30 June, 2022

 

अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी 15 जुलै पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत शासन मान्यता प्राप्त असलेल्या तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांची शासन मान्यता प्राप्त असलेल्या अभ्यासक्रमासाठी 15 ते 45 वयोगटातील अपंग व मूकबधीर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.

या प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (सीसी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलाजी आणि कॉम्प्यूटर टायपींग), वेल्डर कम फॅब्रीकेटर, शिवण व कर्तन कला आणि इलेक्ट्रीशिएन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. या संस्थेत अपंग आणि मूकबधीर प्रशिक्षणार्थींना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकीय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामूल्य सोय केली आहे.

इच्छूक अपंग मुला-मुलींनी , पालकांनी दि. 15 जुलै, 2022 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर जि.नांदेड (भ्रमणध्वनी क्र. 9960900369, 9175446411, 7378641136, 9503078767) येथे संपर्क साधावा व प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन कर्मशाळा अधीक्षक, तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि. नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.   

******

29 June, 2022

 

खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2022-23 च्या खरीप पीक कर्जाचे जास्तीत जास्त वाटप करुन खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक शशीकांत सांवत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक विलास जगताप, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कादरी, आरबीआयचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी नवसारे, विविध बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट केवळ 36.09 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नुतनीकरणाचे व नवीन अर्ज भरुन घ्यावेत. आपणास देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. तसेच विविध योजनेचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत. ज्या बँका पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

******

 

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी

1 ते 15 जुलै या कालावधीत आधार नोंदणी शिबिराचे आयोजन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सर्व लाभार्थ्याचे पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनवर आधार नोंदणी दिनांक 15 जुलै 2022 रोजी पर्यंत पूर्ण करणेच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रातील आधार नोंदणीचे कामकाज दिलेल्या मुदतीमध्ये तात्काळ पूर्ण करण्यासाठी सर्व अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्याचे आधार नोंदणी शिबिराचे आयोजन दिनांक 01 जुलै ते दिनांक 15 जुलै, 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. आठवड्यातील दर शनिवार व रविवारी देखील आधार नोंदणी कॅम्प ठेवण्यासाठी मा. आयुक्त एबाविसेयो मुंबई यांच्याकडे परवानगी मागितली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आधार नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेला महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी सूचना दिलेल्या आहेत.

विहित कालावधीत आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण होणे आवश्यक असल्याने अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना आधार नोंदणीसाठी जन्म दाखला अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व गट विकास अधिकारी यांनी त्यांचे अधिनिस्त सर्व ग्रामसेवक यांना प्राधान्याने सदरील बालकांना जन्म दाखला देण्याबाबत आदेशित करावे. जेणेकरुन बालकांचे आधार नोंदणीचे कामकाज विहित कालावधीत पूर्ण करणे शक्य होईल. तसेच ज्या अंगणवाडी केंद्रांच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था नाही. त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर विद्युत व्यवस्था असलेले ठिकाण उपलब्ध करुन देणेबाबत सूचना सर्व ग्रामसेवकांना देण्यात याव्यात. तसेच संबंधित ग्राम पंचायत कर्मचारी यांचे मार्फत आधार कॅम्पच्या दिवशी गावामध्ये दंवडी देण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

सर्व आधार केंद्र चालकांनी शिबीर कालावधीत दररोज सकाळी 9.00 वाजता नियोजन केल्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी केंद्रावर उपस्थित राहून अंगणवाडी केंद्रातील सर्व बालके, लाभार्थ्यांचे आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण करावेत. सोबत संपूर्ण आधार कीट, रजिस्टर, बॅनर बोर्ड, तक्रार / अभिप्राय पुस्तक सोबत ठेवावे. नागरिकांना प्रत्येक पावती देणे बंधनकारक राहील. आधार नोंदणीसाठी निश्चित केलेल्या दरपत्रकानुसारच शुल्क आकारण्यात यावे. प्रथम आधार नोंदणी ही निशुल्क आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेसोबत पहिल्या दिवशी संपर्क साधून आवश्यक सूचना देण्यात याव्यात व आधार नोंदणीचा दैनंदिन अहवाल जिल्हा समन्वयक यांना सादर करावा.

            संबंधित जिल्हा समन्वयक यांनी अधिनिस्त सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक (आधार केंद्र चालक) यांच्याशी संपर्क साधून नियोजित वेळापत्रकानुसार गावनिहाय आधार नोंदणी कॅम्पचे आयोजन करावे, याबाबत काही अडचण आल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधावा, नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही किंवा त्यांना जास्त वेळ प्रतिक्षा करण्याची वेळ पडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, तसेच आधार कॅम्पशी संबंधित काही सूचना असल्यास संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आधार केंद्र चालक यांच्याशी समन्वय साधून जास्तीत जास्त आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत व आधार नोंदणीबाबतचा जिल्ह्याचा एकत्रित अहवाल दररोज महिला व बालविकास विभागास सादर करण्यात यावा.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने  या शिबिराच्या कालावधीत विद्युत व्यवस्था खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

या शिबीरामध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत सर्व लाभार्थ्याच्या, बालकांचे आधार नोंदणीचे कामकाज आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहणार आहे. त्या ठिकाणी लाभार्थ्यांची गर्दी जमू शकते व इतर गावकरी देखील आधार नोंदणी, दुरुस्ती करण्याबाबत मागणी करण्याची शक्यता आहे. परंतु हे अभियान प्राधान्याने केवळ अंगणवाडी केंद्रातील बालके व लाभार्थ्यासाठी असल्यामुळे त्या सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधित पोलीस कर्मचारी यांना देण्यात याव्यात.

सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी उक्त कालावधीमध्ये अंगणवाडी केंद्रातील सर्व बालके व लाभार्थ्यांचे आधार नोंदणी करण्याचे कामकाज विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्याकरिता कॅम्पच्या दिवशी बालके (पालकांसह) व लाभार्थ्याची आधार नोंदणीसाठी यांना आधार नोंदणी केंद्रामध्ये बोलविणे, अंगणवाडी केंद्र सुरु ठेवणे, आधार केंद्र चालकांशी समन्वय साधून आवश्यक सर्व सहकार्य करणे, आधार कॅम्पच्या दिवशी पूर्णवेळ त्या ठिकाणी उपस्थित राहणे, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, आधार नोंदणी अर्ज अचूकरित्या भरण्यासाठी लाभार्थ्यांना मदत करणे. लाभार्थ्याकडील कागदपत्रांची पूर्तता करणे, आधार केंद्रचालकांना आधार नोंदणी झाल्यानंतर किती बालकांची नोंदणी पूर्ण झाली आहे या बाबतचे प्रमाणपत्र देणे व त्याबाबतचा अहवाल संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास कार्यालयास सादर करणे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आधार कॅम्पच्या दिवशी आधार शिबिराची दंवडी गावामध्ये द्यावी. अंगणवाडी केंद्रातील बालके व इतर लाभार्थी यांना आवश्यक कागदपत्रांसह आधार नोंदणी केंद्रामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. आधार नोंदणीची पावती सांभाळून ठेवण्याबाबत पालकांना सूचना देण्यात याव्यात. त्याबाबतची नोंद अंगणवाडी केंद्रातील नोंदवहीमध्ये करण्यात यावी, तसेच संबंधित सर्व अंगणवाडी पर्यवेक्षकांनी त्यांच्या बीटमधील आधार कॅम्पच्या नियोजनाबाबत जिल्हा समन्वयक यांच्याशी समन्वय साधून सहकार्य करावे व आधार नोंदणीबाबतचा दैनंदिन अहवाल न चुकता जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास कार्यालयास दररोज सादर करावा, अशा सूचना पत्राद्वारे महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिले आहेत.

 

*******

28 June, 2022

 

जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करावी

-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 :  हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक हजार हेक्टर याप्रमाणे एकूण पाच हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील प्रत्येक गावात वानिकी आधारित शेती पध्दतीअंतर्गत बांबूची वृक्ष लागवड करण्यासाठी रोहयो विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, रोहयाचे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, नानाजी देशमुख कृषि संजीवनी (पोखरा) योजनेमध्ये जिल्ह्यातील 236 गावे समाविष्ट आहेत. या सर्व गावामध्ये पोखरा योजनेतून सार्वजनिक जमिनीवर बांबूची लागवड करण्यासाठी तहसीलदारांनी शासकीय जमिनीचा तपशील उपलब्ध करुन द्यावा. कृषि विभागाने योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अंदाजपत्रक तयार करुन बांबू लागवड करावी. तसेच वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेतावरही बांबू लागवड करावी. यासाठी पोखरा अंतर्गत 264 लाभार्थ्यांनी 127 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीसाठी अर्ज केला आहे. या क्षेत्रावरही बांबू लागवड करावी. जिल्ह्यातील कृषि विभागाच्या 26 समूह सहायकामार्फत प्रत्येकी 10 हेक्टरच्या हद्दीत शासकीय पडिक जमीन, गायरान, गावठाण क्षेत्रावर, तसेच नाला काठ, सलग समतल चर व खोल समपातळी चरांच्या बांधावर बांबू वृक्षाची लागवड करावी. तसेच 227 वैयक्तीक लाभार्थ्यांनी 195 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्याही शेतावर फळबाग लागवड करण्याच्या सूचना दिल्या.  

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (एमआरईजीएस) योजनेतून पोखरा योजनेव्यतिरिक्त इतर गावात गटविकास अधिकारी यांनी शासकीय पडिक जमीन, गायरान, गावठाण क्षेत्रावर, तसेच नाला काठ, सलग समतल चर व खोल समपातळी चरांच्या बांधावर प्रत्येक तालुक्यात एक हजार हेक्टरवर बांबूची वृक्ष लागवड करावी. यासाठीचे  प्रस्ताव 5 जुलैपर्यंत सादर करावेत, अशा सूचना दिल्या.

******  

 

इतर मागासवर्गीय महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्या

थकीत लाभार्थ्यांना व्याजात 50 टक्के सवलत

 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 :  महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्जाचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची सुधारित एकरकमी योजना दि. 31 मार्च, 2023 पर्यंत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावेत.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या, जिल्हा कार्यालय : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली-413513 (दूरध्वनी क्र. 02456-224465) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.

******  

 

 

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी

5 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्यामार्फत दि. 5 जुलै, 2022 रोजी कयाधू सर्व्हिसेस ट्रेनिंग सेंटर, राघव बिल्डींग, भारत पेट्रोलियम व जुनी जिजाऊ शाळेजवळ, कळमनुरी ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

            या मेळाव्यात महिंद्रा ॲन्ड महिंद्रा चाकण, पुणे, बडवे इंजिनिअरींग,औरंगाबाद, बजाज इलेक्ट्रीकल्स लि.औरंगाबाद व पुणे येथील 650 रिक्त पदे दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

            जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास 9834104727 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

******  

27 June, 2022

 

विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत

 

            हिंगोली (जिमाका), दि. 27 :  व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

            जात प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 03 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये. यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र  मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज सादर करावेत. याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे, असे आवाहन हिंगोली येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे यांनी केले आहे.

*****

 

नवनिर्मित किनवट अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाशी

संपर्क साधण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 27 :  महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि.नांदेड मुख्यालय औरंगाबाद या समितीची स्थापना दि. 16 डिसेंबर, 2021 पासून करण्यात आली आहे. या नवनिर्मित समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.

            कार्यालय : सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट मुख्यालय औरंगाबाद, प्लॉट नं. 4, सेक्टर सी-1, टाऊन सेंटर, सारस्वत बँकेजवळ, सिडको, औरंगाबाद-431003 या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन विजयकुमार कटके, सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट (मुख्यालय औरंगाबाद) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

****  

26 June, 2022

 

जिल्हा परिषदेच्या 57 व सर्व पंचायत समित्यांच्या 114 जागांच्या निवडणुकांकरिता

सदस्य संख्या निश्चित

 

            हिंगोली (जिमाका), दि. 26 :  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम -5) चे कलम 9 (1) अन्वये मा. राज्य निवडणूक सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या अधिसूचना क्र.रानिआ/जिपपंस-2021/प्र.क्र.10/का-7, दि. 10 मे, 2022 च्या आदेशान्वये हिंगोली जिल्हा परिषदेच्या बाबतीत निवडावयाची सदस्य संख्या 57 इतकी निश्चित करण्यात आली आहे. तसेच हिंगोली पंचायत समिती 22, कळमनुरी पंचायत समिती 24, सेनगाव पंचायत समिती 22, औंढा पंचायत समिती 20, वसमत पंचायत समिती 26 अशी एकूण 114 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.

            वरील आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम-1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम-5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उक्त जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती क्षेत्र जितक्या निवडणूक विभागात विभागण्यात येईल त्या निवडणूक विभागाची संख्या व व्याप्ती, निर्वाचक गणाची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित केले आहेत. हे आदेश तारखेच्या निकटनंतरच्या  पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हे आदेश अंमलात येतील, असेही आदेशात नमूद केले आहे.

            हे आदेश व अनुसूची हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसील कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

*****

 

हिंगोलीत शहरात उभारणार माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा

- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

* उत्थित शिल्पातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख

 



हिंगोली, (जिमाका) दि. 26 : हिंगोली येथे सध्या असलेल्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येत आहे.या कामास मंजुरी देण्यात आली असुन ,या वर्षी महाराष्ट्र दिनी 01 मे रोजी मी त्याचे भुमिपुजनही केले आहे.लवकरच त्या ठिकाणी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा ब्रांझ धातूपासून बनवण्यात येतआहे.मुंबई येथील जगप्रख्यात जे जे स्कुल ॲाफ आर्टच्या शिल्पकारांकडून या पुतळयाच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन ,लवकरच पुतळा उभा करण्यात येणार आहे.तसेच या पुतळा परिसरात मोर, व इतर सौंदर्यपुर्ण संकल्पनेचा वापर करुन सुशोभिकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिली.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारका समोरील पोस्ट ऑफिसच्या रस्त्याच्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग अधोरेखित करणारी म्युरल वॅाल उभी करण्यात येत आहे.यावर चवदार तळ्याचा सत्याग्रह, बौध्द धर्माची  दिक्षा आणि राज्य घटनेची प्रत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सोपवतानाचे क्षण उत्थित शिल्पाद्वारे चित्रित करण्यात येणार आहेत. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख उत्थित शिल्पातून होणार असुन,यामुळे हिंगोली शहराच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहितीही पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्थित शिल्पाचे काम लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे.

*****


 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा





 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , जिल्हास्तरीय सामाजिक शक्ती प्रदत्त  समिती हिंगोलीच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कार्यालय, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली येथील सभागृहात आज दिनांक 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला तसेच महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, डॉ.गीते, महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.विजय निलावार, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा.किशोर इंगोले , निरज देशमुख,  विशाल इंगोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष गुण घेऊन पास झालेल्या मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य गणेश शिंदे, प्रा.किशोर इंगोले, दलित मित्र डॉ.विजय निलावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी उपस्थित असलेल्या बार्टीच्या मुला-मुलींना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी केले. तर सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ  गोवंदे, नागनाथ नकाते, नितीन राठोड, मोतीराम फड, आत्माराम वागतकर, सुरेश पठाडे, सुनिल वडकुते, भास्कर वाकळे, बालाजी टेंभूर्ने, सुलोचना ढोणे, सिंधू राठोड, गीतांजली पडलवार, पल्लवी गीते, प्रफुल्ल पट्टे बहादुर, विजय सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.

******

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन




 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , जिल्हास्तरीय सामाजिक शक्ती प्रदत्त  समिती हिंगोलीच्या वतीने आज दिनांक 26 जून रोजी सकाळी 9 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या समता दिंडीला डॉ.अजय कुरवाडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

ही समता दिंडी शहरातील अग्रसेन चौक, इंदिरा चौक, महात्मा गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. यावेळी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही समता दिंडी समाज कल्याण कार्यालय येथे आल्यावर समारोप करण्यात आला.

 प्रथमतः जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, डॉ.गीते, डॉ.विजय निलावार, निरज देशमुख,  विशाल इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

******

 

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी पुरवठा विभागाचे तहसीलदार श्रीराम पाचपुते, मिलींद वाकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

24 June, 2022

 

दिव्यांगासाठीच्या सर्व बाबींची अंमलबजावणी करावी

                                                        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली, दि. 24 (जिमाका) :   दिव्यांगासाठीच्या सर्व बाबींची अंमलबजावणी करावी. दिव्यांगाची जिल्हास्तरीय समितीद्वारे दिव्यांगामध्ये मतिमंद, अतितीव्र दिव्यांग, गतीमंद, मनोरुग्ण झालेल्या व्यक्तींना पालकत्व मिळवून देण्याचे काम करण्यात येते. त्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींनी कायदेशीर पालकत्वासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावेत. कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्रामुळे अशा व्यक्तींच्या पालकांना विविध योजनाचा लाभ देण्यात येतो. यामध्ये व्यवसायासाठी कर्ज, मालमत्तेविषयक हक्क, मिळकत हक्क प्राप्त होतात. यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी आयोजित बैठकीत केले.

आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिव्यांगाची जिल्हास्तरीय स्थानिक स्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच एडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोत्रे, शिक्षण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

ज्यांच्याकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र आहे त्यांनी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) तयार करुन घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, हिंगोली यांच्याकडे संपर्क साधावे. तसेच तालुकास्तरावर होणाऱ्या दिव्यांग तपासणी शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहेत.

दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी असलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी करावी. त्यांना सहायक उपकरणे उपलब्ध करुन द्यावेत. सर्व कार्यालयांनी दिव्यांगाची वेगळी ज्येष्ठता यादी तयार करावी. जिल्ह्यातील दिव्यांगाचा वस्तुनिष्ठ डाटा उपलब्ध करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्व्हे करावा. या उपलब्ध झालेल्या माहितीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांगाच्या योजनानिहाय विस्तृत आराखडा तयार करावा. तसेच सर्व सार्वजनिक इमारतीमध्ये अपंगासाठीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वेक्षण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.

****

 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘बार्टी’चा आधार

 

डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी बार्टीही संस्था स्थापन करण्यात आली . या संस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि दैनंदिन कामात स्वायतत्ता यावी  काम जलद गतीने व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय  विशेष सहाय्य विभागाने ही संस्था स्वायत्त करण्याचा निर्णय  घेण्यातआला. संस्थेची नोंदणी प्रक्रिया ही यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या संस्थेच्या धर्तीवर करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळ स्थापन करून संस्थेचे काम सुरू आहे. 

या
 संस्थेमार्फत केंद्र सरकार पुरस्कृत अनुसूचित जातीच्या वंचित घटकांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सुरू केले. अनुसूचित जातीच्या उमेदवारांना कौशल्य विकासचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन  प्रशिक्षण संस्थेमार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित झालेली आहेत. 

 राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग  विशेष मागास प्रवर्ग यांच्या जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठीही या संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या 15 विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांशी समन्वय साधून समित्यांनी साधलेल्या प्रगतीबाबत कामाचा आढावा घेणे  त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे या कामासाठी ‘मुख्य समन्वयक जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या’ (Chief Co-Ordinator Caste Validity Scrutiny Committee) म्हणून बार्टीच्या महासंचालकांना नियुक्त करण्यात आले आहे.

सामाजिक
 समता या विषयावर सखोल अभ्यास, संशोधन, प्रशिक्षणाचे भरीव कार्य व्हावे यासाठी उद्दिष्टे  कामे निर्धारीत केली असून त्यामध्ये खाली नमूद केलेली उद्दिष्टे  कामांचा समावेश आहे.

बार्टी संस्थेचे प्रमुख उद्दिष्टे

  1. सामाजिक समता  न्याय या विषयाशी सुसंगत बाबींशी निगडीत संशोधनात्मक उपक्रम हाती घेणे.
  2. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे मूल्यमापन करणे.
  3. संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी  शैक्षणिक उपक्रमासाठी संमेलन, व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  4. संस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असे वाचन साहित्य, संशोधनात्मक अहवाल, निबंध, नियतकालिक  पुस्तके प्रकाशित करणे.
  5. संस्थेच्या कामासाठी निधी जमा करण्यासाठी उपक्रम राबविणे.
  6. सामाजिक न्याय विभागाच्या विविध संवर्गातील अधिकारी  कर्मचारी यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविणे.
  7. संशोधन  प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे.
  8. विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली ‘सामाजिक समता’ याविषयी संशोधन करुन सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल, याबाबत संशोधन करणे.
  9. सामाजिक समता याविषयाशी निगडीत असे व्यावसायिक ज्ञान  अशा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी तरुणांना सुविधा उपलब्ध करुन देणे.
  10. त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशात्राच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण वाढ होईल, असे प्रशिक्षण देणे.
  11. समाजातील विविध स्तरामध्ये ‘सामाजिक समता’ या तत्वप्रणालीवर आधारीत सहकाराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि अधिक संशोधन करणे, त्यानुसार अनुभव, विचार  परिवर्तन करण्याबाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करुन ‘सामाजिक समता’ या कार्यास उचलून धरणे.
  12. महाराष्ट्रामध्ये योग्य ठिकाणी ‘सामाजिक समता’ तत्व प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी शाखांची स्थापना करणे.
  13. ‘सामाजिक समता’ या विषयासंबंधीत समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधन केंद्रांची स्थापना करुन चालविणे.
  14. संस्थेच्या उद्दिष्टांनुसार प्रस्तावित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करून त्यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे.
  15. समाजाच्या पुन:सरण उद्दिष्टानुसार पारितोषिके, पुरस्कार, शिष्यवृत्ती, विद्यावेतन यांना मान्यता देणे आणि त्या प्रदान करणे.

संस्थेमार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम

  1. महाड, जि. रायगड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा विकास  देखभाल.
  2. अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत जाणीव जागृतीसाठी कार्यशाळा.
  3. अनुसूचित जातीतील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद सदस्यांचे प्रशिक्षण.
  4. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन.
  5. संस्थेमध्ये अभ्यासिका, वाचनालय सुरू करणे.

यामुळे अनुसूचित जातीमधील पदाधिकारी, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांना बार्टीचा आधार वाटतोय.

 

                                                                                                                     श्वेता पोटुडे – राऊत

                                                                                                प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी

                                                                                                हिंगोली

*****