18 January, 2018

नागरिकांनी सायबर क्राईमपासून सावध रहावे
                                                               -- सुमित महाबळेश्वरकर
·        वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवा
                                   ·         इंटरनेट बँकींग आणि इलेट्रॉनिक मनीचा वापर जपून करा

            हिंगोली, दि.18 :  माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे सर्व देशांनी आश्चर्यकारक प्रगती केली आहे. इंटरनेट हे मायाजाळ असून स्मार्ट फोनच्या माध्यमातून जग माणसाच्या हातात आले आहे. या इंटरनेटच्या माध्यमातून बँकीग व्यवहार आणि  संवाद साधणे अगदी सहज झाले आहे. परंतू या सायबर तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा आहे तेवढे नुकसान देखील असून नागरिकांनी सायबर क्राईमपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आयसीआयसीआय बँकेचे सायबर तज्ज्ञ सुमित महाबळेश्वरकर यांनी केले.
            येथील पोलिस अधिक्षक कार्यालय येथे ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्हा पोलीस यांच्यावतीने सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती या विषयावर जिल्ह्यातील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, माध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया आणि पोलीस उपअधिक्षक (गृह) सुजाता पाटील यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. महाबळेश्वरकर पुढे म्हणाले की, इंटरनेट हे मायाजाळ असून यामुळे मनुष्याचे जीवन सुसह्य झाले असून स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. याच कारणामुळे आज भारत मोबाईल डेटा वापरण्यात जगात वरच्या क्रमांकावर गेला आहे. स्मार्टफोन मुळे ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन शॉपींग आणि सोशल मिडियाचा अधिक वापर होत आहे. मात्र हा वापर करतांना नागरिक काळजी घेत नसल्याने याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात.  ऑनलाईन बँकींग व्यवहार करतांना आपली वैयक्तीक माहिती, ई-मेल, खाते क्रमांक, क्रेडीट-डेबीट कार्ड, पासवर्ड, पीन आदी माहिती गोपनीय ठेवा कुणालाही शेअर करु नका. क्रेडिट व डेबीट कार्ड स्वत: स्वाईप करा कुणाकडेही देवू नका. सायबर गुन्हेगार या माहितीच्या आधारे फसवणूक करुन आपल्या खात्यातील रक्कम काढू शकतात. मोबाईल किंवा संगणकावरुन सुरक्षित https आणि पॅडलॉक असलेल्या संकेतस्थळाचाच वापर करा. ऑनलाईन शॉपींग करतांना सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा.
            आज जगात सायबर क्राईम करणारे गुन्हेगार सुध्दा मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. केवळ आर्थिकच नाही तर भावनिक, सामाजिक व नात्यांची फसवणूक देखील सायबर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होते. याकरीता इंटरनेटच्या मायाजाळात वावरतांना सायबर क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहाणे आवश्यक आहे. समाज माध्यमावरील अनोळखी व्यक्तीपासून सावध राहणे गरजेचे आहे. समाज माध्यमावर अनेक सायबर गुन्हेगार खोटे प्रोफाईल बनवून धोका देतात त्यामुळे ओळख असल्याशिवाय कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नये. फेसबुक, व्टिटर, व्हॉटस्ॲप या समाज माध्यमावर आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, स्टेटस् टाकतांना आणि ती माहिती कुणाला शेअर करतोय याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. समाज माध्यमातील चुकीच्या प्रवृत्तीला तसेच अमिषाला बळी पडून आपले नुकसान करुन घेऊ नये.
या सायबर क्राईम जाणीव जागृती कार्यशाळेस नागरिक, विद्यार्थी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*****

No comments: