30 November, 2018

जमिनीचा धारणाधिकार शासन राजपत्र प्रसिध्द


जमिनीचा धारणाधिकार शासन राजपत्र प्रसिध्द  
                       
        हिंगोली,दि.30: भाडेपट्याने अथवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींपैकी कृषी, रहिवासी  व वाणिज्यिक प्रयोजनासाठी प्रदान करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्याकरिता नियमांचे प्रारुप शासन राजपत्रात पूर्व प्रसिध्द केलेली सुधारणा सुलभ संदर्भाकरिता अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

****

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास मदत - रूचेश जयवंशी · मसाप अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांच्या हस्ते हिंगोली ग्रंथोत्सवाचे उद्घाटन












ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास मदत
                                                                         - रूचेश जयवंशी

·   मसाप अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांच्या हस्ते हिंगोली ग्रंथोत्सवाचे उद्घाटन
                          
        हिंगोली,दि.30: ग्रंथाचा महोत्सव खऱ्या अर्थाने प्रगत समाजाचे लक्षण आहे. ग्रंथोत्सवांमुळे समाजात वाचन संस्कृती वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
            च्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2018’ उदृघाटनाप्रसंगी जयवंशी बोलत होते. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, प्रसिध्द समिक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय संघ हिंगोलीचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, प्रा. विलास वैद्य, अशोक अर्धापुरकर, कुंडलिकराव अतकरे आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
            यावेळी जयवंशी पुढे म्हणाले की, राज्‍याला वाचन संस्‍कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. आजच्या पिढीमध्ये ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. त्यामुळे भाषा जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी आवर्जुन पुस्तके वाचलीच पाहिजेत. समाजात वाचन संस्कृतीमुळे मराठी भाषा टिकून राहील. वाचन संस्कृती वाढावी यासाठी शासनाने सुरु केलेला ग्रंथोत्सव हा उपक्रम स्तुत्य आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व ती टिकून राहण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत.
            ग्रंथोत्सवाचे उद्घाटक कौतीकराव ठाले पाटील म्हणाले की, समाज आणि राष्ट्र  उभारणीत ग्रंथांचे योगदान महत्तवाचे आहे. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाच्या अंगभूत गुणांमुळे ‘ग्रंथ हेच गुरु’ असे म्हटले जाते. ग्रंथाच्या वाचनामुळे विचारांना दिशा मिळते. वाचनामुळे लेखकाचे विचार सर्व स्तरापर्यंत जातात व हे विचार समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृध्द करण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी ग्रंथोत्सव सारख्या उपकम्राचे महत्‍त्वाचे योगदान आहे. यामध्ये शासकीय ग्रंथालयांची ही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. या ग्रंथालयांकडून वाचकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात असल्याचे ही ठाले पाटील यावेळी म्हणाले.
            प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, ज्या प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात, तसे ग्रंथ देखील मनावर संस्कार करतात. माणुस हा समाजशील प्राणी आहे हे जसे पुस्तकातून कळाले तसा तो हिंस्त्र आहे हे देखील पुस्कानेचे कळाले. ग्रंथ आम्हाला आपल्या वर्तनाचा पुन्हा-पुन्हा विचार करायला लावतात. ज्या वेळी मनुष्याच्या आशा मंदवतात त्या वेळी ग्रंथ हे त्याच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करतात. 
            प्रास्ताविकात सहाय्यक संचालक सुनिल हुसे यांनी ग्रंथोत्सव भरविण्यामागील शासनाचा उद्देश सांगुन, ग्रंथोत्सवानिमित्त्‍ हिंगोलीकरांसाठी कवी संम्मेलन, परिसंवाद आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. यावेळी प्रा. विलास वैद्य यांनी ही समायोचित भाषण केले.
            प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथ विक्री व प्रदर्शनी चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साहित्यिक, वाचन प्रेमी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी आसेगावकर यांनी केले तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी उपस्थिताचे आभार मानले.

****

29 November, 2018

खाजगी टँकरव्दारे पिण्याच्या पाणी पुरवठा करण्याच्या ई-निविदेस द्वितीय मुदतवाढ


खाजगी टँकरव्दारे पिण्याच्या पाणी पुरवठा करण्याच्या ई-निविदेस द्वितीय मुदतवाढ

        हिंगोली,दि.29: जिल्ह्यातील ग्रामीण/नागरी भागातील टंचाईग्रस्त गावे,वाड्या,तांड्यांना पिण्याचे पाणी टँकरव्दारे पुरवठा करण्याबाबत दि. 1 नोव्हेंबर, 2018 रोजी ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. सदर निविदा सूचनेमध्ये देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ई-निविदेमध्ये प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदर ई-निविदा सादर करण्यासाठी दि. 5 डिसेंबर, 2018 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत द्वितीय मुदतवाढ देण्यात आली आहे. ही निविदा दिनांक 6 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 03.05 वाजता उघडण्यात येईल.
            सदर ई-निविदा http://mahatenders.gov.inwww.hingoli.nic.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तरी इच्छूक कंत्राटदारांनी सदर ई-निविदा प्रक्रियेत सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे दुरवध्वनी क्रमांक 02456-221450 यावर संपर्क साधण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी शुध्दीपत्रकान्वये केले आहे.

00000

ग्राहकांकडून वाहनांच्या नोंदणीसाठी विहित शुल्का व्यतिरिक्त कोणतेही ज्यादा शुल्क न आकारता येणार नाही


ग्राहकांकडून वाहनांच्या नोंदणीसाठी विहित शुल्का
व्यतिरिक्त कोणतेही ज्यादा शुल्क न आकारता येणार नाही
                               
        हिंगोली,दि.29: वाहन विक्री करताना वितरक हँडलिंग चार्जेस म्हणून ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करतात याबाबत वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसिध्द झाली होती. त्याअनुषंगाने वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडून विहित शुल्का व्यतिरिक्त कोणतेही ज्यादा शुल्क न घेण्याबाबत परिपत्रकानुसार शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांकडून शुल्क आकरताना काही सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
            नव्याने होणाऱ्या दुचाकी / चारचाकी वाहनांकरिता शासनाने वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये. वाहन नोंदणीसाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेले नोंदणी शुल्क व कर याबाबतची माहिती प्रत्येक वितरकाने शोरुम मधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करावे. तसेच ‘या शो रुम मध्ये मोटार वाहन नोंदणी शुल्क व कर या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत. सदर बाबतीत आपली तक्रार  असल्यास विक्री व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधावा. आपले समाधान न झाल्यास संबंधित प्रादेशिक, उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी यांचेकडे लेखी, समक्ष, टपालाद्वारे, ई-मेलद्वारे किंवा या पोर्टलवर तक्रार दाखल करावी. तसेच आवश्यकता भासल्यास ग्राहक संरक्षण मंचाशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.’, असा फलक शोरुम मधील दर्शनी भागामध्ये प्रदर्शित करण्यात यावा. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित वाहन वितरक यांचे विरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****



आजपासून ग्रंथजत्रेचे आयोजन


आजपासून ग्रंथजत्रेचे आयोजन

            हिंगोली,दि.29: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत हिंगोली येथे ग्रंथ जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वाचक प्रेमीना या निमित्त हस्तलिखित, दुर्मिळग्रंथ, दिवाळी अंकासह इतर दर्जेदार ग्रंथ या ग्रंथ जत्रेत उपलब्ध होणार आहेत. सदर ग्रंथ जत्रेचे आयोजन येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम येथे आजपासून करण्यात आले असून, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतीकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, प्रमुख पाहुणे प्रसिध्द समिक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, ग्रंथालय संचालय सु.हि. राठोड, राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांची उपस्थिती  राहणार आहे.
            यावेळी ग्रंथांचे प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त वाचक प्रेमींनी या ग्रंथजत्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी केले आहे.

****