31 March, 2022

 


जलशक्ती अभियान कॅच द रेनची प्रभावी अंमलबजावणी करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 31 : भारत सरकारने 2019 या वर्षामध्ये जलशक्ती मंत्रालय निर्माण केल्यानंतर एक महिन्याच्या आत लोकसहभागातून संपूर्ण देशात जलद गतीने जलसंधारण व्हावे या उद्देशाने धडक जलसंधारण मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील जास्तीत जास्त पाणीसाठा निर्माण होण्यासाठी व जास्तीत जास्त मत्ता तयार होण्यासाठी गाव आराखडे तयार करुन कामांचे नियोजन करावे. तसेच जलशक्ती अभियान कॅच द रेनची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित बैठकीत दिले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलशक्ती अभियान कॅच द रेन-2022 या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 मार्च, 2022 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, क्रांती डोंबे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, सरकारी कामगार अधिकारी कराड, सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

दि. 3 व 4 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभाचे आयोजन करुन जल शपथ घ्यावी. या शपथ कार्यक्रमाची कार्यवाही करताना ग्रामपंचायतीने गावातील पूर्वीचे जलस्त्रोतांचे नुतनीकरण, पाण्याचा पुनर्वापर आणि जलस्त्रोताचे पुनर्भरण व नव्याने घ्यावयाचे जलसंधारणाची कामे याबाबत गाव आराखडा तयार करावा. यास ग्रामसभेची मान्यता घेऊन तालुकास्तरावर पाठविण्यात यावा. हा आराखडा सादर करताना कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करुन सादर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी केले.

            या जलशक्ती अभियानात पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करणे, विद्यमान संरचनेची पाणी क्षमता पुनर्संचयित करणे, पाण्याचा पुनर्वापर आणि संरचनेचे पुनर्भरण, जलसंधारण संरचनेसाठी संभाव्य ग्रामस्तरीय योजना, पाणलोट योजना तयार करणे आणि गाव नकाशाचा वापर करुन नियोजनबध्द कार्यक्रम राबवणे, वनक्षेत्र आणि इतर क्षेत्रामध्ये सघन वृक्षारोपण करणे, जमिनीवरील मृद ओलावा संवर्धन, जलशक्ती केंद्र, कृषी माहिती केंद्र स्थापन करणे आणि जलआंदोलनाला लोकसहभागातून व्यापक स्वरुप देण्यासाठी प्रचार करणे, राज्यातील प्रत्येक जलसाठ्याची नोंद करणे, जिओटॅग करणे आणि अधिकार अभिलेखात त्यांची नोंद घेणे आदी कामे करण्यात येणार असून यांची संबंधित यंत्रणेनी याची प्रभावी अंमलबजलावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

             जल शपथ पुढीलप्रमाणे आहे : मी अशी शपथ घेतो/घेते की, मी पाण्याचा सुयोग्य वापर करीन व पाणी वाचवेल.  मी अशी शपथ घेतो/घेते की, मी पाण्याचा प्रत्येक थेंबाचा संचय करीन, व जलशक्ती अभियानामध्ये मन:पूर्वक सहभागी होईन. पाणी ही एक अनमोल संपत्ती आहे असे मानून मी पाण्याचा वापर करीन. मी अशी ही शपथ घेतो की, मी आपले कुटुंबीय , मित्र आणि शेजाऱ्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी व तो वाया न घालवण्यासाठी प्रेरित करीन. हा आपलाच ग्रह आहे व आपणच त्याला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो.

***** 

No comments: