03 November, 2018

जलयुक्त शिवारमुळे पुसेगाव व खुडज शिवारातील पाणी पातळीत वाढ







जलयुक्त शिवारमुळे पुसेगाव व खुडज शिवारातील पाणी पातळीत वाढ
        हिंगोली,दि.03: हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत मागील 3 वर्षात जलसंधारणाच्या झालेल्या कामामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. सेनगाव तालूक्यातील पुसेगाव आणि खुडज या गाव शिवारात जलयुक्तच्या कामामुळे परिसरातील विहीर आणि बोअरच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेती आणि सिंचनाला फायदा झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी देखील पाणी उपलब्ध झाले आहे.
            सेनगाव तालूक्यातील पुसेगाव येथे जलयुक्त शिवार अंतर्गत कृषि आणि लघुसिंचन जलसंधारण विभागामार्फत झालेल्या सिमेंट नाला बांध आणि नाल्याचे सरळीकरण व खोलीकरण केल्याने पाणीसाठा निर्माण होऊन परिसरातील शेतीला आणि सिंचनाला फायदा होत आहे. नाला काठावरील शेतकऱ्यांना पिकाकरीता संरक्षीत पाण्याची उपलब्धता झाली आहे. तसेच गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाईवर देखील मात करण्यास मदत झाली. सिमेंट नाला बांध परिसरातील विहीर आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत सुमारे 20 ते 25 फुट वाढ झाली आहे. तर याच तालूक्यातील खुडज शिवारात जलयुक्त अंतर्गत वन विभागामार्फत खोल सलग समतल चर आणि वन तलावाची कामे करण्यात आल्याने या तलावात सुमारे 4 ते 5 टी.सी.एम. पाणीसाठी निर्माण होण्यास मदत झाली आहे, तसेच यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला असून त्यांच्या विहीर आणि बोअर पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतीकरीता आणि पिण्यासाठी संरक्षीत पाणी उपलब्ध झाले आहे. जलयुक्त अंतर्गत या दोन गावात झालेल्या जलसंधारणच्या उत्कृष्ट कामांच्या बाबतीत मा. मुख्यमंत्री यांनी ‘हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव आणि खुडजमध्ये जलयुक्त शिवारच्या कामांमुळे झालेला बदल … अशी अनेक पाणीदार गांव राज्यात तयार होत आहेत…’ अशी प्रशंसा केली आहे.
            सन 2015-2016 मध्ये जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 124 गावे निवडण्यात आली होती. सदर गावांमध्ये विविध यंत्रणाद्वारे एकूण 4 हजार 87 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी एकूण 4 हजार 87 कामे पूर्ण झाली असून यासाठी एकूण 82 कोटी 59 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या 124 गावांपैकी 124 गावे जलयुक्त झालेली आहेत. तर सन 2016-2017 मध्ये जिल्ह्यात एकूण 100 गावांची निवड केली असून या गावात विविध यंत्रणाद्वारे एकूण 4 हजार 117 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 104 कामे पूर्ण झाली असून, त्यावर 53 कोटी 42 लाख रुपयांचा निधी खर्च झाला. यातील 9 कामे प्रगतीपथावर आहेत.  या 100 गावांपैकी 99 गावे जलयुक्त झालेली आहेत. सन 2017-2018 मध्ये जिल्ह्यातील 80 गावांची निवड करण्यात आली असून एकूण 2 हजार 469  कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी 2 हजार 92 कामे पूर्ण झाली आहेत. तर 134 कामे प्रगतीपथावर असून, 15.84 कोटी रुपये सदर कामांवर खर्च झालेला आहे. तसेच सन 2015 ते 2017 या कालावधीत गाळ काढण्याच्या मोहिमे अंतर्गत शासकीय मशीन, लोकसहभाग, खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात 188 कामे करण्यात आली असून सुमारे 35 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
            जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जल व मृद संधारणाच्या कामामुळे भुजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून 31 हजार 281 टि.सी.एम. इतका पाणीसाठा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. या पाण्यामुळे 62 हजार 538 हेक्टर जमिनीला एक संरक्षित पाणी देणे शक्य झाले आहे. लोकसहभागातून शेतात गाळ टाकण्याच्या मोहिमेमुळे जवळपास 2 हजार हेक्टर शेतजमिन सुपीक झाली असून पिक उत्पादनात वाढ होत आहे. तसेच या मोहिमेमुळे सिंचन तलावांच्या साठवण क्षमतेत वाढ होऊन विहिरीची पाणी पातळी देखील वाढण्यास मदत  झाली आहे. यामुळे गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न सुटत असून, मागील वर्षी जिल्ह्यात 55 गावांना टँकरद्वारे पाणीपूरवठा करण्यात आला होता. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे शेतीला संजीवनी मिळत असून, जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होत आहे.
****


No comments: