07 September, 2021

 

सर्व यंत्रणांनी प्राप्त निधी वेळेत खर्च करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव पोलीस दलाचे महानिदेशक संदीप सिंह गिल, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2020-2021 साठी वितरीत केलेल्या निधीतून केलेल्या कामाचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी त्यांना मंजूर केलेली तरतूद, उपलब्ध निधी याचे योग्य नियोजन करुन सर्व कामे पूर्ण करावेत. आयपासचा शंभर टक्के वापर करावा. यासाठी नोडल अधिकारी नेमावा. तसेच गुगलशीटवर दिलेल्या निधीची माहिती देण्यात येणार आहे. याची शहानिशा करुन दिलेला निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करावा. तसेच नाविण्यपूर्ण कामाची यादी तयार ठेवावी व नाविण्यपूर्ण योजनेतील सर्व कामे झाल्याची माहिती घ्यावी. जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असलेला निधी तात्काळ खर्च करावा. कोणताही दिलेला निधी शासनाकडे परत जाणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. कोणत्या योजनांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे हे पहावे. एकमेकाशी समन्वय ठेवून निधी खर्च करण्याबाबत युध्दपातळीवर कार्यवाही करावी व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

तसेच सन 2021-22 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाच्या खर्चाचा प्रस्ताव योग्य नियोजन करुन सादर करावा. शासनाने 2021-22 साठी 30 टक्के निधीचा कट लावलेला आहे. त्यामुळे त्यानुसार सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

 या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासह सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजना, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला.

यावेळी विविध विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

****

No comments: