदोलनाला लोकसहभागातून व्यापक स्वरुप देण्यासाठी प्रचार करणे, राज्यातील प्रत्येक जलसाठ्याची नोंद करणे, जिओटॅग करणे आणि अधिकार अभिलेखात त्यांची नोंद घेणे आदी कामे करण्यात येणार असून यांची संबंधित यंत्रणेनी याची प्रभावी अंमलबजलावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

             जल शपथ पुढीलप्रमाणे आहे : मी अशी शपथ घेतो/घेते की, मी पाण्याचा सुयोग्य वापर करीन व पाणी वाचवेल.  मी अशी शपथ घेतो/घेते की, मी पाण्याचा प्रत्येक थेंबाचा संचय करीन, व जलशक्ती अभियानामध्ये मन:पूर्वक सहभागी होईन. पाणी ही एक अनमोल संपत्ती आहे असे मानून मी पाण्याचा वापर करीन. मी अशी ही शपथ घेतो की, मी आपले कुटुंबीय , मित्र आणि शेजाऱ्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी व तो वाया न घालवण्यासाठी प्रेरित करीन. हा आपलाच ग्रह आहे व आपणच त्याला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो.

***** 

 

हिवताप जनजागृती महिना साजरा करण्याचे आवाहन

            हिंगोली, (जिमाका) दि. 31 : दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी जनतेमध्ये हिवतापाविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्यासाठी  दि. 1 एप्रिल ते 30 एप्रिल हा संपूर्ण महिना हिवताप जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

            हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत डासअळी सर्व्हेक्षण, जलदताप सर्व्हेक्षण, ॲबेटिंग, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवणे, गप्पीमासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनाविषयी आरोग्य शिक्षण देणे, गटसभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात.

            केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार भारतामध्ये सन 2030 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी दि. 1 एप्रिल ते 30 एप्रिल, 2022 या कालावधीत ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            संपूर्ण जिल्ह्यामध्ये दि. 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यात यावे. तसेच हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या किटकजन्य आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी या मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकन ठेवावे. नाल्या, गटारे वाहते ठेवावेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छर दानीचा वापर करावा, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर याची विल्हेवाट लावावी, कुलर, फ्रिजच्या ड्रिपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे, पाण्याचा हौद, टाक्या, रांजन इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावेत. थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन योग्य तो औषध उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.

***** 

30 March, 2022

बोकड पालनाच्या व्यवसायातून कविताने साधला आर्थिक विकास

 

           प्रतिकूल परिस्थितीवर मात करत औंढा येथील रहिवासी असलेल्या कविता साहेबराव नाईकवाड यांची दीक्षाभूमी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरु असलेली वाटचाल इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. कविता नाईकवाड ह्या महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास व रोजगार निर्मिती या योजनेंतर्गत दीक्षाभूमी स्वयं सहायता महिला बचत गटात मागील 6 वर्षापासून सभासद आहेत.

कविताचा बचत गट महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोली स्थापित लोकसंचलित साधन केंद्र औंढा अंतर्गत स्थापन करण्यात आला आहे. या गटामध्ये येण्या अगोदर त्यांची बचत होत नव्हती. तसेच बँक व्यवहाराबद्दल देखील त्यांना माहिती नव्हती. कविता आणि त्यांचे मालक मिळेल ती मजुरी करुन संसार चालवत होते. कवितानी बचत गटात आल्यानंतर त्यांच्या गटाने सुरुवातीला आय सी आय सी आय बँकेचे 01 लाख रुपयाचे कर्ज घेतले. त्यामधून कविताला 10 हजार रुपये कर्ज मिळाले. या पैशातून त्या मोठा व्यवसाय करु शकत नव्हत्या. परंतु कविताला वाटले एखादी शेळी खरेदी केली तर त्या पासून सहा महिन्यात पैसे मिळतील व ही शेळी शेतात मजुरी काम करत करत चारु शकते. या बाबतीत कविताच्या नवऱ्याने देखील होकार दिला व त्यांनी एक गावातूनच गाभण शेळी खरेदी केली. काही दिवसातच तिला तीन पिल्ले झाले. त्यामध्ये 2 बोकड व एक पाठ होती.

          पुढे पाच महिन्यातच एक व्यापारी कविताच्या घरी आला व त्याने कविताकडे असलेले 2 बोकड दहा हजार रुपये किमतीला खरेदी केले. पूर्ण महिनाभर लोकांच्या शेतात काम करुन दोन अडीच हजार मिळत होते ते आता त्यांना कमी कष्टात शेळी पालनाच्या माध्यमातून मिळाल्याने कविताला समाधान वाटले. तेव्हापासून कविता आणि तिच्या पतीने शेळी पालन व्यवसाय करण्याचे ठरविले. मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या त्यांना चारायला नेणे अवघड होऊ लागले. तसेच घरात आर्थिक अडचण भासू लागल्यामुळे कविताला नाविलाजाने त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या  विकाव्या लागल्या.

          अशातच मागील वर्षी त्यांच्या बचत गटाच्या मॅडम गटाची बैठक घेण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळेस त्यांनी महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास व रोजगार निर्मिती या योजनेअंतर्गत ज्या महिला बोकड पालन करण्यास इच्छुक आहेत अशांची नावे विचारली. तेव्हा कवितांनी त्यांचे नाव दिले. घरची आर्थिक स्थितीही नाजूकच होती. अशात ही योजना त्यांना खूप आधार देणारी वाटली. त्यामुळे कवितांनी या योजनेचा लाभ घ्यायचा असे ठरविले. याला कविताच्या नवऱ्याने देखील संमती दिली. कवितांनी त्यांच्या गटाचे कार्यालय लोकसंचलित साधन केंद्राकडे अर्ज केला. त्या बरोबर एके दिवशी त्यांच्या गटाच्या कार्यालयात बोकड पालन करणाऱ्या महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व महिला तसेच जिल्हा कार्यालयातील जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप, संकेत महाजन सर त्या बरोबर लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक विलास पंडित, लेखापाल प्रिती पारसकर व सर्व सहयोगिनी उपस्थित होत्या.

         महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विलास जगताप सरांनी सर्व निवड केलेल्या महिलांना या योजनेबद्दल माहिती सांगितली. यामध्ये या व्यवसायासाठी निवड केलेल्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून प्रती महिला 01 लाख 20 हजार रुपये मिळणार आहेत असे सांगितले. त्यामध्ये महिलांना शेड मिळणार, तसेच बोकडासाठी लागणारे चारा दाणी, पाणी स्टँड, बोकडाचा विमा या बाबी सांगण्यात आल्या. कवितांने जवळा बाजार येथून माहे जानेवारी मध्ये 10 बोकड खरेदी केले. त्याच ठिकाणी त्यांच्या सर्व बोकडांचा विमा काढण्यात आला.    

         कवितांने सर्व बोकड तीन महिन्याच्या वर वय असलेले खरेदी केले. त्यांची चांगली देखभाल केली त्यामुळे अवघ्या पाच महिन्यात कविताला 40 हजार रुपये निव्वळ नफा झाला. पाच महिने कविता मजुरीने कितीही काम केले असते तरी त्यांना एवढा पैसा मिळाला नसता. खरच या व्यवसायामुळे कविता नाईकवाड व त्यांच्या कुटुंबाला खूप आधार मिळाला आहे. त्यामुळे कविताने हा व्यवसाय जो पर्यंत धडधाकट आहे तो पर्यंत करणार असल्याचे सांगून या योजनेमुळे माझा नक्कीच आर्थिक विकास झाला असल्याचे सांगितले .

 

                                                                                                --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                     माहिती सहायक,

     जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******





 

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन रुग्ण नाही

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यानी दिली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 515 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 111  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

 हळद कुकर वापरतांना काळजी घ्यावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : शेतामध्ये सध्या हळद शिजवण्यासाठी हळद कुकरचा वापर होत आहे. इंधन बचतीसाठी हळद कुकरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. हळद कुकरचा वापर काळजीपूर्वक केला नाही तर जिवघेणा ठरु शकतो. त्यामुळे केंद्र, राज्य शासनाच्या तपासणी केंद्राद्वारे प्रमाणित कुकरचा वापर केल्याने कुकरच्या गुणवत्तेची खात्री मिळेल. पाण्याच्या योग्य पातळीशिवाय कुकरचा वापर करु नका, प्रेशर वॉल्व्ह व प्रेशर गेजची नियमित तपासणी करावी. कुकर जबरदस्तीने उघडू नये. कुकरच्या आत असलेली रबराची रिंग प्रत्येक हंगामाला बदलावी. कुकरचे लिकेज व जाळ लावण्याच्या ठिकाणचा लोखंडी पत्रा याची वेळोवेळी योग्य तपासणी करावी. कुकर स्वच्छ ठेवावेत.

सेनगाव तालुक्यातील कहाकर बु. येथील हळद कुकर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शेतकरी बांधवांनी हळद कुकर वापरतांना वरील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

***** 

 ऱ्हदय शस्त्रक्रियेसाठी बालकांना घेऊन जाणाऱ्या बसला

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 30 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून 0 ते 18 वर्षे वयोगटातील संदर्भित संशयित ऱ्हदयरुग्णांसाठी दि. 8 मार्च, 2022 रोजी येथील जिल्हा रुग्णालयात 2डी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ऱ्हदयशस्त्रक्रिया करण्यासाठी 26 विद्यार्थ्यांना संदर्भीत करण्यात आले होते. यापैकी  15 बालकांच्या ऱ्हदयशस्त्रक्रिया करण्यासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा येथे घेऊन जाणाऱ्या बसला आज दि. 30 मार्च, 2022 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बस रवाना करण्यात आली.

      यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी सर्व बालकांना शुभेच्छा देऊन आरोग्य विभागाचे कौतुक केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, बालरोग तज्ञ डॉ.स्नेहल नगरे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, डीईआयसीचे व्यवस्थापक डॉ. नांदूरकर, प्रशांत तुपकरी, लक्ष्मण गाभणे, ज्ञानोबा चव्हाण व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत उर्वरित 11 बालकांना ऱ्हदयशस्त्रक्रियासाठी लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्क यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांना हा कार्यक्रम वरदान ठरला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 मध्ये यापूर्वी 45 बालकांच्या ऱ्हदयशस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच या कार्यक्रमांतर्गत कर्णबधीर आजार असलेल्या 12 बालकांची कॉकलिअर इप्लांट शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेतलेल्या व योग्य उपचार मिळालेल्या पालकांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  

*****  

29 March, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन रुग्ण नाही

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यानी दिली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 515 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 111  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू

            हिंगोली, (जिमाका) दि. 29 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021 हिंगोली  जिल्ह्याच्या खालील ठिकाणी दि. 03 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी 1) आदर्श महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली भाग-अ, 2)  आदर्श महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली भाग-ब, 3) सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल, शास्त्रीनगर, हिंगोली, 4) पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकोला रोड, हिंगोली, 5) कै. बाबूराव पाटील कला महाविद्यालय, गारमाळ परिसर, हिंगोली, 6) अनुसया विद्यामंदीर खटकाळी बायपास, हिंगोली, 7) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, हिंगोली, 8) संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय अकोला रोड, हिंगोली, 9) जिल्हा परिषद बहुविध प्रशाला हिंगोली,       10) सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, हिंगोली या 10 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार असून या परिक्षा केंद्रावर 2 हजार 352 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. वरील सर्व  परीक्षा केंद्रावर सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****  

 

उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व स्वत:चा बचाव करण्यासाठी  खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

काय करावे :-

·         उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

·         तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

·         हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.

·         प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.

·         जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

·         शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.

·         अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

·         गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

·         घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात  यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

·         कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.

·         पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

 

काय करु नये  :-

·         लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

·         बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.

·         उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.)

·         शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इ. यांचा वापर टाळावा.

·         शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins)असलेले अन्न टाळावे.

*****

 

शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट

दुचाकी वाहन चालवताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल

- उप्रप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याबाबत निदर्शनास येत आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात, असे दिसून आले आहे. यासाठी हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी संबंधी व्यापक मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे आदेश राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहन चालविणारे नागरिक, कर्मचारी, अधिकारी  या वाहन धारकांनी शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहन विभाग तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

*****

 

शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी

जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड एक नियम क्रमांक 409 अन्वये शासकीय रोखीचे व्यवहार पूर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 31 मार्च, 2022 रोजी जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व कोषागार कार्यालये उशिरापर्यंत म्हणजेच रात्री 10.00 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.   

*****


 

पिंपळदरी येथील दोन बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : औंढा (ना.) तालुक्यातील मौजे पिंपळदरी येथे दि. 27 मार्च, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता 02 अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच बालविवाह निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार बाल संरक्षण अधिकारी जरीबखॉन पठाण, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, चाईल्ड लाईनचे टीम मेंबर राजरत्न पाईकराव, विकास लोणकर आदींनी विवाहस्थळी भेट देऊन बालिकेचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करुन होणारे 02 (दोन) बालविवाह थांबविले.

यावेळी ग्राम बाल सरंक्षण समिती, बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तथा सदस्य सचिव, गावातील सरपंच इत्यादी व्यक्तींच्या समक्ष कुटुंबियांकडून आम्ही बालिकेचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब घेण्यात आला.     

            शासनाने बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलीचे लग्नाचे वय 18 वर्षे व मुलांचे वय 21 वर्षे  ठरविले आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी नागरिक आपल्या मुलांचे कमी वयात लग्न लावून देत आहेत असे चित्र पहावयास मिळत आहे. बालविवाह होत असल्यास गोपनीय माहिती कोणताही नागरिक 1098 या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.   

*****

25 March, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन रुग्ण नाही

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यानी दिली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 515 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 111  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

 



नेहरु युवा केंद्राच्या वतीने पुरस्काराचे वितरण

राष्ट्र आणि समाज बळकट करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांत युवकांनी सहभागी व्हावे

                                                               - जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत

               

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र अंतर्गत आयोजित राष्ट्रीय, सामाजिक आणि युवक कल्याणाच्या सर्व कार्यक्रमात सर्व युवकांनी सहभागी होऊन राष्ट्र आणि समाज अधिक बळकट करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी केले.

हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा युवा संमेलन 2021-22 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ.संतोष कल्याणकर हे होते. तर प्रमुख अतिथी माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, प्रमुख व्याख्याता म्हणून 1993 सालचे नेहरु युवा केंद्राचे पुरस्कारार्थी ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार, योगाध्यापक रत्नाकर महाजन, संगणक तज्ञ संदीप कांबळे, चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. विजय निलावार यांनी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार यांनी म्हणीप्रमाणे नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय कार्यात स्वत: ची ओळख निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच रत्नाकर महाजन आणि संदीप कांबळे यांनी या प्रसंगी युवकांना संबोधित करताना युवक शक्ती ही देशाची मोठी शक्ती असून ह्या शक्तीचा उपयोग करुन घेण्यासाठी युवकांनी सर्वार्थानं बलशाली होऊन समाज आणि देशाप्रती प्रयत्नरत राहावं अशा आशयाचे उदगार काढले. अध्यक्षीय समारोपात आजचा युवक हा उद्याचा सक्षम नागरिक बनला पाहिजे. यासाठी नेहरु युवा केंद्रासारखे संघटन हे दिशादर्शक असल्याचे डॉ. संतोष कल्याणकर यांनी  सांगितले.

यावेळी नेहरु युवा सांस्कृतिक क्रीडा मंडळ, खरबी ता.हिंगोली या संस्थेचे नामदेव सपाटे यांचा 25 हजार रुपयाचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार आला. तर अन्य  युवा मंडळांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये बोराळवाडीच्या राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्था, लासीनाच्या बहुउद्देशीय संस्था, राहोलीच्या नेहरु युवा मंडळासह अन्य लाभार्थी संस्थांचा समावेश आहे. याप्रसंगी पत्रकार विजय गुंडेकर, पत्रकार पल्लवी मगदूम यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रवीण पांडे यांनी केले.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक युवा, युवती  सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रविण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकंडे, अजय धोतरे, निळकंठ कुंभारे, सुदर्शन राठोड, सोपान सोनटक्के,अनिल बिनगे, बाळू नागरे यांनी परिश्रम घेतले.

*****

 





राज्य सेवा हमी कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा  कायदा

जनतेच्या सेवा पूर्ततेसाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशीलता अधिक प्रगल्भ करावी
                                                                        - आयुक्त डॉ. किरण जाधव

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : राज्य सेवा हमी कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा  कायदा आहे. या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे. जनतेला पारदर्शकपणे व दिलेल्या विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी या उद्देशाने हा कायदा लागू करण्यात आला आहे. येणाऱ्या काळातही जनतेच्या सेवा पूर्ततेसाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशीलता अधिक प्रगल्भ करावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त  डॉ. किरण जाधव यांनी आज दिले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आयुक्त डॉ. जाधव म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन जनतेला पारदर्शक, गतिमान आणि कालमर्यादेत अधिक प्रभावीपणे सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरामध्ये केवळ महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, पंजाब व हरियाणा या पाच राज्यांमध्ये या अधिनियमांतर्गत जनतेला माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सेवा पुरवण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय विभाग तसेच प्राधिकरणे यांच्या 530 सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांचा लाभ जनतेला देण्यात येत आहे.  राज्यात या अधिनियमाच्या स्थापनेपासून आजपर्यंत जनतेला 11 कोटी सेवा विहित वेळेत पुरविण्यात आल्या असल्याचे सांगून  येणाऱ्या काळात हिंगोली जिल्हा महाराष्ट्र लोकसेवा  हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जनतेला सेवा पुरवण्यामध्ये अग्रेसर रहावा, अशी अपेक्षाही आयुक्त डॉ. जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.

हा कायदा जनतेसाठी अत्यंत उपयुक्त असून या कायद्याची माहिती जनतेला होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात या कायद्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सेवांची व त्यासाठीच्या कालमर्यादेची माहिती लावणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीने प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. दिलेल्या कालमर्यादेत जनतेला सेवा देणे आवश्यक आहे, प्रत्येक सेवेसाठी ज्या पध्दतीने प्राधिकृत अधिकारी नेमला आहे, त्याचप्रमाणे अपिलीय अधिकारी सुध्दा नेमण्यात आला आहे. या कायद्याच्या माध्यमातून जनतेचे काम अधिक सोपे होणार आहे. दिलेल्या कालमर्यादेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जिल्ह्यात जास्तीत जास्त सेवांचा लाभ देण्यासाठी  सध्या अधिसूचित असलेल्या व नव्याने अधिसूचित करण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करुन जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच हा कायदा जास्तीत जास्त लोकापर्यंत एक महिन्याच्या आत पोहोवचिण्यासाठी जिल्ह्याची यंत्रणा काम करेल, असे सांगून आयुक्त डॉ. जाधव यांनी चांगल्या प्रकारे समुपदेशन व मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी ज्या सेवा अधिसूचित करणे शक्य आहेत त्या अधिसूचित करुन जनेतला सेवा देता येईल. याबाबत सर्व यंत्रणांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे सांगितले.

यावेळी आयुक्त डॉ. जाधव यांनी गतवर्षभरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात आलेल्या सेवांचा सविस्तर आढावाही घेतला. अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जिल्ह्यात 506 सेवा अधिसूचित असून हे अधिनियम लागू झाल्यापासून आतापर्यंत 11 लाख 25 हजार 181 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 10 लाख 46 हजार 131 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. याची टक्केवारी 92.97 इतकी आहे. यासह जिल्ह्यात झालेल्या विविध सेंवाची व आरटीएस डॅशबोर्ड मध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या सेवाचा लाभ घेण्यासाठी  नागरिकांनी व आपले सेवा सरकार सेवा केंद्रांनी तांत्रिक मदतीसाठी सागर भुतडा, जिल्हा समन्वयक, महाआयटी, हिंगोली मो. 9850371671 आणि उमाकांत मोकरे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली मो. 9970680612 यांच्याशी संपर्क साधावा.

या बैठकीस विविध विभागातील सर्व संबंधित अधिकारी  उपस्थित  होते.


*******