16 September, 2021

 


सिध्देश्वर पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी

निधी उपलब्ध करुन देण्यात येईल

                                 -- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16 : सिध्देश्वर येथील पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.

औंढा तालुक्यातील सिध्देश्वर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण कामाचे, मौ.धार रुपूर सिध्देश्वर रस्ता, पर्यटन क्षेत्र विकासकामांचे उद्घाटन तसेच माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशनवर निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे होते. यावेळी आमदार राजू नवघरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती महादेव एकलारे, दिलीप चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, सिध्देश्वर येथे पर्यटनाला संधी आहे. या पर्यटन स्थळाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन व पाठपुरावा करुन 30 कोटीचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे वेळेला महत्व देवून कामे करतात. त्यामुळे वेळेची किंमत केल्यास वेळ त्यांची किंमत करत असते. त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय साखर महासंघावर निवड केली आहे. या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. ते या संधीचा योग्य वापर करतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी आमदार राजू नवघरे यांनी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी 50 टक्के कामे यापूर्वीच केली आहेत. त्यांच्या कामाचा आदर्श घेऊन जनकल्याणाचे विविध कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी  जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याची मा. पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली .  

माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, हा सत्कार माझा नसून या सत्काराचे खरे मानकरी माझे कार्यकर्ते आहेत, असे सांगून त्यांनी सत्कार केल्याबद्दल व आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले. आ. राजू नवघरे जोमाने काम करत आहेत. त्यांना आपण सर्वांनी साथ दिल्यास मतदार संघाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही, असे सांगून सिध्देश्वर धरणावर पर्यटन स्थळाचा विकास केल्यास जवळपास 20 ते 25 गावांतील नागरिकांना रोजगार मिळणार आहे. पर्यटनाचे हे काम झाले तर सिध्देश्वरचे नाव देशपातळीवर पोहोचणार आहे, असे सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य संतोष दराडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्टीय पोषण आहार सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास विविध पदाधिकारी आणि सिध्देश्वर व रुपूर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

 

No comments: