30 September, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण, तर 04 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 चा पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आला आहे, तर 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 39 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 641 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला कळवावे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सर्वदूर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिके शेतात उभी आहेत, तर काही पिकाची काढणी सुरु आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्सखलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. तसेच काढणी पश्चात नुकसान या जोखमेअंतर्गत देखील वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. फळ पिकविमा धारक शेतकऱ्यांना देखील वेगाचा वारा व गारपीट या बाबीसाठी वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते.

यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची सूचना सर्व प्रथम प्राधान्याने Crop insurance (पिक विमा) मोबाईल ॲपद्वारे, pmfby.maharashtra@hdfcergo.com या ई-मेलवर,  18002660700 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन अशा विविध पध्दतीने आपल्या पिकाचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना पिक विमा कंपनीस द्यावी. ॲपद्वारे दिलेल्या अर्जाची पुष्टी करुन संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे डॉकेट आयडी मिळेल. या आयडीद्वारे शेतकऱ्यांना अर्जाची सद्यस्थिती ॲपद्वारेच पाहता येईल.

ऑनलाईन पध्दतीने पूर्वसूचना देण्यास अडचणी येत असल्यास ऑफलाईन पध्दतीने सदर आपत्तीची माहिती संबंधित बँक, कृषि विभाग, महसूल विभाग यांना देण्यात यावी. आपण दिलेली माहिती बँक, संबंधित विभागाकडून विमा कंपनीस तात्काळ पुढील 48 तासात पाठवण्यात येईल.

Crop insurance (पिक विमा) मोबाईल ॲप Google play Store (गुगल प्ले स्टोअर) वर उपलब्ध असून मराठी भाषेमध्ये माहिती भरता येणे शक्य असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अशांनी प्राधान्याने ॲपद्वारे नुकसानीची सूचना नोंदवावी व अधिक माहितीसाठी श्री.दराडे, जिल्हा प्रतिनिधी, HDFC Ergo मो.क्र. 9518513411 यांच्याशी संपर्क साधावा किंवा नजीकच्या तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस.ए. घोरपडे यांनी केले आहे.

*******

 नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पूर परिस्थतीत काळजी व खबरदारी घ्यावी

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात सद्यस्थितीत झालेला जोरदार पाऊस तसेच येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणाची पाणी पातळीमुळे सर्व नद्या मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना तसेच लहान, मोठ्या ओढ्या, नाल्यांना पूर आलेला आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तसेच नदीकाठच्या गावांना उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खालील प्रमाणे आवाहन केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण पूर्णपणे भरल्यामुळे धरणातून पूर्णा नदीत एकूण 71 हजार 843 क्यूसेक्स इतका विसर्ग चालू असल्याने पुढे पूर्णा नदीवर असलेल्या येलदरी धरणातून एकूण 1 लाख 3 हजार 261 क्यूसेक्स इतका विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात आलेला आहे. यापुढे पूर्णा नदीवर असलेल्या सिद्धेश्वर धरणातून एकूण 01 लाख 10 हजार 531 क्युसेक्स इतका विसर्ग पूर्णा नदीत करण्यात आलेला आहे. यामुळे सेनगाव तालुक्यातील येलदरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने सेनगाव जिंतूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.  तसेच औंढा नागनाथ धार माथा येथील पूल पाण्याखाली गेल्याने औंढा-जिंतूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यासाठी नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी याबाबत खबरदारी बाळगावी.                                       

नद्यांना आलेल्या पूरामुळे  जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना , नद्यांना जोडलेल्या कालव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून कालव्या काठच्या गावांना देखील पुराचा फटका बसण्याची शक्यता  असल्याने नदी, नाले, कालव्या काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.

काय करावे :

1)      गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.

2)     गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगर पालिका प्रशासनास कळवावे.

3)      गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.

4)    पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.

5)     पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी, इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये. 

6)     कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.

7)     पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरुन जाऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

काय करु नये :

1)      पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.

2)     पुराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.

3)      दूषित, उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.)

4)    सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करु नका.

5)     पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत व खोल पाण्यात जाऊ नका.

6)     पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करू नका.

****


29 September, 2021

 




कृषी विज्ञान केंद्रात वेबकास्टिंग द्वारे प्रधान मंत्री यांनी केला शेतकऱ्यांशी  संवाद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : भारताचे प्रधान मंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलास अनुकुल असे 35 विविध पिकांचे वाण  राष्ट्रास समर्पित केले. त्याच प्रमाणे रायपूर येथे राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे उदघाटन सुद्धा केले.  या कार्यक्रमाचे प्रसारण कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी.पी.शेळके यांनी सादरीकरण करुन विविध पिकांच्या वाणापैकी हिंगोली जिल्ह्याला उपयुक्त वाणांची माहिती दिली. प्रा. राजेश भालेराव यांनी बी.डी.एन. 711 या तुरीच्या वाणांचे, परभणी मोती या ज्वारीच्या वाणाचे तसेच सोयाबीनच्या एम.ए.यु.एस. 71 या वाणांचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राद्वारे देण्यात आल्याची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ अजयकुमार सुगावे  यांनी पीक संरक्षण साठी उपयुक्त सात सूत्रांची  माहिती दिली.  प्रा. अनिल ओळंबे  यांनी सद्यस्थितीत हळद पिकाची काळजी कशी घ्यावी या संबधी माहिती दिली. 

या कार्यक्रमाचे संचलन प्रा. अनिल ओळंबे  यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रोहिणी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

****

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

03 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आले नाही, तर 03 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 03 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 38 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 641 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 03 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्याकडून आढावा

नुकसानग्रस्त क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात दि. 27 व 28 सप्टेंबर, 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान ग्रस्त शेत जमिनीचे तात्काळ पंचनामे करावेत, तसेच आजतागायत मयत जनावरे यांची नुकसान भरपाई करण्यासाठी शासनास निधीसाठी मागणी प्रस्ताव सादर करावा आणि रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींचे झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करुन त्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी शासनास सादर करावी, अशा सूचना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.

आज ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीचा पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक इत्यादी अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दि. 27 सप्टेंबर व 28 सप्टेंबर,2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने झालेले शेत जमिनीचे नुकसान, पिकांचे नुकसान, पंचनाम्याची सद्यस्थिती, अतिवृष्टीने रस्ते, पूल, शासकीय इमारतींचे झालेले नुकसान, तलावांची सद्यस्थिती, महावितरण विभागाचे झालेले नुकसान, अतिवृष्टीत पुराने मयत झालेल्या व्यक्तींची, जनावरांची संख्या, अतिवृष्टीने घरांची झालेली पडझड, संपर्क तुटलेले गावे, पुराने वेढलेले गावे इत्यादी विषयावर आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दि. 27 सप्टेंबर ते दि. 28 सप्टेंबर, 2021 या कालावधीत एकूण नुकसान ग्रस्त शेत जमीन अंदाजे क्षेत्र 2 लाख 4 हजार 224 हे.आर. इतक्या क्षेत्राचे नुकसान झाल्याचे आणि माहे जून 2021 ते आजतागायत एकूण नुकसान ग्रस्त शेत जमीनक्षेत्र अंदाजे 2 लाख 13 हजार 277 हे.आर. इतक्या क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती दिली. तसेच दि. 27 सप्टेंबर ते दि. 28 सप्टेंबर, 2021 या कालावधीत एकही व्यक्ती मयत नसल्याचे व 01 जनावर मयत झाल्याची आणि माहे जून, 2021 ते आजतागायत एकूण 15 व्यक्ती व 38 जनावरे  मयत झाले असल्याची माहिती दिली. यासोबतच रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींचे झालेल्या नुकसानीची देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी माहिती दिली.

*****

 






माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

 हिंगोली (जिमाका), दि. 29 : ऑक्सिजन कमी असलेल्या कारगील या ठिकाणी आपल्या सैन्यांने काम केले आहे. त्यांनी कारगील युध्दात भारतीय सैन्य दलाने आपले शौर्य दाखवून दिले आहे. या युध्दात हुतात्मा पत्करलेल्या सैनिकांना सलाम करुन श्रध्दांजली अर्पण करीत आहे, असे सांगून माजी सैनिक व सैनिकांच्या विधवांच्या काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर उपस्थित होते.

भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर, 2016 रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्याचा खात्मा केला होता. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा, माजी सैनिकांच्या विधवा यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले असल्याची माहिती संजय कवटे यांनी दिली.

कार्यक्रमांच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन वीर जवान व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच दोन मिनिटे मौन पाळून वीर जवानांच्या प्रतिमेस श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी माजी सैनिक रामराव जाधव, शेर खान पठाण, गोपीनाथ दळवी, सुभाष अरसोड, पांडूरंग सातव यांचा व माजी सैनिकांच्या विधवा गोदावरी धुगे, मेघा ठाकरे, गीताबाई ढवळे, सीमाबाई दरणे, रेणुका बोरगड यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे उत्तमराव लेकुळे, सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा उपस्थित होते.

*****

 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका

तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

बचाव व मदत कार्याचा मुख्यमंत्र्यानी घेतला जिल्हानिहाय आढावा

मुंबई, दि. २९ : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या  शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.  कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी  दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.

नुकसानीचे पंचनामे सुरू करा

सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व  महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका

निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.  यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.

हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे शंभर जणांना वाचवले

यावेळी एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर , औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टर ने तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतलां आणि औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

एनडीआरएफ बचाव कार्यात

 एनडीआरएफचे  १ पथक उस्मानाबाद आणि १ पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचं हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करीत आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा घेतला आढावा

उस्मानाबाद - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुके प्रभावित झाले असून एकूण दहा महसुली मंडळे प्रभावित झाली आहेत. यापूर्वीही तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून काल अतिवृष्टी झाल्याने शिराढोण 171 मिमी, गोविंदपुर 107 मिमी, ढोकी जाकची आणि तेर येथे जवळपास 140 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये दोन मोठ्या नद्या असून मांजरा नदीवरील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून साधारणतः 706 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या खालील वाकी व वाक्केवाडी गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व गावातील नागरिक अडकले होते. सदर नागरिकांना स्थानिक बचाव पथकांच्या माध्यमातून बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपुर गावातील सहा व्यक्ती तेरणा नदीच्या पाण्यामुळे वेढले गेल्याने ते उंच भागात टेकडीवर आसरा घेऊन थांबले आहेत. यांच्या बचावासाठी भारतीय हवाई हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरपरिस्थितीदरम्यान मदत व बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम तैनात करण्यात आली आहे.

तालुका सौंदनाआंबा गाव कळंब येथे दहा जणांना व उस्मानाबाद गाव दाऊतपुर येथे सहा जणांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

लातूर-  पोहरेगाव तालुका रेनापुर येथे अडकलेल्या तीन व्यक्तींच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पूरपरिस्थिती दरम्यान मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफची एक टीम देखील तैनात करण्यात आली आहे

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील निर्माण पूरपरिस्थितीमध्ये स्थानिक बचाव पथकाने आतापर्यंत 24 व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले असून अतिरिक्त मदतीसाठी एनडीआरएफचे एक पथक रवाना केले आहे.

यवतमाळ-  उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरून पाणी असताना नागपूर डेपोची एसटी बस ड्रायव्हरने पुलावरून नेली असता गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. बसमध्ये चार ते सहा प्रवासी असल्याची माहिती प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून एक व्यक्ती झाडावर चढला होता व एक व्यक्ती एसटीच्या टपावर चढला होता त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.

जळगाव- गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के क्षमतेने भरलेली आहेत. चाळीसगाव येथे यापूर्वी ढगफुटी झाली होती. त्याठिकाणी अतिवृष्टीमुळे चाळीसगाव मध्ये पाणी साचलेले आहे. सध्या रेड-अलर्ट असल्याने सर्व तालुक्यात स्थानिक बचाव दल तैनात करण्यात आले असून, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम अंमळनेर येथे तैनात करण्यात येणार आहे.

बुलढाणा- जिल्ह्यातील तीन तालुक्यात रात्री साडेदहा ते सकाळी पाच पर्यंत अतिवृष्टी झाली असून या तालुक्यातील सर्व मंडळी महसुली मंडळात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तथापि परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. बचावकार्यासाठी स्थानिक दल तैनात आहेत.

*****

 

अन्न व्यवसायिकांना परवाना, नोंदणी प्रमाणपत्र

घेण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : संपूर्ण देशभरात अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. या कायद्याच्या कलम 31 नुसार अन्न व्यवसायिकांनी (जसे की अन्नपदार्थ उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल रेस्टॉरंट, हातगाडी विक्रेते, भाजी व फळे विक्रेते, ज्यूस सेंटर, चिकन, मटन, अंडे विक्रेते, मिठाई विक्रेते, बेकरी इत्यादी) त्यांचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी परवाना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार विना परवाना व्यवसाय करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्यामध्ये सहा महिने शिक्षा व पाच लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.

परभणी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयातेर्फे दि. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत अन्न व्यवसायिकांना परवाना, नोंदणी घेण्यास उद्युक्त करण्यासाठी विशेष माहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यवसायिकाची परवाना व नोंदणी) नियमन 2011 मध्ये हे नमूद असलेला परवाना अट क्रमांक 14 नुसार प्रत्येक अन्नपदार्थ उत्पादक, वितरक व आयातदार यांनी केवळ परवानाधारक, नोंदणी धारक अन्न व्यवसायिकांकडूनच अन्न पदार्थाची खरेदी करणे व परवाना, नोंदणी असलेल्या व्यवसायिकांकडूनच अन्न पदार्थांची विक्री करणे बंधनकारक आहे. या परवाना अटीचे उल्लंघन केल्यास कलम 58 नुसार दोन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

ज्या अन्न व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाख रुपयापर्यंत आहे त्यांनी नोंदणी घेणे आवश्यक आहे. तसेच वार्षिक उलाढाल 12 लाख रुपयांच्यावर असल्यास त्या अनन वयवसायिकांनी परवाना घेणे बंधनकारक आहे.

अन्न व्यवसायिकांना परवाना, नोंदणी प्रमाणपत्रासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीनेच www.FosCos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. त्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे व शुल्क याबाबतची माहिती तसेच आवश्यक इतर तपशील संकेतस्थळावर उपलबध आहे. तसेच याबाबत काही अडचण आल्यास अन्न व औषध प्रशासन, परभणी कार्यालयाकडे संपर्क साधावा.

प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांना परवाना, नोंदणी तात्काळ घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर कोणताही व्यवसायिक विनापरवाना अथवा नोंदणी व्यवसाय करताना आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 अंतर्गत तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच परवाना, नोंदणी नसलेल्या अन्न व्यवसायिकांकडून खरेदी अथवा विक्री केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

 **** 

 

वसमत पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्याविरुध्द

अविश्वास ठराव पारित करण्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन

 

         हिंगोली (जिमाका) , दि. 29 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 72 (2) अन्वये परसराम विठ्ठल जाधव आरळ ता.वसमत यांनी वसमत पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्याविरुध्द अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याबाबत कळविले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 72 (3)(4) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोविड-19 च्या नियमाचे पालन करुन वसमत पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्याविरुध्द अविश्वास ठराव पारित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 72 (3) अन्वये दिनांक 18 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता पंचायत समिती, वसमत येथे विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, वसमत यांची नेमणूक करण्यात आली आहे.

उक्त सभापती व उपसभापती विरुध्द अविश्वास ठराव पारित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सभेच्या इतिवृत्तासह जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

****

 

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

 

        हिंगोली, दि. 29 : जिल्ह्यात दिपावली-2021 संबंधाने तात्पुरते फटाके परवाना (मोकळ्या जागेत) मिळण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना तात्पुरते फटाके परवाना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांच्याकडे अर्ज करावेत. हा अर्ज स्फोटक अधिनियम 2008 मधील नियम 113 (फॉर्म नं. एई-5) मध्ये करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदाराच्या पासपोर्ट साईज आकाराची तीन फोटो व संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांचे नाहरकत प्रमाणपत्र व अर्जदारांचे चारित्र्य प्रमाणपत्र, जागेच्या मालकीचा पुरावा व मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील. खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत. त्याशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत.       

तात्पुरते फटाके ज्वलनशील नसलेल्या शेडमध्ये ठेवण्यात यावे व त्यामध्ये अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था ठेवावी, फटाके  विक्रीचे व साठवणुकीचे दुकाने  एकमेकांपासून  कमीत कमी तीन मीटर अंतरावर असावेत आणि सुरक्षित कामापासून 50 मीटर अंतरावर असावे, फटाके शेड हे एकमेकाच्या समोर नसावे, कोणत्याही प्रकारचे तेलाचे दिवे, गॅस दिवे, उघडे दिवे शेडमध्ये सुरक्षित अंतरामध्ये वापरु नये व विद्युत  बल्ब वापरल्यास ते भिंतीला लावलेले असावेत. केवळ वायरने लोंबकाळत ठेवण्यात येऊ नये. विद्युत  बल्बचे बटन प्रत्येक दुकानाच्या भिंतीवर लावलेले असावेत व मास्टर स्विच प्रत्येक रांगेमध्ये असावे. कोणत्याही प्रकारचे फटाके शेड पासून 50 मीटर आत फोडू नये. एका ठिकाणी 50 पेक्षा अधिक दुकांनाना  परवानगी देण्यात येणार नाही. व्यवसाय कर अधिकारी यांचे ना-देय प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. तात्पुरता फटाका परवान्याची पाचशे रुपये फीस चलनाद्वारे भरणा करणे आवश्यक राहील, असे जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

****

28 September, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 02 रुग्ण, तर 06 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात 02 नवीन कोविड-19 चा पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आले आहेत, तर 06 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 38 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 638 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 06 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******