15 June, 2022




 

उमेद व हिमालया वेलनेस विक्री केंद्र उदघाटन  व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 :  उमेद अभियानातील समाविष्ट प्रभाग संघ, ग्रामसंघ, स्वयं सहायत्ता समुहातील महिलांना हिमालया कंपनीचे उत्पादन विक्रीतून उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण होत आहे.  यामुळे हिंगोलीमधील समगा व औंढा तालुक्यातील येडूत या गावी दि. 14 जून, 2022 रोजी उमेद व हिमालया वेलनेस विक्री केंद्राचे उद्घाटन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद शाळा, शेती, सामुहिक रस्ते व वैयक्तीक निवासाच्या ठिकाणी फळझाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी उपस्थित महिलांना विक्री केंद्र व्यवस्थापन व विक्री कौशल्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा अभियान व्यवस्थापक जे. व्ही. मोडके तसेच हिमालया वेलनेस कंपनीचे राज्य विपणन व्यवस्थापक अभिजित गायकवाड, जिल्हा व्यवस्थापक किरण गुरमे, जिल्हा व्यवस्थापक विक्रम सारस्वत, जिल्हा व्यवस्थापक राजु दांडगे , प्रायमुव्ह संस्थेचे टास्क मॅनेजर दादा  खाडे, प्रभाग समन्वयक जांबूतकर यांनी उपस्थित महिला व समुदायस्तरीय संस्था पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.

क्रांती महिला प्रभाग संघ समगा हिंगोली व प्रभात महिला ग्रामसंघ, येडूत ता. औंढा नागनाथ या महिला स्वयंसहायत्ता समुह व विविध समुदाय संसाधन व्यक्ती यांच्यामार्फत हिमालया वेलनेस कंपनीचे उत्पादने ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गरजू  ग्राहकांना अस्मिता बाजार या मोबाईल अॅपवरुन ऑर्डर दिल्यानंतर समुहातील महिलांना ही उत्पादने दोन्ही ग्रामसंघामार्फत घरपोच मिळणार आहेत. ही  उत्पादने विक्रीमुळे 15 ते 20 टक्के फायदा होणार आहे.  ही विक्री सेवा देणाऱ्या स्वयंसहायत्ता समुहास उपजीविका निर्मितीची शाश्वत संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात अनेक उत्पादने विक्रीची संधी या विक्री केंद्राना उपलब्ध होणार आहे.

*******

No comments: