29 September, 2021

 

अन्न व्यवसायिकांना परवाना, नोंदणी प्रमाणपत्र

घेण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : संपूर्ण देशभरात अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. या कायद्याच्या कलम 31 नुसार अन्न व्यवसायिकांनी (जसे की अन्नपदार्थ उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल रेस्टॉरंट, हातगाडी विक्रेते, भाजी व फळे विक्रेते, ज्यूस सेंटर, चिकन, मटन, अंडे विक्रेते, मिठाई विक्रेते, बेकरी इत्यादी) त्यांचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी परवाना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार विना परवाना व्यवसाय करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्यामध्ये सहा महिने शिक्षा व पाच लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.

परभणी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयातेर्फे दि. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत अन्न व्यवसायिकांना परवाना, नोंदणी घेण्यास उद्युक्त करण्यासाठी विशेष माहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यवसायिकाची परवाना व नोंदणी) नियमन 2011 मध्ये हे नमूद असलेला परवाना अट क्रमांक 14 नुसार प्रत्येक अन्नपदार्थ उत्पादक, वितरक व आयातदार यांनी केवळ परवानाधारक, नोंदणी धारक अन्न व्यवसायिकांकडूनच अन्न पदार्थाची खरेदी करणे व परवाना, नोंदणी असलेल्या व्यवसायिकांकडूनच अन्न पदार्थांची विक्री करणे बंधनकारक आहे. या परवाना अटीचे उल्लंघन केल्यास कलम 58 नुसार दोन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

ज्या अन्न व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाख रुपयापर्यंत आहे त्यांनी नोंदणी घेणे आवश्यक आहे. तसेच वार्षिक उलाढाल 12 लाख रुपयांच्यावर असल्यास त्या अनन वयवसायिकांनी परवाना घेणे बंधनकारक आहे.

अन्न व्यवसायिकांना परवाना, नोंदणी प्रमाणपत्रासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीनेच www.FosCos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. त्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे व शुल्क याबाबतची माहिती तसेच आवश्यक इतर तपशील संकेतस्थळावर उपलबध आहे. तसेच याबाबत काही अडचण आल्यास अन्न व औषध प्रशासन, परभणी कार्यालयाकडे संपर्क साधावा.

प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांना परवाना, नोंदणी तात्काळ घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर कोणताही व्यवसायिक विनापरवाना अथवा नोंदणी व्यवसाय करताना आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 अंतर्गत तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच परवाना, नोंदणी नसलेल्या अन्न व्यवसायिकांकडून खरेदी अथवा विक्री केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

 **** 

No comments: