30 January, 2018

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2017 साठी प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी



वृत्त क्र.46                                           दिनांक : 30 जानेवारी 2018
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2017 साठी
प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी
हिंगोली, दि.30:- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2018 असा आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन , जिल्हा माहिती अधिकारी श्री. अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.
0000

जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना अभिवादन







वृत्त क्र.45                                                                                     दिनांक : 30 जानेवारी 2018 
जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना अभिवादन

        हिंगोली दि.30:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि आदर व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचारी यांनी मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी खुदाबक्क्ष तडवी, उपजिल्हाधिकारी   श्री. बोरगावकर, उपजिल्हा निवडणूक आधिकारी श्री. रणवीरकर यांच्यासह प्रशासकीय संकुलातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

00000

26 January, 2018

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

            हिंगोली, दि.26: जिल्हाधिकारी कार्यालयात 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मणियार  यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.   
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्क्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री. बोरगावकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंदर रणवीरकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय संकुलातील विविध विभागातील अधिकारी - कर्मचारी यांची उपस्थिती होती.



*****
घटना दूरुस्तीमुळे वंचीत व दुर्लक्षीत घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली
                                                                        -- पालकमंत्री दिलीप कांबळे

हिंगोली, दि.26: स्थानिक स्वराज्य संस्थाना घटनात्मतक दर्जा देऊन त्रिस्तरीय व्यवस्था विकसीत करण्यात आलेल्या 73  74 व्या घटनादूरुस्तीला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाले आहे. घटना दूरुस्तीमुळे वंचीत व दुर्लक्षीत घटकांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाल्याचे  प्रतिपादन सामाजीक न्याय राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी राज्याच्या व जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,  उपजिल्हाधिकारी खुदाबक्क्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री. बोरगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, 73  74 व्या घटनादूरुस्तीमुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे. लोकशाहीमध्ये लोकसहभाग हा सकारात्मक असणे आवश्यक आहे. लोकशाही समाजातील उच्च स्तरातील अधिकारापासून तळा-गाळातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ही लोकशाही समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही बळकट करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. पारदर्शक निवडणूकाद्वारे निवडून दिलेल्या शासनाने सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजावून घेत त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हाच सुशासनाचा मुलमंत्र आहे.
            महाराष्ट्राने विविध क्षेत्रात विकासात्मक भरारी घेतली असून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवून राज्यात पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी शाश्वत पाण्याची उपलब्ध करण्याच्या कामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हिंगोली जिल्ह्यानेही या उपक्रमात गती घेऊन प्रगती केली आहे. मागील दोन वर्षात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 304 गावे निवडून तेथे कामे घेण्यात आले आहे. त्यातून 5 लाख 50 हजार टी.सी.एम. पाणीसाठा व 50 हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी  लाभ घेतला. गतवर्षी 80 सामूहिक शेततळी पूर्ण झाली. प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेअंतर्गत 6 हजार शेतकऱ्यांनी ठिबक-तुषार संच बसविले. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 76 ट्रॅक्टर व 216 औजारांचे गरजूंना वितरण झाले. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील 240 गावांची निवड करण्यात आली.
            याशिवाय स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत 3 नगर परिषदा व 2 नगर पंचायतीचे पूर्ण भाग हागणदारीमुक्त घोषित झाले. 563 पैकी 396 ग्रामपंचायतींनी  या कामात यश मिळविले. जिल्ह्यातील सर्व 883 जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्याने जिल्हा प्रथम पुरस्कार विजेता ठरला. महारेशीम अभियानातंर्गत रेशीम उत्पादनामध्ये जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच जिल्ह्यातील 7/12 ऑनलाईनचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना संगणकीय 7/12 कोणत्याही वेळी उपलब्ध होण्यासाठी 7/12 एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व 795 रास्त भाव दुकानात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरीत करण्यात येत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत जिल्ह्यातील 15 हजारहून अधिक लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन देण्यात आल्याचे सांगितले.
            यावेळी मंत्री महोदयांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, डिजिटल शाळा, आय.एस.ओ. मानांकन प्राप्त 32 पशु वैद्यकीय दवाखाने आदींच्या प्रगतीची सविस्तरपणे माहिती दिली.

            राज्याप्रमाणेच प्रगतीच्या क्षेत्रात अग्रभागी राहण्याचा हिंगोली जिल्ह्याने सतत प्रयत्न केला असे गौरवोदगारही त्यांनी यावेळी काढले.
            प्रारंभी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, अग्निशमन दल, नॅशनल कॅडेट कोर, श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद विरोधी वाहन, आपत्ती व्यवस्थापन चित्ररथ, मुद्रा बँक योजना चित्ररथ, सामाजीक वनीकरणाचा हरीत चित्ररथ, आरोग्य विभागाचे आरोग्य पथक यांच्यासह विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी देखील या संचलनात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
            कार्यक्रमांचे सुत्र संचलन डॉ. निलावार यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येनी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


*****

25 January, 2018

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत
कर्जमाफीची रक्कम तात्काळ खात्यावर जमा करावी
                                                                             -- पालकमंत्री दिलीप कांबळे

            हिंगोली, दि.25: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी. तसेच या योजनेपासुन एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या आढावा बैठकीत श्री. कांबळे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक श्री. शिंदे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. कांबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लवकरात-लवकर त्यांची कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून, लवकरच सदर रक्कम खात्यावर जमा होणार आहे. संबंधीत विभागानी आणि बँकांनी याद्या प्राप्त होताच संबंधीत लाभार्थ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करावी.
             जिल्हा उपनिबंधक श्री. मेत्रेवार यांनी कर्जमाफी योजनेची माहिती सादर करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार 385 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 37 हजार 228 लाभार्थ्यांना 120 कोटी 53 लाख कर्जमाफी झाली असून आतापर्यंत 33 हजार 461 लाभार्थ्यांच्या खात्यावर 103 कोटी 38 लाख 50 हजार रक्कम जमा झाली आहे. बँकांनी दिलेली कर्ज खात्यांची माहितीतील त्रूटी आणि शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रूटीमुळे उर्वरीत शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत लाभ मिळाला नाही. सदर उर्वरीत शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रूटी दूर करण्याचे काम सुरु असून जशा याद्या प्राप्त  होतील तशा संबंधीताच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मेत्रेवार यांनी दिली.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी, बैठकीत उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून सदर योजनेबाबत सूचना जाणून घेतल्या. यामध्ये सदर योजनेमध्ये प्रोत्साहनपर रक्कम ही 50 हजार वाढवावी. आत्महत्याग्रस्त आणि मयत शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी. समझोता योजना (ओटीएस) मधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची दीड लाखाची रक्कम आधी देण्यात यावी. सदर सूचना मा. मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करणार असून याबाबत पाठपूरावा करणार असल्याचे श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            आढावा बैठकीस यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी, बँक व्यवस्थापक यांची उपस्थिती होती.

*****

24 January, 2018

माध्यम प्रतिनिधीकरीता सायबर गुन्हे आणि उपाय
या विषयावर कार्यशाळा कार्यशाळा संपन्न

        हिंगोली, दि. 23: ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र प्रकल्पातंर्गत हिंगोली जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे माध्यम प्रतिनीधीकरीता सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती  विषयावरील कार्यशाळेचे आज आयोजन करण्यात आले होते.
            माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज सर्व व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत. परंतू काही विकृत मानसिकता असलेल्या व्यक्तीमुळे सायबर क्राईम जगातील अलिकडच्या वर्षात सायबर गुन्हेगारीची देखील वाढ होता आहे. या दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध आणण्याकरीता समाजात जन जागृती करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. याकरीता माध्यम प्रतिनिधीसाठी आज आयोजित करण्यात आलेल्या सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळेत सायबर सेलचे श्री. अयुब पठान यांनी स्किमिंग स्कॅम्स, विशिंग, फिशिंग, डाटा काऊंटर फिटिंग, आयडेंटिटी थेफ्ट, ई-कॉमर्सचे प्रवाह, किरकोळ मालमत्तांचे घोटाळे, सीम ड्यूप्लिकेशन, सोशल मिडिया आणि फेक  ई-मेल आदी संदर्भात मार्गदर्शन केले. सायबर व्यवहार आणि इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावर ही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
            यावेळी श्री. विनायक लंबे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह माध्यम प्रतिनीधी यांची उपस्थिती होती.

****
प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करू नये
हिंगोली दि. 23 :  भारतीय ध्वज संहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसारच राष्ट्रध्वजाचा वापर करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनासह इतर राष्ट्रीय व सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी कागदाच्या व प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली यांनी केले आहे.
प्रतीवर्षी 26 जानेवारी, 01 मे, 15 ऑगस्ट, मराठवाड्यात 17 सप्टेंबर व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर होत असतो. सदरचे कार्यक्रमाप्रसंगी खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात रस्त्यावर पडून पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मधील तरतुदींचे काटेकोपरणे पालन करावे. तसेच कोणीही कागदी व प्लास्टीकचा राष्ट्रध्वज वापरणार नाही, याची दक्षता घेण्याची सुचना प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.
ध्वजसंहितेच्या कलम 2.2 मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन झाली असून तालुका स्तरावरील समित्या स्थापन करण्याचे निर्देश संबंधित तहसीलदार यांना दिलेले आहेत, असे प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांनी ध्वजसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

***** 

18 January, 2018

नागरिकांनी सायबर क्राईमपासून सावध रहावे
                                                               -- सुमित महाबळेश्वरकर
·        वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवा
                                   ·         इंटरनेट बँकींग आणि इलेट्रॉनिक मनीचा वापर जपून करा

            हिंगोली, दि.18 :  माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे सर्व देशांनी आश्चर्यकारक प्रगती केली आहे. इंटरनेट हे मायाजाळ असून स्मार्ट फोनच्या माध्यमातून जग माणसाच्या हातात आले आहे. या इंटरनेटच्या माध्यमातून बँकीग व्यवहार आणि  संवाद साधणे अगदी सहज झाले आहे. परंतू या सायबर तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा आहे तेवढे नुकसान देखील असून नागरिकांनी सायबर क्राईमपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आयसीआयसीआय बँकेचे सायबर तज्ज्ञ सुमित महाबळेश्वरकर यांनी केले.
            येथील पोलिस अधिक्षक कार्यालय येथे ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्हा पोलीस यांच्यावतीने सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती या विषयावर जिल्ह्यातील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, माध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया आणि पोलीस उपअधिक्षक (गृह) सुजाता पाटील यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. महाबळेश्वरकर पुढे म्हणाले की, इंटरनेट हे मायाजाळ असून यामुळे मनुष्याचे जीवन सुसह्य झाले असून स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. याच कारणामुळे आज भारत मोबाईल डेटा वापरण्यात जगात वरच्या क्रमांकावर गेला आहे. स्मार्टफोन मुळे ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन शॉपींग आणि सोशल मिडियाचा अधिक वापर होत आहे. मात्र हा वापर करतांना नागरिक काळजी घेत नसल्याने याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात.  ऑनलाईन बँकींग व्यवहार करतांना आपली वैयक्तीक माहिती, ई-मेल, खाते क्रमांक, क्रेडीट-डेबीट कार्ड, पासवर्ड, पीन आदी माहिती गोपनीय ठेवा कुणालाही शेअर करु नका. क्रेडिट व डेबीट कार्ड स्वत: स्वाईप करा कुणाकडेही देवू नका. सायबर गुन्हेगार या माहितीच्या आधारे फसवणूक करुन आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतात. मोबाईल किंवा संगणकावरुन सुरक्षित https आणि पॅडलॉक असलेल्या संकेतस्थळाचाच वापर करा. ऑनलाईन शॉपींग करतांना सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा.
            आज जगात सायबर क्राईम करणारे गुन्हेगार सुध्दा मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. केवळ आर्थिकच नाही तर भावनिक, सामाजिक व नात्यांची फसवणूक देखील सायबर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होते. याकरीता इंटरनेटच्या मायाजाळात वावरतांना सायबर क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहाणे आवश्यक आहे. समाज माध्यमावरील अनोळखी व्यक्तीपासून सावध राहणे गरजेचे आहे. समाज माध्यमावर अनेक सायबर गुन्हेगार खोटे प्रोफाईल बनवून धोका देतात त्यामुळे ओळख असल्याशिवाय कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नये. फेसबुक, व्टिटर, व्हॉटस्ॲप या समाज माध्यमावर आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, स्टेटस् टाकतांना आणि ती माहिती कुणाला शेअर करतोय याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. समाज माध्यमातील चुकीच्या प्रवृत्तीला तसेच अमिषाला बळी पडून आपले नुकसान करुन घेऊ नये.
या सायबर क्राईम जाणीव जागृती कार्यशाळेस नागरिक, विद्यार्थी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*****

16 January, 2018

सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी
ऑफलाईन अर्ज करावेत
            हिंगोली,दि.16: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी यांचेकडून परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील माध्यमिक शाळा खाजगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिका अंतर्गत शाळांतील मुख्याध्यापकांना सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना महाडिबीटी संकेतस्थळावरून राबवण्यात येत होती. परंतू महाराष्ट्र शासन निर्णय आदिवासी विकास विभाग दि. 11 डिसेंबर, 2017 अन्वये सदरील योजना काही कालावधीकरिता ऑफ लाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.
            सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव ऑफलाईन (मॅन्युअल) पध्दतीने सादर करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती व प्रशासकीय अधिकारी नगरपालिका/नगरपरिषद व शिक्षणाधिकारी महानगरपालिका यांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शाळांची सुवर्ण महोत्सवी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्रस्ताव विहित नमुन्यात प्राप्त करून प्रमाणपत्रासह या कार्यालयास सादर करावी.
शाळेच्या स्तरावर ठेवण्यात येणारी माहिती विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र (मुख्याध्यापक यांनी शालेय अभिलेख्यानुसार प्रमाणित करावे. मागील वर्षीचे गुणपत्रक, पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तलाठी यांचे), पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचा अर्ज (विद्यार्थ्यांच्या फोटोवर मु. अ. यांची स्वाक्षरी). तसेच प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र, गट शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र, सन 2017-18 चे विहित नमुन्यातील प्रपत्र ब (पात्र विद्यार्थ्यांचे आधार जोडणी केलेले खाते क्र.) ही माहिती सादर करावी.
सन 2017-18 मधील बँक खाते हे विद्यार्थ्यांचे व आधार संलग्न असणे आवश्यक आहे. (आई वडिलांचे खाते क्र. यावर्षी चालणार नाहीत) प्रकल्प कार्यालयाकडून तालुकानिहाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यशाळेतील मार्गदर्शनाप्रमाणे सन 2017-18 मधील पुढील कार्यवाही पुर्ण करण्यासाठी सदरील प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी, 2018 नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत व अनुसूचित जमातीचा एकही विद्यार्थी सदरील शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****